Saturday, 8 August 2020

दोस्ती...!

 

दोस्ती..!

       सगळं कस गुडी गुडी चाललेलं. स्वतःच नवीन घर सजवताना मन आत्यंतिक आनंदानं भारलेलं होतं. एकीकडं आयुष्यातल्या सर्व इच्छा-आकांक्षा भरुन पावल्यात असा फिल यायचा तर, दुसरीकडं जुनं भाड्याचं घर सोडताना तिथल्या गोतावळ्याचा पाश मनाभोवती असा काही घट्ट लपेटायचा की तिथल्या आठवणीनं मनाच्या कोपऱ्यात अनावर रुखरुख ही भासायचीच. चांगली माणसं आयुष्यात येणं हा काही योगायोग नसतो ती येतातच पण त्यांना वेळीच ओळखावं लागतं व आपल्या अंतःकरणातल्या निर्व्याज ऊमाळ्यानं त्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे भक्कम करावं लागतं. नवीन घराच्या भोवतालच्या  नवीन वातावरणात रुजणं तस जडच जाणार होतं. हीथल्या सोसायटीत म्हणावी तशी जीवाभावाच्या नात्याची नाळ कुणाशीच जुळली न्हवती. त्याला कारणही तसच खमकं होतं म्हणा. अशी नाळ जुळायला नव्यानं भेटणारी व्यक्ती ही एका वैचारिक आणि भावनिक या दोन्हीं पातळीवर आपल्याला हक्काची वाटायला हवी, सोबतच आपापले सगळे सिक्रेट्स पोटात ठेवणारी, आपसुक समजुन घेणारी, दिल्या-घेतल्याचं मोजमाप न ठेवता, अमर्याद प्रेम, जिव्हाळा, मैत्रीची ऊधळण करणारी अशी व्यक्ती हीथ भेटणं तर जवळपास अशक्यच होतं. जशी की जुन्या घरी राहताना ती मला भेटली होती. त्यामुळं राहुन राहुन मला तिची आठवण आल्याशिवाय रहायची नाही. म्हणुन वरचेवर माझी व तिची फोनाफोनी चालु असायची. ती माझ उच्चारत असलेलं नाव मला जाम आवडायचं.ऐवजी आणि ऐवजी ज्य असं काहीतरी...

     हे पाह्य सैलेज्या तु ह्यावेळनं तरी माज्या घरी यायला पाह्यजेल. आता माजे बी व्याप वाढवुन घेतलेत मी. हीथं जवळचं कपड्याच्या दुकानातं जाते बगं मी कामाला. लेकराच खाणं-पिणं, घरच आवरुन जाते. तेवडाच आधार नाह्य का गं? नायतर कोणं बाय जीवाला पुरले जनमभर?” ती फोनवर माझ्याशी बोलत होती नि माझे कान न्हवे तर अश्रुंनी भरलेले डोळेच तिचं हे बोलणं ऐकत होते. तिच्याशी जेव्हा जेव्हा बोलणं व्हायच, तेव्हा तेव्हा एक वेगळं रितेपण मला माझ्या आयुष्यात जाणवायचं. हे रितेपण म्हणजे मला तिची असणारी काळजी. तिच्या मुलाचं म्हणजे शिक्षण कसं होणार? तोवर तिला तिच्या दुखण्यातुन तिच आयुष्य जगण्यासाठी पुरेल का? तिला या समाजात आणखी कुणी भक्कम साथ देणारं भेटेल का? की, तिला कुणी फसवेल? आपल्या परीनं तिला काय व कोणती मदत करता येईल? या प्रश्नांनी अख्खी रात्र मनाला खाऊन उठायची जेव्हा तिची जगण्याची धडपड ती मला सांगायची. या धडपडीत ती मला मात्र कधीही विसरलेली नाही ही तिची खासियत.

     ती...!’ आयुष्यातील एक अशी व्यक्ती जिनं आयुष्य जगण्याची एक वेगळी परिभाषा मला शिकवली. रक्ताच्या नात्यालाही लाजवेल असा एक गोड आंतरिक ऊमाळा देणारी व्यक्ती...जिच्यावरच्या अपार प्रेमाविषयी लिहिण्यासाठी माझ्याकडील शब्दही अपुरे पडावेत अशी व्यक्ती... आयुष्याकडुन फार काही अपेक्षा न ठेवता ते नेटानं जगणारी हरहुन्नरी व्यक्ती... पुन्हा पुन्हा कोसळुनही तेवढ्याच जिद्दीनं पाय रोवुन ऊभा राहणारी अशी व्यक्ती... तिनं मला मैत्री कशी असावी? हे मैत्रीच नातं निभावणारी मैत्रीण कशी असावी? याचं एक जिवंत ऊदाहरणच जणु माझ्या जीवनात घालुन दिलं.

   फार कमी लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या सुख-स्वप्नांचा मोठा गवगवा न करता सचोटीनं आयुष्य जगण्याची कला परमेश्वरानं बहाल केलेली असते. अशांच लोकांपैकी ती एक होती. दिसायला सावळी, नाकात चमकी, लांबसडक केस, पायात एकदम भारदस्त चांदीच पैंजण, जोडवीही तशीच दणदणीत, डाव्या हातात, पायात काळा धागा, गळ्यात लांबच लांब फक्त सोन्याच्या मण्यांचं मंगळसुत्र व गळ्यातही काळा धागा, हातात दरवेळी नवीन डीझाईनचे कंडे, नेलपॉलिश आणि दोन तीन अंगठ्यानी हात सजलेला, चुडीदार वा साडी किंवा गाऊन अशा कपड्यांमध्ये गाजलेली जी ती फॅशन ज्या त्या वेळेस घालुन मिरवणाऱ्या व्यक्तीमत्वाची ती.. म्हणजे ओरिजीनल गावाकडील पण प्युअर शहरी स्टाईलचे अजब रसायनच होती. तिला पहिल्यांदा भेटल्यावर मनाला हळुवार वाटुन गेलं ही आपल्याला याआधीच भेटली असती तर कित्ती छान झाल असतं. अगदीच दुष्काळी भागातल्या अस्सल खेड्यातुन नवऱ्याच्या नोकरीसाठी ती शहरात आलेली. फारशी बुकं न शिकलेली पण व्यवहाराला चोख असणारी, व्यवहार नि मैत्री यांमध्ये माझा नेहमीच गोंधळ होतसे पण एकदा का एखाद्या व्यक्तीला जीव लावला की लावला. तिथं व्यवहाराला शून्य स्थान असतं हा धडा तिनं घालुन दिला. तिचं बालपण अगदीच साध्यात गेलेलं. कोरडवाहु पण भरपुर शेतजमीन असणाऱ्या घरची भांडीकुंडी, झाडलोट, पाणीशिंपण, आणि शेतातली खळ्यातली कामं यातचं तिचा दिवस ऊगवायचा नि मावळायचा. वेगळं अस स्टायलिश नि चकचकीत विश्व तिनं कधी पाहिलच नसल्यानं या शहरी जगताबद्दल तिला कमालीचं आकर्षण होतं आणि नेमकं पुण्यासारख्या शहरात तिच्या वैवाहिक जीवनाची एंट्री झाली.  अगदीच दुष्काळी भागातल्या अस्सल खेड्यातुन नवऱ्याच्या नोकरीसाठी ती शहरात आलेली. सुरुवातीला ती आली तेव्हा तिला एकट्यानं साधा रस्ताही पार करायला यायचा नाही एवढी वेंधळी. पण हळुहळु तिनं काही शहरी गोष्टीही आत्मसात केल्या पण तेही आपला गावठी बाज जपुनच. तिच्यात नि माझ्यात एक कमालीच साम्य म्हणजे जगण्यातला साधेपणा. त्यामुळेच की काय मला तिची व तिला माझी आजतागायत ओढ टिकुन आहे.

     अगदी कमी वयात नात्यातल्याच सुमारे पंधरा वर्षांनी वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी तिची जन्मांतरीची गाठ बांधली गेली...तिला फारसं सांसारिक स्वातंत्र्य न्हवतं तरीही ती तिच्या मुलासाठी व नवऱ्यासाठी अगदी छोटा-मोठा सणवार-ऊपासतापास अगदी मन लावून करायची. तिचा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन फार काही गंभीर न्हवता पण येणारा दिवस मनभरुन, भरभरुन जगायचा हेच ती ठरवायची. दिवाळसणाला अगदी सगळा फराळ ती स्वतः घरी बनवुन सर्वांना खाऊ घालायची. खाण्या-पिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी तिच्याकडुन शिकले विशेषतः पुरणपोळी. माझ्या शिक्षणाचा माझ्यापेक्षा तिलाच जास्त अभिमान होता. तिचं एकच तत्व – ते म्हणजे स्वतःला कधीही कुठल्याही बाबतीत कमी लेखायचं नाही..ज्यात आपण कमी आहे ती गोष्ट जिद्दीनं शिकायची. गावाकडील शेतात असताना, सैराटमधल्या आर्चीसारखं ती शेतात ट्रॅक्टर चालवायची, विहिरीत पोहायची. शेतातले औतही ओढायची. पुरुषांनाही लाजवेल असा तिचा थाट असायचा. तर हीकडे शहरात सणावाराला पदार्थांचे स्टॉल भरायचे, तेव्हा सोसायटीतल्या सगळ्या एकीकडे व ही एकटी एकीकडे असचं चित्र असायचं. तिच्या हातच्या पदार्थांना डीमांड असायचा.

     एरवी कुणी सोबत असो वा नसो एकट्यानच फिरायचं, एकट्यानच हसायचं एकटं असतानाही स्वतःची पुरती हौस-मौज कशी करायची हे तिच्यात मला पहायला नि अनुभवायलाही मिळालं. आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजे तिच असा वारंवार फिल मला यायचा. नेहमी हसतमुख, बिनधास्त, निडर, खेळकर वृत्तीची अशा तिला पाहिल्यावर मला एक जगण्याची नवी ऊमेद मिळायची. सुख-दुःखांची देवाणघेवाण होता होता आमच्या दोघींच्यात कोणतच अंतर राहिलं नाही. रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती कितीतरी पटीनं सर्वश्रेष्ठ असतात ह्याचा चालता-बोलता जिवंत पुरावा म्हणजे माझी ही जिवलग मैत्रीण. काही माणसं ही आपल्या सहवासातुन गेली तरी आपल्या विचारांमध्ये त्यांच स्थान टिकवुन ठेवतात ह्यामध्ये आपल्यापेक्षा त्यांचा अधिकचा वाटा असतो. हे त्या लोकांच्या सदगुणी आचरणाचं फार मोठं यश असतं. यासाठी आयुष्यात फार पैसा कमवुन श्रीमंत व्हावं लागत नाही, किंवा फार मोठ्या पदावर असणंही गरजेचं नाही किंवा कुठंतरी चार लोकांच्यात मिरवुन मिळवलेली प्रतिष्ठाही हीथं काही कामाची नसते तर, आपली सदसदविवेकबुध्दी सदैव जागृत ठेवुन माणसं जोडणं ही या भूतलावरची सर्वांत सुंदर आणि तितकीच कठीण गोष्ट आहे असंही मला या दोस्तीच्या नात्यात वाटुन गेल. दोस्तीच्या खुप व्याख्या वाचल्या पण तिच्या बाबतीत या व्याख्या मी तंतोतंत अनुभवल्या. दोस्ती हे असं नात आहे की जिथं निर्व्याज, निरपेक्ष, निःस्वार्थी या शब्दांना जागायला लागतच पण या तिन्हींचा कस ही लागतो जेव्हा आपण या नात्याला न्याय देऊ शकत नाही.

     तीन वर्ष ती माझ्या सहवासात राहिली पण तिचे तीन जन्मांचे भास-आभास तिनं मला दिले. दोस्ती हे नात खोलवर रुजल्यानंतर त्याला आपल्यातल्या सर्वच्या सर्व चांगल्या गुणांचे खतपाणी घालुन त्याचा आभाळभर पसरणारा असा आपलेपणाचा वटवृक्ष ऊभा करायची ताकद ही दोन्हीं बाजूंनी असावी लागते. जी की आमच्या मैत्रीत आजही टिकुन आहे. नियतीनं तिचा जोडीदार खुप लवकर हिरावुन नेला. तो चटका सहन करते नि करते तोवर कोरोना नावाच्या संकटाचा

निखारा पोळायला लागला. तरीही तिनं हिम्मत हारली नाहीय. गावाकडच्या शेतीची म्हणजे काळ्या आईची सेवा करुन त्या मातीच्या ढेकळांतही ती स्वतःचं नि लेकराचं ऊज्वल भविष्य पाहत आहे.. काय ग? करमते का तुला तिकडे? परवाच तिला फोनवर मी विचारलं..अगं ते आणि काय असतय, कुठल्या बाजारात इकत मिळतय? मला तर कायमच भारी वाटतय बग, आपण मस्त मौला मजेत रहायचं नि जगायचं..!” ती हसत हसतच बोलली..हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं ते तिच्यावरची दया म्हणुन न्हवे तर काश, आपल्यालाही दोस्तीच्या इतक्या भारी फिलींग्ज घेऊन जगता आलं तर.....!

लेखिका - शैलजा खाडे, कोल्हापुर.

 

Saturday, 4 April 2020

लॉकडाऊन..!


लॉकडाऊन...!
Story By - शैलजा खाडे, कोल्हापुर.

     सकाळची कोवळी ऊन्हं केव्हाच सरली होती. परड्यात दावणीच्या गाईची चाऱ्यासाठी धडपड सुरु झाली होती...तरी तो अजुनही गोधडीत तसाच पहुडलेला होता. पहाटेच त्याचा डोळा खुलला, पण रोजच्या जगण्याची भ्रांत त्याच्या जीवाला अशी काही बैचेन करीत होती की, तो तास न तास तसाच  पडुन रहायचा. 
     त्याचे खोलवर गेलेले डोळे तो सताड ऊघडे ठेवून एकेकाळी ऊराशी फुलाप्रमाणं बाळगलेलं आणि आता मात्र तेच भंगलेलं स्वप्न काळजात साठवून तो ठेवायचा. शेतात हिरीरिनं करण्यासारखं काहीच काम नसल्याकारणानं तो गेले पंधरा दिवस चुळ भरुन पुन्हा गोधडीचं मुळकुट करुन ऊन्हं तळपेतोवर त्या मुळकुटाला टेकुन बसुन रहायचा...आओ ऊठा वाईच च्या तरी घ्या की. किती दिस असं दगडागत बसुन ऱ्हाणारा? नुसकान तर झालया, पर आपला जीव तरी शाबूत हाय न्हवं? ह्यातच त्या पांडुरंगाला हात जोडायचं. ऊठा चाटदिशी. पोरगं बी तुमच्याकडं बगुनशान कावरंबावरं हुतया. तेच्याकडं तरी प्हाय तुम्ही”. चुलीवरच चहाच आधणं वाटीत ओतत त्याची बायको त्याला बोलली. तसं त्याची कोरडी नजर खेळतेल्या पोरावर फिरली व चाऱ्यासाठी आसुसलेल्या गाईवर येऊन थांबली. त्यांना पाहुन त्याला थोडीफार तरतरी आल्यासारखी झाली, आणि ती चहाची वाटी पुढ्यात ओढुन त्यानं त्याचे दोन्हीं हात दोन्हीं गुडघ्यावर टेकले आणि पुन्हा गोधडीच्या मुळकुटाला तो टेकुन बसला. आपल्याला आपलं लेकरु तसंच शेतातली फुलं व्हती...ह्या ह्या हातानं घास भरवावा तसं त्यानला पाणी-लागवड दिली पर आज ती मातीत पार रयाला जातेली बगुन कोणला सुखं वाटल बाय? मला तर हे जिणं सुदीक मयतासमान वाटायलय. आगं कस नुसकान भरुन काडायचं दोन लाखाचं? सगळं किडुक-मिडुक झेंडवांच्या मशागतीला इकलं..आता तर इक खायाला बी पैकं न्हाईती...!” असं बोलुन तो बसल्याजागी टपटप आसवं गाळु लागला.
     तशी त्याची बायकोही डोळ्यांना पदर लावुन मुसमुसु लागली. काही क्षण असेच गेले केवळ हुंदक्यांचा आवाज! पुन्हा ती पुढे सरसावली व चहाची वाटी त्याच्या तोंडासमोर धरली. तसा तो भानावर आला व वाटीतला गारगीच चहा त्यानं फटकन एका घोटात पोटात ढकलला. पुन्हा तो शांत होऊन शुन्यात नजर लावुन बसला. तिनं चुलीतला पेटता निखारा वाया जाऊ नये म्हणुन पटकन त्या चेपक्या डब्यातले पार तळाला गेलेले तांदूळ धुऊन चुलीवर भात चढवला...नि एक हात डोक्याला लावुन निखाऱ्यातल्या ऊष्ण धगीकडं ती कितीतरी वेळ पाहत राहिली...
परमुलखातुन साऱ्या जगभर फैलावलेला कोरोना संसर्गजन्य विषाणु राज्यातल्याएका छोट्याशा खेडेगावातल्या शेतकऱ्यालाही गिळु पाहत होता. यामुळे होणारी महामारी रोखण्यासाठी सरकारने कितीतरी दिवस पुर्ण राज्य न्हवे तर देश लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरचे दिवस मात्र गावातल्या शेतकऱ्यांसाठी एक दर्दभरी कहाणी घेऊन येणारे ठरले. पुण्या-मुंबईतल्या खुराड्यातली माणसं आता गावाकडच्या शुध्द, पवित्र हवेत झेपावली होतीत. त्यांच्यातला रोग आता गावात मुक्काम ठोकु पाहत होता. त्यांच्यामुळंच गावातले दोन-तीन जणं ह्या कोरोना संसर्गाला बळी पडले होते. त्यामुळं इतर जीवांसाठी पोलिसांची खास कुमक रुजू होऊन ते स्वतःचा जीव धोक्यात घालुन, कित्येक दिवस गावात चिटपाखरुही फडफडु देत न्हवते.
     हिंदु नवीन वर्षाची बहर घेऊन येणाऱ्या चैत्राच्या पाडव्याला मोठ्या आनंदानं, ऊत्साहानं ज्या फुलांची आरास, ऊधळण केली जाते त्या झेंडुंच्या फुलांची शेती पार ऊध्वस्त व्हायच्या मार्गाला होती. त्यांपैकीच कोरडवाहु जमिनीवर झेंडुचं हे पिवळं सोनंपिकवुन सर्वसामान्य जिणं जगणारा हा शेतकरी हैराण झाला होता. आजचा दिवस मावळला तरी तो पुन्हा ऊगवूच नये असं त्याला वाटत होतं. कारण, हिरव्यागार रोपांवर हे पिवळं सोनं पिकुन कितीतरी दिवस लोटले होते. त्याची तोडणी केव्हांच ऊलटुन गेली होती. शहराप्रमाणं गावातही कडेकोट बंदोबस्त केल्याकारणानं गावातला प्रत्येक माणुस पिंजऱ्यातल्या पक्ष्याची कैद जगत होता. दारा-खिडक्यांतुन केवळ नि केवळ निस्तेज चेहरे नि भेदरलेली नजर असं चित्र होतं. एरवी पार चुलीपर्यंत येणारं गावातल माणुस घराचा ऊंबरठाही ओलांडायला धजावत न्हवतं. त्यामुळं त्यानं त्याच्या शेतात केलेल्या या झेंडुंच्या फुलांची तोडणी करायला, त्याचे शिस्तीत वाटे करुन भरायला नि ती विक्रीसाठी नीटमार्गी वाहनाने वाहुन न्यायला माणुस मिळणं तर लांबच, तर असं माणुस डोळ्यांना दिसतही न्हवतं. तोडणीला मजुर मिळत न्हवतेच शिवाय स्वतः तोडणी करुन ढीग भरावेत तर तो शेतमाल नेणार कुठं? व कसा? त्यामुळं फुलांच्या अशा निर्जीव अवस्थेचा विचार करुन, आज मात्र त्याचं आवसान पार गळालं होतं.
      निसर्गाला आव्हान न देता त्याची नेहमीच पूजा करणारा बळीराजा नियतीसमोर पुरता हतबल झाला होता. म्हणुनच, या निराशेच्या गर्तेत तो खोल डुंबून बुडून मरेल की काय? या भितीनं त्याची सहचारिणी त्याला रोज धीर देत होती...तिचा घरधनी मनानं पार चिंबून गेला होता, याची तिला जाणीव होती. आजवर शेतातल्या त्या निर्मळ फुलांवर तिचा आखीव रेखीव संसार गोड फुलावानी चालला होता. पण यंदा या विषारी रोगामुळं तिच्या या फुलाप्रमाणं दरवळलेल्या संसाराची निर्माल्यासारखी अवस्था व्हायची वेळ आली होती. जर तीच खचली तर त्याचं नि लेकराचं कसं होणारं? या काळजीनं तिचा जीव खात होता म्हणुन तर शेतीतलं कितीही नुकसान अंगावर पडुदे पण ती मात्र नियतीसमोर अजिबात ढळणार न्हवती...
  आये लगट भात व्हाढ. इतक्या दिसानं आपुण आपल्या शेतात जायाचं हाय न्हवं?” पोराचा हा भुकेला आवाज कानावर पडताच निखाऱ्याकडं डोळं लावुन बसलेली घरची लक्ष्मी भानावर आली. चुलीवरचा भात ऊतरुन तिनं तव्यात लसुण-बेसनाचा झुणका गरगटला, आणि जर्मलच्या तीन थाट्यांत भाताचे तीन ढीग रचले नि त्यावर तव्यातला झुणका निववला. बसल्याजागी डोळं मिटलेल्या धन्याला तिनं जागं केलं. थाटीतले चार घास दाटल्या ऊरानं संपवले, आणि त्या मुक्या जनावराला साठवणीतला चारा-पाणी दावुन ते तिघंही शेताच्या पाऊलवाटेनं चालु लागले...एरवी या वाटेनं चालताना तिघांच्याही गप्पा-खेळ रंगायचेत, लाडक्या लेकराला खांद्यावर ऊचलुन घेऊन आजुबाजूला पसरेललं पिकांच शिवार तो मोठ्या हौसेनं दाखवायचा...या वाटेवर त्या तिघांच्याही मनातल्या इच्छांची स्वप्नं रंगवली जायचीत..यंदा फुलांच्या किती ट्रॉल्या होतील? त्यांची किती विक्री होईल? किती बेगमी होईल? याचा हिशेब करुन, पाडव्याला नवीन बैलजोडी घ्यायची, दसऱ्याला गावदेवीच्या ऊरुसात समद्यांना गावजेवाण द्यायचं, नेहमी रफु केलेला सदरा घालणाऱ्या लेकराला नवीन जीन्सकुडती घ्यायची नि लग्न झाल्यापासुन गळ्यात एका वाटीचं काळं मणी घालणाऱ्या अर्धांगिनीला यंदाच्या दिवाळसणात सोनसाखळी करायची...अशा छोट्याशा स्वप्नांच्या लाटेवर स्वार होऊन क्षणिक का होईना पण एक सुखाची आभासी सफर ते करुन यायचेत...पण अशा वाटेवर चालताना, एरवीचे दिवस आनंदाने भारलेले होते व आजचा दिवस मात्र जीवाची काहिली करणारा होता.
      जसजसं शेत जवळ येत होते, तसतसं त्यांची पाऊलं जड होत चालली होती...इतका वेळ निःशब्द राहुन तिघंही शेताच्या बांधावर आले. त्यांनी मोठ्या जड काळजानं चहुबाजूंनी पसरलेल्या त्या पिवळ्या सोन्यावर नजर फिरविली. जवळपास महिनाभर ती गोंडस, गोजिरवाणी झेंडुची फुलं तोडणीविना तशीच झाडाला लटकुन होतीत. कितीतरी कोस पसरलेल्या त्या वावरात सगळ्या पिवळ्याशार फुलांनी झाडावरच माना टाकल्या होत्या. त्यात पुरेसं पाणीही नसल्यानं व कडक ऊन्हानं ते पिवळधमक सोनं आता पार काळवंडुन गेलं होतं. नुसता हात जरी लावला तरी पाकळ्या गळुन पडाव्यात अशी केविलवाणी अवस्था त्या फुलांची झाली होती. तीन महिन्यांपुर्वी ह्याची सुरुवात करताना त्या बळीराजाच्या ऊरात स्वप्नांची अशी काही दाटी झाली होती की तो ऊत्साहानं पार हरखुन गेला होता. वेळच्यावेळी केलेली मशागत-लागवड-पाणी त्याला त्याची पोटची भाकरी मिळवुन देणार होते. पण यावेळी काळाचा फास त्याच्याभोवती घट्ट आवळला होता. डोळ्यांनी न दिसणाऱ्या त्या भयावह विषाणुने या कष्टाळु शेतकऱ्याच्या डोळ्यांतले भाकरीचे स्वप्न पार धुळीला मिळवले होते...
      ऊन्हं आता माथ्यावरुन कललेली होतीत. त्याच्या साक्षीनं ती तिघंही बांधावर ऊभा राहुन मयतासमान फुलांकडं एका भकास नजरेनं पाहत होतीत. अशा दिनवाण्या फुलांकडं पाहुन त्यांच्या काळजाच पाणी पाणी झालं. त्यानं ऊभ्या ऊभ्या त्या एकेकाळी बहरुन ओंसडणाऱ्या पण आता विरुन गेलेल्या त्या वावराला हात जोडले...बांधावरुन थोडं पुढं होऊन त्यानं खिशातली माचिस काढली व  त्यातली काडी पेटवुन वावरात टाकली...निम्म्याहुन अधिक वाळलेल्या, सुकलेल्या फुलझाडांनी काही वेळातच पेट घेतला. मयताला अग्नी द्यावा तसा अग्नी त्यानं आज आपल्या वावराला दिला होता. हे अग्नितांडव पाहुन चिमुकल्याच्या डोळ्यांतही पाणी दाटुन आलं. त्यानं एकवार पेटत्या फुलांकडं पाहिलं व आपल्या मायला घट्ट मिठी मारली व तिच्या पदरात तोंड खुपसुन तो ओक्साबोक्शी रडु लागला. तसा मायेनं दाटलेल्या आईलाही तिचा हुंदका आवरेनासा झाला व तिचे अश्रुही पोराच्या अश्रुमध्ये मिसळुन गेले. आता बळीराजाच्या अश्रुंचाही बांध फुटला. वावरातल्या त्या स्मशानशांततेत तिघांच्या हुंदक्याचे आवाज घुमु लागले. शेजारच्या आंब्याच्या झाडावरचे पक्षीही पंखांची केविलवाणी धडपड करुन फडफडु लागले. भावनांचा हा पसारा साक्षात परमेश्वरालाही आटोपता न येण्यासारखा होता म्हणुनच इतके दिवस शेताचा धनी शेताकडं यायला धजत न्हवता. पण त्याला रोजची वाट विसरुन चालणार न्हवती. त्याची काळी आई त्याला सारखी साद घालत होती. संसारापेक्षा अधिकचे प्रेम तो आपल्या शेतावर करीत होता. तिच्या पोटी जन्मलेल्या या पेटत्या फुलांकडं पाहुन त्याचं आतडं आज तिळं तिळं तुटत होतं. त्याच्या यंदाच्या भविष्याची राखरांगोळी ऊभ्या डोळयानं तो पाहत होता. नशीबाचे हे हारलेले भोग सोसुन सोसुन बळीराजा शेवटी मनानं व भावनेनं बधीर झाला. काही क्षणांसाठी तो स्तब्ध झाला नि आता तिघांनीही काळजावर दगड ठेवुन तिथुन परतीची वाट धरली...
     घरच्या छताखाली जाऊन टेकल्यावर, शेजारच्या दोस्तानं लांबुनच आज लॉकडाऊन संपल्याची बातमी त्यांना दिली. पण आता काळाचे काटे कधीच पुढं सरकले होते कारण,तिकडं वावरात पेटलेली वाळकी फुलं आता राखेत विलीन झाली होती..कदाचित देवाच्या पायी जाण्याचं भाग्य घेऊन ती जन्माला आलेलीच न्हवती. लोकांचे जीव वाचावेत म्हणुन सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊननं आज बळीराजाचं भविष्यच लॉक करुन टाकलं होतं...आणि तिकडं राखेत फुलं निवल्यानंतरची जी भयाण शांतता दाटली होती तीच भयाण शांतता त्याच्या घरावरतीही कब्जा करुन होती...!
Story By शैलजा.

    
    

Saturday, 28 March 2020

यंदा कर्तव्य आहे..!

यंदा कर्तव्य आहे!
                                                                                 By.शैलजा
     भट्टीसारख्या आग ओकणा-या करप्या ऊन्हातुन घामानंं भिजतं, धावतं-पळतच वैशु घराच्या मागील दारानं आत धावली. हळुच कानोसा घेत, फ्रेश होऊन, बेडरुममध्ये येऊन तिनं
कपाट ऊघडलं. तसं रिसर्च-स्टडीच्या रुटीनमधुन सवड न मिळाल्यानं तिनं सगळे कोंबून ठेवलेले कपडे धाडधाड तिच्या अंगावर कोसळले. तशी ती वैतागली व तिनं आईला हाक दिली. "वैशु केव्हा आलीस तु? अगं चेहरा किती काळवंडलाय ऊन्हानं तो. फेशियल करुन आलीयस ना? नि ती हिरवीगार झालरीची साडी नको नेसु बाई. यावेळी छान लाईट पिंक कलरची साडी नेस. हल्लीच्या मुलांना असेच सोबर रंग आवडतात म्हणे". आई कपाटातुन पडलेले कपडे आवरत बोलली. " अगं आई, वेळेवर आलेय ना मी. बस ना आता. ते नेहमीचं बोअरिंग लेक्चर नको देऊ. आणि यावेळी मी फेशियल, ब्लीच वगैरे काहीही केलेलं नाहीय, मला जी आवडेल तिच साडी मी नेसणार. शिवाय मुलांकडच्यांच्या प्रश्नांना मला सुचतील ती प्रामाणिक ऊत्तर. मी द्यायच ठरवलय. ज्याला मी ओरिजिनल आवडेल त्याचा होकारच येईल ना". वैशुला लग्नासाठी पहायला येणारं हे अकरावं स्थळ होतं. या वर्षभरात तिनं दहादा फेशियल करुन चारदा हेअरकट केला होता. ऊंचीला तशी कमी, आडवा बांधा, कुरळे केस, सावळा रंग, बदामी डोळे, डाव्या गालाला एक खळी नि ऊजव्या गालावर ऊठुन दिसणारा तीळ, नि तब्येतीनं  जरा थोराड असं सर्वसामान्य व्यक्तिमत्व लाभलेल्या वैशुनं विद्यापीठातुन पुरातत्व विभागातुन पोस्ट ग्रॅज्युएट पुर्ण केलेलं. सध्या त्यांच्या विभागप्रमुखांच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये ती रिसर्च असिस्टंट म्हणुन काम करीत होती. ती या 'संशोधनात' रममाण होते, तोच तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी 'वरसंशोधन' सुरु केलं होतं. गंमत म्हणजे तिने तिच्या
क्षेत्रातील, तिच्या विचारांशी जुळवुन घेणारा, तिचाच एखादा क्लासमेट किंवा कुणी सिनिअर असल्यास तिने स्वतःसाठी स्वतःच वर शोधायचे स्वातंत्र्यही आई-बाबांनी तिला दिलं होतं. पण तिचं सुदैव असेल किंवा दुर्देव असा मुलगा मिळण्याचा योग-संयोग  तिच्या नशीबी जुळुन येण्याचा काडीमात्र चान्स न्हवता. कारण, जी कोणी ओळखीची मुलं होती, ती तिच्याकडे भावी जोडीदार पाहणा-यातील मुळीच न्हवती किंवा ऊलटही होतं..तिला तिच्या रिसर्चपलिकडे त्यांच्यात लग्नाळु वर शोधण्यात काहीएक स्वारस्य न्हवतं. राहता राहिलं एखादं प्रेमप्रकरण. जेणेकरुन निदान तिनं लव्हमॅरेज करुन तिच्याकरिता सध्याच्या चालु असलेल्या वरसंशोधनाच्या 'हार्डवर्क' ला पुर्णविराम तरी मिळाला असता. हेही अगदी आभाळातल्या सुंदरशा इंद्रधनुष्याला तिचे अलगद हात लागावेत अशा कल्पनेतल्या गोष्टीसारखे अशक्यप्राय होतं. कारण, सध्याच्या जमान्यातला, मुलांना रिक्वायर्ड असणारा 'प्रेमाचा ट्रेंडी लुक' काही तिच्याकडं न्हवता. यामुळे 'पहली नजर का पहला प्यार' वगैरे तर तिच्यासाठी क्षितिजापलिकडच्याही लांबची गोष्ट झाली. मात्र तिला विद्यापीठात सर्वजण एका कारणाने 'प्रचंड भाव' द्यायचे कारण 'ऑन दि स्पॉट ऑल नोट्स' केवळ तिच्याकडेच मिळत असत! शिवाय तिच्याकडं 'सो कॉल्ड इंप्रेशन' मारायला दोनच गोष्टी होत्या त्या म्हणजे 'तिची अभ्यासातील हुशारी' व दुसरे तिचा 'प्रामाणिकपणा'! पण या गोष्टी खोलवर पाहण्याची द्रुष्टी खुप दुर्मिळ लोकांकडं असते. अन् अशांपैकी एक दुर्मिळ व्यक्ती तिला तिच्या आयुष्यात हवी होती. आई - बाबांच्या इच्छेखातर ती 'लग्नाच्या मार्केट' मध्ये ऊतरली होती...तिची लग्नाबाबतची अपेक्षा फार काही उंच न्हवती. तिला केवळ तिचे विचार, मानसिकता समजुन घेणारा जोडीदार हवा होता. मग त्याची परिस्थिती, त्याचे कुटुंब, त्याचे शिक्षण, त्याचे आर्थिक ऊत्पन्न, शेती-वाडी या गोष्टी तिच्यासाठी 'सेकंड प्रेफरन्स' होत्या. तिची खुपच साधी अपेक्षा पाहुन काहींना आश्चर्य वाटे. थोडक्यात तिला दिसण्यापेक्षा’, वास्तवात असलेल्या लाईफ पार्टनरशी जुळवुन घ्यायला आवडणार होतं. आजवरच्या दहा स्थळांपैका नऊ स्थळांनी तिला नकारच दिला होता. यांपैकी कुणी तिच्या थोराड दिसण्यावरुन, कुणी तिला तिच्या राहत्या घरावरुन, कुणी तिच्या वडिलांच्या ऊत्पन्नावरुन, कुणी तिला पाठचा भाऊच नाही म्हणुन, कुणी तिच्या ऊंचीवरुन, कुणी तिच्या
थोड्या पुढे आलेल्या दातांवरुन, तर कुणी तिच्या कमी कमाईवरुन नाकारलं होतं. अर्थात या गोष्टी मागाहुन तिला कळल्या होत्या. एकानं तर तिच्या शिक्षण क्षेत्रासंदर्भात ती जुन्या-पुराण्या गाडलेल्या प्राचीन कवट्यांचा अभ्यास करते यावरुनही तिला नकार दिला होता. तर दहाव्या स्थळाला तिने स्वतःहुन नाकारलं होतं. दहाव्या स्थळाचा लोचा थोडा न्यारा होता. मुलांच्या घरच्यांची पसंदी होती पण पाहण्याच्या कार्यक्रमानंतर त्या मुलाने वैशुला विद्यापीठात गाठुन त्याचे दुस-या एका मुलीवर प्रेम असल्याचं इमोशनल ब्लॅकमेल करुन हिने या लग्नास नकार द्यावा अशी गळ घातली. त्यामुळे दहाव्याही स्थळाला पुर्णविराम मिळाला. पाहण्याच्या कार्यक्रमातल्या तुमचं नाव? शिक्षण? नोकरी? याबद्दलच्या विचारल्या जाणा-या त्याच-त्याच चाकोरीबध्द प्रश्नांची तिच तिच रटाळवाणी, मॅनर्समध्ये बांधलेली व घोकुन पाठ केलेली, आणि होय किंवा नाही या दोनच शब्दांत अडकलेली ऊत्तरं देऊन वैशु एका वैचारिक पातळीवर थकुन गेली होती. तिने आई-बाबांना हे कांदेपोह्यांचे कार्यक्रम थांबविण्याचे कित्येकदा सांगितले पण शेवटी एका मुलीचे जन्मदाते ते. कधी ना कधी एक गुणी जावई त्यांना भेटेल या आशेवर ते त्याचा मोठ्या नेटाने शोध घेत होते. अर्थात आपल्या मुलीच्या कर्तुत्वावर त्यांचा विश्वास होताच पण तिच्यासाठी तिचा जीवन साथीदार शोधण्यासाठी समाजाने लग्न जुळविण्याच्या या 'इंटरेस्टींग ट्रॅक' वर चालणं त्यांना भाग होतं. त्यामुळं त्यांनी यंदा कर्तव्य पार पाडताना वैशुशी वेळोवेळी मोकळा-ढाकळा संवाद साधायला सुरुवात केली. काही गोष्टी तिच्या कलाने घेतल्या. आता अकराव्या स्थळासाठी पाहुणचारासाठी कांदेपोहे न ठेवता छान तळलेला कुरकुरीत खमंग काजु बेदाणे घातलेला तिखट चिवडा व जोडीला चांदीचा वर्ख लावलेली काजुकतली तेही चॉकलेट, पिस्ता, अंजीर अशा मिक्स फ्लेवरची! असा  बेत योजिला. आता मात्र हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 'कांदेपोह्यांचा' न्हवे तर 'काजु-चिवडया' चा कार्यक्रम होणार होता.
      या दरम्यान...वैशु जाम वैतागली होती. आता मात्र तिच्यातला 'सेल्फ रिस्पेक्ट' जागा झाला. ती आतुन डीस्टर्ब राहु लागली. 'कांदेपोहे' खाऊन त्यांच्या वासानेही तिला त्याची अक्षरशः शिसारी येऊ लागली. आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातुन 'कांदेपोह्याला' तिने पुर्णपणे तिलांजली दिली. आपल्यात काय कमी आहे? याचा ती शोध घेऊ लागली. खुप विचारांती तिच्या लक्षात आल की, कमी आपल्यात नाहीय ती आपल्याकडे पाहणा-याच्या 'द्रुष्टीकोनात' आहे. आपण एका अनुभवी व्यक्तिशी यासंदर्भात मार्गदर्शन घेतल पाहिजे जेणेकरुन हे कांद्यापोह्यांचे चाललेले कार्यक्रम तिच्यासाठी थोडेतरी सुकर होतील. यासाठी तिने याच 'गोंधळी प्रोसेसमधुन' गेलेल्या एका मैत्रीणीच्या काही 'उपयुक्त ट्रीक्स' वापरायचे ठरविले होते. अकराव्या स्थळाच्या बाबतीत तिने पुर्ण तयारीनिशी या ठरवाठरवीच्या मैदानात ऊतरायचं ठरवलं. तर तिनं  आता त्या अनुभवी मैत्रीणीशी सल्ला-मसलत व काही खलबतेही केलीत. या चर्चांतरानंतर ती ह्या अनुमानापर्यंत पोहोचली की, खरंतरं अरेंज्ड मॅरेज हा आपल्या माणसांनी आपल्याच भावी हितासाठी घालुन दिलेला एक मजेशीर पण सुंदर असा ट्रॅक आहे. यावरचे चालणे प्रसंगी धावणे आपण एन्जॉय करायला हवं. व यामध्ये आपल्याला मनापासुन साथ देणाराही शोधुन निवडण्याचा पर्यायही आहे. तर, वैशुने पहिला वहिला प्रयोग केला तो मिशन वेटलॉस!’ चा. फार काही नाही पण एक योगाचा क्लास करुन टाकला. महिन्याभरात ती कमनीय दिसु लागली. नंतर तिने तिच्या रुटीन लुकचे रुपांतर आताच्या जमान्यातल्या मॉडर्न ट्रेंडी लुक मध्ये केले. यासाठी तिने फार काही ऊपद्य्व्याप केले नाही तर थोडे केस घुंगराले केले..आय-लायनर,आय-ब्रो पेन्सिल मारली. अगदी लाईट कलरची लिपस्टीक व मंद सुवासाचा डीओ वापरायला सुरुवात केली. कपड्यांमध्येही तिनं साजेसा लुक फॉलो केला. छान सुती वारली पेंटींगचे कुर्ते, कानात मॅचिंग कुड्या, अँकलिंग जीन्स, कोल्हापुरी चपला असं काहीतरी ती ट्राय करु लागली. पण या बदलांसोबतच तिच्यातला आत्मविश्वास मात्र तिने कायम ठेवला. अर्थात केवळ कपड्यांनी आधुनिक होणं गरजेचं न्हवतं तर चांगल्या विचारांनी आधुनिक होणं म्हणजे खऱ्या अर्थाने मॉडर्न बनणं याचं वैशुला पुरेपुर भान होतं. हळुहळु तिच्यातला हा दिसण्यातला बदलतिच्या असण्याला अधोरेखित करु लागला. तिच्या वाऱ्यालाही न ऊभारणारे तिच्यातल्या ह्या बदलाला गुडी गुडी कॉम्प्लिमेंट्स देऊ लागले...चष्मा-भिंगांचे डीपी ठेवणारी वैशु आता व्हॉट्सअप, फेसबुकवर तिच्या छान छान या बदलावु लुकचे डीपी ठेवु लागली. तिच्या सोशल नेटवर्कींग गोतावळ्यात तिच्या डीपी, स्टेटसची आवक-जावक वाढली. आता मात्र हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 'कांदेपोह्यांचा' न्हवे तर 'काजु-चिवडया' चा कार्यक्रम होणार होता. आज ती दुपारी याच कार्यक्रमासाठी हातचा रिसर्च सोडुन घरी आलेली. आजच्या सिईंग प्रोग्राममध्ये काहीतरी वेगळे घडणार होते हे निश्चित. कारण यावेळचा डाव वैशुच्या बाजुने जिंकण्यासाठी तिने जय्यत तयारी केली होती.  आज दुपारी अकराव्या स्थळातले मुक्काम पोस्ट म्हणजे नियोजित वर त्याच्या लवाजम्यासह वैशुला पाहण्यासाठी तिच्या घरी येऊन स्थानापन्न झालेले. भावी नवरामुलगा तसा खेडेगावातलाच होता पण मोठ्या स्ट्रगलमधुन वर आल्याची माहिती मध्यस्थीने दिली होती. मुलगा माणसांचा डॉक्टर होता. वैशुला याची कल्पना दिली गेली. दुपारच्या रणरणत्या ऊन्हातुन फ्रेश होऊन वैशुने सौम्य पिस्ता रंगाची साडी नेसली...सुंदर मॅचिंग बांगड्या व एका हातात घडी. कुरळ्या केसांत निरागस अबोलीचा गजरा माळला. गळ्यात तिच्या आद्याक्षर v ची साखळी ठेवली.  आज तिच्या अंगी एक वेगळाच ऊत्साह होता. आईने देऊ केलेला चिवडा व काजुकतली, सरबताचा ट्रे घेऊन तिनं हॉलमध्ये लिमीटेड असं लाजतच एंट्री केली. ट्रे मधुन तिनं खाणं सर्व्ह केलं व समोरच्या खुर्चीवर ती बसली. तिच्या डाव्या हाताला बसलेल्या, किंचित ढेरी पुढं आलेल्या  तरुणाकडे तिनं तिरकस नजरेनं पाहिलं. तो तरुण बकाबक चिवडा हाणीत होता. वैशुला हसु फुटलं पण ते हसु तिनं ओठांतल्या ओठांत दाबलं. हं...हे ध्यान आहे तर! स्वारीला चिवडा आवडतो तर..पण खायला कळतं तसं ह्याला व्यायाम करायला कळत नसेल का? वाटतच नाही हा डॉक्टर वगैरे असेल..असे विचार वैशुच्या मनात क्षणभर तरळुन गेले. हा आमचा रामेश्वर. खुप जिद्दीने डॉक्टर झालाय. परिस्थिती म्हणाल तर तुमच्या मुलगीला काही कमी पडु देणार नाही इतका धनाने  नाही तर मनाने व बुध्दीने श्रीमंत आहे तो. त्याच्या आईच्या माघारी आमचं बिऱ्हाडचं त्याची माय झाली. बाकी मुलीची माहिती मिळालीय आम्हाला. तुम्हाला आणखी काय बोलायचं असेल तर बोलुन घ्या.  चिवड्याचा एकच चमचा तोंडात टाकुन प्लेट बाजुला ठेवत मुलाच्या काकांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. समोरच्या ऊजव्या कोपऱ्यात रंगानं थोडा सावळा, उंचीनं जेमतेम, अंगात पांढरा सुती सदरा व बारीकशा नाजुक काड्यांचा चश्मा घातलेल्या तरुणाकडं वैशुनं नजर वळवली. तशी ती  आणखीनच स्टॅच्यु झाली. चिवडा खाणारा मुलाचा भाऊ असल्याचा समजताच ती फिसकन स्वतःवरच हसली..दरम्यान तो तिच्याकडेच पाहत होता हे पाहुन वैशुनं सेकंदात तोंड मिटलं. त्याच्या चेहऱ्यावरच विलक्षण तेज वैशुनं कॅप्चर केलं. त्यानं एक हलकेसं स्मितहास्य केलं तशी वैशु बावरली. तिची चुळबूळ सुरु झाली. तसे रामेश्वरच्या भावाने जुजबी प्रश्नांपेक्षा त्या दोघांना एकांतात काही बोलायचं असेल तर बोलु द्यावं असं मोठ्यांना सुचविलं. तशी वैशु खुष झाली कारण असं स्थळाशी बोलणं पहिल्यांदाच होणार होतं.  त्यानुसार रामेश्वर व वैशु घराच्या गच्चीवर गेले. खरंतरं मला तुम्ही रिसर्च करीत असलेलं क्षेत्र फारच इंटरेस्टींग वाटल म्हणुन मी हीथवर आलो असं समजुन जा”. डोळ्यांवरचा चश्मा हटवित रामेश्वर वैशुला बोलला. हो का? चांगलंय की. माझा फोटो पाहुन न्हवे तर माझं अभ्यासु क्षेत्र पाहुन लग्नासाठी पहायला येणारं स्थळ म्हणजे दुर्मिळच म्हणायला हवं! पण तुम्ही पेशाने डॉक्टर. मग डॉक्टर मुलींची कुठे कमीय?” वैशु थोडी खोचक टोनमध्ये बोलली. मला माझं हॉस्पीटल सांभाळायला साथ देणारी डॉक्टरच मुलगी हवी होती पण समान रंग कसे मुळमुळीत, बोअरिंग वाटतात व तेच रंग जर कॉंट्रास्ट असतील तर त्या रंगांमधील कोणतीही गोष्ट खुलुन ती अधिकच सुंदर दिसते या फॉर्म्युल्यानुसार थोडा मुलींचा सर्च  करावा म्हणुन मी तुमच्यासारखी रिसर्च करणारी मुलगी पाहिली”. वैशुच्या नजरेशी नजर भिडवत रामेश्वर ऊत्तरला. हे ऐकुन वैशु मनातुन गलबलली. तिने क्षणार्धात नजर चोरली. हं. अस्सय तर. मग पहा हो नीट मला. तुम्हाला हवा असणारा रंग दिसतोय का माझ्यात?” वैशु हसत-हसत बोलली. आधी तुमच्या आयुष्याची सुखद किनार रंगवायला माझ्यातला रंग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुमचा होकार महत्वाचा. मग माझा. तुम्ही निर्जीव शरीरं अभ्यासता आणि मी मानवी सजीव शरीर तपासतो, अभ्यासतो तस माणसाचं मनही अभ्यासता येत मला. तुम्ही दिसायला छान आहातच आणि शेवटी माणुसच आहात पण तुमच्या शरीरातला जो अंतरात्मा आहे त्यातले विचार व संस्कार माझ्यासाठी महत्वाचे. काय!” काढलेला चश्मा पुन्हा डोळ्यांवर चढवित रामेश्वर एक मंद हास्य करीत वैशुला बोलला. हे ऐकुन वैशु पार सातवे आसमांनपर तरंगली..तिला सध्या गच्चीत नाहीतर छान फुलांनी नटलेल्या बागेत असल्याचा भास झाला एवढचं न्हवे तर त्या बागेतल्या झोक्यावर बसुन तिनं असा काही ऊंचच्या ऊंच झोका घेतलाय की त्या आनंदानं पार धन्य धन्य झालीय असाही फिल तिला काही वेळ आला. ती इतके दिवस ज्या क्लीक च्या शोधात होती नेमकी तीच क्लीक तिला आज मिळाली. ती भानावर आली. रामेश्वर तिच्याकडे ती पुढचे काहीतरी पॉझिटीव्ह थॉट्स मांडेल या आशेने पाहत होता. तशी वैशु चमकली. अशा सुंदर विचारांचा, संयमी तत्वांचा माणुस ती पहिल्यांदाच पाहत होती ती काहीवेळ निःशब्द राहिली... आणि तिनं चोरलेली नजर त्याच्या चेहऱ्यावर थेट खिळवली तसं तिचं व त्याचं यंदा कर्तव्य फिक्स असल्याचं रामेश्वरच्या मनानं जाणलं. दोघंही अगदी खळखळुन हसले...अन दोघांनाही भर ऊन्हातं प्रेमाचं चांदणंपडल्याची आंतरिक जाणीव झाली...!  


                                                                                     By.शैलजा
                                


Monday, 2 March 2020

कॉफी..! (एक सत्यकथा)


कॉफी…! ( एक सत्यकथा )
                                                                         ..By शैलजा.
    
 कपाळावर टेकवलेल्या दोन्ही हातांना सोडवत, तिने एक दीर्घ ऊसासा टाकला आणि त्याच्या दुरवर निघुन जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहतच राहिली...आजवर आयुष्यात असे हातातुन निसटुन जाणारे पण ते जिवानिशी धरुन ठेवावेसे वाटणारे असे कित्येक क्षण तिच्या अंतरात्म्याने अनुभवले होते. डोळ्यांतली आसवं रोखुन रोखुन तीचे मन ऊबले होते. आणखी काही दिवस जर असेच गेले तर ती एक रोबोट बनेल की काय अशी शक्यता नाकारता येत न्हवती. आज त्याने तिच्या आयुष्यातला सुंदर स्वप्नांच्या पलीकडला असा फायनल डाव टाकला होता. गेल्या तीन वर्षांपासुनच्या त्याच्या व तिच्या मैत्रीच्या नात्यापुढे जाणारे प्रेमाचे नाते त्याला आयुष्यभरासाठी आता हवे होते. आज या फायनल प्रपोजचा पत्ता टाकुन तो निर्णयाची आस ठेवून निघुन गेला होता. तो पत्ता ऊचलुन तिला हा डाव जिंकायची संधी असुनही तिचे मन असा विचार करण्यासही धजावत न्हवते. कारण तिचा काळाकुट्ट भूतकाळच तिला हा प्रेमाचा डाव जिंकु देत न्हवता. कधी न्हवे ते त्याला जीवापाड आवडणारी कॉफी तो अर्धवट टाकुन निघुन गेला.त्याने दिलेला, टेबलावर ठेवुन दिलेला, तो गुलाबांचा बुके तिने ऊचलला तसा त्यातला एक काटा तिच्या नाजुकशा बोटांत टचकन् टोचला. याने ती थोडी दुखावली. पण हा काटा वेगळा होता. हे दुखणे तिला सुखावणारे होते. त्या दुखऱ्या बोटावर हळुवार प्रेमाने फुंकर मारतच कॉफीबील भागवुन ती कँफेमधुन बाहेर पडली.जीव गुदमरुन टाकणा-या ट्रॅफिकच्या रगाड्यातुन ती घरी आली. घर ते कसले! थोड्याफार सामानासकटच्या चार भिंतीच त्या! माणसांच्या हसण्या-खिदळण्याला ते घर पोरकेच होते. एरवी, दिवसभर ऑफिसच्या कामात तिच मन रमुन जायच पण सांजवेळी घरी आल्यावर तिला तिचा एकांत अक्षरशः खायला ऊठायचा! ज्या देवाला तिच्या भाग्याची जरासुध्दा दया न येता नियतीच्या गुढ फेऱ्यात अडकुन तिची अख्खी जिंदगीच अंधारमय झाली होती तरीही
देव्हा-यातल्या देवापुढे अंधार नको म्हणुन निदान दिवा लावायच्या एकमेव ओढीने ती घरी यायची. आज 'त्याच्यासोबतची' फायनल भेट म्हणुन ती कॉफी डे मध्ये गेली होती. तशीच घरी लवकर निघुन आली. आल्यानंतर फ्रेश होऊन दिवेलागण केली. कितीदा ती कडवट कॉफी प्यायची? शेवटी 'त्याच्यामुळेच' तिला चहा सोडुन कॉफीची सवय होऊन गेली होती. अजुनही निर्णय होत न्हवता...चहा करावा की कॉफी? शेवटी तिने तिला आवडणा-या चहाचेच आधण ठेवले. आणि तिने एफएम ची ट्युन सेट केली....
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥
राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ?
राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी॥...
नेमके हे गाणे ऐकुन तिच्या अंगावर सरर्कन काटा आला. तिने स्वतःलाच एक घट्ट मिठी मारली व रडु लागली..तेवढ्यात चर्रचर्र चर्रचर्र असा आवाज करीत चहा पार ऊतु गेला. तिने पटकन गॅस बंद केला पण त्यातल्या करपट चहापुडीचा वास तिला आता असह्य झाला. तिने लगेच एफएम ऑफ केले. आता मात्र तिला कॉफी प्यावीशी वाटु लागली...शेवटी ती बनवुन बाल्कनीत येऊन आराम खुर्चीवर ती रेलुन बसली. तेवढ्यात बाल्कनीतल्या कुंडीतला आजच खुललेला गुलाब तिला बोलवु लागला. तो डार्क व्हेलवेट रेड टपोरा गुलाब फांदीच्या आडोशाहुन जणु तिच्याशी काही बोलु पाहत होता...

त्याच्या पाकळ्यांमध्ये तिला तिच्या भूतकाळाचा सुवास खुणावू लागला...शाळा-कॉलेजमध्ये  असताना असाच डार्क व्हेलवेट गुलाब तिला नेहमी बक्षीस म्हणुन मिळायचा. सर्वांत सुंदर मुलगी म्हणुन. तिचे निळसर घारे डोळे सोनेरी केस, नितळ कांती, आणि डॅशिंग स्वभाव. पाहताक्षणी अगदी कुणीही प्रेमात पडावे असे तिचे अप्सरामय सौंदर्य...रोज कानामागे काळा तीट लावुनच तिची आई तिला घराबाहेर सोडायची. इतके तिचे आरसपाणी सौंदर्य जगजाहीर होते. पण सुंदर, सोनेरी रंगीबेरंगी माशांना आयुष्यभर काचेच्या पेटीत राहुन त्यांना त्यांच्या सौंदर्याची शिक्षा भोगावी लागते. त्यांना चांदण्यांच्या प्रकाशात, मनमोहक आस्वादी अशा निळाशार समुद्रात पोहण्याचा आनंद त्यांच्या नशीबात नसतो! असचं तथ्य तिलाही लागु होतं.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असतानाच सगळीकडे चर्चा सुरु झाली ती, तिच्या लग्नाची. तिला खुप शिकायच होतं. पण वडिलांच्या धाक-शिस्तीपुढे तिचे शिक्षणही हरले. एकापेक्षा एक सरस स्थळे येऊ लागली. मुलगा चांगला बिझीनेसमन. कोट्यावधींची ऊलाढाल करणारा. बंगला, गाडी, शेतजमीन, फार्महाऊस सगळी सगळी सुखं अगदी तिच्या पायाशी लोळण घेणारी. कुठल्याही मुलीच्या आई-वडिलांना आणखी काय हव असतं? जी आयुष्यातली कमतरता, दुःखं, संकटं त्यांच्या वाट्याला आली तशी ती पोटच्या लेकरांच्या वाट्याला नकोत हीच त्यांची एकमेव इच्छा असते. अगदी याच इच्छेपुढे ती नमली. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान या एकमेव गोष्टींसाठी तिने स्वतःच्या आयुष्याचा जणु जुगार खेळायचे ठरविले. हरलो तर हरलो. जिंकलो तर जिंकलो. हीला पाहताक्षणी लग्न जमले. तिच्यात व त्याच्यात कोणताही संवाद नाही. नवीन नात्याची ओढ नाही. पण सर्वांनी एकच अनुमान काढले. ते म्हणजे मुलगा एकदम शांत, अबोल व लाजरा आहे. लग्नानंतर थोडा सोशल व फ्रि होईल. आता हीची जबाबदारी वाढली होती. एका अनोळखी व्यक्तीला जीव लावुन त्याच्या वाटेने त्याच्यासोबत आयुष्यभरासाठी चालायचे होते. लग्नानंतर तिला राजेशाही थाट मिळाला, दागदागिन्यांचे ओझे तिला पेलवेनासे झाले इतकी हौस तिच्या नशीबी आली, रोज पंचपक्वान्नाची गोडी मिळाली, जे तिने पाहिले न्हवते ते तिला ऊपभोगायला मिळाले, फक्त एक गोष्ट सोडुन ते म्हणजे नवऱ्याचे प्रेम!’

    प्रेम ह्या शब्दाचा अर्थ फुलविणारे तिचे वय. त्या अर्थातल्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलायचे तिचे वय. लडिवाळपणे कोड-कौतुकांमध्ये रमायचे तिचे वय! पण तिच्या जीवनाचा सारीपाट असा काही ऊधळून निघाला की त्यातले प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे, सुखा-समाधानाचे डाव खेळण्याआधीच ती हरुन बसली. नवरा नावाचा माणुस न्हवे तर प्राण्याशीचजणु ती तडजोड करीत होती. तो तिच्याशी कुठल्याही गोष्टींबाबत बोलणे करीत नसे. महिन्यातले निम्मेअधिक दिवस बाहेर कामानिमित्त तो न सांगताच निघुन जात असे. अर्धांगिनी म्हणुन आयुष्यातली सुख-दुःखे वाटुन घेणे तर लांबच पण ती त्याच्या घरी राहणारी एक सदस्य आहे ह्याचाही त्याला विसर पडत असे. तो माणुस म्हणुन एकदम विचित्र होता. त्याला फारसे मित्रही न्हवते. तिने पहिले वर्षभर त्याच्याशी जुळवून घेण्याचा नितांत प्रयत्न केला पण त्याच्या या वागण्यामध्ये काडीभरही फरक पडला नाही. केवळ नि केवळ आपल्या आई-वडिलांच्या प्रतिष्ठेपायी व त्यांच्या समाधानासाठी म्हणुन ती संसार नावाचा गाडा एकेरीच हाकत होती. ती जगुनही रोज मरत होती. तिच्या भावनांचा इतका कोंडमारा होत असे की कधी कधी तिला वेड लागेल की काय अशी भीती असायची.
आज तिच्या व त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस! माणुस आशेवरच तर जगत असतो. या वेड्या आशेपायी तिने केक बनविला, सगळे घर सुंदर सजविले, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती छान सजुन त्याची वाट पहात बसली. असा कितीतरी वेळ निघुन गेला. तो आला...पण तोवर दुसरा दिवस ऊजाडला होता. पहाटेचे चार वाजलेले. ही बसल्याजागी वाट पहातच निजुन गेलेली. जाग आली. तिने पाहिले तो निवांत झोपुन गेलेला. ही ऊठली. हे पाहिले नि तिच्या सहनशीलतेचा बांध आज मात्र कोसळला. तिने त्याच्या तोंडावर पाणी मारुन ऊठवले. तो रागाने ऊठला.मूर्ख बाई तुझी जागा बाहेर आहे. हीथे नाही. आजवर तुला कळायला हवे होते की तु फक्त दिखाव्याला माझी बायको आहेस. तु जगासाठी असशील देखणी परी, पण माझ्यासाठी केवळ आखीव रेखीव पुतळा आहेस तु. माझं जग दुसरी कोणीतरी आहे. केवळ घरच्यांच्या इच्छेखातर मी तुला या घरात आणलय. माझ्या आयुष्यात तुझे शून्य स्थान आहे समजल तुला? आता तर माझा पिच्छा सोड. तो तावातावाने तिच्या अंगावर धावून ओरडुन तिला सांगत होता. हे सारे तिने ऐकले. मरणयातना बऱ्या पण हे शब्द नकोत असे तिला वाटले, तत्क्षणी तिने पाण्याने भरलेली घागर बदाबदा स्वतःच्या अंगावर ओतुन घेतली. ही काय केली तुझ्या नावाने आज मी अंघोळ. तुझ्यासारख्या वेडसर माणसाशी मला संसार करण्यात मुळीच स्वारस्य नाही. पण हीथुन पुढील क्षण मी फक्त नि फक्त स्वतःसाठीच जगेन. वीज कडाडावी तशी ती मोठ्या त्वेषाने त्याला बोलली.


पुढे कोर्टकचेरीचे सोपस्कार होऊन दोघेही घटस्फोट नावाच्या घावाने पुर्णतः वेगळे झाले. हा घाव काही सोप्पा तर नसतोच पण सहजासहजी भरुन निघणाराही नसतो. या घावाने दोन व्यक्ति न्हवे तर दोन कुटुंबेच उध्वस्त होतात. तिने पुढील २-३ वर्षांत शिक्षण पुर्ण केले. तिला छान नोकरी मिळाली. नातेवाईक-शेजारी-जोडलेले सगळीकडे तिच्याबाबतीत जे काही झाले त्याची हळहळ व्यक्त होऊ लागली. सर्वांनी तिला संसारात बाईनेच खऱ्या अर्थाने तडजोड करावी लागते, निदान मागील भावंडांचा, आई-वडिलांचा तरी विचार कर असे सांत्वन करुन त्या नवरा नावाच्या विचित्र माणसाकडे परत जायचा सल्ला दिला. तिला समाज नावाच्या हत्याराने  वारंवार तिच्या मनाचे, भावनांचे तुकडे करुन पुरते घायाळ केले, पण अशा वेळी तिचे वडिल तिच्या पाठीशी खंबीर ऊभे राहिले. तिने हे लग्न करतेवेळी आपल्या स्वप्नांचा केलेला त्याग तिला वडिलांच्या रुपात एक नवीन ऊमेदीचे आयुष्य जगायला प्रेरणा देत होता.
     हाय, आय एम दि न्यु ब्रॅंच कोऑर्डीनेटर ऑफ धिस ऑफिस”. डोळ्यांवरचा गॉगल खिशाला अडकवत एक क्युट स्माईल देत तो तिला बोलला. लॅपटॉपवरील नजर हटवत तिने त्याच्याकडे पाहिले तसे तिच्या मनात नि मेंदुत काहीतरी क्लीकझाले. ती क्षणभर शहारली. कोणतीतरी जुनी पुराणी एक गुढ ओळख असावी असा तिला भास झाला. तिनेही एक मंद हास्य करीत आपली ओळख त्याला करुन दिली.
     आता मात्र आयुष्याचा एक नवीन कित्ता गिरविला जात होता तेही तिच्या नकळत. तिला चहाचे वेड होते तर त्याला कॉफीचे. त्यांच्यातील मैत्रीचे बंध चांगलेच घट्ट विणले इतके की ती कॉफीप्रेमी झाली व तो चहाप्रेमी!’ कॉफी?’ असे त्याने विचारायचा अवकाश क्षणात ती ओके. बोलुन ठरलेल्या कॅफेमध्ये जायची. रोज तिचे व त्याचे बोलणे, सुख-दुःखाचे शेअरिंग सुरु झाले. तो एक माणुसकीने भारलेला माणुस होता. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे चांगले ज्ञान व भानही होते. एका स्त्रीबद्दल त्याच्याकडे नुसतचे स्त्रीदाक्षिण्य न्हवते तर त्यापलीकडेही कोणतीही स्त्री एक माणुसही असते याची त्याला पुरेपुर जाणीव होती. त्यानेही लग्नाचा प्रंपच केला. पण जोडीदारीण फारच ईगोइस्ट निघाली. कसातरी तीनेक वर्ष त्यांचा मेळ बसला आणि शेवटी तिनेच एकदाचा या नात्याचा शेवट केला. तोही हीच्यासारखाच एक जखमी राजहंस होता. आयुष्यातल्या या चुकलेल्या परिपाठाने त्याला सही असलेले जगणे मात्र शिकविले होते. हे सगळे तिने त्याच्या बाबत अनुभवलेले एक वास्तव होते.

आणि हेच वास्तव तिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या एका अनामिक अशा ओढीचे कारण बनले. या दोन वर्षांत त्याने तिच्यासोबत तिच्य़ा आई-वडिलांच्या मनातही घर केले. सर्वांनाच तो हवाहवासा वाटु लागला.
 आणि...आज कॅफे डे मध्ये त्यालाही ती व तिचे कुटुंब आता कायमस्वरुपी त्याच्या आयुष्यात हवे असल्याचे तो तिला सांगुन तिच्या निर्णयाची वाट पाहत निघुन गेला...ती अजुनही बाल्कनीत त्या डार्क रेड व्हेलव्हेट गुलाबाकडे पाहत या विचारांत गढून गेली. तिला खरेतर लग्न या शब्दाची नुसती भिती न्हवे तर दहशत वाटत होती. तरीही तिला त्याचा सहवास नकोसाही वाटत न्हवता. कपातली कॉफी तर कधीच संपलेली. पुन्हा तिने एक दीर्घ ऊसासा टाकला..मात्र विचारांचे चक्र थांबविले. व पुन्हा एकदा आणखीन् कॉफी बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. आता ती एक न्हवे तर दोन कप कॉफी बनवणार होती.कॅफेतली अर्धवट सोडलेली कॉफी घरी प्यायला ये. असा एक फोनकॉल तिने त्याला केला...नि ऑफ केलेली एफएम ट्युन पुन्हा सेट केली...ती ते गाणे स्वतःही गुणगुणु लागली...
वेड पांघरावे न व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हुरहुर वाढे गोड अंतरीही, पास पास दोघांत अंतर तरीही...
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे, हो ऊन सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा...
ना त्याचे बंधन व्हावे तु ही रे माझा मितवा...
                                                                       --    शैलजा खाडे.