Tuesday 28 January 2020

'खिचडी'..!

 खिचडी...!
                --By शैलजा खाडे  
      सकाळी कधीशा घेतलेल्या त्या मशीनमधल्या कडवट कॉफीची चव त्याला अजुनही अस्वस्थ करत होती. कधी न्हवे त्या इस्त्रीतल्या कपड्यांत, व पाय बांधुन ठेवलेल्या त्या चकचकीत पॉलिशी बुटांत त्याचे अंतर्मन वळवळत होते...आजुबाजुच्या ऑफिसकलिगच्या मंद डीओच्या वासाने तर त्याचे डोके चांगलेच भणभणत होते. तरीही आजवर त्याने ही नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या स्ट्रगलपुढे या गोष्टी त्याच्यासाठी शून्य तडजोडीसारख्याच होत्या.

      सोबतचा सिनीअर सुपरवायझर त्याला कामाची पुर्वकल्पना देत, रोजचे आफिशीअल इशु कसे सांभाळायचे हे समजावुन देत होता..अन् दिपुचे लक्ष मात्र वारंवार मोबाईलमधल्या टायमिंगकडे जात होते. पोटातली भूक त्याला चलबिचल करीत होती. बहुधा त्याच्या या वळवळीची जाणीव  सोबतच्या सिनिअरला झाली असावी म्हणुनच की काय दिपुला त्याने लंच ब्रेक साठी मुक्त केले. तसा दिपु भर्रदिशी रुमच्या दिशेने धावला. पोटातली आतडी भूकेने चांगलीच पिळुन निघत होतीत. तो रुमच्या उंबरठ्यापाशी आला व थबकला. तिथे त्याला जेवणाचा डबा ठेवलेला दिसला..रुममालकाने ही सोय लावुन दिली होती. 
भूक ही अशी गोष्ट आहे ज्याकरिता माणुस आपले अस्तित्व पणाला लावुन आयुष्याच्या कालचक्रानुसार धावत राहतो...हीच पोटाची भूक माणसाला झगडण्यासाठी प्रवृत्त करते नि ह्याच भुकेसाठी माणुस आपला प्रांत, देश- विदेश पार करुन नोकरी-कामानिमित्त निर्वासित होतो. अशाच पहिल्या वहिल्या नोकरीनिमित्त कोल्हापुरहुन पुण्याला आलेल्यांपैकी दिपु एक होता. आजवर केलेल्या कष्टाचे चीज म्हणुन त्याला एका सॉफ्टवेअर कंपनीत बऱ्या पॅकेजची नोकरीची संधी मिळाली होती. नवीन ऑफिस, नवीन शहर, नवे मित्र..दिपुला त्याच्या बालवाडीचा जणु पहिलाच दिवस आठवला. नव्या कोऱ्या पाटीवर नवा श्री गणेशा लिहिलेला आठवला..आणि सोबत सोडायला आलेली भाबड्या मायेची आठवली ती आई’! पण आजच्या दिवसात व त्या पहिल्या दिवसात एकमेव फरक होता तो म्हणजे दिपुची आई आज त्याच्या सोबत न्हवती सोबत होता तो केवळ नवखेपणा’! मनात आईचा विचार येताच दिपुचे डोळे पाणावले...या विचारांत त्याने फ्रेश होऊन डबा ऊघडला नि डब्यातली साबुदाण्याची खिचडी पाहुन त्याच्या मनातली आईची आठवणेआणखीनच गडद झाली..खिचडीचा एक घास त्याने तोंडात टाकला नि त्याचे डोळे आपोआपटच मिटले गेले..जसजसा तो घास चावत तो चवीने खाऊ लागला तसतसे त्याची आईच जणु  स्वतःच्या हाताने खिचडीचा घास भरवत असल्याचा भास त्याला झाला. मऊसर शाबु..त्यात तांबुस भाजलेली मिरची, नि नमकीन बटाटा आणि तळलेला कुरकुरीत कढीपत्ता..अधुन मधुन चवीपुरते तेलातले थोडेबहुत करपलेले शेंगदाणे नि त्यात परतलेली बारीकशी कोथिंबीर व्वा मजा आ गया!! अक्षरशः जश्शीच्या तश्शी आईच्या हातचीच चव! दिपुने मोठ्या आवडीने त्या चवदार सुवासिक खिचडीचा चट्टा मट्टा केला. डबा धुऊन त्याने या खिचडीप्रती वाटलेल्या चवीच्या प्रेमाखातर त्या डब्यात एक चिठ्ठी सोडुन दिली. तुमच्या हातची खिचडी खाऊन मला माझ्या आईचा भास दिलात...अशा अन्नपुर्णेला मनापासुन थॅंक्स.
           रात्री रुममालक व नवीन दोस्तांसोबत गप्पाटप्पा झाल्या. तेव्हा दिपुने मेसडब्यातील खिचडीची मनभरुन तारीफ केली. त्या अन्नपुर्णेबाबत त्याने चौकशीही केली पण हा मेसचा पहिलाच महिना होता कोणीतरी मुलगा त्यांच्या अपरोक्षच डबा ठेवुन जायचा व घेऊनही त्यामुळे आजवर त्याचीही भेट झाली न्हवती असे काय ते कळले. पुन्हा रात्रीचा डबा आला...दिपुने मोठ्या तत्परतेने डबा ऊघडला, पाहतो तो मसालेवांग्याची भाजी, रेशमी पुलाव व फुलके असा मेन्यु त्यात होता. फुलक्यांच्या वर एक चिठ्ठीही होती. तुम्ही खिचडीची केलेली तारीफ त्याबद्दल आभार व दुसऱ्या एका मेसमेंबरचा ऊपवासाचा डबा बदली होऊन तुम्हाला आला त्याबद्दल दिलगिरी... आत्ताच्या स्मार्टफोनच्या जमान्यात असा हा चिठ्ठ्यांमधला संवाद दिपुला फारच मजेशीर वाटला. त्याने आवडीने जेवण आटोपले. ते जेवण जेवताना त्याला पुन्हा त्याच्या आईच्या हातचेच जेवण जेवतोय अशी भावना दाटुन आली. त्याच नादात त्याने डब्यात परतीचा संदेश दिला.  तुमच्या हाताला इतकी सुंदर चव आहे की ज्याला कुणाला आयुष्यभरासाठी असे पक्वान्न खायला मिळत असेल किंवा मिळेल तो या संबंध पृथ्वीतलावरील सर्वांत भाग्यशाली व्यक्ति असेल..धन्यवाद.”


       दिपुचे आँफिसचे रुटिन सुरु झाले..पंधरवड्यातच त्याला करमु लागले. सर्व वातावरण त्याला अगदी समरस करुन गेले. कारण मुख्य त्या जेवणाची कसलीच तक्रार त्याला न्हवती. कधी पाटोड्याच्या वड्या, कधी टोमॅटो सार, कधी कढीभजी तर कधी लसणाचा मोकळा झुणका असा बेत त्याला डब्यातुन रोज मिळत असे. कोण म्हणत जगातुन एकदा देवाघरी गेलेली व्यक्ति पुन्हा कधीही भेटत नसते? कारण दिपुला अशा रोजच्या जेवणातुन त्याला त्याची आई भेटत असे. या भावनेतुनच त्याला अशा आईच्या हातची चव असणाऱ्या व्यक्तीला भेटण्याची तीव्र ओढ वाटु लागली. त्याने डब्यातुन निरोपाच्या चिठ्ठ्या पाठवुनही त्याला कोणताही प्रतिसाद मिळेना. त्याला काहीकरुन त्या मेसवाल्या व्यक्तीला भेटायचेच होते. तो एक दिवस दुपारच्या वेळी थोडे आधीच  रुमवर आला व त्या डबा पोहोचवणाऱ्या मुलाची आतुरतेने वाट पाहु लागला. तसा जेवणाचा डबा घेऊन तो मुलगा दाराशी येताच दिपुने त्याला हटकले. ये कोणाची मेस आहे ही? तुझ्या मेसमालकांचा पत्ता नाहीतर फोन नंबर तरी दे यार..काय सॉलिड जेवण असते रे यार!” हे ऐकुन तो मुलगा पार घाबरला व पळुनच जाऊ लागला दिपुने पटकन त्याची कॉलर पकडली तेव्हा तो कळवळुन बोलला.भाऊ सोडा मला, आमच्या मेसचा एक कडक नियम हाय. काय देवघेव ती फकस्त डब्यातुनच, आम्ही जेवाण द्यायच. ते तुम्ही जेवायचं, आम्ही मेसबिल देणार ते तुम्ही भागवायचं बास्स बाकी इषय खतम! आमच्या आशाताईंचा रुल हाय हा..आणि जास्तीची लांबड आसल तर थेट आम्हासनी कामावरुन कमी. सोडा मला सोडा. असे बोलुन कॉलर सोडवुन तो मुलगा दिपुच्या हातुन निसटलाही. दिपुलाही काही समजेनासे झाले. महिन्याभराने डब्यातुनच बिलाची चिठ्ठी आली. दिपुने निमुटपणे जेवणानंतर डब्यातुनच मेसबिल अदा केले. पण आत्ताच्या ऑनलाईन जगात ही मेसवाली असा का बरं संवाद साधत असेल? असा प्रश्न त्याला स्वस्थ बसु देईना. अशा अन्नपुर्णेला भेटण्याची त्याची उत्सुकता आता आणखीनच वाढली. तो त्या खिचडीच्या, जेवणाच्या अक्षरशः प्रेमात पडला होता.
      या उत्सुकतेपोटी त्याने एक दिवस डबा पोहोचविणाऱ्या त्या मुलाचा पाठलाग करायचे ठरविले. तो दिपुच्या ऑफिसचा सुट्टीचाच दिवस होता. दुपारी तो मुलगा ऊंबरठ्यापाशी येऊन डबा ठेवुन वळला तोच दिपुने त्याचा पाठलाग सुरु केला. त्याच्यापाशी नाही म्हंटले तरी अजून १५-२० डबे सहज होते. कुठल्या कुठल्या गल्लीबोळात, मंदिरानजीक, मार्केटपाशी, तर कधी कॉलेज कँपसपाशी असलेल्या मेसमेंबर्सना डबे पोहोचवत पोहोचवत तो अखेर एका जुन्या-पुराण्या चाळीपाशी आला. त्याने त्याची सायकल चाळीच्या खाली लावली व तो आतल्या मोडक्या लाकडी जिन्याने वरती निघुन गेला.


     हिकडे दिपु त्या मुलाचा पाठलाग करुन घामाने पुरता डबडबला होता. त्याला चांगलीच धाप लागली होती. हुश्श! करीत त्याने त्या आत्ता पडेल की मग पडेल अशा अवस्थेत असणाऱ्या चाळीवर एक नजर टाकली व तो आतुन आणखीनच ढवळुन निघाला. इतकी अप्रतिम चवीने कित्येकजणांचे पोट भरणारी ती मेसवाली अशा अवस्थेतल्या निवाऱ्यात राहत असेल? याचे त्याला आश्चर्यच वाटले. पण ती हिथल्या कोणत्या खोलीत रहात असेल हे मात्र दिपुला कळेना. म्हणुनच तोही त्या लाकडी जिन्याने वर जाऊ लागला..जसजसे प्रत्येक खोलीसमोरुन तो जाऊ लागला तसतसे त्याला काही दृश्यं ही कधी सुखद तरी कधी दुःखद धक्के देत होतीत. चाळीतली  म्हातारी माणसं खोकत ऊंबऱ्यापाशीच बसुन होती. लहान शेंबडी पोरं-टोरं तिथेच चिटुकल्या चेंडुशी खेळत होतीत..आयाबाया वेण्या-फण्या करीत टीव्हीसमोर बसुन खिदळत होत्या..बेरोजगार तरणी पोरं मोबाईलवरच्या टीकटॉकवर रंगलेली होती..अशा दोन-चार खोल्या पार करताच दिपुला एका ओळखीच्या सुवासाने खेचते केले. तो वास तुपात भाजल्या जाणाऱ्या ओल्या नारळाचा होता. त्या वासाच्या दिशेने दिपु पावले टाकु लागला..आणि एका खोलीच्या उंबऱ्यापाशी येऊन तो थबकला….
      समोर अर्धवट पडद्याआड त्याला एक व्हीलचेअरवर बसलेली एक मुलगी  तिच्याच उंचीच्या बेताने ठेवलेल्या मंदाग्नीवर तो तुपातला ओल्या नारळाचा चव परतत होती. साधासाच चेहरा, किंचीत घारे डोळे, लांबसडक काळेभोर अगदी जमिनीपर्यंत लोळणारे तिचे केस व ओठांतल्या ओठात ती गुणगुणत असलेले गाणे हे सगळे पाहुन दिपु दारापाशीच थबकला. अरे राजु तु पुन्हा परत आलास? कोणाचा परतीचा डबा घेऊन आलास? आलायस तर एवढा परतलेला चव चाखुन पहा कितीसा गोड झालाय तो? मला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत लवकर.. असे बोलता बोलता तिने तो नारळाचा चव हातावर घेऊन दाराच्या दिशेने हात केला व दिपुला पाहुन तिचा हात इतका थरथरु लागला की तो चव जमिनीवर पडुन पुरता बिखरला. ती घामाने पुरती डबडबली.कोण? कोण आहात तुम्ही? काय हवय तुम्हाला?” असे विचारत विचारत ती व्हीलचेअरची चाके जोरात फिरवत फिरवत  आतल्या बाजुला पडद्याआड झाली. तिचे हे प्रश्न ऐकुन ऊंबऱ्यापाशीचा दिपु आत आला. मी दिपु तुमचा मेसमेंबर. तुमच्या हातच्या चवीने मला हिथवर आणलं. गेली १० वर्ष मी माझ्या आईच्या हातच्या जेवणाला मुकलोय. तिच्या हातची चव तुमच्यामुळे चाखायला मिळाली. असे वाटते ती देवाघरी जाताना तिचे हातच तुम्हाला दान करुन गेलीय..अगदी जस्सेच्या तस्से सगळे त्याच चवीचे पदार्थ. असे म्हणतात..जगात एका हाताला असलेली चव दुसऱ्या हाताला कधीच नसते. पण तुम्ही त्याला अपवाद आहात. मी तुमच्या हातच्या याच चवीच्या प्रेमात पडलोय..त्या खिचडीच्या प्रेमात पडलोय..मला आता आयुष्यभर हीच चव हवी आहे. हे ऐकुन आशुच्या डोळ्यातुन

 झरझर अश्रु पाझरु लागले. मी ही अशी, तुम्ही चांगल्या घरातले दिसताय..हा विचार माझ्यापेक्षा लायक मुलीला बोलुन दाखवा. आयुष्याचे कल्याण होईल तुमच्या.आशु डोळे पुसत पुसत बोलली.  हे ऐकुन दिपु क्षणभर थबकला. तो अस्वस्थ झाला, मी वाट पाहिन. इतकेच बोलुन तो जड पावलांनी निघुन गेला.
                                                                    *****
     वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी एका अपघातात माझ्या आई-वडिलांना काळाने हिरावुन नेले, व मला असे अधु-अपंग मागे ठेवले. जगायला तर हव होतं..पण कसं ते कळत न्हवतं. शिक्षण अर्धवट सोडुन पोटाचा हा मार्ग मी निवडला. आजुबाजुच्या गिधाडांचा त्रास नको म्हणुन मी शक्य तितकी माणसांपासुन लांब राहिले.  आज मला कळतय मी का जिवंत आहे? माणसांच्या वीतभर पोटात मी बनवलेले अन्न जाऊन त्यांना आभाळभर चवीचा आनंद मिळतो. तुमच्यासारखा प्रेमाचा भुकेला जोडीदार मिळणं माझ नशीबच! मला खुप आवडेल तुम्हाला हक्काने घास भरवायला!” डब्यातली हि महिन्याभरा नंतरची चिठ्ठी वाचुन दिपु मोठ्या आनंदाने चाळीच्या दिशेने झेपावला.
                                                                     --By शैलजा खाडे.