खाण्यासाठी जन्म आपुला...! – शैलजा खाडे-पाटील.
आनंदाचा मार्ग पोटातुन जातो
अस बोलतात खूप खोलवर विचार केला असता, माझ्याही अस लक्षात आलं की खरच आनंदाचा खरा
मार्ग हा पोटातुनच जात असतो, म्हणजे विविध चवी-ढवीचे पदार्थ खाण्या-पिण्यामुळे जो काही
तृप्तीचा ढेकर येतो त्याला तर स्वर्गसुखाचीही सर नसते. खाण्यासाठी जगायचे? की जगण्यासाठी खायचे? असा काही जणांना पडलेला प्रश्न
असतो. पण जे चविष्ट, पोषक, रुचकर, मधुर, अंत:करणाची तृष्णा
भागविणारे देशा-प्रदेशानुसार जे-जे काही उपलब्ध होईल ते-ते उदरात ढकलण्यास काहीच
हरकत नसावी असं माझं शुध्द मत आहे. पण या खाण्यास तब्येतीच्या चौकटीमध्ये मापुनच
खाणे इष्ट. पुर्वी अगदी कुणालाही तुमचा छंद काय असं छेडले असता
वाचन-लेखन-प्रवास-फोटोसेशन इ. छंदांच्या शब्दांची कानाला कशी सवयच जडलेली असायची.
पण आत्ता खुपशा व्यक्ति-वल्लींकडुन ‘हॉटेलिंग’ हा माझा खासम खास छंद आहे असे सर्रास ऐकायला न मिळेल तर नवलच!
तसा सुरुवातीला मला हॉटेलिंग हा प्रकार
माहितच नव्हता कारण घरी तशी परंपराच नाही. आई – वडिल पक्के नोकरदार असले तरी विशेष
म्हणजे, माझ्या आईला वीक एंड, हॉटेलिंग हे कधीही रुचलं व पटलं नाहीच. तिच
वैशिष्ट्य म्हणजे नोकरी व कुटुंब सांभाळुने तिने सकाळी ९ ची व रात्री ९ ची ताजी
गरम भाकरी करायची वेळ कधीही चुकवली नाही. तिच्या हातचा गुण म्हणजे कमीत कमी किंवा
घरी उपलब्ध असलेल्या सामानातुन खुप छान स्वयंपाक बनवणे. पाकिटातला मसाला किंवा
रेडी टु इट हाही प्रकार मी चक्क लग्नानंतरच ट्राय केला. आईच्या हातच्या गरमागरम
भाकरी व त्यावर धार लावुन तुप सोडुन ती पटकन चट्टामट्टा करायची माझी खास सवय आहे...
आणि तिच्या हातच्या तीन-चार पदरी तवाभर पसरलेल्या गरमागरम चपात्या तशाच कोरड्याच
खायला मला विशेष आवडतं. अस्सल व खेडुत कोल्हापुरकर असल्यामुळे सणावाराला आणि
पाहुणचाराला ठरलेले दोन मेन्यु म्हणजे झणझणीत मटन आणि पुरणपोळ्या. कधीतरी चेंज म्हणुन
मग पुरी बासुंदीचा बेत असतो. लहानपणी वडणगे येथे शाळेत असताना तिथल्या
ग्रामपंचायतीच्या बाजुला खाऊच्या एका छोट्या टपरीत तांदळाच्या उकडीपासुन बनवलेले
रंगीबेरंगी तळलेले सांडगे भेटत शिवाय फुकण्या म्हणजे आत्ताचे बॉबी आणि साधे साखर
टाकलेले रवाळ गुलाबजामुन हे म्हणजे माझ्यासाठी मधल्या सुट्टीतली एक स्पेशल मजा
असायची. नंतर निगवे हायस्कुल हीथल्या शाळेतल्या खाऊवाल्या आजीकडे भेटणारी, कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,
तिखट व वरती मस्त लिंबू पिळलेली अशी खारीडाळ खाल्ली की ब्बास्स! आत्मा तृप्त होऊन जायचा. शिवाय, लेमन व
पेपरमिंटची गोळी तोंडात चघळत चघळत वर्गात फळ्यावरच वहीत उतरुन घेताना असा काही
त्या विषयात जीव रमायचा की ते लिहायलाही माझ्याकडे शब्दच नाहीत. या खारीडाळसारख्या
तिखट मेन्युसोबत ठरलेला गोड मेन्यु म्हणजे
चिक्की गुडदाणी. तिच्यावर तर माझ आजही तितकच प्रेम आहे. शाळेमध्ये असताना हे माझ
प्रेम जरा जास्तच ऊतु गेल्याच मला आठवत कारण, एके दिवशी ही प्राणप्रिय चिक्की
गुडदाणी घरीच बनवायचा मी बेत केला.
शेंगदाणे चांगले भाजुन सालं काढुन भरडुन घेतले
तर दुसरीकडे गुळाचा पाक केला पण गंमत अशी झाली की तो पाक खुपच पक्का व भरपुर झाला
आणि त्त्यात भर म्हणजे थाळीला तेल न लावताच हे मिश्रण मी त्या थाळीत ओतल ही नेमकी
प्रोसेस माहीत नसल्यान ते गार झाल्यावर मी आपली त्या चिक्क्या काढायला गेले नि
काही केल्या चिक्क्या काही निघेनात ती थाळी आपटुन आपटुन माझे हात दुखायला लागले.
कहर म्हणजे ती लांब फेकुन जवळ फेकुन चेंडुप्रमाणे भिंतीवर आपटुन माझा क्रिकेटचा
खेळ ही जोमात रंगला. पण चिक्की काही निघाली नाहीच. त्याची चव मला कधी एकदा घेईनाशी
झाली. त्यामुळे तशीच थाळी मी चाटायला घेतली व घरच्यांचा चांगलाच ओरडा खाल्ला. असो.
चिक्कीपुराण चांगलच अंगलट आल्यानं मी काही अशा भानगडीत पडायच नसल्याच पक्क केल.
नंतर कोल्हापुरातल्या हायस्कुल मध्ये
आल्यावर जरा जरा शहरी पदार्थांची ओळख होऊ लागली. शाळेच्या वाटेवर एका दुकानात
बरणीत ठेवलेले डींकाचे लाडु, क्रिमरोल, खाजे, पार्लेची चॉकलेट्स आणि गव्हाच्या
कणकेपासुन बनवलेली छोटी पांढरी बर्फी..असं काय नि काय शाळेला येता-जाता माझी चव
चाळवत असे. पण मला ती पांढरी छोटी बर्फीच जास्त आवडत असे. ती टाकली की जीभेवर लगेच
विरघळायची आणि १रु ला चार अशी ती स्वस्तही पडत असे. नंतर भेळ हा प्रकारही मला
तिथेच चाखायला मिळाला. तेव्हा तर घर नि शाळा ..शाळा नि घर हेच माझं जग असायच.
त्यामुळे या छोट्याशा जगात जे-जे पहायला, अनुभवायला मिळेल तोच काय तो माझा आनंद
असे. खेडेगावातुन कोल्हापुर सारख्या शहरात आल्याने मला नवनवीन पदार्थांची ओळख
हीथेच झाली. मी पाणीपुरी हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला तो इ. १० वी नंतरच्या एन्जॉयिंग
सुट्टीमध्ये आणि तोही धुंद बेधुंद वारा अंगावर घेत जिथे स्वतालाही विसरायला होत
अशा मनमोहक रंकाळा तलावावर. नंतर नंतर तिथली पाणीपुरी आणि फालुदा हा माझ्या
जीवाभावाचा विषय बनला.जस लग्न होऊन मी पुण्या-मुंबईच्या खुराड्यांमध्ये अडकुन पडले
तस मला या दोन्ही पदार्थांच्या आठवणी अधिकच त्रास देऊ लागल्या. पहिल्यांदा मी
पाणीपुरी कशी खायची हे माहीत नसल्यानं मी प्लेट हातात घेताच प्रत्येक पाणीपुरीतलं
पाणी प्लेटमध्ये ओतुन दिल मग त्या रिकाम्या पाणीपुऱ्या खाल्ल्या व शेवटी चहाची बशी
तोंडाला लावुन आम्ही कोल्हापुरकर कसे फुर्रफुर्र चहा पितो तसे ते पाणीपुरीचे पाणी
मी प्यायला लागले तेव्हा माझ्या सोबतच्या शहरी मैत्रीणी फिस्सकन् दात काढुन हसु
लागल्या.
मग त्यातल्या एकीनं मला पाणीपुरी कशी खायची ह्याचं प्रात्यक्षिक करुन
दाखविलं. आणि आता पाणीपुरी खाताना तोंडाचा मोठ्ठाला आ करुन मस्त तिखट-गोड-आंबट असं
पाणी+रगडा+कांदा+शेव असं सगळं मिश्रण जीभेवर अफलातुन कमाल करत ना की मी अशावेळी देवाचे
मनोमन आभार मानत असते की थॅंक्यु देवा! तु मला तोंडाचा मोठ्ठा
जबडा दिलास की त्यात ही चटकदार पाणीपुरी आरामात जाऊन बसते. फालुद्यातलंही ते सब्जा
बी व शेव सुटुक सुटुक गिळताना मला भारी मजा वाटते. आईस्क्रीमच्या फॅमिलीतला फालुदा
हा मेंबर सोडल्यास महाद्वार रोडवरच्या महालक्ष्मी दरवाजासमोरच्या कॉर्नरवर असणारं
दिलीप कोल्ड्रींक हाऊस मधलं गडबड आईस्क्रीम खाताना जीव गडबडुन जागा व्हायचा. कारण
त्या आईस्क्रीम मध्ये चॉकलेट, व्हेनिला, मॅंगो, पिस्ता असे मिक्स फ्लेवर असायचे.
नि त्यात सगळ्या फ्रुटच मिक्श्चर असायत वरती चेरी, लाल-पिवळे-हिरवे मनुके,
असकायतरी भारंभार घातलेल असायच तो गडबड आईस्क्रीमचा मोठ्ठा कप समोर आल्यावर आम्ही
मैत्रीणी तो दोघींच्यात वगैरे शेअर करायचो इतकी त्याची क्वांटीटी असायची.
या
कोल्ड्रींक हाऊसच्या समोरच्या तिरक्या बोळात एक चायनीज स्टॉल आहे. तिथेही
दरसालाबादप्रमाणे दिवाळीची शॉपिंग केल्यानंतर मी व ताई जायचो. व तिथली गोबी
मंच्युरिअन व हक्का नुडल्सचा आस्वाद घ्यायचो. अशावेळी ती ऑर्डर देताना ताई व माझ्यात
थोडे आढेवेढे व्हायचे कारण अशी बाहेरच्या खाण्याची चैन माझ्या आई-पप्पांना आवडत
नाही. कारण बाहेरच्या खाण्यानं आरोग्य बिघडत अशी त्यांची ठाम समजुत आजही कायम आहे.
शिवाय पैशांची विल्हेवाट नुसती ती हेही त्यांच मत हेही वेगळं सांगायला नको. पद्माराजे
शाळेचा सरळ रोड महाद्वार रोड कडे जाताना तिथे तृषाशांती नावाचं एक हॉटेल असायच
तिथेच आम्ही कॉलेजचे मित्र-मैत्रीणी ग्रुपमधले वाढदिवस साजरे करत असु. तेव्हा तिथे
स्प्रिंग चीज डोसा, उत्तप्पा, पुरीभाजी, पावभाजी, कटवडा, मिसळ, असे पदार्थ चाखायला
मिळाले. मी पिझ्झा हा प्रकारही या ठिकाणीच पहिल्यांदा टेस्ट केला. त्यामुळंच चीज,बटर
नेमकं काय असतं तेही कळल. त्यानंतर महाद्वार रोडवर सरळ वर वर सरकत गेल की
वणकुंद्रे भांडी सेंटरला लागुनच कोल्हापुरची चोरगे मिसळ आहे. तिथली मिसळ खाल्ली की
ब्बास्सच! नाद्या बाद फिलींग यायच! तिथुन
थोड मागे आल्यावर महालक्ष्मी देवीच्या मुख दरवाजाचा रस्ता थेट रंकाळ्यावर जातो
तिथे कपीलतिर्थ मार्केट समोर् हॉटेल सन्मान लागत.
इयत्ता एफवाय बीए मध्ये असताना
मी पहिल्यांदा हॉटेलिंग केल ते याच हॉटेल
मध्ये. तेव्हा एकंदरित मेन्युकार्ड पाहुन धीरगंभीर चर्चा करुन मेन्यु ठरवणे.. ठरवलेल्या
मेन्युची नीट शुध्द भाषेत वेटरला ऑर्डर देणे पासुन ते प्लेटमधला पदार्थ
काटेचमच्याने व्यवस्थीत न सांडता खाणे.. खाल्ल्यानंतरही टीश्युपेपरचा वापर हात
पुसायला करणे...त्यानंतर बडीशेपची चिमट तोंडात टाकुन पुन्हा दातांत अडकलेली बडीशेप
टेबलावरच्या टुथपिकने बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे..बिल देताना वेटरला
तेव्हा आम्ही ५ रु ची टीप दिल्याच मला आजही लख्ख आठवत व खुप हसायलाही येत. असं
सगळं हॉटेलिंग च ट्रेनिंग तेव्हा माझ्यासोबतच्या मित्र मैत्रिणींनी मला दिल. तेव्हा
मी आयुष्यात पहिल्यांदा मसाला डोसा खाल्ला.
आणि तेव्हापासुनच चिक्कीगुडदाणीसोबतच
माझ मसाला डोशावरही विशेष प्रेम जडलं. मग त्यातही पेपर मसाला डोसा, चीज स्प्रिंग
डोसा, सेट डोसा, ट्रॅंगल डोसा, व्हेज स्टफ डोसा, दावणगिरी लोणी डोसा, चायनीज डोसा इ. इ.
इंदुमती गर्ल्स हायस्कुल समोर दावणगिरी लोणी
डोशाच एक खास सेंटर आहे. तिथला डोसा मला विशेष आवडतो. विशेष म्हणजे तो
खाण्यापेक्षा कसा बनवतात हे पहायलाच मला अधिक रुची वाटते. मोठ्या आडव्या तव्यावर
एकाच वेळेस ४-४ डोसे वाटीने टाकुन तो लुंगी वाला
सावळासा माणुस ते डोसे इतके भरभर फिरवतो की जादुच झाल्यागत वाटत. केळीच्या
पानातुन खास साऊथ इंडियन खोबऱ्याची चटणी व सोबत ऊभा कांदा चिरलेली तिखट व गोडसर
बटाटा भाजी खाताना जीव पुरता रमुन जातो... तिथल विशेष म्हणजे बटाटा भाजी व
खोबऱ्याची चटणी कितीही वेळेस हवी तेवढी खायला भेटते. त्याच्या बाजुलाच रुपाली
हॉटेल आहे त्या मध्ये आम्ही मैत्रिणींनी पहिल्यांदाच दहीवडा खाल्ल्याच मला आठवत.
तो मी पहिल्यांदाच खात असल्याने एका मोठ्या बाऊल मध्ये मधोमध वडा ठेवुन वरुन भरपुर
गोडसर दही चाटमसाला तिखट शेव यात तो वडा लपला होता. मला काही केल्या हा शोध लागेना
की दहीवडा म्हणताना वडा कुठाय यात मी चिडुन वेटरला विचारल तर त्यानं दिलेल उत्तर
माझ्या हृदयाला चांगलच घाव करुन गेल-“मॅडमजी वडा अब चश्मा लगाके ढुंडीए..दही के अंदर छिपा हुआ है!”
तेव्हा सगळेजण खुप हसले.
ते दिवस भारलेले होते..फक्त आणि फक्त आनंदाने
भारलेले..खाण्यामुळे तर होतेच शिवाय, कॉलेजातले मित्र-मैत्रीणी, लेक्चर्स,
प्राध्यापक वृंद, कॉलेज कॅंटीन, वेगवेगळे डें चं सेलिब्रेशन, लायब्ररी कट्टा
सेंडऑफ इ.इ. गोष्टी या आयुष्यात एक वेगळेच सुखानुभव देणाऱ्या ठरल्या म्हणुन.
खासबाग मैदानाला लागुन असलेल्या खाऊ गल्लीत
मी खुप वेळानेच शिरले कारण माझ्या ऑफिसचा रस्ता त्या खाऊगल्लीतुनच जायचा. अशावेळा
ऑफिस सुटल्यावर आम्ही राजाभाऊच्या भेळवर चवीने ताव मारायचो. त्या भेळवरची तिखट व
हळद टाकलेली आंबट-गोड कैरी मला जास्तच
आवडायची. खरतर राजाभाऊंच्या भेळसारखी चवीची भेळ मी आजपर्यंत चाखलेली नाहीच.
पुण्यात नवीन नवीन असताना राजाभाऊंच्या भेळची आठवण आली म्हणुन सारसबागेत भेळ खायला
गेले तर हाय रामा! त्या सुक्या चुरमुऱ्यांमध्येच मटकी, शेंगदाणे, फुटाणे आणि हिरव्या मिरचीचा
ठेचा घातलेली भेळ खाताना माझा चेहरा फोटो काढण्यासारखा झालेला माफ करा हिथे पुणेरी
मटकी भेळही चवीचीच आहे पण कोल्हापुरच्या राजाभाऊंच्या भेळची काही बातच और आहे.
त्याच
खाऊगल्लीत कॉर्नभेळही मी पहिल्यांदा खाल्ली. पण चुलीत भाजलेल्या कणसावर तिखट मीठ
टाकुन, लिंबु पिळुन खाताना जी काय अफलातुन मजा येते ती मुळात या क़ॉर्नभेळलाही
फीकी पाडते. आणि हेही अनुभवांती बर का कारण प्रशस्त किचनट्रॉली, व्हेपर चिमणी काय
नि काय असलेल्या आमच्या किचनच्या मागे आम्ही झाडाखाली चुल मांडुन ओपन किचनही
मांडलय. तर कधी घरच्यांना चुलीवरची मटन भाकरी खायची इच्छा झालीच तर आमची रस्सा
पार्टी या किचनमध्ये जोरात रंगते. दिवाळी झाल्यावर रात्री आईसोबत चुलीसमोर शेकत
बसायचा अनुभव नामानिराळाच! त्याच चुलीत भुईमुगाच्या शेंगा,
रताळी, भरतासाठीच वांग, कणीस, कोवळा हरभरा भाजला जातो. आता यांची चव कशी लागत असेल
ते तोंडात आलेल पाणीच सांगेल नाही का? चुलीवरुन आठवलं..माझ्या
आजोळी कोंबडी खायची लहर आल्यावर आजीने पाळलेल्या गावठी कोंबड्यांना पकडायला आमची
शर्यत लागायची. परड्यातल्या बेटाजवळ ठरलेल्या दगडापाशी आजी कोंबडीला पाणी पाजायची
व विळ्याने कापायची तेव्हा मला ती त़डफडणारी कोंबडी पाहुन रडु यायच व खुप रागही
यायचा. अशावेळी आम्ही भांवंडं कापलेल्या कोंबडींच मुंडकं चुलीत भाजायचो व ते कोण
कोण खाणार यासाठी भांडणे पण व्हायचीत. आजही कोंबडी व मटन याशिवाय आमच्या घरात
पानही हालत नाही. मामाच्या घरी जत्रेला किंवा वाढदिवसासारखा कोणताही कार्यक्रम
असेल तर चार-पाच बकरी सहज खपतात. व्हेज-नॉनव्हेज या वादात न पडलेलंच बर. तो ज्याचा
त्याचा व्यक्तिगत आवडीचा प्रश्न आहे.
जग इतकं बदललं आहे की आई-वडील, बहीणी-भावंडं
तसेच इतर प्रेम आपुलकी व मायेच्या नात्यांगोत्यांपेक्षाही व्हेज व नॉनव्हेज हा आता
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. माझी एक मैत्रीण तिने तिच अख्ख आयुष्य
फक्त नि फक्त चिकनलाच वाहील आहे म्हणजे एक दिवस आड तरी तिला हा मेन्यु खायला
लागतोच. सांगायचा मुद्दा हा की ती व्हेजीटेरियन लोकांचा प्रचंड द्वेष करते. किती
हास्यास्पद आहे ना हे!!!
व्हेज म्हणजे गोडामध्ये दुधाच्या पदार्थांची फार चलती आहे. पनीर, बासुंदी,
खवा, चक्का, लस्सी इ. इ. तर कोल्हापुरातल्या महानगरपालिकेच्या थोडं पुढं एका
कॉर्नरवर सुप्रसिध्द मोहक लस्सी सेंटर आहे. तिथली भला मोठ्ठा ग्लास व त्यावर मलई
टाकलेली सुमधुर लस्सी पिल्यावर आत्मा तृप्त न झाला तर नवलच! तिथली तांबुस खरपुस तळलेला बटाटा, कुरकुरीत कढीपत्ता व खमंग भाजके भरडलेले शेंगदाणे
घातलेली खिचडी खाल्ली की वाटत रोजच उपवास धरावा अशी चवीष्ट लागते. ती खिचडी नि
शिवाजी विद्यापीठातल्या मोठ्या कॅंटीनमधली खिचडी आठवली की माझ्या तोंडाला पाणी
सुटत. त्या खिचडीसोबत पांढरी काकडी दह्यात कालवुन त्यात साखर-मीठ घालुन बनवलेली कोंशिबीर खाताना भन्नाट फिलींग यायच. विद्यापीठातल्या कॅंटीनमधला आणखी एक मला भावलेला मेन्यु म्हणजे शिरा-पोहे मिक्स! पायनॅपल इसेन्स व लवंग घातलेला तुपातला न्हवे तर तेलातला बर का तो पिवळाधमक शिरा व त्यासोबत गरमागरम पोहे हे एकत्र खाताना वाटायच प्लेट मधली ही शिरा-पोह्याची जोडी कधी वेगळी होऊच नये! आता लिहायला घेतलेला विषयही संपुच नये असं वाटतयं...पण कोणताही खायचा पदार्थ थोडा-थोडा व चवीने खाल्ला तरच पचतो नाही का? आणि तशीही शिरा पोहे मिक्स खायची चव आलीय..थांबलं पाहिजे...!
No comments:
Post a Comment