Monday 2 March 2020

कॉफी..! (एक सत्यकथा)


कॉफी…! ( एक सत्यकथा )
                                                                         ..By शैलजा.
    
 कपाळावर टेकवलेल्या दोन्ही हातांना सोडवत, तिने एक दीर्घ ऊसासा टाकला आणि त्याच्या दुरवर निघुन जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहतच राहिली...आजवर आयुष्यात असे हातातुन निसटुन जाणारे पण ते जिवानिशी धरुन ठेवावेसे वाटणारे असे कित्येक क्षण तिच्या अंतरात्म्याने अनुभवले होते. डोळ्यांतली आसवं रोखुन रोखुन तीचे मन ऊबले होते. आणखी काही दिवस जर असेच गेले तर ती एक रोबोट बनेल की काय अशी शक्यता नाकारता येत न्हवती. आज त्याने तिच्या आयुष्यातला सुंदर स्वप्नांच्या पलीकडला असा फायनल डाव टाकला होता. गेल्या तीन वर्षांपासुनच्या त्याच्या व तिच्या मैत्रीच्या नात्यापुढे जाणारे प्रेमाचे नाते त्याला आयुष्यभरासाठी आता हवे होते. आज या फायनल प्रपोजचा पत्ता टाकुन तो निर्णयाची आस ठेवून निघुन गेला होता. तो पत्ता ऊचलुन तिला हा डाव जिंकायची संधी असुनही तिचे मन असा विचार करण्यासही धजावत न्हवते. कारण तिचा काळाकुट्ट भूतकाळच तिला हा प्रेमाचा डाव जिंकु देत न्हवता. कधी न्हवे ते त्याला जीवापाड आवडणारी कॉफी तो अर्धवट टाकुन निघुन गेला.त्याने दिलेला, टेबलावर ठेवुन दिलेला, तो गुलाबांचा बुके तिने ऊचलला तसा त्यातला एक काटा तिच्या नाजुकशा बोटांत टचकन् टोचला. याने ती थोडी दुखावली. पण हा काटा वेगळा होता. हे दुखणे तिला सुखावणारे होते. त्या दुखऱ्या बोटावर हळुवार प्रेमाने फुंकर मारतच कॉफीबील भागवुन ती कँफेमधुन बाहेर पडली.जीव गुदमरुन टाकणा-या ट्रॅफिकच्या रगाड्यातुन ती घरी आली. घर ते कसले! थोड्याफार सामानासकटच्या चार भिंतीच त्या! माणसांच्या हसण्या-खिदळण्याला ते घर पोरकेच होते. एरवी, दिवसभर ऑफिसच्या कामात तिच मन रमुन जायच पण सांजवेळी घरी आल्यावर तिला तिचा एकांत अक्षरशः खायला ऊठायचा! ज्या देवाला तिच्या भाग्याची जरासुध्दा दया न येता नियतीच्या गुढ फेऱ्यात अडकुन तिची अख्खी जिंदगीच अंधारमय झाली होती तरीही
देव्हा-यातल्या देवापुढे अंधार नको म्हणुन निदान दिवा लावायच्या एकमेव ओढीने ती घरी यायची. आज 'त्याच्यासोबतची' फायनल भेट म्हणुन ती कॉफी डे मध्ये गेली होती. तशीच घरी लवकर निघुन आली. आल्यानंतर फ्रेश होऊन दिवेलागण केली. कितीदा ती कडवट कॉफी प्यायची? शेवटी 'त्याच्यामुळेच' तिला चहा सोडुन कॉफीची सवय होऊन गेली होती. अजुनही निर्णय होत न्हवता...चहा करावा की कॉफी? शेवटी तिने तिला आवडणा-या चहाचेच आधण ठेवले. आणि तिने एफएम ची ट्युन सेट केली....
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥
राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ?
राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी॥...
नेमके हे गाणे ऐकुन तिच्या अंगावर सरर्कन काटा आला. तिने स्वतःलाच एक घट्ट मिठी मारली व रडु लागली..तेवढ्यात चर्रचर्र चर्रचर्र असा आवाज करीत चहा पार ऊतु गेला. तिने पटकन गॅस बंद केला पण त्यातल्या करपट चहापुडीचा वास तिला आता असह्य झाला. तिने लगेच एफएम ऑफ केले. आता मात्र तिला कॉफी प्यावीशी वाटु लागली...शेवटी ती बनवुन बाल्कनीत येऊन आराम खुर्चीवर ती रेलुन बसली. तेवढ्यात बाल्कनीतल्या कुंडीतला आजच खुललेला गुलाब तिला बोलवु लागला. तो डार्क व्हेलवेट रेड टपोरा गुलाब फांदीच्या आडोशाहुन जणु तिच्याशी काही बोलु पाहत होता...

त्याच्या पाकळ्यांमध्ये तिला तिच्या भूतकाळाचा सुवास खुणावू लागला...शाळा-कॉलेजमध्ये  असताना असाच डार्क व्हेलवेट गुलाब तिला नेहमी बक्षीस म्हणुन मिळायचा. सर्वांत सुंदर मुलगी म्हणुन. तिचे निळसर घारे डोळे सोनेरी केस, नितळ कांती, आणि डॅशिंग स्वभाव. पाहताक्षणी अगदी कुणीही प्रेमात पडावे असे तिचे अप्सरामय सौंदर्य...रोज कानामागे काळा तीट लावुनच तिची आई तिला घराबाहेर सोडायची. इतके तिचे आरसपाणी सौंदर्य जगजाहीर होते. पण सुंदर, सोनेरी रंगीबेरंगी माशांना आयुष्यभर काचेच्या पेटीत राहुन त्यांना त्यांच्या सौंदर्याची शिक्षा भोगावी लागते. त्यांना चांदण्यांच्या प्रकाशात, मनमोहक आस्वादी अशा निळाशार समुद्रात पोहण्याचा आनंद त्यांच्या नशीबात नसतो! असचं तथ्य तिलाही लागु होतं.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असतानाच सगळीकडे चर्चा सुरु झाली ती, तिच्या लग्नाची. तिला खुप शिकायच होतं. पण वडिलांच्या धाक-शिस्तीपुढे तिचे शिक्षणही हरले. एकापेक्षा एक सरस स्थळे येऊ लागली. मुलगा चांगला बिझीनेसमन. कोट्यावधींची ऊलाढाल करणारा. बंगला, गाडी, शेतजमीन, फार्महाऊस सगळी सगळी सुखं अगदी तिच्या पायाशी लोळण घेणारी. कुठल्याही मुलीच्या आई-वडिलांना आणखी काय हव असतं? जी आयुष्यातली कमतरता, दुःखं, संकटं त्यांच्या वाट्याला आली तशी ती पोटच्या लेकरांच्या वाट्याला नकोत हीच त्यांची एकमेव इच्छा असते. अगदी याच इच्छेपुढे ती नमली. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान या एकमेव गोष्टींसाठी तिने स्वतःच्या आयुष्याचा जणु जुगार खेळायचे ठरविले. हरलो तर हरलो. जिंकलो तर जिंकलो. हीला पाहताक्षणी लग्न जमले. तिच्यात व त्याच्यात कोणताही संवाद नाही. नवीन नात्याची ओढ नाही. पण सर्वांनी एकच अनुमान काढले. ते म्हणजे मुलगा एकदम शांत, अबोल व लाजरा आहे. लग्नानंतर थोडा सोशल व फ्रि होईल. आता हीची जबाबदारी वाढली होती. एका अनोळखी व्यक्तीला जीव लावुन त्याच्या वाटेने त्याच्यासोबत आयुष्यभरासाठी चालायचे होते. लग्नानंतर तिला राजेशाही थाट मिळाला, दागदागिन्यांचे ओझे तिला पेलवेनासे झाले इतकी हौस तिच्या नशीबी आली, रोज पंचपक्वान्नाची गोडी मिळाली, जे तिने पाहिले न्हवते ते तिला ऊपभोगायला मिळाले, फक्त एक गोष्ट सोडुन ते म्हणजे नवऱ्याचे प्रेम!’

    प्रेम ह्या शब्दाचा अर्थ फुलविणारे तिचे वय. त्या अर्थातल्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलायचे तिचे वय. लडिवाळपणे कोड-कौतुकांमध्ये रमायचे तिचे वय! पण तिच्या जीवनाचा सारीपाट असा काही ऊधळून निघाला की त्यातले प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे, सुखा-समाधानाचे डाव खेळण्याआधीच ती हरुन बसली. नवरा नावाचा माणुस न्हवे तर प्राण्याशीचजणु ती तडजोड करीत होती. तो तिच्याशी कुठल्याही गोष्टींबाबत बोलणे करीत नसे. महिन्यातले निम्मेअधिक दिवस बाहेर कामानिमित्त तो न सांगताच निघुन जात असे. अर्धांगिनी म्हणुन आयुष्यातली सुख-दुःखे वाटुन घेणे तर लांबच पण ती त्याच्या घरी राहणारी एक सदस्य आहे ह्याचाही त्याला विसर पडत असे. तो माणुस म्हणुन एकदम विचित्र होता. त्याला फारसे मित्रही न्हवते. तिने पहिले वर्षभर त्याच्याशी जुळवून घेण्याचा नितांत प्रयत्न केला पण त्याच्या या वागण्यामध्ये काडीभरही फरक पडला नाही. केवळ नि केवळ आपल्या आई-वडिलांच्या प्रतिष्ठेपायी व त्यांच्या समाधानासाठी म्हणुन ती संसार नावाचा गाडा एकेरीच हाकत होती. ती जगुनही रोज मरत होती. तिच्या भावनांचा इतका कोंडमारा होत असे की कधी कधी तिला वेड लागेल की काय अशी भीती असायची.
आज तिच्या व त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस! माणुस आशेवरच तर जगत असतो. या वेड्या आशेपायी तिने केक बनविला, सगळे घर सुंदर सजविले, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती छान सजुन त्याची वाट पहात बसली. असा कितीतरी वेळ निघुन गेला. तो आला...पण तोवर दुसरा दिवस ऊजाडला होता. पहाटेचे चार वाजलेले. ही बसल्याजागी वाट पहातच निजुन गेलेली. जाग आली. तिने पाहिले तो निवांत झोपुन गेलेला. ही ऊठली. हे पाहिले नि तिच्या सहनशीलतेचा बांध आज मात्र कोसळला. तिने त्याच्या तोंडावर पाणी मारुन ऊठवले. तो रागाने ऊठला.मूर्ख बाई तुझी जागा बाहेर आहे. हीथे नाही. आजवर तुला कळायला हवे होते की तु फक्त दिखाव्याला माझी बायको आहेस. तु जगासाठी असशील देखणी परी, पण माझ्यासाठी केवळ आखीव रेखीव पुतळा आहेस तु. माझं जग दुसरी कोणीतरी आहे. केवळ घरच्यांच्या इच्छेखातर मी तुला या घरात आणलय. माझ्या आयुष्यात तुझे शून्य स्थान आहे समजल तुला? आता तर माझा पिच्छा सोड. तो तावातावाने तिच्या अंगावर धावून ओरडुन तिला सांगत होता. हे सारे तिने ऐकले. मरणयातना बऱ्या पण हे शब्द नकोत असे तिला वाटले, तत्क्षणी तिने पाण्याने भरलेली घागर बदाबदा स्वतःच्या अंगावर ओतुन घेतली. ही काय केली तुझ्या नावाने आज मी अंघोळ. तुझ्यासारख्या वेडसर माणसाशी मला संसार करण्यात मुळीच स्वारस्य नाही. पण हीथुन पुढील क्षण मी फक्त नि फक्त स्वतःसाठीच जगेन. वीज कडाडावी तशी ती मोठ्या त्वेषाने त्याला बोलली.


पुढे कोर्टकचेरीचे सोपस्कार होऊन दोघेही घटस्फोट नावाच्या घावाने पुर्णतः वेगळे झाले. हा घाव काही सोप्पा तर नसतोच पण सहजासहजी भरुन निघणाराही नसतो. या घावाने दोन व्यक्ति न्हवे तर दोन कुटुंबेच उध्वस्त होतात. तिने पुढील २-३ वर्षांत शिक्षण पुर्ण केले. तिला छान नोकरी मिळाली. नातेवाईक-शेजारी-जोडलेले सगळीकडे तिच्याबाबतीत जे काही झाले त्याची हळहळ व्यक्त होऊ लागली. सर्वांनी तिला संसारात बाईनेच खऱ्या अर्थाने तडजोड करावी लागते, निदान मागील भावंडांचा, आई-वडिलांचा तरी विचार कर असे सांत्वन करुन त्या नवरा नावाच्या विचित्र माणसाकडे परत जायचा सल्ला दिला. तिला समाज नावाच्या हत्याराने  वारंवार तिच्या मनाचे, भावनांचे तुकडे करुन पुरते घायाळ केले, पण अशा वेळी तिचे वडिल तिच्या पाठीशी खंबीर ऊभे राहिले. तिने हे लग्न करतेवेळी आपल्या स्वप्नांचा केलेला त्याग तिला वडिलांच्या रुपात एक नवीन ऊमेदीचे आयुष्य जगायला प्रेरणा देत होता.
     हाय, आय एम दि न्यु ब्रॅंच कोऑर्डीनेटर ऑफ धिस ऑफिस”. डोळ्यांवरचा गॉगल खिशाला अडकवत एक क्युट स्माईल देत तो तिला बोलला. लॅपटॉपवरील नजर हटवत तिने त्याच्याकडे पाहिले तसे तिच्या मनात नि मेंदुत काहीतरी क्लीकझाले. ती क्षणभर शहारली. कोणतीतरी जुनी पुराणी एक गुढ ओळख असावी असा तिला भास झाला. तिनेही एक मंद हास्य करीत आपली ओळख त्याला करुन दिली.
     आता मात्र आयुष्याचा एक नवीन कित्ता गिरविला जात होता तेही तिच्या नकळत. तिला चहाचे वेड होते तर त्याला कॉफीचे. त्यांच्यातील मैत्रीचे बंध चांगलेच घट्ट विणले इतके की ती कॉफीप्रेमी झाली व तो चहाप्रेमी!’ कॉफी?’ असे त्याने विचारायचा अवकाश क्षणात ती ओके. बोलुन ठरलेल्या कॅफेमध्ये जायची. रोज तिचे व त्याचे बोलणे, सुख-दुःखाचे शेअरिंग सुरु झाले. तो एक माणुसकीने भारलेला माणुस होता. त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचे चांगले ज्ञान व भानही होते. एका स्त्रीबद्दल त्याच्याकडे नुसतचे स्त्रीदाक्षिण्य न्हवते तर त्यापलीकडेही कोणतीही स्त्री एक माणुसही असते याची त्याला पुरेपुर जाणीव होती. त्यानेही लग्नाचा प्रंपच केला. पण जोडीदारीण फारच ईगोइस्ट निघाली. कसातरी तीनेक वर्ष त्यांचा मेळ बसला आणि शेवटी तिनेच एकदाचा या नात्याचा शेवट केला. तोही हीच्यासारखाच एक जखमी राजहंस होता. आयुष्यातल्या या चुकलेल्या परिपाठाने त्याला सही असलेले जगणे मात्र शिकविले होते. हे सगळे तिने त्याच्या बाबत अनुभवलेले एक वास्तव होते.

आणि हेच वास्तव तिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या एका अनामिक अशा ओढीचे कारण बनले. या दोन वर्षांत त्याने तिच्यासोबत तिच्य़ा आई-वडिलांच्या मनातही घर केले. सर्वांनाच तो हवाहवासा वाटु लागला.
 आणि...आज कॅफे डे मध्ये त्यालाही ती व तिचे कुटुंब आता कायमस्वरुपी त्याच्या आयुष्यात हवे असल्याचे तो तिला सांगुन तिच्या निर्णयाची वाट पाहत निघुन गेला...ती अजुनही बाल्कनीत त्या डार्क रेड व्हेलव्हेट गुलाबाकडे पाहत या विचारांत गढून गेली. तिला खरेतर लग्न या शब्दाची नुसती भिती न्हवे तर दहशत वाटत होती. तरीही तिला त्याचा सहवास नकोसाही वाटत न्हवता. कपातली कॉफी तर कधीच संपलेली. पुन्हा तिने एक दीर्घ ऊसासा टाकला..मात्र विचारांचे चक्र थांबविले. व पुन्हा एकदा आणखीन् कॉफी बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. आता ती एक न्हवे तर दोन कप कॉफी बनवणार होती.कॅफेतली अर्धवट सोडलेली कॉफी घरी प्यायला ये. असा एक फोनकॉल तिने त्याला केला...नि ऑफ केलेली एफएम ट्युन पुन्हा सेट केली...ती ते गाणे स्वतःही गुणगुणु लागली...
वेड पांघरावे न व्हावे शहाणे, ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हुरहुर वाढे गोड अंतरीही, पास पास दोघांत अंतर तरीही...
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे, हो ऊन सावलीचे खेळ हे
नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा...
ना त्याचे बंधन व्हावे तु ही रे माझा मितवा...
                                                                       --    शैलजा खाडे.

9 comments:

  1. Very nice story
    Keep writing best luck.

    ReplyDelete
  2. खूप छान , वास्तववादी निर्णय ..

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  4. Nehmisarkhich.. hi story pan heart touching..

    ReplyDelete
  5. खूपच छान, आजच्या जगात गरज आहे सत्य परिस्थिती चा स्वीकार करून असे धाडशी आणि वास्तववादी निर्णय घेण्याची.. त्यामुळे अन्यान करणाऱ्याना जरब बसेल..
    काही परिस्थितीत तडजोड करणे योग्य आहे पण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन कधीच नाही....

    ReplyDelete
  6. मुलीच्या जीवनात 'बाप' हाच सच्चा मित्र असतो. आपल्या मुलीच्या वेदना तोच समजू शकतो जशी मुलगी वडिलांच्या वेदना समजू शकते. दुसरा भाग म्हणजे जीवन जगायचे असेल तर भूतकाळ विसरून सध्याचा विचार करून निर्णय घेणे अधिक योग्य आहे. ज्यापद्धतीने जग चालले आहे त्यानूसार निर्णय योग्यच आहेत.छान आहे. अशाच कथा सर्वांसमोर विविध विषयावर येवुदेत. पुढील कथांसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. Thoroughly gone through the story,it is very nice.

    ReplyDelete