Monday 13 November 2017

खाण्यासाठी जन्म आपुला...!

 खाण्यासाठी जन्म आपुला...!    – शैलजा खाडे-पाटील.
     आनंदाचा मार्ग पोटातुन जातो अस बोलतात खूप खोलवर विचार केला असता, माझ्याही अस लक्षात आलं की खरच आनंदाचा खरा मार्ग हा पोटातुनच जात असतो, म्हणजे विविध चवी-ढवीचे पदार्थ खाण्या-पिण्यामुळे जो काही तृप्तीचा ढेकर येतो त्याला तर स्वर्गसुखाचीही सर नसते. खाण्यासाठी जगायचे? की जगण्यासाठी खायचे? असा काही जणांना पडलेला प्रश्न असतो. पण जे चविष्ट, पोषक, रुचकर, मधुर, अंत:करणाची तृष्णा भागविणारे देशा-प्रदेशानुसार जे-जे काही उपलब्ध होईल ते-ते उदरात ढकलण्यास काहीच हरकत नसावी असं माझं शुध्द मत आहे. पण या खाण्यास तब्येतीच्या चौकटीमध्ये मापुनच खाणे इष्ट. पुर्वी अगदी कुणालाही तुमचा छंद काय असं छेडले असता वाचन-लेखन-प्रवास-फोटोसेशन इ. छंदांच्या शब्दांची कानाला कशी सवयच जडलेली असायची. पण आत्ता खुपशा व्यक्ति-वल्लींकडुन हॉटेलिंगहा माझा खासम खास छंद आहे असे सर्रास ऐकायला न मिळेल तर नवलच!

     तसा सुरुवातीला मला हॉटेलिंग हा प्रकार माहितच नव्हता कारण घरी तशी परंपराच नाही. आई – वडिल पक्के नोकरदार असले तरी विशेष म्हणजे, माझ्या आईला वीक एंड, हॉटेलिंग हे कधीही रुचलं व पटलं नाहीच. तिच वैशिष्ट्य म्हणजे नोकरी व कुटुंब सांभाळुने तिने सकाळी ९ ची व रात्री ९ ची ताजी गरम भाकरी करायची वेळ कधीही चुकवली नाही. तिच्या हातचा गुण म्हणजे कमीत कमी किंवा घरी उपलब्ध असलेल्या सामानातुन खुप छान स्वयंपाक बनवणे. पाकिटातला मसाला किंवा रेडी टु इट हाही प्रकार मी चक्क लग्नानंतरच ट्राय केला. आईच्या हातच्या गरमागरम भाकरी व त्यावर धार लावुन तुप सोडुन ती पटकन चट्टामट्टा करायची माझी खास सवय आहे... आणि तिच्या हातच्या तीन-चार पदरी तवाभर पसरलेल्या गरमागरम चपात्या तशाच कोरड्याच खायला मला विशेष आवडतं. अस्सल व खेडुत कोल्हापुरकर असल्यामुळे सणावाराला आणि पाहुणचाराला ठरलेले दोन मेन्यु म्हणजे झणझणीत मटन आणि पुरणपोळ्या. कधीतरी चेंज म्हणुन मग पुरी बासुंदीचा बेत असतो. लहानपणी वडणगे येथे शाळेत असताना तिथल्या ग्रामपंचायतीच्या बाजुला खाऊच्या एका छोट्या टपरीत तांदळाच्या उकडीपासुन बनवलेले रंगीबेरंगी तळलेले सांडगे भेटत शिवाय फुकण्या म्हणजे आत्ताचे बॉबी आणि साधे साखर टाकलेले रवाळ गुलाबजामुन हे म्हणजे माझ्यासाठी मधल्या सुट्टीतली एक स्पेशल मजा असायची. नंतर निगवे हायस्कुल हीथल्या शाळेतल्या खाऊवाल्या आजीकडे भेटणारी, कांदा,टोमॅटो,कोथिंबीर, तिखट व वरती मस्त लिंबू पिळलेली अशी खारीडाळ खाल्ली की ब्बास्स! आत्मा तृप्त होऊन जायचा. शिवाय, लेमन व पेपरमिंटची गोळी तोंडात चघळत चघळत वर्गात फळ्यावरच वहीत उतरुन घेताना असा काही त्या विषयात जीव रमायचा की ते लिहायलाही माझ्याकडे शब्दच नाहीत. या खारीडाळसारख्या  तिखट मेन्युसोबत ठरलेला गोड मेन्यु म्हणजे चिक्की गुडदाणी. तिच्यावर तर माझ आजही तितकच प्रेम आहे. शाळेमध्ये असताना हे माझ प्रेम जरा जास्तच ऊतु गेल्याच मला आठवत कारण, एके दिवशी ही प्राणप्रिय चिक्की गुडदाणी घरीच बनवायचा मी बेत केला.
शेंगदाणे चांगले भाजुन सालं काढुन भरडुन घेतले तर दुसरीकडे गुळाचा पाक केला पण गंमत अशी झाली की तो पाक खुपच पक्का व भरपुर झाला आणि त्त्यात भर म्हणजे थाळीला तेल न लावताच हे मिश्रण मी त्या थाळीत ओतल ही नेमकी प्रोसेस माहीत नसल्यान ते गार झाल्यावर मी आपली त्या चिक्क्या काढायला गेले नि काही केल्या चिक्क्या काही निघेनात ती थाळी आपटुन आपटुन माझे हात दुखायला लागले. कहर म्हणजे ती लांब फेकुन जवळ फेकुन चेंडुप्रमाणे भिंतीवर आपटुन माझा क्रिकेटचा खेळ ही जोमात रंगला. पण चिक्की काही निघाली नाहीच. त्याची चव मला कधी एकदा घेईनाशी झाली. त्यामुळे तशीच थाळी मी चाटायला घेतली व घरच्यांचा चांगलाच ओरडा खाल्ला. असो. चिक्कीपुराण चांगलच अंगलट आल्यानं मी काही अशा भानगडीत पडायच नसल्याच पक्क केल.  
     नंतर कोल्हापुरातल्या हायस्कुल मध्ये आल्यावर जरा जरा शहरी पदार्थांची ओळख होऊ लागली. शाळेच्या वाटेवर एका दुकानात बरणीत ठेवलेले डींकाचे लाडु, क्रिमरोल, खाजे, पार्लेची चॉकलेट्स आणि गव्हाच्या कणकेपासुन बनवलेली छोटी पांढरी बर्फी..असं काय नि काय शाळेला येता-जाता माझी चव चाळवत असे. पण मला ती पांढरी छोटी बर्फीच जास्त आवडत असे. ती टाकली की जीभेवर लगेच विरघळायची आणि १रु ला चार अशी ती स्वस्तही पडत असे. नंतर भेळ हा प्रकारही मला तिथेच चाखायला मिळाला. तेव्हा तर घर नि शाळा ..शाळा नि घर हेच माझं जग असायच. त्यामुळे या छोट्याशा जगात जे-जे पहायला, अनुभवायला मिळेल तोच काय तो माझा आनंद असे. खेडेगावातुन कोल्हापुर सारख्या शहरात आल्याने मला नवनवीन पदार्थांची ओळख हीथेच झाली. मी पाणीपुरी हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला तो इ. १० वी नंतरच्या एन्जॉयिंग सुट्टीमध्ये आणि तोही धुंद बेधुंद वारा अंगावर घेत जिथे स्वतालाही विसरायला होत अशा मनमोहक रंकाळा तलावावर. नंतर नंतर तिथली पाणीपुरी आणि फालुदा हा माझ्या जीवाभावाचा विषय बनला.जस लग्न होऊन मी पुण्या-मुंबईच्या खुराड्यांमध्ये अडकुन पडले तस मला या दोन्ही पदार्थांच्या आठवणी अधिकच त्रास देऊ लागल्या. पहिल्यांदा मी पाणीपुरी कशी खायची हे माहीत नसल्यानं मी प्लेट हातात घेताच प्रत्येक पाणीपुरीतलं पाणी प्लेटमध्ये ओतुन दिल मग त्या रिकाम्या पाणीपुऱ्या खाल्ल्या व शेवटी चहाची बशी तोंडाला लावुन आम्ही कोल्हापुरकर कसे फुर्रफुर्र चहा पितो तसे ते पाणीपुरीचे पाणी मी प्यायला लागले तेव्हा माझ्या सोबतच्या शहरी मैत्रीणी फिस्सकन् दात काढुन हसु लागल्या.
मग त्यातल्या एकीनं मला पाणीपुरी कशी खायची ह्याचं प्रात्यक्षिक करुन दाखविलं. आणि आता पाणीपुरी खाताना तोंडाचा मोठ्ठाला आ करुन मस्त तिखट-गोड-आंबट असं पाणी+रगडा+कांदा+शेव असं सगळं मिश्रण जीभेवर अफलातुन कमाल करत ना की मी अशावेळी देवाचे मनोमन आभार मानत असते की थॅंक्यु देवा! तु मला तोंडाचा मोठ्ठा जबडा दिलास की त्यात ही चटकदार पाणीपुरी आरामात जाऊन बसते. फालुद्यातलंही ते सब्जा बी व शेव सुटुक सुटुक गिळताना मला भारी मजा वाटते. आईस्क्रीमच्या फॅमिलीतला फालुदा हा मेंबर सोडल्यास महाद्वार रोडवरच्या महालक्ष्मी दरवाजासमोरच्या कॉर्नरवर असणारं दिलीप कोल्ड्रींक हाऊस मधलं गडबड आईस्क्रीम खाताना जीव गडबडुन जागा व्हायचा. कारण त्या आईस्क्रीम मध्ये चॉकलेट, व्हेनिला, मॅंगो, पिस्ता असे मिक्स फ्लेवर असायचे. नि त्यात सगळ्या फ्रुटच मिक्श्चर असायत वरती चेरी, लाल-पिवळे-हिरवे मनुके, असकायतरी भारंभार घातलेल असायच तो गडबड आईस्क्रीमचा मोठ्ठा कप समोर आल्यावर आम्ही मैत्रीणी तो दोघींच्यात वगैरे शेअर करायचो इतकी त्याची क्वांटीटी असायची.
या कोल्ड्रींक हाऊसच्या समोरच्या तिरक्या बोळात एक चायनीज स्टॉल आहे. तिथेही दरसालाबादप्रमाणे दिवाळीची शॉपिंग केल्यानंतर मी व ताई जायचो. व तिथली गोबी मंच्युरिअन व हक्का नुडल्सचा आस्वाद घ्यायचो. अशावेळी ती ऑर्डर देताना ताई व माझ्यात थोडे आढेवेढे व्हायचे कारण अशी बाहेरच्या खाण्याची चैन माझ्या आई-पप्पांना आवडत नाही. कारण बाहेरच्या खाण्यानं आरोग्य बिघडत अशी त्यांची ठाम समजुत आजही कायम आहे. शिवाय पैशांची विल्हेवाट नुसती ती हेही त्यांच मत हेही वेगळं सांगायला नको. पद्माराजे शाळेचा सरळ रोड महाद्वार रोड कडे जाताना तिथे तृषाशांती नावाचं एक हॉटेल असायच तिथेच आम्ही कॉलेजचे मित्र-मैत्रीणी ग्रुपमधले वाढदिवस साजरे करत असु. तेव्हा तिथे स्प्रिंग चीज डोसा, उत्तप्पा, पुरीभाजी, पावभाजी, कटवडा, मिसळ, असे पदार्थ चाखायला मिळाले. मी पिझ्झा हा प्रकारही या ठिकाणीच पहिल्यांदा टेस्ट केला. त्यामुळंच चीज,बटर नेमकं काय असतं तेही कळल. त्यानंतर महाद्वार रोडवर सरळ वर वर सरकत गेल की वणकुंद्रे भांडी सेंटरला लागुनच कोल्हापुरची चोरगे मिसळ आहे. तिथली मिसळ खाल्ली की ब्बास्सच
! नाद्या बाद फिलींग यायच! तिथुन थोड मागे आल्यावर महालक्ष्मी देवीच्या मुख दरवाजाचा रस्ता थेट रंकाळ्यावर जातो तिथे कपीलतिर्थ मार्केट समोर् हॉटेल सन्मान लागत.
इयत्ता एफवाय बीए मध्ये असताना मी पहिल्यांदा हॉटेलिंग केल ते याच  हॉटेल मध्ये. तेव्हा एकंदरित मेन्युकार्ड पाहुन धीरगंभीर चर्चा करुन मेन्यु ठरवणे.. ठरवलेल्या मेन्युची नीट शुध्द भाषेत वेटरला ऑर्डर देणे पासुन ते प्लेटमधला पदार्थ काटेचमच्याने व्यवस्थीत न सांडता खाणे.. खाल्ल्यानंतरही टीश्युपेपरचा वापर हात पुसायला करणे...त्यानंतर बडीशेपची चिमट तोंडात टाकुन पुन्हा दातांत अडकलेली बडीशेप टेबलावरच्या टुथपिकने बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे..बिल देताना वेटरला तेव्हा आम्ही ५ रु ची टीप दिल्याच मला आजही लख्ख आठवत व खुप हसायलाही येत. असं सगळं हॉटेलिंग च ट्रेनिंग तेव्हा माझ्यासोबतच्या मित्र मैत्रिणींनी मला दिल. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मसाला डोसा खाल्ला.
आणि तेव्हापासुनच चिक्कीगुडदाणीसोबतच माझ मसाला डोशावरही विशेष प्रेम जडलं. मग त्यातही पेपर मसाला डोसा, चीज स्प्रिंग डोसा, सेट डोसा, ट्रॅंगल डोसा, व्हेज स्टफ डोसा, दावणगिरी लोणी डोसा
, चायनीज डोसा इ. इ.

     इंदुमती गर्ल्स हायस्कुल समोर दावणगिरी लोणी डोशाच एक खास सेंटर आहे. तिथला डोसा मला विशेष आवडतो. विशेष म्हणजे तो खाण्यापेक्षा कसा बनवतात हे पहायलाच मला अधिक रुची वाटते. मोठ्या आडव्या तव्यावर एकाच वेळेस ४-४ डोसे वाटीने टाकुन तो लुंगी वाला  सावळासा माणुस ते डोसे इतके भरभर फिरवतो की जादुच झाल्यागत वाटत. केळीच्या पानातुन खास साऊथ इंडियन खोबऱ्याची चटणी व सोबत ऊभा कांदा चिरलेली तिखट व गोडसर बटाटा भाजी खाताना जीव पुरता रमुन जातो... तिथल विशेष म्हणजे बटाटा भाजी व खोबऱ्याची चटणी कितीही वेळेस हवी तेवढी खायला भेटते. त्याच्या बाजुलाच रुपाली हॉटेल आहे त्या मध्ये आम्ही मैत्रिणींनी पहिल्यांदाच दहीवडा खाल्ल्याच मला आठवत. तो मी पहिल्यांदाच खात असल्याने एका मोठ्या बाऊल मध्ये मधोमध वडा ठेवुन वरुन भरपुर गोडसर दही चाटमसाला तिखट शेव यात तो वडा लपला होता. मला काही केल्या हा शोध लागेना की दहीवडा म्हणताना वडा कुठाय यात मी चिडुन वेटरला विचारल तर त्यानं दिलेल उत्तर माझ्या हृदयाला चांगलच घाव करुन गेल-मॅडमजी वडा अब चश्मा लगाके ढुंडीए..दही के अंदर छिपा हुआ है!” तेव्हा सगळेजण खुप हसले.
ते दिवस भारलेले होते..फक्त आणि फक्त आनंदाने भारलेले..खाण्यामुळे तर होतेच शिवाय, कॉलेजातले मित्र-मैत्रीणी, लेक्चर्स, प्राध्यापक वृंद, कॉलेज कॅंटीन, वेगवेगळे डें चं सेलिब्रेशन, लायब्ररी कट्टा सेंडऑफ इ.इ. गोष्टी या आयुष्यात एक वेगळेच सुखानुभव देणाऱ्या ठरल्या म्हणुन. 

     खासबाग मैदानाला लागुन असलेल्या खाऊ गल्लीत मी खुप वेळानेच शिरले कारण माझ्या ऑफिसचा रस्ता त्या खाऊगल्लीतुनच जायचा. अशावेळा ऑफिस सुटल्यावर आम्ही राजाभाऊच्या भेळवर चवीने ताव मारायचो. त्या भेळवरची तिखट व हळद टाकलेली  आंबट-गोड कैरी मला जास्तच आवडायची. खरतर राजाभाऊंच्या भेळसारखी चवीची भेळ मी आजपर्यंत चाखलेली नाहीच. पुण्यात नवीन नवीन असताना राजाभाऊंच्या भेळची आठवण आली म्हणुन सारसबागेत भेळ खायला गेले तर हाय रामा! त्या सुक्या चुरमुऱ्यांमध्येच मटकी, शेंगदाणे, फुटाणे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेली भेळ खाताना माझा चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला माफ करा हिथे पुणेरी मटकी भेळही चवीचीच आहे पण कोल्हापुरच्या राजाभाऊंच्या भेळची काही बातच और आहे.
त्याच खाऊगल्लीत कॉर्नभेळही मी पहिल्यांदा खाल्ली. पण चुलीत भाजलेल्या कणसावर तिखट मीठ टाकुन, लिंबु पिळुन खाताना जी काय अफलातुन मजा येते ती मुळात या क़ॉर्नभेळलाही फीकी पाडते. आणि हेही अनुभवांती बर का कारण प्रशस्त किचनट्रॉली, व्हेपर चिमणी काय नि काय असलेल्या आमच्या किचनच्या मागे आम्ही झाडाखाली चुल मांडुन ओपन किचनही मांडलय. तर कधी घरच्यांना चुलीवरची मटन भाकरी खायची इच्छा झालीच तर आमची रस्सा पार्टी या किचनमध्ये जोरात रंगते. दिवाळी झाल्यावर रात्री आईसोबत चुलीसमोर शेकत बसायचा अनुभव नामानिराळाच! त्याच चुलीत भुईमुगाच्या शेंगा, रताळी, भरतासाठीच वांग, कणीस, कोवळा हरभरा भाजला जातो. आता यांची चव कशी लागत असेल ते तोंडात आलेल पाणीच सांगेल नाही का? चुलीवरुन आठवलं..माझ्या आजोळी कोंबडी खायची लहर आल्यावर आजीने पाळलेल्या गावठी कोंबड्यांना पकडायला आमची शर्यत लागायची. परड्यातल्या बेटाजवळ ठरलेल्या दगडापाशी आजी कोंबडीला पाणी पाजायची व विळ्याने कापायची तेव्हा मला ती त़डफडणारी कोंबडी पाहुन रडु यायच व खुप रागही यायचा. अशावेळी आम्ही भांवंडं कापलेल्या कोंबडींच मुंडकं चुलीत भाजायचो व ते कोण कोण खाणार यासाठी भांडणे पण व्हायचीत. आजही कोंबडी व मटन याशिवाय आमच्या घरात पानही हालत नाही. मामाच्या घरी जत्रेला किंवा वाढदिवसासारखा कोणताही कार्यक्रम असेल तर चार-पाच बकरी सहज खपतात. व्हेज-नॉनव्हेज या वादात न पडलेलंच बर. तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत आवडीचा प्रश्न आहे.
 जग इतकं बदललं आहे की आई-वडील, बहीणी-भावंडं तसेच इतर प्रेम आपुलकी व मायेच्या नात्यांगोत्यांपेक्षाही व्हेज व नॉनव्हेज हा आता प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. माझी एक मैत्रीण तिने तिच अख्ख आयुष्य फक्त नि फक्त चिकनलाच वाहील आहे म्हणजे एक दिवस आड तरी तिला हा मेन्यु खायला लागतोच. सांगायचा मुद्दा हा की ती व्हेजीटेरियन लोकांचा प्रचंड द्वेष करते. किती हास्यास्पद आहे ना हे!!!  व्हेज म्हणजे गोडामध्ये दुधाच्या पदार्थांची फार चलती आहे. पनीर, बासुंदी, खवा, चक्का, लस्सी इ. इ. तर कोल्हापुरातल्या महानगरपालिकेच्या थोडं पुढं एका कॉर्नरवर सुप्रसिध्द मोहक लस्सी सेंटर आहे. तिथली भला मोठ्ठा ग्लास व त्यावर मलई टाकलेली सुमधुर लस्सी पिल्यावर आत्मा तृप्त न झाला तर नवलच!  तिथली तांबुस खरपुस तळलेला  बटाटा, कुरकुरीत कढीपत्ता व खमंग भाजके भरडलेले शेंगदाणे घातलेली खिचडी खाल्ली की वाटत रोजच उपवास धरावा अशी चवीष्ट लागते. ती खिचडी नि शिवाजी विद्यापीठातल्या मोठ्या कॅंटीनमधली खिचडी आठवली की माझ्या तोंडाला पाणी सुटत.
त्या खिचडीसोबत पांढरी काकडी दह्यात कालवुन त्यात साखर-मीठ घालुन बनवलेली कोंशिबीर खाताना भन्नाट फिलींग यायच. विद्यापीठातल्या कॅंटीनमधला आणखी एक मला भावलेला मेन्यु म्हणजे शिरा-पोहे मिक्स
! पायनॅपल इसेन्स व लवंग घातलेला तुपातला न्हवे तर तेलातला बर का तो पिवळाधमक शिरा व त्यासोबत गरमागरम पोहे हे एकत्र खाताना वाटायच प्लेट मधली ही शिरा-पोह्याची जोडी कधी वेगळी होऊच नये!  आता लिहायला घेतलेला विषयही संपुच नये असं वाटतयं...पण कोणताही खायचा पदार्थ थोडा-थोडा व चवीने खाल्ला तरच पचतो नाही का? आणि तशीही शिरा पोहे मिक्स खायची चव आलीय..थांबलं पाहिजे...!

Wednesday 21 June 2017

वजनम् पुराणम्..!

वजनम् पुराणम्...!  -शैलजा खाडे-पाटील.
                                                                                 
                                           
 हां, हा टॉप मला खुपच आवडलाय, यामध्ये कलर्स दाखवा ना दुसरेती बोलुन गेली. मॅडम इसमें  ब्लु, पिंक और व्हाईट ये तीनही कलर मिलेंगे दुकानातला सेल्सबॉय दुकानाच्या काची तावदानावर सुंदर व मनमोहक असे ते तीन लेडीज टॉप अलगद पसरवत तिला बोलला. तिन त्यातला मस्त आकाशी निळ्या रंगाचा लाल-हिरव्या कोयल्यांनी सजवलेला अगदी ट्रॅडीशनल लुक असलेला टॉप उचलला नि समोरच्याच आरशात अंगाला लावुन पाहिला तशी तिला थोडी शंका आली. मग तिने पटकन त्या टॉपची कॉलर पाहिली तर हाय रे देवा! तो टॉप XL अशा तिला न बसणाऱ्या मापाचा होता. त्यामुळं तिच्या आधीच्या आनंदी झालेल्या मनाचा वारु क्षणार्धात रोखला गेला कारण तिला तर नेहमी XXXL मापाचेच कपडे लागत असत. मग एखादा खुप मोठा गुन्हा केल्यागत अपराधी भावनेने तिने तो टॉप ठेवुन दिला. अरे भैय्या इसमें XXXL साईज मिलेगी क्या?” तिने नाराजीच्या सुरातच त्या सेल्सबॉयला विचारल. अरे मॅडमजी इस साईज के काफी कम कस्टमर खरीदारी करते हैं इसलिए हमारे शॉप में XXXL का स्टॉक हम लिमिटेडही रखते हैं फिरभी ये सेम टॉप नही मिलेगाअस म्हणुन तो सेल्सबॉय तिला XXXL मापातले मोठ्या मोठ्या गोळ्यांचे, पट्ट्यांचे, चित्र-विचित्र रंगातले, विदुषकी वाटावे असे घोळदार झब्बे दाखवु लागला. जसजसे ते अफगाणी लोकांगत मोठ्ठे मोठ्ठे झब्बे तिला समोर दिसु लागले तसतसं आपण सर्कशीतला विचित्र विदुषक आहोत नि हे असे झब्बे घालुन विदुषकी खेळ करीत आहोत अस कायतरी तिला क्षणभरासाठी वाटुन गेल.
     तिनं घायाळ मनाने त्या दुकानातुन काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर त्या दुकानाच्या काचेनं व्यापलेल्या तावदानांमध्ये तिला तिचचं टुम्म फुगलेलं अस्सल भोपळी रुप चिडवु आणि डिवचुही लागल. त्याचवेळी तिच लक्ष दुकानाच्या दारातच उभ्या केलेल्या चवळीच्या शेंगेसारख्या कमनीय बांध्याच्या, घारे डोळे, कुरळे सोनेरी केस व बदामी रंगाचे डोळे असणाऱ्या सुंदर तरुणीच्या पुतळ्याकडे गेल आणि नेमकं त्या पुतळ्याला तिने मघा आत पसंत केलेला सुंदर नक्षीदार आकाशी निळ्या रंगाचाच टॉप चढवला होता. मग ती त्या पुतळ्याकडे जरा ओशाळुनच पाहु लागली. जोडीला तिनं एक दीर्घ उसासाही टाकला. तो मनमोहुक सुंदर टॉप तो निर्जीव पुतळा घालु शकतो पण माझ्यासारखी हाडांमासांची, चालती-बोलती तरुणी घालु शकत नाही. जिथे जाईल तिथे कपड्यांसाठी, जागेसाठी आपल्याला तडजोड करावीच लागते अस तिला वाटुन गेलं.  
     हल्ली हल्ली तर हक्काचा जीवाभावाचा नवराही आपल्या जाड्या रुपावरुनचेष्टा करु लागलाय. आपल एकुलत एक लाडकं पिल्लु पण आपल्याला ए ढब्बे मम्मेम्हणुनच पण अजाणतेपणाने का होईना बोलवत असत. श्शी काय हे कुठे नेऊन ठेवलय आपण स्वःताला?  तरी नशीब जगात खाय-प्यायच्या बाबतीत अशी मापं नाहीत..म्हणजे शरीराचं माप बघायच आणि मग तेवढच खायचं असं काहीतरी..पण आता मात्र राहून राहून वाटतय मोजुन-मापुन-तोलुन खायला हवयं. या वाढत चाललेल्या धुडाला आवर घातला पाहिजे. या विचारांत ती रममान असतानाच अरे अरे काकु जरा बघुन चाला ना!” अस हुसकावत एक सुंदर तरुणी तिला नकळत थडकुन आत दुकानात शिरली. श्शी काकु?!!!” तिनं हटकलेला काकुशब्द तिला खुपच झोंबला. निदान ताई तरी म्हणायच ना आता कुठ तिसावं लागलय मला. अस मनाशीच पुटपुटत ती मघा दुकानात चाललेल्या तरुणीच्या तंग जीन्स व स्लीव्हलेस ब्लॅक टॉपच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली आणि पुन्हा तेच..मनसोक्त कपडे घालण्यासाठी मनसोक्त खाऊन चालणार नाही ही जाणीव तिला तिच्या रोजच्या जगण्यातल्या कटु अनुभवांतुंन होत होती.

     या विचारांतच ट्रॅफिकच्या बुजबुजटातुन ती घरी आली, अंग टेकलं. तिच गोंडस पिलु शाळेला गेलं असल्यानचं तिनं आज शॉपिंगचा घाट घातला होता पण तिच्या त्या अवजड धुडामुळे तिच्या या घाटावर पाणी पडलं होतं. मग थंडगार कोकम सरबतचे घुटके घेत घेत तिनं टी.व्ही. ऑन केला. तर कुठल्यातरी रेसिपी शोमध्ये घरच्या घरी तुपातली जिलेबी कशी बनवायची दाखविली जात होती. अमुक कप साखर..तमुक कप मैदा..शेर-पावशेर तुप अस सगळं चालल होत..तिला तिच्या वाढलेल्या वजनाची आधीच चिंता लागुन राहिली होती त्यात ही जिलेबी पाहुन तिच्या तोंडाला पाणी सुटु लागलं. मग वैतागुन तिनं चॅनल बदललं तोवर टशनपिक्चर मधल्या छलियॉं..छलियॉं ओ छलियॉं..च्या तालावर झिरो फिगर मधली करिना कपुर ठुमकत होती परत गाडी आली ना फिगरवरच! परत तिनं चॅनल बदललं तर सई ताम्हणकर नि प्रिया बापटचा वजनदारचालला होता.
     झ्झाल्ल..! सगळीकडे तोच तोच नि तोच वजनदारमाहोल! तिला स्वतःच्याच शरीराची चीड येऊ लागली. मग वैतागुन सरबत पिलेला असतानाही, टाकला चहा मस्तपैकी.. तजेल्या चहाचा कप ओठांवर टेकवत तिचं अंतर्मन तिच्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावू लागलं..तर ती ५ वर्षांची असतानाच तिला सुदृढ बालक स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याचे तिच्या आईच्या कौतुकाचे बोल आजही तिच्या कानात घुमत असत. शाळेमध्येही कबड्डी, खो-खो इ. खेळांमध्येही ती तिच्या बोजड शरीरामुळे मोकळेपणाने कधी खेळलीच नव्हती. कॉलेजच्या दिवसांतही तिला वेगवेगळ्या फॅशनचे कपडे कधी ट्राय करताच आले नाहीत. शाळा-कॉलेजच्या गॅदरिंग व नाटकांमध्येही नाचणं तर लांबच पण एखाद्या काकुबाईसारख्या आई, आज्जीचाच रोल तिला मिळायचा. अशावेळी अवजड वाहनास प्रवेश बंद’, ‘चल चल मेरे हाथी असे पोरांपोरींचे टोमणेही तिला बेजार करायचेत. कॉलेजात असतानाही तिच्या या पुरीगत टम्म फुगलेल्या रुपड्यामुळं एखादा राजकुमार तिच्या आयुष्यात येऊन प्रेमा बिमाची भानगड करणं पण शक्यच न्हवतं (अपवाद सौंदर्यावर भाळुन नव्हे तर विचारांवर प्रेम करणाऱ्या पुरुषांचा) पण तिची बुध्दीचं एवढी अफाट असल्यानं नोट्ससाठी मात्र तिच्याभोवती भल्या भल्या पोरांचा गराडा असायचा. एरवी वडापचा रिक्षावालाही हीच्यामुळे ४ ऐवजी ३ च सीट्स बसायच्या म्हणुन ४ थ्या सीटचे पैसे हीच्याकडुनच वसुल करायचा. सणावाराला किंवा एखाद्या घरगुती कार्यक्रमांमध्ये जाडेपणामुळं हीला साडी नेसायची हौसच उरायची नाही पण त्यातही कधीतरी तिने ती नेसलीच तर मात्र सगळेजणं तिच्याकडे अशा काही नजरेनं बघायचेत की जणु काही समोर रंगरंगोटी केलेल असं भाताचं टोपलं च उभं आहे.
     पण एक गोष्ट तिच्याकडे अस्सल होती ती म्हणजे तिचे चांगले विचार’, तिची सद्सद् विवेकबुध्दी. मग आयुष्याच्या अशा जळमटी वळणांवर तिला सतत वाटत रहायचं शरीर तर नाशवंत आहे पण विचार चिरंतन राहतात..जसजशी वर्षे सरत जातील तसतशा शरीरावर सुरकुत्या चढत जातील, ते आकसेल, थकेल पण आपल्या चांगल्या विचारांवर तर कधीच सुरकुत्या पडणार नाहीत ते सदोदित राहतील..नाहीतर दिसायला डावीअसणारी माणसं विचारांनी मात्र उजवीअसतात. शेवटी सौंदर्यालाही कोमेजण्याचा शाप असतोच की! या तिच्या विश्वासामुळं ती आजवर तिच्या वजनदार धुडाकडे दुर्लक्ष करीत आली होती. लग्न जमतेवेळी तिची खरी कसोटी होती. वजनी कारणामुळे तिला बरेच नकार येऊ लागले. मग तिनं थोड मनावर घेतल नी तात्पुरत का होईना मॉर्निंग वॉक व एखादा योगाचा क्लास करुन करुन २-३ महिन्यांत फार जाड नाही पण आटोपशीर दिसेल अशी शरीराची ठेवण केली. दुधात साखर अशी की तिच्या नवऱ्याने तिला पहिल्या भेटीतच सांगुन टाकलं की त्याला साधी सरळ सालस व चांगली शिकलेली पोरगी हवीय..तिचं शिक्षण व चांगले आचार-विचार याला त्यानं पहिल प्राधान्य देऊन लग्नाला होकार दिलाय. त्यावेळी तर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती मनातुन धन्य पावली. लग्नानंतरच हॉटेलिंग, फिरणं, मग कसबस बाळंतपण मग बाळाच पालन पोषण यामुळं तिच तिच्या शरीराकडं अक्षम्य असं दुर्लक्ष होऊ लागलं. आधीच वात्या भरलेलं शरीर त्यात बाळंतपणानंतर मात्र ते खुपच अवजड बनलं. तिचं तिलाच तिच्या शरीराचं ओझ उचलता येईनास झाल. बी.पी. चा त्रास सुरु झाला. रोज आरोग्याची एक ना एक तक्रार सुरु झाली. अस्वस्थच नि कससच होऊ लागल. आपण आपल्या विचारांवर, मनावर प्रेम करायला शिकलो पण स्वतःच्या शरीरावरही प्रेम केल पाहिजे तरच आपल आयुष्यमान वाढेल याची तिला वारंवार जाणीव होऊ लागली.

     नाकी डोळी छान आहे हो तुमची पण थोडं बारीक झाला ना मग आणखी खुलुन दिसाल बघा. अगं लग्नात कशी होतीस बघ आणि आत्ता मात्र वाढता वाढता वाढे झालयं की तुझं. काय, खाऊन पिऊन टुमटुमीत आहेस की तुझ्याकडं बघुनच कळत हो ते. ये बाई ते लेगिग्न्झ वगैरे घालत नको जाऊस अग बघ तरी त्यातनं कशा त्या जाड्याजुड्या मांड्या बाहेर डोकावतात बर नाही दिसत ते. आमच्या सुनबाई पहायला गेलो तेव्हा बऱ्या दिसत होत्या पण आता हाड-पेरं शोधावी लागतात त्यांच्यात. असे सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी इ. चे टोमणेवजा संवाद तिला आणखीनच अस्वस्थ करीत असत. असचं एके दिवशी लेकराचे बाबा नि लेकरु पाठीवर बसुन घोड्याचा खेळ खेळत होते. बाबा दमले लेकराला पाठीवर फिरवुन तेवढ्यात लेकरु पटकन् बोललं बाबा तुम्ही नका खेळत जाऊ तुम्ही लगेच दमता आपली मम्मी ढब्बी आहे ना मग मम्मी हत्ती बनेल”! यावर दोघंही बापलेक खुप वेळ हसत राहीलीत. हे ऐकुन मात्र तिचा आता तिळपापडच झाला कारण अरे आपल्या हाडा-मासांचच लेकरु आपल्याला आपल्या बेढब व बोजड शरीरावरुन काहीतरी पाचकट बोलत म्हणजे काय! अर्थात त्याच वय तिच्या या जीव्हारी लागलेल्या शब्दांचं गांभीर्य न कळण्याइतपत लहानच होत ही गोष्ट वेगळी पण..ही बाब तिच्या अंर्तमनावर घाव करुन गेली. अरे याच लेकरासाठनं तर आपण गरोदरपणी व बाळंतपणानंतर बकऱ्याच्या मुंड्या, काळीज, रक्ती, आत जाऊन लपाव अशा गुबगुबीत अंड्याच्या पोळ्या, तर्रीदार सुरमई, गरम-गरम मोगरा बासमती नि त्याच्यावर तुपाची धार, खारीक, खोबरे, बदाम, काजु, अशानं भारलेले असे डींकाचे लाडू, असा खुराक  खाल्ला त्यानंतरची जागरणं व शून्य व्यायाम यामुळचं तर आपला परत भोपळा झाला ना. दिवसेंदिवस तिच्या वजनाचा काटा पुढे-पुढे सरकत होता. लेकराची पहिली वहिली शाळा..त्याचे नखरे, खाणं-पिण, अभ्यासाच्या वेळा, नवऱ्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, त्याचे मित्र, ऑफिस स्टाफ यांची रेलचेल, नातेवाईक, शेजारी-पाजारी, जोडलेले, रक्तातले, इ.इ.इ. च येणंजाणं..मध्येच सण-वार, व्रतवैकल्ये, आजारपणं, वेळी-अवेळी खाणं, वेळच मिळत नाही म्हणुन स्वप्नातच चालु असलेला व्यायाम आणि सोबतीला सणावाऱ्यातल्या पुरणपोळ्या, करंज्या, खाजे, कानोले, गुलाबजामुन, श्रीखंडपुरी इ खुराकाचा डोस! या सगळ्या पसाऱ्यात ती इतकी हरवुन गेली की तिला स्वतःलाच स्वतः शोधणं कठीण होऊन बसलं.

     अचानक दारावरची बेल वाजली. तिचं लाडकं-दोडकं पिल्लु शाळेतुन आलेल होत. ती अशा विचारांतुन बाहेर आली व त्याला तिनं खाणं-पिणं भरवलं तसं ते धावलं खेळायला. मग ती स्वयंपाकाला लागली. पण; वाढलेल्या वजनाची चिंता तिला काही केल्या गप्प बसुच देईना. कित्येक वर्षांची तिची अशा बोजड वजनाची झिंग उतरवायला काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं बनल होत. अहो ऐका ना उद्यापासुन मीही तुमच्यासोबत जीमला येते.तिनं झोपण्यासाठी अंथरुण टाकत टाकत नवऱ्याला सांगुन टाकल. अगं तुझा घरकामातुन, मार्केटला येता-जाता होतो ना व्यायाम? मग कशाला जीम वगैरे भानगड..!” तो कामाचा लॅपटॉप बंद करीत करीत तिला बोलला. हे बघा मी हे बोजड शरीर घेऊन फार दिवस जगेन अस काही मला वाटत नाही आत्ताच माझ्या मागे कमी का दुखणी लागली आहेत? मग बसा तुम्ही नि तुमचं लेकरु दोघचजणं.तिनं जरा चढ्या आवाजतच नवऱ्याला सुनावलं. अगं अस का बोलतेस बरं, मलाही तुझी काळजी आहेच ना पण मला काय वाटत आपण प्रॉपर अशा डाएटीशीअनचा (आहारतज्ञ) सल्ला घेऊयात म्हणजे तुला व्यायामाची व आहाराची एक योग्य दिशा मिळेल नाही का”  हे ऐकुन ती खुदकन हसली, मग झोपेत तिला ती बारीक झाली आहे व तो आकाशी निळ्या रंगाचा सुंदर टॉप चढवुन ती बागेत दोरीउड्या मारत असल्याच्या अशा काहीतरी स्वप्नांची गाडी सुसाट पळु लागली....

     अखेर तो दिवस उजाडला...! सकाळपासुनच तिचा नवरा व लेकरु तिला खाण्यापिण्यावरुन चिडवु लागल होत. आज डाएटीशीअन कडे जायच आहे. आजच काय खायच ते खाऊन घ्या उद्यापासुन तुझा डाएट, व्यायाम सुरु होणार..दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार..चमचमीत..झणझणीत..तर्रीद्दार..हे शब्द आता फक्त दुसऱ्यांकडुनच ऐकायचेस तु. खाय-प्यायचे मोठ्ठे-मोठ्ठे त्याग करावे लागणार. आम्ही कधी मस्त वेलची पाकातले खव्याचे गुलाबजामुन खाताना आमच्या खाण्यावर तु अजिबात मन घालायचे नाहीस..पाणीपुरी, मिसळ, पावभाजी, रगडा, मंच्युरिअन हे सगळं आता स्वप्नातच पहायच बर तु! अस बरच काहीतरी तिला सुनवायच चालु होत. जाताना मात्र तिने पाणीपुरीवर जाम रट्टा मारला व चांगल्या ३ सुक्या पुऱ्या संपवुन टाकल्या. चायनीज गाडीकडं तिच लक्ष गेलं पण नवऱ्यानं तीला आता त्यागाची सवय करुन घ्यायला हवी याची जाणीव करुन देताच त्यांचा मोर्चा डाएटीशीअन कडे जायला वळला.
     “हे पहा, तुमच्या वयाच्या व उंचीच्या मानानं तुमचं २० किलो वजन जास्त आहे. आपल्याला तुमच्या बॉडी मास इंडेक्स नुसार वजन कमी करायच आहे. तुम्ही आजवर कसा आहार घेत आलात त्याचा रोजचा क्रम मला सांगाडाएटीशीअन मॅडम तिला बोलल्या. खरं सांगु का मॅडम मी सकाळी नुसतीच चहा घेते २ कप, दुपारी २ वाजता जेवण..परत संध्याकाळचा चहा व परत रात्रीच जेवणं. व्यायाम घरकाम व मार्केट ला जाता येतानाचा होतो.ती एवढुसं तोंड करीत मॅडमंना बोलली. हे पहा, घरकाम किंवा दैनंदिन कामं हा अगदीच मर्यादित व्यायाम झाला तुमच्या शरीरात गेलेल्या कॅलरी रोजच्या रोज प्रमाणात बर्न झाल्या पाहीजेत तरच तुम्ही फिट राहु शकता. सकाळचा नाश्ता राजासारखा, आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारख हवं नेहमी. लक्षात ठेवा, आपला ९०% आहार व १०% व्यायाम असं आपल्या चांगल्या आरोग्याचं गणित आहे.याबाबतीत, जगात तीन प्रकारच्या व्यक्ति असतात,
१. काही व्यक्ति या पहाटे ५ वाजता ऊठुन फिरायला जातात..फिरुन दमुन आलो म्हणुन दिवसभर खा-खा खातात. दुपारी जेवणानंतर मस्तपैकी २-३ तास आडवे होतात. यामुळे शरीरात चरबी साठत जाते व वजन वाढते.
२. काही व्यक्ति पटकन वजन कमी करायच्या नादात अतिव्यायाम करतात व सोबतीला अतिडाएट करतात, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणतत्वे न मिळता शरीर पुर्णपणे क्षीण बनतं जातं. प्रसंगी त्यांना व्हीटॅमीनचे डोस व कोर्सेस चालु करावे लागतात.
३. आणि काही व्यक्ति सकस व चौरस आहाराची आणि योग्य व्यायामाची सांग़ड घालुन वजन आटोक्यात ठेवतात. स्वतःचे आयुष्यमान वाढवुन समृध्द बनतात.
     आपल्याला तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींपैकीच एक बनायचय. वजन कमी करण अवघड नाही तर कमी झालेल वजन आहे तितकच आयुष्यभर मेंटेन ठेवणं हे खर आव्हान आहे. पण हे ज्याला जमलं तो जिंकला!” डाएटीशीअन मॅडम हसतमुखाने हे सगळं सांगत होत्या व दोघे ती आणि तो कानात जीव ओतुन हे सर्व ऐकत होते. तिच्या मनानं तर आताच पक्क केलं होतं की आजपर्यंत आपण आपल्या आवडी-निवडीने सगळं कसं हवं तसं खात आलो पण आता योग्य डाएट फॉलो करायचाच. मॅडम जमेल ना मला सगळं हे?” ती थोडं कचरतच बोलली.

     खरतरं आजवर तुम्ही हवं ते खाल्ल, हव तस जगला. हे शरीर आहे.  अगदी यंत्रासारखंच. याची जर हालचालच झाली नाही तर त्याला गंज चढतो. तुमच्या शरीराची योग्य तेवढी हालचाल करा. व जोडीला योग्य आहार घ्या. खाण्यासाठी जगु नका तर जगण्यासाठी खा. पाणी भरपूर प्या. मैदा, साखर, मीठ, व तेल यांचा अतिरेक वाईटच. अधिकाधिक फळे, पालेभाज्या, व कडधान्ये खा. पॉलिश तांदळाऐवजी हातसडीचा तांदूळ वापरा. दर एक – दोन महिन्याला सुर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन, राईस ब्रान, ऑलिव्ह ऑईल ही तेले आलटुन-पालटुन वापरा. मांसाहारामध्ये मटन क्वचित खा मात्र रोस्टेड फिश व चिकन तुम्ही प्रमाणात खाऊ शकता. कुठेही बाहेर गेलात तर स्वतःचे खाण्या-पिण्याचे पर्याय तयार ठेवा. आग्रहाला बळी पडु नका. योग्य आहारात समावेश नसलेल्या पदार्थांना नाही म्हणायला शिका. शेवटी डाएट म्हणजे काय? तर आपल्या शरीराच्या हालचालीनुसार त्या प्रमाणातच कॅलरीज शरीराच्या गरजेनुसारच पोटात जातील असा आहार घेणे. या कॅलरीज अती झाल्या तर त्याच फॅट बनायला लागत. शरीरामध्ये अधिकाधिक प्रोटीन्स व फायबर्स जायला हवेत. त्यामुळे तुमची चयापचय शक्ती वाढायला मदत होते. प्रोटीन्स व फायबर्स असलेले अन्न सेवन केल्यास तुमचं शरीर फिट – फाईन राहून थकवा येत नाही. कोण म्हणतं तुम्ही व्यायामासाठी जीमच लावा?, योगाच करा. तर सायकलिंग, स्वीमिंग, टेनिस, दोरीउड्या, किंवा न चुकता मॉर्निंग वॉक. यांपैकी तुम्ही काहीही फॉलो करु शकता पण रोज न चुकता सातत्याने कमीत कमी अर्धा तास कोणताही व्यायाम प्रकार तुम्ही करु शकता. हे सगळं फॉलो करा व मला दोन महिन्यांनी भेटा.डाएटीशीअन मॅडम हे सर्व अत्यंत कळकळीनं त्या दोघांना सांगत होत्या.
     असं सगळं आहाराच व व्यायामाच गणित मनातल्या मनात सोडवत ते त्रिकुट घरी आलं. दुसऱ्याच दिवसापासुन तिने मॉर्निंग वॉक चालु केला. मग तो ही तिला स्वतःला वेळ मिळावा म्हणुन बारीक-सारीक कामांत मदत करु लागला. शिवाय, तिला पहाटे लवकर उठवणे, तिच्या डाएटची तयारी करुन ठेवणे, दुपारी झोपु न देणे व वारंवार या सगळ्यांसाठी चीअर अप करु लागला.
ती ज्या सोसायटीत रहायची तिथल्या बायका फारतर भाजी, शॉपिंग व गप्पांचा कट्टा अटेंड करायलाच बाहेर पडत असत. हे तिला ती जेव्हा सकाळ सायंकाळचा वॉक करु लागली तेव्हा कळल. कारण सोसायटीच्या स्पोर्ट स्पेस मध्ये २-३ पुरुष माणसं सोडलीत तर बाईम्हणुन तिच व्यायामाला येत असे. मग अशावेळी कुणी किचनच्या खिडकीतुन वाकुन बघत तर कुणी बाल्कनीतल्या तुळशीला पाणी घालता घालता तिच्या या दंगलअवताराकडे टकामका टकामका पाहत असे. एव्हाना तिलाही अशा चोरट्या व विचित्र नजरांची सवय झाली. आपण स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करतो, इतरांसाठी नाही या पक्क्या विचाराने नंतर तिनं दोरीउड्या, स्टेप्स, आर्म्स-लेग्ज स्ट्रेचेस तसेच घरच्या घरी वॉल पुशअप्स, फ्लोअर पुशअप्स, स्क्वॅट्स, सुर्यनमस्कार असा व्यायाम चालु ठेवला तोही सातत्याने. सोबतीला योग्य आहारही नीट पाळला. चवी-ढवीच्या मोहजाळातुन तर ती कधीच बाहेर पडली.

     आता हा दिनक्रम तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनुन गेला. हळुहळु हवे ते परिणाम दिसु लागले. बेढब शरीराला सुडौल आकार मिळु लागला. पाहणा-यांच्या नजरेत तिचं खुललेलं व्यक्तीमत्व आत्मविश्वासा सकट भरु लागल.तिला जगण्याचा व एकंदरित फिट रहाण्याचा मंत्रच मिळाला...तिच्या असण्याबरोबरचतिच्या दिसण्याचहीध्येय जसजसं तिच्या टप्प्यात यायला लागलं तसतसं तिच्या आत्मविश्वासाचा वाराही आता अधिकच अनुकूल बनला व आनंदाचे पंख लावून ती सुखा-समाधानाच्या गगनात झेपावु लागली....!
                                                                                                              -शैलजा खाडे-पाटील.

रऱफफफऱऱर

------------------------------------------------------------------------------------------------