Tuesday 4 February 2020

'लेकरु'


लेकरु
                                                                     By शैलजा खाडे.
थरथरत्या हाताने बिनसाखरेच्या बेचव चहाचा घोट अप्पांनी घेतला. सुरकुतलेले डोळे किंचितसे बारीक करुन,चष्म्याच्या धुसर काचांतुन ट्रंकेत भरलेल्या सामानावर त्यांनी एक खिन्न नजर टाकली. दोन चार सुती झब्बे, डायरी, पेन,वर्तमानपत्रांतली जुनी कात्रणेमफलर इतकाच काय तो अप्पांचा संसार. तो घेऊन ते एका परक्या ठिकाणी नांदायला होेतेेे. तेही वयाच्या पंचाहत्तरीत! पाठवणी करायला दुसरे तिसरे कुणी नाही तर त्यांचा लाडका समीर येणार होता. आठवडाभरापासुन अप्पांच्या मागे लागुन, लागुन घरापेक्षा वृध्दाश्रम कसे त्यांना रहायला, खाय-प्यायला निवांत होईल हे त्याने अगदी वकिली मुद्देसुद पध्दतीने अप्पांना पटवुन दिले होते. हीथे सुनेसोबतची अप्पांची रोजची बाचाबाची सगळ्यांचेच जिणे हैराण करीत चालली होती. शेवटी नवरा-बायकोने हा सुवर्णमध्य शोधला होता...म्हणजे व्रुध्दाश्रम फारसे लांब न्हवते. एकदम सर्व सोईनियुक्त होते. दर महिन्याच्या सुट्टीदिवशी दोघेजण अप्पांना भेटायला येतीलच, शिवाय अप्पाही हवापालटासाठी घरी येऊ शकतात अशा काहीशा ऊपायांवर अप्पा नावाच्या दुखण्यावरचे जालीम औषध समीर व मिसेस समीर यांनी शोधले होते..समीर व पूजाच्या संसारावरचे त्यांच्या म्हातारपणाच्या सावटाचे मळभ दूर व्हावेत यासाठी अप्पांनीही समीरच्या मतास मूक्यानेच मंजुरी दिली होती.

         बापाची चप्पल मुलाला बसायला लागते तेव्हा बापाने 'बाप' रहायच नसतं तर त्या मुलाचा 'मित्र' व्हायच असतं. असच काहीस नातं निभवायला मी चुकलो की काय? ही खंत अप्पांच्या मनाला सलत होती. समीरच्या बाबतीत काय चुकल? काय बिनसल? या गोष्टींची ऊत्तरं अप्पांच्या आठवणींच्या पुस्तकात काही केल्या सापडत न्हवती. हव्या त्या वस्तु, हवं ते खाणं-पिणं, हवं ते करिअर इतकच काय हवी ती आयुष्याची जोडीदारीण इतक सगळं स्वातंत्र्य देऊनही तो या पातळीला पोहोचुन, या वयात तो वृध्दाश्रम नामक खुराड्यात डाळायला चाललाय...व्वा!
            चला ठीकाय.. हाही आयुष्याचा नवा टप्पा स्विकारु असे समजुन, आज अप्पा वृध्दाश्रमात जायला निघाले होते...सकाळीच परवाच्या पाडव्याला घेतलेली नवीन स्विफ्ट समीर मन लावुन पुसत होता..तर मिसेस समीर म्हणजे पुजाने कधी न्हवे ते बिनबोलाचा दिलेला चहा अप्पा पुतळ्यासारखे बसुन घेत होते. एरवी "दुधात चहापुड टाकुन दोन मिनीटे उकळी तर काढायचीय अप्पा, तास न् तास त्या बोअरींग न्युजपेपरमध्ये तोंड खुपसुन बसण्यापेक्षा स्वतःची चार कामे स्वतः केलीत तरी मिळवलं" अस मन कापणार पूजाच धारदार बोलणं अप्पांना ऐकुन घ्याव लागतसे. चहा घेता घेता हॉलमधल्या काचेच्या शोकेसमधला, परवाच्या गाडी शोरुममध्ये नवीन स्विफ्टसोबत, समीर व पुजा सोबत काढलेला फोटो ते न्याहाळत होते. "अप्पा आयुष्यभर मुलाच्या सुखासाठीच्या कष्टाची गाडी चालवलीत आता मुलगा तुमच्या जबाबदारीच्या कर्तव्याची गाडी चालवेल, काय..मग, मस्त निवांत गाडीतुन फिरायच..छान छान ठीकाणं पहायचीत" असे शोरुममध्ये नवीन गाडीची चावी अप्पांच्या हाती देत शोरुम सेल्समन बोलल्याचे अप्पांना आठवले व अप्पांच्या उतरलेल्या चेह-याचे प्रतिबींब बशीतल्या चहात विरुन गेले. आज समीरला इतक्या तन्मयतेने गाडी पुसताना पाहुन, माणसांची धुळ बसलेली मनंही अशी घासुन पुसुन लख्ख करता आली असतीत तर कित्ती बरे झाले असते असे अप्पांना क्षणभरासाठी वाटुन गेले..मनात हा विचार असतानाच अप्पांना काहीतरी आठवले. ते पुन्हा खोलीत गेले व कपाटातील चोरकप्प्यात ठेवलेली एक फाईल त्यांनी बाहेर काढली.

     "अरे अप्पासो तुला सांगतो ऐक,  नटसम्राट पाहिलायस ना तु? जेवणाच ताट द्याव रे पण बसण्याचा पाट कधी देऊ नये माणसानं, माणुस कधी बदलेल सांगता नाही येत, थोडंफार ठेव रे तुझ्या नावाने, आपल्या मित्राच एवढ ऐक".बळवंत आपल्या मित्राला म्हणजे अप्पांना समजावुन सांगत होता. "अरे ही सारी जिंदगी, हा श्वासही समीरसाठीच आहे..शेवटी रित्या हातानेच वरचा बोलवणार आहे आणि माझ्या अशा गुणी लेकरावर अविश्वास दाखवणं म्हणजे मी आजवर त्याच्यावर केलेल्या संस्कारांचा तो अपमानच नाही का? म्हणुन घरासकट ही सगळी प्रॉपर्टी समीरच्या नावे करतोय" अप्पा बळवंतला अगदी निस्वार्थी मनाने हसत हसत बोलले. हे सगळे आठवुन अप्पांच्या डोळ्यांच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या. आज ती फाईल घेऊन ते समीरच्या खोलीत गेले व त्याच्या लॅपटॉपवर ती ठेवुन दिली. लॅपटॉपच्या बाजुलाच एक पपी टेडीबियर होता..इटुकलाच! त्यावर अप्पांची नजर गेली. त्यांनी तो हातात घेतला व त्याच्या निर्जीव, निर्विकार डोळ्यांमध्ये अगदी खोलवर ते पाहु लागले...त्यात त्यांना 'त्या दिवशीचा' प्रसंग दिसु लागला. पुजाच्या मैत्रीणीच्या मुलाचा टेडी होता तो. अप्पा नि समीर दोघांनाही त्या गोंडस मुलाचा खुप लळा होता. तो वरचेवर घरी यायचा तेव्हा अप्पांसोबत खुप मजामस्ती चालायची त्याची. असेच त्याच्याशी खेळताना.."आमच्याही गोड गोड बाळनातवाशी खेळायला येशील ना तु?" असे अप्पा त्याला बोलल्याचे पुजाने ऐकले व तीची तळपायाची आग मस्तकात गेली. "मला माझ्या करियरचा ग्राफ आणखीन ऊंचावायचा आहे त्यात ही मुलाबाळांची बेडी मला आत्ताच नकोय, आणि हा आमच्या नवरा बायकोचा खाजगी विषय आहे हो अप्पा, त्यात तुम्ही नाक खुपसु नका" पुजाचे हे बोलणे ऐकुन अप्पा नेहमीप्रमाणे नमते झाले. समीरच्या खोलीतला तो टेडी खाली ठेवत अप्पांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला..या मरणासमान बाहुल्या टेडीला या घरात स्थान आहे पण माझ्यासारख्या हाडामासांच्या जिवंत म्हाता-याला हीथे स्थान नाही ही गोष्ट त्यांच्या मनात काट्याप्रमाणे रुतली.

     समीर व पुजा दोघेही नोकरदार. त्यांच्या 'बीझी' शेड्युलमध्ये अप्पांना देवपुजा झाल्या झाल्या लागणा-या 'चहाची', रोजच्या जेवणातल्या 'कढीभाताची', त्यांच्या 'औषधांच्या मात्रांची', त्यांच्या पहाटेच्या भजन-किर्तनाची लुडबुड नकोशी झाली होती. समीर तसा अप्पांच्या बाबतीत काळजीवाहु मुलगा होता पण बायकोवरील आंधळ्या प्रेमापुढे बापाची त्याच्यावर असलेली डोळस माया तो नजरअंदाज करीत असे. अप्पांनी पुजाला मुलीसारखे प्रेम द्यायचा नेहमीच प्रयत्न केला पण..एखाद्या व्यक्तीबद्दलची 'ओढ ' ही ऊसनी घेता येत नाही ती मुळात 'रक्तातच' असावी लागते. हे पुजाच्या बाबतीत अगदी तंतोतत खरे होते.
     अप्पा पुन्हा आपल्या खोलीत आले. अर्ध्यावरती डाव टाकुन देवाघरी गेलेल्या आपल्या सुविज्ञ पत्नीच्या फोटोकडे अप्पा बराच वेळ पाहत राहिले. तिच्या कपाळावरील ठसठशीत कुंकवाचा अप्पांना हेवा वाटला..."का तु सुवासिनीचे मरण देवाकडे मागितले? आज तु असतीस तर बिनसाखरेचा चहाही मला अमृतासमान गोड लागला असता...आज तु असतीस तर या संसाराच्या वेलीवरची फुले अशी न कोमेजता अजरामर सुगंधी झाली असती..आज तु असतीस ज्याने मुलाला सर्वस्वी प्रेम,माया दिली अशा या म्हाता-याला 'पोरके' व्हावे लागले नसते...आज तु असतीस तर या मंदिरासमान घरात तुझ्या आज्ञारुपी शब्दांची पुजा झाली असती..आज तु असतीस तर अंगणातली तुळस सदोदित टवटवीत राहिली असती ना की ती अशी रुसली सती..आज तु असतीस तर असे घडूदिले नसतेस. खरचं तु असायला हवी होतीस, खरच तु असायला हवी होतीस.." असे मनातले शब्द ओठांवर पुटपुटत अप्पा लहान पोरासारखे हुंदका देऊन रडू लागले..

    तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. अप्पा भानावर आले डोळे पुसून ते बाहेर आले. "वरचेवर फोन वगैरे करायच्या भानगडीत नका पडु. आमच्या मिटींग्ज शेड्युलमधुन आम्ही फ्रि झाल्यावर कॉल करत जाऊ तुम्हाला, काही लागलेच तर महिन्याभरात एखादी चक्कर मारुच आम्ही." अप्पांचे सामान गाडीच्या डीकीत सेट झाल्याची खात्री करुन घेतच पुजा अप्पांना बोलली. अप्पा गाडीत बसले..समीर गाडी चालवु लागला. गाडीच्या खिडकीच्या काचेतुन अप्पांनी एकवार घरावर नजर टाकली आता मात्र ते हेलावुन गेले..नजरेतले खारे अश्रु आता कडवट झाले..समीरला समोरच्या आरशात अप्पांचा असा गलितगात्र चेहरा दिसत होता पण तो निःशब्द होऊन गाडी चालवित होता...
       गाडी रस्त्याने धावत होती नि अप्पांचे मन त्यांच्या व समीरच्या आठवणींमागे धावत होते. त्यांना समीरचे बालपण आठवु लागले...असेच एकदा बालपणी बाजारात समीरला सायकलीवरुन घेऊन जाताना सायकल पंक्चर झाली. तेव्हा समीरला अप्पांनी खांद्यावर घेऊन तो ४-५ किलोमीटरचा रस्ता अंतःकरणातील मात्तृत्वाच्या बळावर सहज पार केला होता..चालताना.."बाळा तु मोठा झाल्यावर कोण बनणार? चांगले काम करणार ना?" अप्पा समीरला विचारत होते..तेव्हा "मी विमानाचा पायलट बनणार नि तुम्हाला त्यातुन फिरवणार, उंचच्या उंच आकाशात सैर करवुन आणणार." असे समीर मोठ्ठ्या आवाजात आनंदात ऊत्तरला होता.
   आज मात्र त्या विमानाने चारचाकी गाडीचे रुप घेतले होते, अन् समीर अप्पांना वृध्दाश्रमात सोडण्याचे एक रुटीन काम करायला निघाला होता. आता मात्र अप्पांना हे विचार असह्य झाले अशा थकव्यात ते गाडीत झोपुन गेले. काही वेळाने, समीरच्या हाकेने अप्पा जागे झाले. वृध्दाश्रम आले होते. समीर वृध्दाश्रमाच्या संचालकांकडे कागदोपत्री औपचारिक कामासाठी जाऊन आला. अप्पांच्या बॅगा तिथला एक सहायक त्यांच्या खोलीकडे घेऊन गेला. अप्पांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडण्यासाठी समीर सोबत चालु लागला. तेवढ्यात मागुन त्या संचालकांनी अप्पांना हाक दिली. याच घटकेत समीरला ऑफिसचा एक महत्वाचा फोन आला व तो बाजुला जाऊन बोलु लागला. त्याचे बोलणे झाले व तो अप्पांची वाट पाहत पाहत फेसबुक, व्हॉट्सअपवर गुंग होऊन गेला..तरी अर्धा-एक तास होऊन गेला होता.

शेवटी वैतागुन समीर वृध्दाश्रमाच्या संचालकांच्या केबिनमध्ये आला. "सर, आमचे अप्पा तुम्हाला भेटण्यासाठी हिथेच आले होते ना? कुठायत ते? खोलीवर सोडायचेय मला त्यांना. तुम्ही इतका वेळ काय बोलत होता नेमके? खुप ऊशीर झालाय मला निघायला हवे." समीरने संचालकांना विचारले. "हो, हो ते पहा पाणी पिण्यासाठी गेलेयत येतील ते, अप्पा नावाच्या माणसाला कोण ओळखत नाही? देवमाणुसच तो. माझ्या वडिलांचे खास मित्रच ते. खुप वर्षांनी भेट झालीय आमची. या वृध्दाश्रमाच्या मागच्या बाजुला आमच्या संस्थेचे अनाथाश्रमही आहे. आज ज्या खुर्चीवर मी आहे त्या खुर्चीवर माझे वडिल बसुन या दोन्हीं संस्थांचा व्यवहार पहायचे, आणि काय योगायोग पहा..२५ वर्षांपुर्वी अप्पा तुम्हांला याच अनाथाश्रमातुन न्यायला आले होते दत्तकपत्राद्वारे. खरतरं हे रहस्य आजवर कुणालाही न सांगण्याचे त्यांना दिलेले वचन मी आज तोडतोय...त्यांच्या डोळ्यांत दाटलेल्या करुणेने मला हे तुम्हाला सांगावयास भाग पाडले." ते संचालक गंभीर स्मितहास्य करीत समीरला बोलले.

    
हे शब्द कानी पडताच समीर मटकन खाली गुडघ्यांवर बसला. तो मनाने पार गाभाळुन गेला. त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला. तो पुरता घामेजला..अन् क्षणार्धात त्याच्या डोळ्यांतुन अश्रुधारा वाहु लागल्या. पण त्याने स्वतःला सावरले  ऊठला व अप्पांच्या दिशेने धाव घेतली. अप्पा रुमालाने तोंड हात पुसत हळुहळु थरथरत चालत समोरुन येत होते. समीर त्यांना सामोरा झाला. त्याची व अप्पांची नजरानजर झाली. एकवार त्याने अप्पांना डोळेभरुन पाहिले व पटकन् घट्ट मिठी मारली. आता तो  अप्पांचा बाप झाला होता व अप्पा त्याचे लेकरु! गेली कित्येक वर्ष हा एकमेकांचा मायेचा ऊबदार स्पर्श ते दोघेही अनुभवत होते...दोघांनीही एकमेकांना सावरले. समीर लहान असताना जो प्रवास चालु झाला होता तोच त्याला आता वेगळ्या भूमिकेत जाऊन पार पाडायचा होता..हिथुन पुढच्या प्रवासात समीर बाप बनुन, अप्पा नावाच्या 'लेकराला' एक जबाबदारी न्हवे, कर्तव्यही म्हणुन न्हवे तर काळजाचा एक तुकडा म्हणुन सांभाळणार होता..! समीरने पिकले पान हळुवार अलगद उचलावे तशा मायेने अप्पांचा हात हातात घेतला व  वृध्दाश्रमाच्या बाहेरच्या गेटकडे तो रवाना झाला------------------------------------By शैलजा खाडे.