Saturday 8 August 2020

दोस्ती...!

 

दोस्ती..!

       सगळं कस गुडी गुडी चाललेलं. स्वतःच नवीन घर सजवताना मन आत्यंतिक आनंदानं भारलेलं होतं. एकीकडं आयुष्यातल्या सर्व इच्छा-आकांक्षा भरुन पावल्यात असा फिल यायचा तर, दुसरीकडं जुनं भाड्याचं घर सोडताना तिथल्या गोतावळ्याचा पाश मनाभोवती असा काही घट्ट लपेटायचा की तिथल्या आठवणीनं मनाच्या कोपऱ्यात अनावर रुखरुख ही भासायचीच. चांगली माणसं आयुष्यात येणं हा काही योगायोग नसतो ती येतातच पण त्यांना वेळीच ओळखावं लागतं व आपल्या अंतःकरणातल्या निर्व्याज ऊमाळ्यानं त्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान हे भक्कम करावं लागतं. नवीन घराच्या भोवतालच्या  नवीन वातावरणात रुजणं तस जडच जाणार होतं. हीथल्या सोसायटीत म्हणावी तशी जीवाभावाच्या नात्याची नाळ कुणाशीच जुळली न्हवती. त्याला कारणही तसच खमकं होतं म्हणा. अशी नाळ जुळायला नव्यानं भेटणारी व्यक्ती ही एका वैचारिक आणि भावनिक या दोन्हीं पातळीवर आपल्याला हक्काची वाटायला हवी, सोबतच आपापले सगळे सिक्रेट्स पोटात ठेवणारी, आपसुक समजुन घेणारी, दिल्या-घेतल्याचं मोजमाप न ठेवता, अमर्याद प्रेम, जिव्हाळा, मैत्रीची ऊधळण करणारी अशी व्यक्ती हीथ भेटणं तर जवळपास अशक्यच होतं. जशी की जुन्या घरी राहताना ती मला भेटली होती. त्यामुळं राहुन राहुन मला तिची आठवण आल्याशिवाय रहायची नाही. म्हणुन वरचेवर माझी व तिची फोनाफोनी चालु असायची. ती माझ उच्चारत असलेलं नाव मला जाम आवडायचं.ऐवजी आणि ऐवजी ज्य असं काहीतरी...

     हे पाह्य सैलेज्या तु ह्यावेळनं तरी माज्या घरी यायला पाह्यजेल. आता माजे बी व्याप वाढवुन घेतलेत मी. हीथं जवळचं कपड्याच्या दुकानातं जाते बगं मी कामाला. लेकराच खाणं-पिणं, घरच आवरुन जाते. तेवडाच आधार नाह्य का गं? नायतर कोणं बाय जीवाला पुरले जनमभर?” ती फोनवर माझ्याशी बोलत होती नि माझे कान न्हवे तर अश्रुंनी भरलेले डोळेच तिचं हे बोलणं ऐकत होते. तिच्याशी जेव्हा जेव्हा बोलणं व्हायच, तेव्हा तेव्हा एक वेगळं रितेपण मला माझ्या आयुष्यात जाणवायचं. हे रितेपण म्हणजे मला तिची असणारी काळजी. तिच्या मुलाचं म्हणजे शिक्षण कसं होणार? तोवर तिला तिच्या दुखण्यातुन तिच आयुष्य जगण्यासाठी पुरेल का? तिला या समाजात आणखी कुणी भक्कम साथ देणारं भेटेल का? की, तिला कुणी फसवेल? आपल्या परीनं तिला काय व कोणती मदत करता येईल? या प्रश्नांनी अख्खी रात्र मनाला खाऊन उठायची जेव्हा तिची जगण्याची धडपड ती मला सांगायची. या धडपडीत ती मला मात्र कधीही विसरलेली नाही ही तिची खासियत.

     ती...!’ आयुष्यातील एक अशी व्यक्ती जिनं आयुष्य जगण्याची एक वेगळी परिभाषा मला शिकवली. रक्ताच्या नात्यालाही लाजवेल असा एक गोड आंतरिक ऊमाळा देणारी व्यक्ती...जिच्यावरच्या अपार प्रेमाविषयी लिहिण्यासाठी माझ्याकडील शब्दही अपुरे पडावेत अशी व्यक्ती... आयुष्याकडुन फार काही अपेक्षा न ठेवता ते नेटानं जगणारी हरहुन्नरी व्यक्ती... पुन्हा पुन्हा कोसळुनही तेवढ्याच जिद्दीनं पाय रोवुन ऊभा राहणारी अशी व्यक्ती... तिनं मला मैत्री कशी असावी? हे मैत्रीच नातं निभावणारी मैत्रीण कशी असावी? याचं एक जिवंत ऊदाहरणच जणु माझ्या जीवनात घालुन दिलं.

   फार कमी लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या सुख-स्वप्नांचा मोठा गवगवा न करता सचोटीनं आयुष्य जगण्याची कला परमेश्वरानं बहाल केलेली असते. अशांच लोकांपैकी ती एक होती. दिसायला सावळी, नाकात चमकी, लांबसडक केस, पायात एकदम भारदस्त चांदीच पैंजण, जोडवीही तशीच दणदणीत, डाव्या हातात, पायात काळा धागा, गळ्यात लांबच लांब फक्त सोन्याच्या मण्यांचं मंगळसुत्र व गळ्यातही काळा धागा, हातात दरवेळी नवीन डीझाईनचे कंडे, नेलपॉलिश आणि दोन तीन अंगठ्यानी हात सजलेला, चुडीदार वा साडी किंवा गाऊन अशा कपड्यांमध्ये गाजलेली जी ती फॅशन ज्या त्या वेळेस घालुन मिरवणाऱ्या व्यक्तीमत्वाची ती.. म्हणजे ओरिजीनल गावाकडील पण प्युअर शहरी स्टाईलचे अजब रसायनच होती. तिला पहिल्यांदा भेटल्यावर मनाला हळुवार वाटुन गेलं ही आपल्याला याआधीच भेटली असती तर कित्ती छान झाल असतं. अगदीच दुष्काळी भागातल्या अस्सल खेड्यातुन नवऱ्याच्या नोकरीसाठी ती शहरात आलेली. फारशी बुकं न शिकलेली पण व्यवहाराला चोख असणारी, व्यवहार नि मैत्री यांमध्ये माझा नेहमीच गोंधळ होतसे पण एकदा का एखाद्या व्यक्तीला जीव लावला की लावला. तिथं व्यवहाराला शून्य स्थान असतं हा धडा तिनं घालुन दिला. तिचं बालपण अगदीच साध्यात गेलेलं. कोरडवाहु पण भरपुर शेतजमीन असणाऱ्या घरची भांडीकुंडी, झाडलोट, पाणीशिंपण, आणि शेतातली खळ्यातली कामं यातचं तिचा दिवस ऊगवायचा नि मावळायचा. वेगळं अस स्टायलिश नि चकचकीत विश्व तिनं कधी पाहिलच नसल्यानं या शहरी जगताबद्दल तिला कमालीचं आकर्षण होतं आणि नेमकं पुण्यासारख्या शहरात तिच्या वैवाहिक जीवनाची एंट्री झाली.  अगदीच दुष्काळी भागातल्या अस्सल खेड्यातुन नवऱ्याच्या नोकरीसाठी ती शहरात आलेली. सुरुवातीला ती आली तेव्हा तिला एकट्यानं साधा रस्ताही पार करायला यायचा नाही एवढी वेंधळी. पण हळुहळु तिनं काही शहरी गोष्टीही आत्मसात केल्या पण तेही आपला गावठी बाज जपुनच. तिच्यात नि माझ्यात एक कमालीच साम्य म्हणजे जगण्यातला साधेपणा. त्यामुळेच की काय मला तिची व तिला माझी आजतागायत ओढ टिकुन आहे.

     अगदी कमी वयात नात्यातल्याच सुमारे पंधरा वर्षांनी वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी तिची जन्मांतरीची गाठ बांधली गेली...तिला फारसं सांसारिक स्वातंत्र्य न्हवतं तरीही ती तिच्या मुलासाठी व नवऱ्यासाठी अगदी छोटा-मोठा सणवार-ऊपासतापास अगदी मन लावून करायची. तिचा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन फार काही गंभीर न्हवता पण येणारा दिवस मनभरुन, भरभरुन जगायचा हेच ती ठरवायची. दिवाळसणाला अगदी सगळा फराळ ती स्वतः घरी बनवुन सर्वांना खाऊ घालायची. खाण्या-पिण्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी तिच्याकडुन शिकले विशेषतः पुरणपोळी. माझ्या शिक्षणाचा माझ्यापेक्षा तिलाच जास्त अभिमान होता. तिचं एकच तत्व – ते म्हणजे स्वतःला कधीही कुठल्याही बाबतीत कमी लेखायचं नाही..ज्यात आपण कमी आहे ती गोष्ट जिद्दीनं शिकायची. गावाकडील शेतात असताना, सैराटमधल्या आर्चीसारखं ती शेतात ट्रॅक्टर चालवायची, विहिरीत पोहायची. शेतातले औतही ओढायची. पुरुषांनाही लाजवेल असा तिचा थाट असायचा. तर हीकडे शहरात सणावाराला पदार्थांचे स्टॉल भरायचे, तेव्हा सोसायटीतल्या सगळ्या एकीकडे व ही एकटी एकीकडे असचं चित्र असायचं. तिच्या हातच्या पदार्थांना डीमांड असायचा.

     एरवी कुणी सोबत असो वा नसो एकट्यानच फिरायचं, एकट्यानच हसायचं एकटं असतानाही स्वतःची पुरती हौस-मौज कशी करायची हे तिच्यात मला पहायला नि अनुभवायलाही मिळालं. आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजे तिच असा वारंवार फिल मला यायचा. नेहमी हसतमुख, बिनधास्त, निडर, खेळकर वृत्तीची अशा तिला पाहिल्यावर मला एक जगण्याची नवी ऊमेद मिळायची. सुख-दुःखांची देवाणघेवाण होता होता आमच्या दोघींच्यात कोणतच अंतर राहिलं नाही. रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती कितीतरी पटीनं सर्वश्रेष्ठ असतात ह्याचा चालता-बोलता जिवंत पुरावा म्हणजे माझी ही जिवलग मैत्रीण. काही माणसं ही आपल्या सहवासातुन गेली तरी आपल्या विचारांमध्ये त्यांच स्थान टिकवुन ठेवतात ह्यामध्ये आपल्यापेक्षा त्यांचा अधिकचा वाटा असतो. हे त्या लोकांच्या सदगुणी आचरणाचं फार मोठं यश असतं. यासाठी आयुष्यात फार पैसा कमवुन श्रीमंत व्हावं लागत नाही, किंवा फार मोठ्या पदावर असणंही गरजेचं नाही किंवा कुठंतरी चार लोकांच्यात मिरवुन मिळवलेली प्रतिष्ठाही हीथं काही कामाची नसते तर, आपली सदसदविवेकबुध्दी सदैव जागृत ठेवुन माणसं जोडणं ही या भूतलावरची सर्वांत सुंदर आणि तितकीच कठीण गोष्ट आहे असंही मला या दोस्तीच्या नात्यात वाटुन गेल. दोस्तीच्या खुप व्याख्या वाचल्या पण तिच्या बाबतीत या व्याख्या मी तंतोतंत अनुभवल्या. दोस्ती हे असं नात आहे की जिथं निर्व्याज, निरपेक्ष, निःस्वार्थी या शब्दांना जागायला लागतच पण या तिन्हींचा कस ही लागतो जेव्हा आपण या नात्याला न्याय देऊ शकत नाही.

     तीन वर्ष ती माझ्या सहवासात राहिली पण तिचे तीन जन्मांचे भास-आभास तिनं मला दिले. दोस्ती हे नात खोलवर रुजल्यानंतर त्याला आपल्यातल्या सर्वच्या सर्व चांगल्या गुणांचे खतपाणी घालुन त्याचा आभाळभर पसरणारा असा आपलेपणाचा वटवृक्ष ऊभा करायची ताकद ही दोन्हीं बाजूंनी असावी लागते. जी की आमच्या मैत्रीत आजही टिकुन आहे. नियतीनं तिचा जोडीदार खुप लवकर हिरावुन नेला. तो चटका सहन करते नि करते तोवर कोरोना नावाच्या संकटाचा

निखारा पोळायला लागला. तरीही तिनं हिम्मत हारली नाहीय. गावाकडच्या शेतीची म्हणजे काळ्या आईची सेवा करुन त्या मातीच्या ढेकळांतही ती स्वतःचं नि लेकराचं ऊज्वल भविष्य पाहत आहे.. काय ग? करमते का तुला तिकडे? परवाच तिला फोनवर मी विचारलं..अगं ते आणि काय असतय, कुठल्या बाजारात इकत मिळतय? मला तर कायमच भारी वाटतय बग, आपण मस्त मौला मजेत रहायचं नि जगायचं..!” ती हसत हसतच बोलली..हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं ते तिच्यावरची दया म्हणुन न्हवे तर काश, आपल्यालाही दोस्तीच्या इतक्या भारी फिलींग्ज घेऊन जगता आलं तर.....!

लेखिका - शैलजा खाडे, कोल्हापुर.

 

6 comments:

  1. अप्रतिम लिहिलं आहेस... खरंच माझ्या सुदैवानं मला ही अशीच मैत्रीण लाभली आहे... कामानिमित्त आम्ही 1000 की.मी दूर असूनही मनाने खूप जवळ आहे, अगदी सख्या बहिणीप्रमाणे... खरचं खऱ्या मैत्रीसाठी सौन्दर्य,संपत्ती,स्टेटस,class ह्यासारख्या गोष्टी कधीच मर्यादा ठरत नाहीत, त्यासाठी फक्त मैत्री मध्ये निस्वार्थी प्रेम आणि निरपेक्ष ओढच असावी लागते....

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिलं आहेस... खरंच माझ्या सुदैवानं मला ही अशीच मैत्रीण लाभली आहे... कामानिमित्त आम्ही 1000 की.मी दूर असूनही मनाने खूप जवळ आहे, अगदी सख्या बहिणीप्रमाणे... खरचं खऱ्या मैत्रीसाठी सौन्दर्य,संपत्ती,स्टेटस,class ह्यासारख्या गोष्टी कधीच मर्यादा ठरत नाहीत, त्यासाठी फक्त मैत्री मध्ये निस्वार्थी प्रेम आणि निरपेक्ष ओढच असावी लागते....

    ReplyDelete
  3. थॅंक्यु फ्रेंड्स

    ReplyDelete
  4. खरच खूप छान लिहिलंय मला खूप आवडलं थँक्यू

    ReplyDelete