Sunday, 19 March 2017

आत्मझुंज..!

                                                    आत्मझुंज
-                                                                                                                                                                                       शैलजा खाडे-पाटील
                                                                         
अया अया आईगंssss आरं बघ की किच्चच्या काय रगात आलंया पार आंगठा चिघाळलाया बघ!” मी इव्हळत हुतो आणि घोरपड्यांच अमऱ्या माज्याकडं बघूनशान बत्तिशी काढीत हुत. मी तेच्याकडं फणकाऱ्यानं बघितल तस तेन माझा योक हात आपल्या खांद्यावर घेतला आणि आम्ही माझ्या घरला निघालो.
 आर शिवा, लेकाच्या तरी तुला मी सांगीत
हुतो त्या सुताराच्या झाडाचं आंब आपणासनी लय महागात पडत्याल म्हणून..पर तुझी खुमखुमी नडली. त्याच्या दगडाचा मार वाचवाया गेलास आणिक ठ्याच लागून उताना झालास. तरी बर मी वाचलो बाबा. घर येईपातुर ह्यो माझा दोस्त मला लय शानपनाच डोस पाजीत हुता.
त्यो काय बोलतोय यापरास, माज्या मनात बा च्या हातातलं ठेंगड नाचत हुत. आता घरला गेल्यावर आपल काय खरं नाही या भ्यानं माजा अंगातला सदरा घामानं पार वल्ला चिप झालां हुतां. घर जवळ आलं तस मला अमऱ्यानं उंबऱ्यावर टीकीवला आणि माज्या बा च्या भ्यान त्यो पार तर्राट चालता झाला. परड्यातल्या म्हसरांच्या शेडची डागडुजी चालू हुती तोवर तात्पुरती सोय म्हणून बा म्होरच्या लांबड्या सोप्याच्या मधोमध एक तटावनी घालून दुसऱ्या बाजूला म्हसरं बांधाया जागा करीत हुता. हाय ती शेणाची भुई उकरुन त्यावर पाणी मारुन बुरुम टाकलेला, आणि त्यो बारीक बुरुम त्यो चोपण्यान चोपून बसवत हुता. जसा मी उंबऱ्याच्या आत पाऊल टाकल तस बा न माजा कानोसा घेतला.
 सुक्काळीच्या कुठं दिस-दिस भर बोंबलत फिरत हुतास, इवढी १० वी पातुर शाळा शिकीवली त्यात बी त्वांड काळ केलसं, आई बा शेतात मर मर राबतुया आणि ह्यो गावात उनाडक्या करीत फिरतुया. अस म्हणत बा न त्येच्या हातातल चोपण माझ्याकड नेम धरुन मारलं आणि ते नेमक माझ्या ठेच लागलेल्या अंगठ्यावर येऊन आदळलं.
आंगठ्याच्या पारच चिंध्या झाल्या अन् त्यातन रगात पागळु लागल. तस मी पायाचा आंगठा एका हातात उचलून दुसरा हात तोंडावर नेऊन पार बेंबीच्या देठापासनं  आरडायला लागलो. माझ्या आवाजानं मागच्या परड्यातन आई शाण कालिवतेला हात पटाकदिशी धुऊन पुसतच सोप्यात आली. तिन मला मायेन जवळ घेतलं तस मी बा कड कायतरी जिंकल्याचा आव आणूनशान नजर टाकली. बा चा रागाचा पारा हुता तसाच हुता. त्यान माज्यापाशी पडलेलं चोपण घेतल आणि बुरूमाच्या जागी मीच असल्यागत हाय नाय तेवढ्या ताकदीन बुरूम चोपायला लागला. आईन माज्या चिंध्या झालेल्या आंगठ्याकडं बघितलं तस तिला माजा लयच कळवळा आला. तीन लगट हळद आणून त्यावर टाकली तस माज्या अंगातनं साणकन् झिणझिण्या आल्या मनातल्या मनात त्या सुताराला मी एक शिवी हासडली आणि तिथच टाकून आलेल्या आंब्यासनी पण.
 आईनं तिच्या फाटक्या लुगड्याच काठ टराटरा हातान फाडून माझ्या त्या आंगठ्याला बांधत बांधत ती बा ला बोलली तुमासनी माझ्या लेकराच दुखण दिसत न्हाई व्हय, आदीच भुक्याऊन आलं असलं ते, बघिल तवा तेचा पानउतारा करीत असतायसा काय बी वंगाळ नगा बोलत जाऊ माझ्या वाणी तीनीच्या हिऱ्याला”.
तुझच लाड नडत्यात, हिऱ्याचा पार कोळसा व्हाया लागलाय दिसना व्हय तुला. बा बोलला.
आव कस बी आसलं तरी पदरच हाय ते, सगळीजण देवळात जाऊन देवाला नवस बोलत्यात पर ७ व्या महिन्याच पॉट घीऊनशान मोठ्या हौसनं त्यो ढाण्या गड चढुन माज्या मनात हेरल हुत की शिवबा राजां सारख पराक्रमी लेकरु माझ्या पोटाला याव म्हणून. 
हे ऐकुन बा उठला अन् त्यान तांब्याभर पाणी ढसढसा गळ्याखाली उतरवल...जणु त्यो माझ्यावरचा रागच त्या पाण्यासोबत गिळत हुता. डोळं पुशीत पुशीतच हात धुऊन आईनं थाटीत वाढलेलं वरण्याच्या शेंगांच कोरड्यास आणि लालभडक तांदळाचा पाण्या भात मी गट्टम केला. आंबं न्हाई ते न्हाई तरी बर या भातान मला तारल. कोन्यात गेलो आणि गुधडी अंगावर घेऊन अश्शी ताणून दिली. पडल्या पडल्या डोळा लागला. तस मला सपान पडलं त्यात मी आंब्याच्या झाडाऐवजी गडावर चढीत हुतो अन् गावातली समदी पोर बी सोबतीला हुतीत माज्या हातात एक मशाल बी हुती. ती इझु नये म्हणूनशान मी दमानं चालीत हुतो. पर चालताना माज्या पायात एक काटा रुतला, लय जोरात कळ आली. पर मशाल माझ्या हातात हुती म्हणून मी जोराच्यान माज्या पुढ चालत असलेल्या गजाला हाळी दिली. मला पायातल्या कळ नं कायबी सुदरना. मी तशीच मशाल गजाकड झोकून दिली. त्यानं बी ती आचुती झेलली आन् त्यो ती मशाल घेऊन चालू लागला. तवर मी पायातला काटा काढला..तस बळकन रगात बाहेर येऊनशान सणक भरली. तसा मी जोरात आरडाय लागलो.
 हेच्या मारी झोपत बी आराडतयं बेनं, कशाला उठतायसा आता राजं तुम्ही. त्यापरास उद्या सकाळीच उठनासा, आई बा हाय की दिमतीला तुमच्या”.  म्या खाडकन डोळ उघडलत बा बडबडत हुता.
 आन् डीरीत दूध घालायला म्हणून खुट्टीला अडीकलेली किटली काढताना ती नेमकी माज्या ठेच लागलेल्या पायावर पडली हुती म्हणून मी आरडत हुतो. पर मी सपनात बी आरडत हुतोच की. मला ते सपान खर की हे किटलीच दुखण खर काय उमगनाच. त्या इचारातच मी चुळ भरली आन रोजच्यासारखं आईनं नुकतच धार काढलेलं कासांडीतल आकडी दूध मला प्याला दिल. दुधाचा पेला रिता केला. आणि भितीच्या आरशात त्वांड बघितल व्हटावरच्या पांढऱ्या मिशा बघून माजी छाती एकदम फुलली. 
त्या मिशाकड बघत बघतच म्या आईला इचारल, आये खरचं का ग मी तुझ्या पोटात असताना, मी शिवाजी राजावानी हुशार नि पराक्रमी बनाव अस तु मनात हेरली हुतीस? मग मी त्यांच्यासारखा हुशार का नाय झालो?”
व्हय रं माझ्या सोन्या आणिक तु बाळुत्यात हुताच तवाच राजांच्या जन्मादिशी गडावर जाऊन राजांच्या पुतळ्यासमोर तुला आडव टाकल नि त्यांच उपकार मानलत. त्या शिवजयंती दिशी आपली दानत नसताना कुटन कुटन जुडणी करुन गावातल्या समद्या गोरगरिबासनी एक एक पायली जुंदळ वाटल हुतत तुझ्या बान. आई चुलीवर भात चढवीत चढवीत बुलली.
 “आये पर राजांवानी माझ्या हुशारीच काय बुलली न्हाईस ते?” आरशात बघीत केसात कंगव्यान भांग पाडीत पाडीत मी इचारल.
शिवबा च्या नावावरन तर तुझ नाव शिवा ठेवल. पर बाळा एक ध्यानात ठेव देवाचा, आणिक राजांचा आर्शिवाद जरी तुझ्या पाठन हायच. म्हणुनच सांगतो, तुझी हुशारी तुझ्या भल्या कर्मातच हाय. आर साळतल्या पुस्तकात काय समद्यांचच डोक नाय चालत, पर जे काय काम धाम करशील ते चांगल आन् जीव लावून केल की हुतय की राजावानी हुशार.असं म्हणत ती परड्याकडला एखाद दुसर शीणकुट आणाय गेली.  
साथियॉं ये तुने क्या किया..बैरिया ये तुने क्या किया... तेवढ्यात शेंगांच्या टोपल्यावर ठेवलेल्या मोबाईलची रिंगटोन वाजली. अमऱ्याचा फोन हुता.
 आर शिवा इ की लवकर, कवाधरन वाट बगतुय आम्ही सगळी चौकात इथ. अस म्हणून मी काय बोलायच्या आतच त्यान फटाक कन फोन बंद बी केला.
तेला त्याच्या टॉकटाईम ची लयच चिंता. मग मी मोबाईलच्या दोनी बाजुची टोपणं आगुदरच बांधलेल्या रबरानं आणखीनच घट बशीवलीत पार मोडकळीला आलत ते डबड. कवा ३-४ वर्षापूर्वी रमेश दाजींनी मंजे माझी चुलत बहीण गीता आक्काच्या नवऱ्यान बा ला लय हौसेन घीऊन दिलेला हुता त्यो मोबाईल. रमेश दाजी खर तर लय भला माणूस. शेतीबदलच्या कुठल्या तरी हापीसात कारकून म्हणून कामाला असलेला. गीता आक्कालाबी कधी माग सर नाई म्हणणारा. बा नेहमी मला त्यांचा दाखला दीऊन टोमणं मारायचा. मला बी वाटायच मी तेंच्यासारखा १५ वी पातुर शिकलो असतो तर, माज बी कल्याण झाल असतं. पर डोस्क्यानं साथ दिली नाई माज्या. असा इचार करीत करीतच मी सोप्यातल पॅरॅगॉन शिल्पर पायात चढविलं आणिक डीरीच्या मागच्या आळीनंच निघालो कारण डीरीच्या गल्लीन गेलो असतो तर, परतीला येताना डीरीत दूध घालाय गेलेल्या बा न मला बगुनशान परत शिव्यांचा शिमगा चालु केला असता. चौकात गेलो तर, गजा, अमऱ्या, भिका, संद्या, इठ्ठल, अशी समदीजण माझीच वाट बघीत हुतत.
आर शिवा लेकाच्या कवाच्या काय खोळंबलुय तुज्यासाटन. बर समदी ध्याना मनान ऐका र, आपल्याकड टोट्टल ३००० रु. वर्गणी म्हणून जमा झाल्यात तवा त्येचा वापर यवस्थित झाला पायजे”. अमऱ्यानं वर्गणीची वही म्होर ठेवली आणिक अजून कोण कोण वर्गणीच बाकी आहे त्यांची नाव बी वाचून दावली.
बर ते संबा तारदाळकराची गाठ घेतलीस काय र तु मांडव आणिक डॉल्बीसाटन?”  भिका संद्याला बोलला.
 आर पयला मशाल, पताका, फूल , हार, तोरण, आन परसादाचा मेनु याच काय ते ठरवूया. काय रं शिवा?”  गजानं तोंडातला मावा थुकत इचारल. त्याच्या माव्याची पिचकारी थेट माज्या पायापशी येऊन पडली. तस माज टाळकं फिरल.
ये गजा लेकाच्या मंडळाचा नियम इसरलास व्हय, सुपारीच्या खांडाला बी शिवायच नाही असं ठरलय आपल का घालू तुज्या टाळक्यात धोंडा?” मी बोललो, तस गजा चटपाटलं आणिक त्यो समदा मावा थुकून चुळ भरून आला.
  हे सगळ ठीकाय पर मला काय वाटतय, आपण या साली एकांद्या शिकल्या सवरल्या आणिक ज्याला राजांची महती यवस्थित ठाव आसल अशा माणसाला आपल्या गावात भाषणासाठी बुलिवल तर काय हुईल रं?”  इठ्ठल बोलला.
 त्योच काय ते आमच्यापैकी पुस्तकातल्या डोस्क्यानं हुशार हुता. तालुक्यातल्या कालेजात बी जाईत हुता. त्याच्या या बोलण्यान आमी समदी एकमेकांच्या तोंडाकड बगाय लागलो. त्यो बी जरा बावचळला. मग आमी जरा इचार करून ठरवितो अस त्याला सांगून टाकल तोवर त्यानं त्यो भाषणासाठीचा हुशार माणूस शोधायचा अस ठरल. परसादाचा मेनू, शिरा ठरविला आणिक शिवजयंतीच्या आदल्या रात्री कुणी कुणी कनच्या मार्गान, ढाण्यागडावरन मशाल आणाय जायाच ते बी ठरल. राजांचा पुतळा कनच्या दिशेला, मांडवाच्या मधोमध की तिरका ठेवायचा ह्याची बी आखणी झाली. डॉल्बीच बजेट लयच भारी हुत त्यामुळ डॉल्बीच मागन बघुयात अस ठरलं. मग समदी आपापल्या घराकडं पांगली. रातच्याला बाच्या तोंडाम्होर नग म्हणून रोजच्या सारखं पयला बा जेवला. मागून आई आणिक माज जेवाण झालं. परड्यात आई भांडकुंड कराया गेली. जाताना चुलीतला इस्तु निखारा तव्यातन घेऊन गेली. आणि मोडक्या शेडपाशी तीन त्यो तवा पालथा केला. मग मी बी चुली म्होरली फुकणी घेऊन परड्यात गेलो. सक्रात सपून महिना हुन गेला तरीबी अंगाला लय थंड झोंबायची, म्हणून मी तिथलच वाईच जळाण काढून त्या इस्तवावर टाकल, फुकणीन फुंsssफुंsssकरीत जाळ केला. मग आई भांडकुंड करीस्तोवर मी शेकत बसलो.
मनात नाना इचार इत हुतत. आपणाला सलग ४ वरसं वाऱ्या करुन बी १० वी का नाय सुटली...सुटली असती तर आज बा बी माज्यासुबतीला शेकत बसला असता...खरच आपण बीनकामाच हाय काय..आतापातुरच्या जिंदगीत आपुण कुणाला बी कधी दुखीवल नाय..कुणाच वाईट वंगाळ तर आपल्या मनाला बी कधी शिवल नाय...आता तर बा सारख म्हणत असतुया वरीस भरान हेला दावं लाऊन टाकायच...मग सरी ला काय सांगू? ती तर लगीन केल तर माज्यासंगंच, म्हणून अडून बसलीया माजा बी जीव तिज्यात गुतलाय...हीथ माझीच जिंदगी दावणीला लागलीया आणिक तिला बी कशाला त्या दाव्याला बांधून ठीवू?...जाळ जसा इझत चालला तशी माझ्या काळजात लयच कालवा कालव व्हाया लागली...राख हुइत आलेल्या शेणकुटावर काटकीन टोचा मारीत बसलो...नीसती काटकी शेणकुटावर टीकीवली तरी त्येच ढेपाळ हून ते इझायच...मला बी त्या ढेपाळलेल्या शेणकुटागत इझतुय का काय अस वाटाया लागल.
शिवा बाळा रात लय झालीया..कुत्री बघ कशी भुकाया लागल्यात चल आता नीजाया.आईच्या बोलण्यान मी भानावर आलो.
नीज लागली तस दुपारच गडाच तेच सपान परत पडलं. जस १० वी च्या वाऱ्या कराया लागलो तस मला सारखी गडाची, मशालीची सपनं पडत हुतीत. पर एक मातुर हुत की सपनात कधी बी मी गडापातुर पोचायचो नाय. सपान पुरं व्हायच्या आत माजा गाढ डोळा लागायचा नायतर मध्येच कायतरी खोडा होऊन मला जाग यायची. सकाळी डीरीच्या भोंग्यान जाग आली. आंगुळ-पाणी करुन चुलीम्होर शेकाय बसलो. आई बा दोघ बी आंबाड्याची भाजी, दही अन् भाकरीची न्याहरी करीत हुतत. आईन लगट च्या-वरकी खाया दिल. मला च्या मदी दुधाची घटरबुट शाय घालून त्यात वरकी बुडवून खायला लय आवडायच. म्हणून आईन माज्या च्यात वरन बक्कळ शाय वतली. ते बा ला लयच झोंबल.
घाल घाल म्हसराटाला बक्कळ शाय घाल आता ऊठून पावडर लावून हिंडायला जाणार नाही का, तवा पोटात रतीब नग व्हय तेला, हिंडायला चांगली ताकद याया पायजे. बा असा बोलला तवर आईन रागान एक नजर बा वर टाकली. तसा बा ऊठला आणिक खुट्टीवरचा वळकटीचा दोर घेऊन वैरण आणाय गेला. तवर आईन कालच्या माज्या आंगठ्याच्या जखमेवर परत दवा पाणी केल.
शिवा म्या बी आवरून शेताकडं जातु. भूक लागली की शिक्क्यावर बुट्टी हाय त्यातली भाजी भाकर खा हां”.  आई बोलली.
मी मान हालिविली. मी बी पावडर भांग आवरून बाहेर पडलो. अमऱ्याच्या घरला जायला निघालो. ४ दिस झाल तरी सरी ला बघितल नव्ह्त कससच वाटत हुत म्हणून मुद्दामच अमऱ्याकड जायचा बेत केला. कारण सरीच आणिक अमऱ्याच घर समोरासमोर हुत. गेलो तर अमऱ्या आणि त्याची आजी उंबऱ्यावरच मक्याची कणस सुलीत बसली हुतीत.
आर शिवा ते शिवजयंती दिशी कान फुटत्याल मशीन लावू नगा बाबांनो त्यापरीस आम्हां सारख्या म्हाताऱ्या-कोताऱ्यासाठी रातच्याला ग्वाड वाणी भजन किर्तन ठेवनासा”.  अमऱ्याची आजी किस्नाआई बोलली.  
बघु की किस्नाआये, तस बी यंदा बजेटमदी डॉल्बी बसतच नाय. इचार करुया तुज्या भजनाच्या कारेक्रमावर काय र अमऱ्या?” अस म्हणून मी अमऱ्याकड बघितल तवर तेन सरीच्या घराकड नजर टाकून तशीच माज्याकड वळीवली.
 मला काय कळायच ते कळल. मग मी बी कणसं सोलाय घेतली पर मनान सरी बाहेर कवा येती याची वाट बघीत बसलो. सरी कोंबडींची खुराडी झाडायला बाहेर आली. तिची बी नजर माज्याकडच गेली. पर नाक फुगवून व्हट चावीतच ती रागान आत गेली. ते तास गेला तरी बी बाहेर ईना.
आर शिवा जरा काम धाम कायतरी करीत जा. किती दिस अस गावातन मोकळा फिरायचास. हे आमच बेन अमऱ्या आणिक तु दोघं बी एकाच माळचं मणी. अशा आळसुट्यापणान तुम्हाला पुरगी बी कोण देणार नाही लग्नासाटनं. तुला सांगते शिवा ज्या पुरीच्या नशीबाला नवरा चांगला तिच समदी जिंदगी फुलावानी फुलतीया बघ. आता आमच्या दाराम्होरली सरी तिच्या बी आई बा ला लय घोर लागलाय बघ, कसा नवरा मिळतुय तिला हेचा. आंवदा तिज लगीन कराय काडलय. किस्नाआई बोलली. हे ऐकल्यावर माज्या हातातल सोललेल मक्क मी बीरमुटाच्या ढीगावर टाकलत आणिक बीरमुटा सोललेल्या मक्क्यात. माज काळीच झर्र झर्र व्हाया लागल.
आर आर शिवा काय झाल तुला बीरमुट्यात मक्क नगस टाकू. का तुला सुदरना झालयकिस्नाआईन मला टोकल तसा मी भानावर आलो. माज डोळ पाण्यान डबडबल. अमऱ्यान माज्या मनातली कालवाकालव वळखली.
आये यातली कवळी कणस सरीला बी देणार हुतीस न्हव का मक्याचा चिवडा कराया. दे मी दीऊन येतोअमऱ्या किस्नाआई ला बोलला. तिनबी आतल सुप आणल ते भरल आणिक अमऱ्याच्या हातात दिलं.
आये वाईच थांब पोटात लयच कळ मारालीया आलो मी अस म्हणून अमऱ्यान सुप ठीऊन मला डोळा मारला. आम्ही माग परड्यात गेलो आणिक....
माज्या पाखरा, मला ठाव हाय ४ दिस झाल भेट नाय. पर तु चिडु नग. आणिक लग्नाच काय बी टेन्शन घीऊ नग...मी तुला येत्या पाडव्याच्या मुहुतुरावर रितसर मागणी घालीन. तवर जीवाला जप. तुजाच शिवा.अशी एक चिट्टी लिहीली.
परत सोप्याला येऊन मक्याच सुप घेतल, सरीच्या उंबऱ्याला गेलो. सरी काला वडीत हुती. शेणाच्या हातासकट ती आमच्यासमोर येऊन उभी राहीली. मी सुपातल्या मक्क्यात चिट्टी लपिवली आणिक अमऱ्यानं ते सुप तिच्या हातात दिल.
किस्नाआईन दिल्यात मक्क तुला खायाला. आणिक यवस्थित चिवडा बनीव. खाऊन झाल्यावर सांग तुला मक्क आवडल का नाही ते.अमऱ्या तिला बोलला. माज नशीब तिला बी त्यातलं शिक्रेट कळल. ती लाजनं चुर्र झाली. तवर आतन तिच्या आईचा आवाज आला. तस तेवढ्या मिनीटभरातच म्या तिला डोळंभरुन बघून घेतलं. अमऱ्यानं माजा हात दाबला. आणि आम्ही तिथन काढता पाय घेतला.
परत दुपारच्याला घरचा रस्ता धरला. घरात गेलो पर भूक मेल्यागत झालती. नीसत घटाघटा पाणी पिऊन कोन्यात जाऊन पडलो. पर मन अजून पण सरीच्या डोळ्यामदीच घुटमळत हुत. तसाच इचार इचार करीत करीत डोळा लागला. ते थेट सांजच्याला आईच्या आवाजानच मला जाग आली.
आर बाळा तु जेवला का नाहीस दुपारच्याला, भाकर तशीच हाय वाटत शिक्क्यावर. हे घे दूध तरी पिऊन घे.आय बोलली. मी दूध पिलो पर हाय त्या गुधडीतच मान खुपसून बसलो. आईन माजा रागरंग वळकला. जेवाण करता करता तिन मला हाळी मारली. मग मी बी तिच्याजवळ चुलीम्होर जाऊन बसलो.
मला ठाव हाय समद, तु का गप गप हायस. तुज्या मनात अण्णा खोताची सरी भरलीया मी वळिकलय कवाच. खरं सांगू? मला बी ती पुरगी झाक वाटती बग. बारक्यापणा पासन तिला बगीत आलुय मी. चांगल्या वळणाची हाय लेकआय मला बोलली.
 तस न्हव ग माय पर तीज आता लगीन कराय काडलय तिज्या घरच्यांनी. आणिक तुला पटली की झाल नाय, बा ला बी पटाया पायजे. इचारान डोस्क्यात किड पडल्यागत झालय बग माज्या”. मी बोललो.
आर लेका माग मी सरीच्या बा ला तिच्या लग्नाबद्दल ताडून बगीतलय. तेला नुकरीधंदा करतेला जावई पायजे. आन् तुजा नुकरीचा पत्ता तर लांबच आणिक लोकाच्या राहील पर आपल्या सोताच्या शेतांमंदी बी कदी फिरकत नाहीस. म्हणून तर तुजा बा भी सरळ डोक्यान वागत नाय तुज्यासंग. माज ऐक लेका वाईच शेताकड ध्यान दे. तु नाय बघणार तर कोण बघणार सांग बर मला?” आय काळजीपोटी बोलली.
आये माज अज्याबात मन रमत नाय बघ शेतात. ढोरागत राबाया मला जमणार नाही. तुला कितीदा सांगु. माज्या मनाला पटल तेच मी करणार. जरा टाइम काढ. आदी लगीन हुदे मग बघतो.मी संतापून बोललो.
तशी आई गप झाली. आईन तव्यातली भाकरी काढली आन् चुलीतला निखारा बाहेर वढून त्यावर भाकरी चुलीला टिकवून खरपूस भाजाया ठेवली. चुलीवरचा त्यो रिकामा तवा बघूनशान माजी बी जिंदगी या चटकं बसतेल्या रिकाम्या तव्यागत झालीया का काय अस मला वाटाया लागल. तेवढ्यात त्यात आईन मीठ भरलेल्या वल्ल्या मिरच्या टाकल्या आणिक तेच्या ठसक्यान माजा जीव बेजार झाला. बाहेर परड्यात आलो. तिथल्या मोडक्या शेडच्या मेडक्याला टिकून उभा राह्यलो. वर आभाळाकड नजर गेली. चंद्राच्या परकाशान समद आभाळ भारल हुत. त्या चंद्राच्या जागी मला फकस्त सरीचा हसरा चेहराच दिसु लागला. आणिक तेच्या भोवतीच्या चांदण्या मंजी सरीच्या हनुटीवरच, कपाळावरच गोंदण भासू लागल. या तंद्रीतच आईन जेवाया हाळी मारली. त्या राती बा दुसऱ्या वाडीवर कुणाच तरी माहीच आवातन हुत तिकड जेवाया गेलता. मग आईची अन् माजी जेवणं झाली. तेवढ्यात इठ्ठल दारात अडखळलेला दिसला. त्यानं त्यो शिवजयंती दिशी राजांबद्दल भाषण देणारा हुशार माणूस हुडीकल्याच मला सांगितल. त्यो ज्या कालेजात जाईत हुता तिथलच इतिहासाच मास्तर भाषणाला यायला तयार झालतत. मला त्याच पटलं तवा तेच्याच फोनवरन समद्या मंडळाच्या सदस्यासनी सांगून मी त्या भाषणासाटीच पक्क करून घेतल. मग हाथरुनावर पडलो. परत ते गडाच आणिक मशालीच सपान मला पडलं....ते पुर व्हायच्या आतच गाढ डोळा लागला असल.
काय स्वारी लय खुशीत आणिक जोमात दिसतीया आज जणु? आक्शी माजा शिवा राजा शोबून दिसतुयस बघ. थांब तुजी दिष्टच काढतो. आई माज कौतुक करीत हुती. मी आमच्या स्व. आज्याचा जुना भगवा फेटा डोक्याला बांधतेल बघूनशान आईला भारी अप्रुप वाटल.
अग आये उद्याच्या शिवजयंतीच्या तयारीला चाललोय, आज राजांची मशाल आणाया जायाच हाय. मग राजावानी दिसाया नग व्हय आणिक यंदा आमी डॉल्बी न्हाय तर राजांची महती सांगणारा एक हुशार माणुस भाषणाला बुलीवलाय.मी अभिमानान तिला बोललो. मग आईला माजा लयच अभिमान वाटला. तसाच फेटा बांधूनशान चौकात गेलो. समदी दोस्त मंडळी जमून राजांसाठीच्या मांडवाची तयारी करीत हुतत. मी बी ऐदान घीऊनशान मांडवासाटन भुई उकराया घेतली.
आर हे बेन आता आपल्या सोताच्या लग्नाचा मांडव घालायच्या वाटणीच राजांच्या उत्सवाचा मांडव घालतय व्हय अजून. हेच्या नादान आमच अमऱ्या आन् गावातली पोर बोंबलत मुकळी हिंडाया चटावल्यात बगा.
 “आर हेला तर लुळी-पांगळी बी पुरगी कोण देणार न्हाय...नीसत घोड्यागत उधळत फिरतय, ना काम ना धंदा..आई बा च्या कष्टाची जरा बी चाड न्हाय बग तेला.
तेल्याचा अप्पा, पराडकरांचा दादा, अमऱ्याचा आज्जा अशी कोण नी कोण समदी मांडवाकडच्या पारावर बोलत बसली हुतीत. त्यांच हे बोलण माज्या कानावर पडल तस माज्या हातातल ऐदान हाय नाय तेवढ्या ताकदीन मी भूईत मारल तस हाताच्या इतभर आत ते ऐदान जाऊन बसल. ते काय केल्या बाहेर निघना. माज डोळं पाराभोवतनं भिरभिरु लागलत. रागानं लालबुंद झालत. पर दुसऱ्याच मिनटाला त्यातनं घळाघळा पाणी व्हाया लागल. गड्यासारखा गडी म्हणून कोणतर रडत्याल बघून हसल की काय अस वाटून मी भुईची धूळ डोळ्यांत गेल्याच नाटक कराया लागलो. आपली आपल्या घरात, भावकीत, गावात, काय बी लायकी नाय अस वाटुन मी चोरुन चोरुन मुसमुसायला लागलो. कससच व्हाया लागल. तेवढ्यात, पारावर मला एका येगळ्याच चेहऱ्याचा भास झाला. डोळ चोळून पुन्हा पुन्हा बघीतल तर त्यो राजांचा चेहरा हुता. संद्या, राजांचा पुतळा साफ करीत हुता. मी बी तेच्यापाशी गेलो. राजांची भेदक नजर,  धारदार नाक, पराक्रमी तलवार, वाघावानी निधडी छाती, बघितल्यावर माजा बी ऊर भरुन आला. त्यासनी बघितल्यावर माज्या डोळ्यातल पाणी आपोआप थांबल.
मी माज्या घशातला रडकुंडीचा आवंढा गिळीत मशालीच काय ठरलं रं?” संद्याला इचारल.
 जाऊया की रातच्याला, जेवणं आटपून. तु, मी, अमऱ्या, गजा आणिक भिका. पर शिवा तुज्या तर आंगठ्याला लागलय तुला पळायला ईल का मशाल घीऊन?”  त्यो बोलला.
माज नाव शिवा हाय, ह्या शिवबांसाटन मणभर दुखनं अंगावर घीन मी, आणिक तु या कणभर जखमचं काय कौतुक घीऊन बसलायस मर्दा.मी बोललो तस संद्यान माजी पाठ थोपटली.
 मग मांडवाच काम एकदम झाक झालं. उद्याच्या रातीला भजनासाटन वरतीकडच्या पाटणंवाडीतल्या भजनी मंडळाला यायच आवातन दिऊन आलो. त्या भाषणाच्या इतिहासाच्या मास्तरांना बी फोनाफोनी झाली. अशा समद्या तयारीत दिस कधी मावळला ते ध्यानातच नाय आलं. डीरीच्या वाटनं घरला निघालो. तवर बा डीरीत दूध घालूनशान माज्या पुढच्या पावलावर चालीत हुता. तेला बघितल्यावर मी खाल मान घालून, रस्त्याचा एक बारका दगूड पायान हळूहळू ढकलीत तेच्या माग माग चाललो. तेवढ्यात तेच्या पायतानाचा आंगठा तुटला त्यो थांबला तसा मी बी थांबलो, लगट भोसल्याच्या घराकडच्या बारक्या बोळात लपलो. बा न तुटलेल पायतान हातात घेतल. तुटलेला अंगठा परत घुसवायचा प्रयत्न केला पर तेच पायतान पायात घालायच्या बी लायकीच राह्यल नव्हत. तेच्या पायतानाला बारकी बारकी भिसकं पडली हुतीत...आणिक तरी बी त्यो पैक्याला पैका जोडीत ते जुनंपानं पायतान जमल तेवढ दिस वढीत हुता..तेला आजुबाजूच्या कसल्या जगाची नि लाजची फिकिर नव्हती.  बा च ते रुप बघून माजी मलाच लाज वाटाया लागली. मी सारख सारख माज्या पायातल्या शिल्पर कड आणिक बाच्या पायातल्या पायतानाकड बघीत हुतो. माज्या मनात नि डोस्क्यात घरच्या गरीब परिस्थितीच किडं वळवळाया लागलत. बा च साधसुध तुटलेल पायतान तेच्या मनात लपून बसलेल्या माज्याबद्दलचा मायेच्या उमाळ्याच कोड उलगडत हुत. शेवटाला त्यो आंगठा बसना म्हणून बान तसच तुटलेल पायतान चढविलं आणिक त्यो तसाच पाय वढीत पाय वढीत चालाया लागला. तसा मी बोळातन बाहेर आलो आणिक परत तेच्या माग माग चालाया लागलो. मला बी माज्या आंगठ्याच्या जखमन धड चालाया येत नव्हत. म्हणून मी बी लंगडत लंगडत तेच्या मागन चाललो. पर आमच्या दोघांच्या चालण्यात जमीन आसमानच अंतर हुत. बा ला तेची उघडी-वाघडी गरिबी चालवीत हुती पर मला माज्या अंगातली मस्ती चालवीत हुती. त्यो पायतान वढीत नव्हता तर, तेची फाटकी तुटकी जिंदगीच कशीबशी वढीत हुता. अशी फाटकी तुटकी जिंदगी माज्या बी नशिबाला नग म्हणून, आरडून-वरडून, मारुन-मुटकून कस जमल तस मला चांगल्या चुंगल्या मार्गावर लावायच्या बेतात हुता. सोताच्या गरजा मारुन मारून आई-बा माज्यासाटन तेंच जगणं पणाला लावत हुतीत. मला हे कळत हुत पर वळत नव्हत...या लाजखातर पायाच्या जखमच्या दवाखान्यातल्या इलाजासाटन बी तेंच्याकड पैशे मागाया मला लाज वाटाया लागली....
रातच्याला रोजच्यासारखी जेवणं झालीत. मशाल आणाया जायाचाय, तवा चौकात जमू. असा संद्याचा फोन येऊन गेला.
आये मी चाललो बघ मशाल आणाया. पहाटंला ईन.आज्याचा फेटा बांधीत बांधीत मी आईला बोललो.
 आर माज्या सोन्या तुजा चिगाळलेली जखम तरी बघ, कस कस जाणार तु या दुखण्यानं. आई दह्यासाटनं इरजान लावत लावत बोलली.
 आये शिवाजी राजांसाटन काय पण.. मी छाती फुलवून तिला बोललो.
बरं बरं लेका, पर दमानं जावा. संबाळा एकमेकास्नीआई काळजीपोटी बोलली.
मी चौकात गेलो तर समदी जमलेली हुतीत. समद्यांनी फेटं घातल हुतत. जय जय जय जय जय भवानी! जय जय जय जय जय शिवाजी! एकच ललकार झाला. थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घीऊन आम्ही ढाण्या गडाची वाट धरली. समदी अणवानीच हुतीत. पर मी एकल्यानच पायात शिल्पर घातल हुत. मग मी बी पायातल शिल्पर काडून हातात घेतल आणिक चालाया लागलो.
आर शिवा लेकाच्या, शिल्पर काडू नगस तुज्या पायाला जखम हाय नि लयच चिघळल ती.भिका माग वळत वळत बोलला.
 आर शिवबानी आपल स्वराज्य मिळवाया सोताच्या जीवाची बी कधी परवा केली नाही नि मी या शिप्पीएवढ्या जखमची कशाला करु. चला बिगी बिगी...मी भिकाबरोबर येऊन त्याचा हात पकडत बोललो.
 रातीच बारा वाजून गेल आसतील. रस्याला चिटपाखरु बी नव्हत. बाजूच्या शेतातल्या ऊसाच्या पातीचा सळसळ आवाज साथीला हुता.  नि मधनच एकांद्या घुबडाच वरडणं कानावर यायच. काजव्यांची किर्रकिर्र कानावर पडायची. घाटाकडन जाताना खालच्या अंगाला डबऱ्यात छोट्या छोट्या वाड्या वस्त्या मधलं मिणमिणत दिव बघितलत की धीर यायचा. कोणतरी आणखी चार माणसं संगतीला हायत अस वाटायच. जास्तच दम लागाया लागला की राजांचा नावाची गर्जना करायचो मग चालायला आणखीनच हुरूप यायचा. आमी मशालीच्या इराद्यान झाप झाप पावल टाकीत हुतो. तेवढ्यात मागन फटफटीचा आवाच आला. ती फटफट आमच्या बरोबर चालू लागली.
 आर दोस्तांनो आस चालीत चालीत गडावर पोचाया तुम्हाला उद्या दुपारच १२ उजडलंत्यो इठ्ठल हुता. तेच्या बा ची फटफट घीऊन त्यो आमच्या मागन मागन आलता.
 शिवा तुज्या पायाला लागलय तू बस गाडीवर आपण म्होर जाऊन मशाल आणू. ती इझणार नाही अशी गाडी मी चालिवतो बेतान. आणिक अर्ध्या वाटपासन मागारी समदी मशाल घीऊन परत येऊया बघा इचार करा लवकर”. फटफटीवरन लुडबूडीत लुडबूडीत त्यो बोलला.
 मी बसणार नाही गाडीवर.  दुसर कोण बी जावा, मी राजांसाटन असाच रातभर चालाया लागल तरी चालीन. काय बी होऊदे.मी घाम पुशीत पुशीत बोललो.
पर संद्याला इठ्ठलच म्हणणं पटल. तेला टाईम महत्वाचा हुता आणिक उजाडत्या येळी शिवजयंतीच्या बाकीच्या तयारीला बी लागायच हुत.  मग त्योच गाडीवर बसुन गडावर मशाल आणाया गीलीत. आम्ही चालीत राह्यलो. चालताना माज मन थाऱ्यावर राहीना..म्हणजे राजांचा इचार डोक्यात घोळत हुता. कवा ४ थी च्या पुस्तकात तेंचा इतिहास वाचला हुता, त्यावर नाही. पर तेंच्या महतीच्या खाचाखोचा मला मालूम नव्हत्या. ते इतिहासाच मास्तर राजांबद्दल काय काय सांगणार आसतील बर?..आपण तर राजांच्या नखाशी बी सर करू शकत नाही. नुसता तेंचा उदो उदो करुन उपयोग नाही तर तेंच्यावानी गुणान बी आपण बनाय पायजे. मग समदीजण मला नावजतील...पर आस काय कराया पायजे बर..? आस समद डोक्यात चालू असताना तास २ तास तरी गेला असल तवर समोरनं गाडीची लाईट डोळ्यांवर पडली. इठ्ठल आणिक संद्या मशाल घीऊन आलीत. संद्या गाडीवरन उतरतोय न उतरतोय तेच मी तेच्या हातातली मशाल माज्याकड घीतली. आणिक हाय ती वाट माघारी फिरवून भारभार पावल टाकाया लागलो. समदी माज्या सुबतीला चालाया लागलीत. राजांच्या उत्सवाची पुढची समदी तयारी कराया, स्वागत कराया इठ्ठल आणिक संद्या म्होर गाडीवरन निघून गेलीत. पहाटच ४ वाजाया आल असतील. गार गार वार अंगाला झोंबत हुत. फेट्याचा तुरा त्या वाऱ्याच्या नादावर नाचत हुता.  
आर शिवा तुच मगापासन मशाल घीतलीयास. तुजा आंगठा बघितलास काय पार चिंध्या झाल्यात तेच्या चालून चालून. मशाल जरा माज्याकड बी दी की मर्दा..त्या आंब्याच्या झाडाखाली टीकुया. जरा दमान घीऊया आणिक मग धरु गावचा रस्ता.गजा मला बोलला.
 नाय नाय नाय मशाल माज्या हातातच राहील. काय नाय होत माज्या जखमला, अस कितीस गाव लांब राहीलय तवा..चलाअस म्हणत मी माज्या चालण्याचा वेग वाढीवला..
थोड थोड पळायाच लागलो. कसलच भान नव्हत मला. ना झोंबणाऱ्या वाऱ्याच, ना भळभळणाऱ्या जखमचं. जखमतनं रगात टपकत हुत..तेच वण माझ्या प्रत्येक पावला पावलाला उमटत हुतत...जस काय ते माझ्या असण्यान नसण्याची जाण मी चालीत असलेल्या वाटला करुन दीत हुतत. घामानं आंग निथळत हुत. पायाच्या पिंडऱ्यासनी चालून चालून पेटकं आलं हुतत. पर कशाचीच तमा नव्हती. प्रत्येक पावलाला हातात अभिमानानं धरलेल्या मशालीची मूठ आणिखीनच आवळत आवळत चालली हुती. शिवाजी राजांसाटनं ह्यो शिवा ऊर फाटस्तोवर चालीत हुता, पळीत हुता. समदं देहभान हरपला हुता. फकस्त राजांच्या चेहऱ्यावरच तेज मला डोळ्यांसमोर दिसत हुत. इतिहासाच्या मास्तरांकडनं राजांची महती ऐकायला मिळणार म्हणून, मी येगळ्याच तोऱ्यात हुतो. चालत चालत कोण कुणासंग काय काय बोलतयं ह्याकड तर माज आजिबातच लक्ष नव्हत. तांबड फुटल हुत. लवकरच गावाची वेस आली. संद्या न तुतारी वाजिवली नि समद्यांना अष्टीगंधाचा नाम वडला. मग मांडवात गेल्यावर समद्यांनी राजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या शेजारी म्या मशाल उभी केली. त्यांना भगव वस्त्र अर्पण केलं. राजांच्या गळ्यात फुलांचा हार घालून नाम वडला. प्रत्येकांन कपाळी नाम वडून राजांना जीवा-भावान वंदन केल. मग समद्यांनी १० वाजता भाषणाच्या वेळी चौकात जमू अस ठरलं.
      घरला गेलो तर आई माजीच वाट बघीत हुती. तिन राहवून राहवून आंगठ्याच्या जखमवर दवापानी केलं. आणिक ती कपाटातल्या डब्यात बराच वेळ कायतरी शोधत राहीली. मग तीनं कारेक्रम झाल्यावर जखमवर इलाजासाठी दवाखान्यात जायाला माज्या हातावर २०रु. टीकीवलत. बा न माजी काय इशेष चौकशी केली नाही. परत चा-पाणी आटपून मी बाहेर पडलो. जाताना आईला आज शेतात न जाता चौकात राजांविषयीच भाषण ऐकायला या अस सांगाया इसरलो नाही. ते ऐकून, बा न जाताना माज्याकड बघूनशान नजरनचं चौकात यायची मूक संमती दिली.
      जाताना मुद्दामच अमऱ्याच्या सोबत जाऊ असा विचार केला. थेट अमऱ्याच्या दारात जाऊन तेला मोठ मोठ्ठ्यान हाळी माराया लागलो. तस किस्नाआई बाहेर आली आणिक अमऱ्या कवाच चौकात गेल्याच तिनं मला सांगितल. मी उंबऱ्यापासन माग वळलो तोच सरी तिच्या दारात रांगुळी काडीत हुती. माज्या आवाजान तिन माज्यावर नजर रोखली. मी बी तिच्या डोळ्यात डोळ घालून बघाया लागलो. माज्या सुख दुःखाला ती जिंदगीभर साथ देईन अस तिच डोळ मला सांगीत हुतत. शेवटाला तिनच लाजेनं नजर हटवून ती आत पळाली. मी परत भानावर आलो.
     चौकात आलो. जय जय जय जय जय शिवाजी!...जय जय जय जय जय भवानी! शिवछत्रपती महाराज की ज्जय्य!!!! समद्यांचा आवाजाचा नाद पार गावच्या वेशीपातुर घुमाया लागला. गावातली म्हाता-कोतारी, बाया-माणसं, पोरं-बाळ चौकाच्या तोंडाला यीऊनशान थांबलीत. तस ढोल-ताशांचा आवाज एकदम तालात घुमाया लागला. गावातली शाळंची पोरं लय हौसनं मांडवाम्होर लेझीम खेळलीत. भिका आणिक मी बापू सावंताच्या घराकडं गेलो. तेनीच परसादाचा शिरा बनिवला हुता. तेच आख्ख पात्याल आणून मांडवाखाली ठेवल. गावचं सरपंच, थोरं-मोठी मंडळी समदी जमली. समद्यांनी राजांना हार-फूल अर्पण करुन मनापासन वंदन केल. आया-बायांनी बी राजांना ववाळलं नि त्यांनी, पयल्या दिवशी राजदरबारी..आला वंशाला असा केसरी...बाळशिवाजी पयल्या अवतारी...जो बाळा जो जो रे जो असा राजांचा पाळणा बी म्हटला. तेवढ्यात संद्यान तुतारी फुंकली. इठ्ठलच्या मागोमाग ते भाषणासाटीच इतिहासाच मास्तर येत्याल दिसलं. मग इठ्ठलनच श्री. आनंद पवार अशी त्यांची समद्यांना ओळख करुन दिली. फूल, नारळ देऊन सरपंचांनी त्यांच स्वागत केल. राजांना वंदन करुन ते भाषणासाटी उभं राहीलत. परत एकदा राजांच्या शिवगर्जनेचा ललकार चहुबाजूंनी घुमला.
जिजाऊशहाजी पुत्र क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमन्महाराजाधिराज शककर्ते स्वराज्यनिर्माते श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की- असं त्या मास्तरांनी पुकारल्यावर आम्ही समदी जण हाय नाय ती शक्ती एकवटून जय! बोललो.
गावातले आदरणीय मान्यवर, तरुण तडफदार युवावर्ग, आणि माझ्या बंधु आणि भगिनींनो, आज महनीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही इतक्या उत्साहाने साजरी करताय ते पाहून मला अत्यंत आनंद होतोय. सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला आपण लोक अजुनही या शिवउत्सवाच्या माध्यमातून जिवंत ठेवलयं यातच खर तर शिवछत्रपतींच्या खऱ्याखुऱ्या महतीची आपणास प्रचीती येते. आज आपल्या समाजाला खरंतरं राजांच्या महान आणि दूरदृष्टी असणाऱ्या विचारांची गरज आहे. राजांनी स्वराज्याच्या शत्रुंवर कधी शक्तीनं, तर कधी युक्तीनं विजय मिळवला. त्यामुळच ते यशवंत आणि किर्तीवंत बनले. आज समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अशा विविध क्षेत्रांमध्ये जो भ्रष्टाचार, अन्याय सुरु आहे ते पाहता यावर मात करण्यासाठी आपण राजांच्या कर्तृत्ववान विचारांचे अवलंबन केले पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्रहो, राजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यातही एवढ्या तन्मयतेन सांगितला जायचा, वाचला जायचा की त्याकाळीसुध्दा, युरोपमध्ये द लंडन गॅझेट या दैनिकात पहिल्या पानावर २० फेब्रुवारी १६७२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची सुरत लूटीच्या दुसऱ्या छापाची बातमी आली होती. म्हणूनच लोकहो, असा सामर्थ्यवंत आणि वरदवंत राजा आपल्या महाराष्ट्रात घडला याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहीजे. राजांच्या अंगी प्रखर देशप्रेम ओतप्रोत भरल होत. आपल्या राज्यातील सगळ्यांना ते समान न्यायाची वागणुक देत असत. आज आजुबाजूला दिल्लीतल्या निर्भया सारखे आया-बायांवर अत्याचार होत असताना आपण पाहतोय. त्यासाठी सरकारने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी सुध्दा गंभीरपणे कुणी करताना दिसत नाहीय. पण ३५० वर्षांपूर्वी राजांनी आया-बायांवर अत्याचार करणाऱ्यां दुराचाऱ्यांना कठोर शासनाची शिक्षा सुनावल्याच इतिहास आपल्याला सांगतो. आणि तेवढाच जरबही त्यांच्यावर बसत असे. राजांनी नेहमीच आपल्या जनतेच्या भल्याचा विचार केला. त्यांनी प्रत्येक कार्यात दूरदृष्टी ठेवली.
 आजच काय तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यकाळातही स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या देशप्रेमींना राजांच्या पराक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याच दिसतय. म्हणूनच, स्वातंत्र्या आंदोलनाची प्रेरणा आम्हास छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातून मिळाली अस नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. हा सगळा पराक्रमाचा इतिहास पाहता निश्चयाचा महामेरु. बहुत जनासी आधारु. अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी असा राजांचा गौरव केला जातो. तर, राजे हे केवळ जनतेच्या समस्यांचेच न्यायनिवाडा करणारे राजे नव्हते तर, ते एक उद्योगशील अर्थतज्ञही होते. त्याकाळी समाजाला जाचक कराच्या जाळ्यांत न अडकवता समाजातील शेतकरी, कष्टकरी आणि विविध वर्गातल्या जनतेची मिळकत, उत्पन्न यांचा सारासार विचार करुनच राजे करवसुली व आकारणी करत असत. राजांच्या ताब्यात जवळपास ३६० च्या वर किल्ले होते. राजांना शेतकऱ्यांविषयी उमाळा होता. म्हणूनच त्यांनी दुष्काळा वेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना बैलजोडी, नांगर, बी-बियाणे यांचे मोफत वाटप केले. या संदर्भात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी लंगोट्यास देई जानवे पोशिंदा कुणब्याचा, काळ तो असे यवनाचा, कुळवाडीभूषण पोवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजींचा. या शब्दांत शिवाजी महाराजांचा गौरव केला आहे. राजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे मावळे होते. आजही जातीभेदाला खतपाणी न घालता शिवरायांच्या समतेच्या विचारांची कास आपण सर्वांनी धरली पाहिजे असं मला मनापासुन वाटत. आपल्या साथीदारांना त्यांनी कधीही दुजाभावाची वागणुक दिली नाही. म्हणूनच स्वराज्याचा शत्रू म्हणुन चाल करुन आलेल्या अफजलखानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला. राजांना आपल्याच राज्यातील नव्हे तर शत्रुच्याही आया-बहिणीं विषयी कमालीचा आदर होता. इतिहासातही याबाबतचा दाखला पहायला मिळतो की, छत्रपती शिवाजी राजांचा सर्व सैनिकांना सक्त हुकूम होता की, धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, स्रिया, लहान मुले, यांचा आदर करा. अस  मोगलकालीन इतिहासकार, काफिखान यांन लिहून ठेवलय. स्वच्छ आणि निष्कंलक चारित्र्य हे राजांच्या व्यक्तीमत्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य होय. राजांच्या राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी लोककल्याण हेच उद्दिष्ट्य होते. आज येथे मोठ्या संख्येने युवा वर्ग जमलाय त्या सर्वांना मी एवढच सांगु इच्छितो की  भलेही परिस्थितीने तुम्ही कितीही गरीब, मागासलेले, रंजलेले, गांजलेले असा पण आपल जीवन जगत असताना राजांसारख उदात्त ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. आपल्या कुटुंबाला, समाजाला उपयोगी असणार काम करा. आपल्या आई-वडीलांना मान खाली घालायाला लावणार अस कोणतंही कार्य करू नका. जे काही चांगल कराल ते तन-मन-धन अर्पूण करा. आपला स्वाभिमान कधीही गहाण टाकू नका. जातीभेद मानू नका, सर्वांना आपल्या चांगल्या वर्तणुकीतुन आपलसं करा. माणुसकी अंगीकारुन जीवनात एक चांगला माणुस म्हणुन नावारुपाला या. हे सर्व जर तुम्ही केलात तर कुटुंबाचीच काय पण आपल्या सबंध देशाची सेवा तुमच्या हातुन आपोआपच घडेल. अस घडल तरच शिवरायांच्या गुणांचा आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने आपण स्वीकार केलाय याच समाधान मिळेल. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.  अशा या पुण्यवंत, नीतिवंत, जाणत्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम!”
     दुन्ही कानात जीव एकवटुन मी ही राजांची महती ऐकत हुतो. तेवढ्यात टाळ्यांच्या कडकडाटानं मी भानावर आलो. भाषण संपलं हुत. बोला शिवछत्रपती महाराज की ज्जय! जय जय जय जय जय भवानी!  जय जय जय जय जय शिवाजी! अशी एकच ललकारी आभाळात घुमली.
     ती नुसती ललकारी नव्हती तर माज्यातल्या आजपातुरच्या जाग्या न झालेल्या आतल्या शिवाच्या असण्या नसण्यावरचा त्यो घाला हुता. मास्तरांच्या भाषणातला एक नि एक शब्द माज्या मनातल्या नि मेंदुतल्या नसानसात जळवां प्रमाण चिकटला हुता आणिक त्यातल समद आळसुटपण, भित्रपण शोषून घेत हुता. समद्यांच्या नजरेतला नाकर्ता शिवा आज राजांची महती ऐकुन आतन पार ढवळुन निघाला हुता. मास्तरांच शिवबांच्या महतीच शब्द कानात घुमत हुतत तवाच शिक्षणाच्या शाळेत नापास झालो तरी आयुष्याच्या शाळेत पास व्हायचच असा पक्का निर्धार या शिवानं केला.
     आता काय बी झाल तरी आपण स्वतः बदलुन, आपल्या जिंदगीचा बुरूज ढासळु द्यायचा नाही अशी मनाशी गाठ बांधली. स्वतामधल्या बेताल शिवाशी लढवय्या बाण्यान झुंज दिऊन जिंदगीत चांगला शिवामाणुस बनायचच हेबी डोक्यात फिट्ट केल. मला पडत असलेल्या सपनाचा खराखुरा अर्थ मला आज उमगाया लागला ... आणि याच इचारानं मी तिथन चालता झालो. मांडवाकडची वाट तीच मातीन धुळलेली हुती.. पर त्या वाटवरन चालणारा आजचा शिवा मातुर येगळा हुता. ती वाट हटके हुती..मी चांगला माणुस व्हायच्या जवळ जाणारी हुती. ती आजपातुर माज्या मनाला चकवीत आली हुती पर आज त्याच वाटनं जायच अजाबात फसायच नाही म्हणुन मी चालता झालो. मुठी आवळुन राजांच इचार मनाशी बांधून एक एक पाऊल टाकु लागलो. सरीच्या घराची वाट, माज्या घराची वाट नाय तर मी माज्या शेताकडची वाट धरली....तिकड वळता वळताच मी बा कड नजर टाकली... बा मांडव्याच्या कोपऱ्याला परसादाचा शिऱ्यासाटनं लाईनीत उभा हुता, आणिक त्यो बी माज्याकडच टक लावून बघीत हुता...तवाच कधी न्हाय ते लय वर्सांनी मला त्याच्या तोंडावळ्यावर माज्याबद्दलच्या चिडी एवजी बोलका अभिमान क्लीयर कट्ट दिसला....!
............................................................................................................................
-                                                                                                                                                                शैलजा खाडे-पाटील. 

4 comments:

  1. Great going!!.. congratulations all the best for the journey....

    ReplyDelete
  2. आत्मझुंज कथा जबरदस्त झाली आहे. विषयाची मांडणी, कथा, भाषा अर्थाने लिखान खरच छान झाले आहे. तुला भाषेचा हा प्रकार हाताळता येतो ही खुप चांगली बाब आहे. कथेच्या माध्यमातून एक चांगला मेसेज दिला आहे. विशेष म्हणजे तो उपदेशात्मक नाही वाटत, कथेत काही ठिकाणी भाषा थोडी नेहमीच्या मराठी प्रमाणे झाली आहे. पण त्याने फार फरक पडत नाही. ही कथा थोडी छोटी करून दिवाळी अंकासाठी किंवा लघुकथा स्पर्धेसाठी पाठवण्यास हरकत नाही...

    ReplyDelete