Saturday 28 March 2020

यंदा कर्तव्य आहे..!

यंदा कर्तव्य आहे!
                                                                                 By.शैलजा
     भट्टीसारख्या आग ओकणा-या करप्या ऊन्हातुन घामानंं भिजतं, धावतं-पळतच वैशु घराच्या मागील दारानं आत धावली. हळुच कानोसा घेत, फ्रेश होऊन, बेडरुममध्ये येऊन तिनं
कपाट ऊघडलं. तसं रिसर्च-स्टडीच्या रुटीनमधुन सवड न मिळाल्यानं तिनं सगळे कोंबून ठेवलेले कपडे धाडधाड तिच्या अंगावर कोसळले. तशी ती वैतागली व तिनं आईला हाक दिली. "वैशु केव्हा आलीस तु? अगं चेहरा किती काळवंडलाय ऊन्हानं तो. फेशियल करुन आलीयस ना? नि ती हिरवीगार झालरीची साडी नको नेसु बाई. यावेळी छान लाईट पिंक कलरची साडी नेस. हल्लीच्या मुलांना असेच सोबर रंग आवडतात म्हणे". आई कपाटातुन पडलेले कपडे आवरत बोलली. " अगं आई, वेळेवर आलेय ना मी. बस ना आता. ते नेहमीचं बोअरिंग लेक्चर नको देऊ. आणि यावेळी मी फेशियल, ब्लीच वगैरे काहीही केलेलं नाहीय, मला जी आवडेल तिच साडी मी नेसणार. शिवाय मुलांकडच्यांच्या प्रश्नांना मला सुचतील ती प्रामाणिक ऊत्तर. मी द्यायच ठरवलय. ज्याला मी ओरिजिनल आवडेल त्याचा होकारच येईल ना". वैशुला लग्नासाठी पहायला येणारं हे अकरावं स्थळ होतं. या वर्षभरात तिनं दहादा फेशियल करुन चारदा हेअरकट केला होता. ऊंचीला तशी कमी, आडवा बांधा, कुरळे केस, सावळा रंग, बदामी डोळे, डाव्या गालाला एक खळी नि ऊजव्या गालावर ऊठुन दिसणारा तीळ, नि तब्येतीनं  जरा थोराड असं सर्वसामान्य व्यक्तिमत्व लाभलेल्या वैशुनं विद्यापीठातुन पुरातत्व विभागातुन पोस्ट ग्रॅज्युएट पुर्ण केलेलं. सध्या त्यांच्या विभागप्रमुखांच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये ती रिसर्च असिस्टंट म्हणुन काम करीत होती. ती या 'संशोधनात' रममाण होते, तोच तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी 'वरसंशोधन' सुरु केलं होतं. गंमत म्हणजे तिने तिच्या
क्षेत्रातील, तिच्या विचारांशी जुळवुन घेणारा, तिचाच एखादा क्लासमेट किंवा कुणी सिनिअर असल्यास तिने स्वतःसाठी स्वतःच वर शोधायचे स्वातंत्र्यही आई-बाबांनी तिला दिलं होतं. पण तिचं सुदैव असेल किंवा दुर्देव असा मुलगा मिळण्याचा योग-संयोग  तिच्या नशीबी जुळुन येण्याचा काडीमात्र चान्स न्हवता. कारण, जी कोणी ओळखीची मुलं होती, ती तिच्याकडे भावी जोडीदार पाहणा-यातील मुळीच न्हवती किंवा ऊलटही होतं..तिला तिच्या रिसर्चपलिकडे त्यांच्यात लग्नाळु वर शोधण्यात काहीएक स्वारस्य न्हवतं. राहता राहिलं एखादं प्रेमप्रकरण. जेणेकरुन निदान तिनं लव्हमॅरेज करुन तिच्याकरिता सध्याच्या चालु असलेल्या वरसंशोधनाच्या 'हार्डवर्क' ला पुर्णविराम तरी मिळाला असता. हेही अगदी आभाळातल्या सुंदरशा इंद्रधनुष्याला तिचे अलगद हात लागावेत अशा कल्पनेतल्या गोष्टीसारखे अशक्यप्राय होतं. कारण, सध्याच्या जमान्यातला, मुलांना रिक्वायर्ड असणारा 'प्रेमाचा ट्रेंडी लुक' काही तिच्याकडं न्हवता. यामुळे 'पहली नजर का पहला प्यार' वगैरे तर तिच्यासाठी क्षितिजापलिकडच्याही लांबची गोष्ट झाली. मात्र तिला विद्यापीठात सर्वजण एका कारणाने 'प्रचंड भाव' द्यायचे कारण 'ऑन दि स्पॉट ऑल नोट्स' केवळ तिच्याकडेच मिळत असत! शिवाय तिच्याकडं 'सो कॉल्ड इंप्रेशन' मारायला दोनच गोष्टी होत्या त्या म्हणजे 'तिची अभ्यासातील हुशारी' व दुसरे तिचा 'प्रामाणिकपणा'! पण या गोष्टी खोलवर पाहण्याची द्रुष्टी खुप दुर्मिळ लोकांकडं असते. अन् अशांपैकी एक दुर्मिळ व्यक्ती तिला तिच्या आयुष्यात हवी होती. आई - बाबांच्या इच्छेखातर ती 'लग्नाच्या मार्केट' मध्ये ऊतरली होती...तिची लग्नाबाबतची अपेक्षा फार काही उंच न्हवती. तिला केवळ तिचे विचार, मानसिकता समजुन घेणारा जोडीदार हवा होता. मग त्याची परिस्थिती, त्याचे कुटुंब, त्याचे शिक्षण, त्याचे आर्थिक ऊत्पन्न, शेती-वाडी या गोष्टी तिच्यासाठी 'सेकंड प्रेफरन्स' होत्या. तिची खुपच साधी अपेक्षा पाहुन काहींना आश्चर्य वाटे. थोडक्यात तिला दिसण्यापेक्षा’, वास्तवात असलेल्या लाईफ पार्टनरशी जुळवुन घ्यायला आवडणार होतं. आजवरच्या दहा स्थळांपैका नऊ स्थळांनी तिला नकारच दिला होता. यांपैकी कुणी तिच्या थोराड दिसण्यावरुन, कुणी तिला तिच्या राहत्या घरावरुन, कुणी तिच्या वडिलांच्या ऊत्पन्नावरुन, कुणी तिला पाठचा भाऊच नाही म्हणुन, कुणी तिच्या ऊंचीवरुन, कुणी तिच्या
थोड्या पुढे आलेल्या दातांवरुन, तर कुणी तिच्या कमी कमाईवरुन नाकारलं होतं. अर्थात या गोष्टी मागाहुन तिला कळल्या होत्या. एकानं तर तिच्या शिक्षण क्षेत्रासंदर्भात ती जुन्या-पुराण्या गाडलेल्या प्राचीन कवट्यांचा अभ्यास करते यावरुनही तिला नकार दिला होता. तर दहाव्या स्थळाला तिने स्वतःहुन नाकारलं होतं. दहाव्या स्थळाचा लोचा थोडा न्यारा होता. मुलांच्या घरच्यांची पसंदी होती पण पाहण्याच्या कार्यक्रमानंतर त्या मुलाने वैशुला विद्यापीठात गाठुन त्याचे दुस-या एका मुलीवर प्रेम असल्याचं इमोशनल ब्लॅकमेल करुन हिने या लग्नास नकार द्यावा अशी गळ घातली. त्यामुळे दहाव्याही स्थळाला पुर्णविराम मिळाला. पाहण्याच्या कार्यक्रमातल्या तुमचं नाव? शिक्षण? नोकरी? याबद्दलच्या विचारल्या जाणा-या त्याच-त्याच चाकोरीबध्द प्रश्नांची तिच तिच रटाळवाणी, मॅनर्समध्ये बांधलेली व घोकुन पाठ केलेली, आणि होय किंवा नाही या दोनच शब्दांत अडकलेली ऊत्तरं देऊन वैशु एका वैचारिक पातळीवर थकुन गेली होती. तिने आई-बाबांना हे कांदेपोह्यांचे कार्यक्रम थांबविण्याचे कित्येकदा सांगितले पण शेवटी एका मुलीचे जन्मदाते ते. कधी ना कधी एक गुणी जावई त्यांना भेटेल या आशेवर ते त्याचा मोठ्या नेटाने शोध घेत होते. अर्थात आपल्या मुलीच्या कर्तुत्वावर त्यांचा विश्वास होताच पण तिच्यासाठी तिचा जीवन साथीदार शोधण्यासाठी समाजाने लग्न जुळविण्याच्या या 'इंटरेस्टींग ट्रॅक' वर चालणं त्यांना भाग होतं. त्यामुळं त्यांनी यंदा कर्तव्य पार पाडताना वैशुशी वेळोवेळी मोकळा-ढाकळा संवाद साधायला सुरुवात केली. काही गोष्टी तिच्या कलाने घेतल्या. आता अकराव्या स्थळासाठी पाहुणचारासाठी कांदेपोहे न ठेवता छान तळलेला कुरकुरीत खमंग काजु बेदाणे घातलेला तिखट चिवडा व जोडीला चांदीचा वर्ख लावलेली काजुकतली तेही चॉकलेट, पिस्ता, अंजीर अशा मिक्स फ्लेवरची! असा  बेत योजिला. आता मात्र हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 'कांदेपोह्यांचा' न्हवे तर 'काजु-चिवडया' चा कार्यक्रम होणार होता.
      या दरम्यान...वैशु जाम वैतागली होती. आता मात्र तिच्यातला 'सेल्फ रिस्पेक्ट' जागा झाला. ती आतुन डीस्टर्ब राहु लागली. 'कांदेपोहे' खाऊन त्यांच्या वासानेही तिला त्याची अक्षरशः शिसारी येऊ लागली. आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातुन 'कांदेपोह्याला' तिने पुर्णपणे तिलांजली दिली. आपल्यात काय कमी आहे? याचा ती शोध घेऊ लागली. खुप विचारांती तिच्या लक्षात आल की, कमी आपल्यात नाहीय ती आपल्याकडे पाहणा-याच्या 'द्रुष्टीकोनात' आहे. आपण एका अनुभवी व्यक्तिशी यासंदर्भात मार्गदर्शन घेतल पाहिजे जेणेकरुन हे कांद्यापोह्यांचे चाललेले कार्यक्रम तिच्यासाठी थोडेतरी सुकर होतील. यासाठी तिने याच 'गोंधळी प्रोसेसमधुन' गेलेल्या एका मैत्रीणीच्या काही 'उपयुक्त ट्रीक्स' वापरायचे ठरविले होते. अकराव्या स्थळाच्या बाबतीत तिने पुर्ण तयारीनिशी या ठरवाठरवीच्या मैदानात ऊतरायचं ठरवलं. तर तिनं  आता त्या अनुभवी मैत्रीणीशी सल्ला-मसलत व काही खलबतेही केलीत. या चर्चांतरानंतर ती ह्या अनुमानापर्यंत पोहोचली की, खरंतरं अरेंज्ड मॅरेज हा आपल्या माणसांनी आपल्याच भावी हितासाठी घालुन दिलेला एक मजेशीर पण सुंदर असा ट्रॅक आहे. यावरचे चालणे प्रसंगी धावणे आपण एन्जॉय करायला हवं. व यामध्ये आपल्याला मनापासुन साथ देणाराही शोधुन निवडण्याचा पर्यायही आहे. तर, वैशुने पहिला वहिला प्रयोग केला तो मिशन वेटलॉस!’ चा. फार काही नाही पण एक योगाचा क्लास करुन टाकला. महिन्याभरात ती कमनीय दिसु लागली. नंतर तिने तिच्या रुटीन लुकचे रुपांतर आताच्या जमान्यातल्या मॉडर्न ट्रेंडी लुक मध्ये केले. यासाठी तिने फार काही ऊपद्य्व्याप केले नाही तर थोडे केस घुंगराले केले..आय-लायनर,आय-ब्रो पेन्सिल मारली. अगदी लाईट कलरची लिपस्टीक व मंद सुवासाचा डीओ वापरायला सुरुवात केली. कपड्यांमध्येही तिनं साजेसा लुक फॉलो केला. छान सुती वारली पेंटींगचे कुर्ते, कानात मॅचिंग कुड्या, अँकलिंग जीन्स, कोल्हापुरी चपला असं काहीतरी ती ट्राय करु लागली. पण या बदलांसोबतच तिच्यातला आत्मविश्वास मात्र तिने कायम ठेवला. अर्थात केवळ कपड्यांनी आधुनिक होणं गरजेचं न्हवतं तर चांगल्या विचारांनी आधुनिक होणं म्हणजे खऱ्या अर्थाने मॉडर्न बनणं याचं वैशुला पुरेपुर भान होतं. हळुहळु तिच्यातला हा दिसण्यातला बदलतिच्या असण्याला अधोरेखित करु लागला. तिच्या वाऱ्यालाही न ऊभारणारे तिच्यातल्या ह्या बदलाला गुडी गुडी कॉम्प्लिमेंट्स देऊ लागले...चष्मा-भिंगांचे डीपी ठेवणारी वैशु आता व्हॉट्सअप, फेसबुकवर तिच्या छान छान या बदलावु लुकचे डीपी ठेवु लागली. तिच्या सोशल नेटवर्कींग गोतावळ्यात तिच्या डीपी, स्टेटसची आवक-जावक वाढली. आता मात्र हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 'कांदेपोह्यांचा' न्हवे तर 'काजु-चिवडया' चा कार्यक्रम होणार होता. आज ती दुपारी याच कार्यक्रमासाठी हातचा रिसर्च सोडुन घरी आलेली. आजच्या सिईंग प्रोग्राममध्ये काहीतरी वेगळे घडणार होते हे निश्चित. कारण यावेळचा डाव वैशुच्या बाजुने जिंकण्यासाठी तिने जय्यत तयारी केली होती.  आज दुपारी अकराव्या स्थळातले मुक्काम पोस्ट म्हणजे नियोजित वर त्याच्या लवाजम्यासह वैशुला पाहण्यासाठी तिच्या घरी येऊन स्थानापन्न झालेले. भावी नवरामुलगा तसा खेडेगावातलाच होता पण मोठ्या स्ट्रगलमधुन वर आल्याची माहिती मध्यस्थीने दिली होती. मुलगा माणसांचा डॉक्टर होता. वैशुला याची कल्पना दिली गेली. दुपारच्या रणरणत्या ऊन्हातुन फ्रेश होऊन वैशुने सौम्य पिस्ता रंगाची साडी नेसली...सुंदर मॅचिंग बांगड्या व एका हातात घडी. कुरळ्या केसांत निरागस अबोलीचा गजरा माळला. गळ्यात तिच्या आद्याक्षर v ची साखळी ठेवली.  आज तिच्या अंगी एक वेगळाच ऊत्साह होता. आईने देऊ केलेला चिवडा व काजुकतली, सरबताचा ट्रे घेऊन तिनं हॉलमध्ये लिमीटेड असं लाजतच एंट्री केली. ट्रे मधुन तिनं खाणं सर्व्ह केलं व समोरच्या खुर्चीवर ती बसली. तिच्या डाव्या हाताला बसलेल्या, किंचित ढेरी पुढं आलेल्या  तरुणाकडे तिनं तिरकस नजरेनं पाहिलं. तो तरुण बकाबक चिवडा हाणीत होता. वैशुला हसु फुटलं पण ते हसु तिनं ओठांतल्या ओठांत दाबलं. हं...हे ध्यान आहे तर! स्वारीला चिवडा आवडतो तर..पण खायला कळतं तसं ह्याला व्यायाम करायला कळत नसेल का? वाटतच नाही हा डॉक्टर वगैरे असेल..असे विचार वैशुच्या मनात क्षणभर तरळुन गेले. हा आमचा रामेश्वर. खुप जिद्दीने डॉक्टर झालाय. परिस्थिती म्हणाल तर तुमच्या मुलगीला काही कमी पडु देणार नाही इतका धनाने  नाही तर मनाने व बुध्दीने श्रीमंत आहे तो. त्याच्या आईच्या माघारी आमचं बिऱ्हाडचं त्याची माय झाली. बाकी मुलीची माहिती मिळालीय आम्हाला. तुम्हाला आणखी काय बोलायचं असेल तर बोलुन घ्या.  चिवड्याचा एकच चमचा तोंडात टाकुन प्लेट बाजुला ठेवत मुलाच्या काकांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. समोरच्या ऊजव्या कोपऱ्यात रंगानं थोडा सावळा, उंचीनं जेमतेम, अंगात पांढरा सुती सदरा व बारीकशा नाजुक काड्यांचा चश्मा घातलेल्या तरुणाकडं वैशुनं नजर वळवली. तशी ती  आणखीनच स्टॅच्यु झाली. चिवडा खाणारा मुलाचा भाऊ असल्याचा समजताच ती फिसकन स्वतःवरच हसली..दरम्यान तो तिच्याकडेच पाहत होता हे पाहुन वैशुनं सेकंदात तोंड मिटलं. त्याच्या चेहऱ्यावरच विलक्षण तेज वैशुनं कॅप्चर केलं. त्यानं एक हलकेसं स्मितहास्य केलं तशी वैशु बावरली. तिची चुळबूळ सुरु झाली. तसे रामेश्वरच्या भावाने जुजबी प्रश्नांपेक्षा त्या दोघांना एकांतात काही बोलायचं असेल तर बोलु द्यावं असं मोठ्यांना सुचविलं. तशी वैशु खुष झाली कारण असं स्थळाशी बोलणं पहिल्यांदाच होणार होतं.  त्यानुसार रामेश्वर व वैशु घराच्या गच्चीवर गेले. खरंतरं मला तुम्ही रिसर्च करीत असलेलं क्षेत्र फारच इंटरेस्टींग वाटल म्हणुन मी हीथवर आलो असं समजुन जा”. डोळ्यांवरचा चश्मा हटवित रामेश्वर वैशुला बोलला. हो का? चांगलंय की. माझा फोटो पाहुन न्हवे तर माझं अभ्यासु क्षेत्र पाहुन लग्नासाठी पहायला येणारं स्थळ म्हणजे दुर्मिळच म्हणायला हवं! पण तुम्ही पेशाने डॉक्टर. मग डॉक्टर मुलींची कुठे कमीय?” वैशु थोडी खोचक टोनमध्ये बोलली. मला माझं हॉस्पीटल सांभाळायला साथ देणारी डॉक्टरच मुलगी हवी होती पण समान रंग कसे मुळमुळीत, बोअरिंग वाटतात व तेच रंग जर कॉंट्रास्ट असतील तर त्या रंगांमधील कोणतीही गोष्ट खुलुन ती अधिकच सुंदर दिसते या फॉर्म्युल्यानुसार थोडा मुलींचा सर्च  करावा म्हणुन मी तुमच्यासारखी रिसर्च करणारी मुलगी पाहिली”. वैशुच्या नजरेशी नजर भिडवत रामेश्वर ऊत्तरला. हे ऐकुन वैशु मनातुन गलबलली. तिने क्षणार्धात नजर चोरली. हं. अस्सय तर. मग पहा हो नीट मला. तुम्हाला हवा असणारा रंग दिसतोय का माझ्यात?” वैशु हसत-हसत बोलली. आधी तुमच्या आयुष्याची सुखद किनार रंगवायला माझ्यातला रंग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुमचा होकार महत्वाचा. मग माझा. तुम्ही निर्जीव शरीरं अभ्यासता आणि मी मानवी सजीव शरीर तपासतो, अभ्यासतो तस माणसाचं मनही अभ्यासता येत मला. तुम्ही दिसायला छान आहातच आणि शेवटी माणुसच आहात पण तुमच्या शरीरातला जो अंतरात्मा आहे त्यातले विचार व संस्कार माझ्यासाठी महत्वाचे. काय!” काढलेला चश्मा पुन्हा डोळ्यांवर चढवित रामेश्वर एक मंद हास्य करीत वैशुला बोलला. हे ऐकुन वैशु पार सातवे आसमांनपर तरंगली..तिला सध्या गच्चीत नाहीतर छान फुलांनी नटलेल्या बागेत असल्याचा भास झाला एवढचं न्हवे तर त्या बागेतल्या झोक्यावर बसुन तिनं असा काही ऊंचच्या ऊंच झोका घेतलाय की त्या आनंदानं पार धन्य धन्य झालीय असाही फिल तिला काही वेळ आला. ती इतके दिवस ज्या क्लीक च्या शोधात होती नेमकी तीच क्लीक तिला आज मिळाली. ती भानावर आली. रामेश्वर तिच्याकडे ती पुढचे काहीतरी पॉझिटीव्ह थॉट्स मांडेल या आशेने पाहत होता. तशी वैशु चमकली. अशा सुंदर विचारांचा, संयमी तत्वांचा माणुस ती पहिल्यांदाच पाहत होती ती काहीवेळ निःशब्द राहिली... आणि तिनं चोरलेली नजर त्याच्या चेहऱ्यावर थेट खिळवली तसं तिचं व त्याचं यंदा कर्तव्य फिक्स असल्याचं रामेश्वरच्या मनानं जाणलं. दोघंही अगदी खळखळुन हसले...अन दोघांनाही भर ऊन्हातं प्रेमाचं चांदणंपडल्याची आंतरिक जाणीव झाली...!  


                                                                                     By.शैलजा
                                


11 comments:

  1. खूपच सुंदर. ..एक वाक्य खूपच आवडल .हुशारी व प्रामाणिकपणा खोलवर पाहण्याची दृष्टी खूपच कमी लोकांकडे असते.����

    ReplyDelete
  2. सुंदर.......कांदापोहे प्लेट सम्पेपर्यंत लाइफपार्ट्नर शोधणे फारच अवघड आहे आपल्या ईथ तरही कांदापोहे खाणाऱ्याची संख्या कमी नाही 😜😜😜😜

    ReplyDelete
  3. खूप आवडलं, वैशु ने कुठलीही तडजोड न करता आपल्या विचारांवर ठाम राहून जीवनसाथी मिळवला हे आवडलं
    Keep it up.

    ReplyDelete
  4. लग्नासाठी मुलगा पाहायला आल्यानंतर मुलींच्या मनात काय चालू असतं याच एक उत्तम उदाहरण...,

    ReplyDelete
  5. थॅंक्यु फ्रेंड्स.

    ReplyDelete
  6. खूपच छान, पण स्वतः अनुभवातून गेल्यासारख वाटतं

    ReplyDelete
  7. कथा वाचता वाचता आयुष्यातील बरेच किस्से आठवले.

    ReplyDelete