Wednesday, 9 May 2018

'पालवी' - एक लघुकथा.

    
पालवी

      शैलजा खाडे-पाटील.
     माणुस या दोन पायाच्या सस्तन प्राण्याला अफाट बुध्दीचं असं वरदान लाभलेलं आहे असं बोलतात. या बुध्दीच्या जोरावर तो सारासार प्रयत्न करुन त्याचं आयुष्य अधिकाधिक सोप्प करायचा उपद्व्याप करीत राहतो. काहीजण आयुष्यभर काही ना काही कमीच पडतं म्हणुन दिवसरात्र एक करुन पैसा नावाचं चलन खोऱ्यानं ओढत राहतात, तर कोणीतरी आहे त्यातच समाधानं मानुन आपलं कर्म करीत राहतो व गाठीला पैशांऐवजी चार माणसे जोडतो. माणसाला परमेश्वरानं एक वीत भर तर पोट दिलेल आहे आणि तो याच वीतभर पोटासाठी कितीही काबाडकष्ट करायला तयार राहतो.  
     अशाच माणसांपैकी असा एक नामदेव’,  एका टळटळीत दुपारी सोसायटीच्या बिल्डींगखाली २४ तास पहारा देण्यासाठी बसुन राहीलेला होता. त्याचा चेहराही फार लोकांचं लक्ष जाईल असा नक्कीच न्हवता. खुरटलेली दाढीचं ती काय त्याच्या व्यक्तीमत्वाची पक्की खुण होती. तशी ही दुपार त्याला थोडी अस्वस्थच करणारी होती कारण एकतर आजचा सुर्य हा रोजचा सुर्य नक्कीच नव्हता. वारुळातील एखादी मुंगीही सहज जळुन खाक होईल अशी आग तो ओकत होता. त्यालाही आता या माणुसनावाच्या प्राण्याने पृथ्वीतलावर चालविलेल्या विध्वंसाचा चांगलाच तिटकारा आला होता. म्हणुनच ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली माणुस जे-जे उपाय शोधत होता ते सगळे या तापत्या सुर्यापुढे शून्य बनत चालले होते. आणि दुसर त्याला अस्वस्थ करणारं कारण म्हणजे काल रात्री चालु झालेली त्याफ्लॅटमधील तिचीत्याचीभांडणं अगदी ऊनं वर येईतोवर चालुच होती. नेमक्या त्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या खालीच नाम्याची पहाराचौकी होती. त्यामुळे त्यालाही आता त्यादोघांच्या भांडणाच्या आवाजाची सवयच झाली होती. बहुदा रात्रीपासुन मस्त सुर्य डोक्यावर येईतोवर ती दोघं भांडुन भांडुन दमली असावीत आणि त्यांना जाम भुकही लागली असावी म्हणुनच दुपारच्या जेवणाचा ब्रेक त्यांनी घेतला असावा असा विचार नामदेवच्या मनात तरळुन गेला. तेवढ्यात त्याच्या डोळ्यांवर चकचकणारा प्रकाशझोत पडला त्यामुळे त्याने थोडे डोळे मिचकावुनच गेटकडे पाहिले तर तीच रोजची तिची नि त्याचीचंदेरी रंगाची शायनिंग चारचाकी जोरात धुरळा उडवत, डाव्या हाताला असणाऱ्या रुचिरारेस्टॉरंट च्या दिशेने गेली. मग नाम्याने अंदाज केलाच की साहेब चमचमीत पापलेटचच पार्सल आणायला गेले असणार. नाहीतर, तेंची ती मस्त लाली-पावडर थापलेली, अप्सरावानी कांती असलेली बायकु तिला असल्या सुरमई, पापलेट, ते चिकन ६५, खिमा पाव, असल्या वशाडाचा लय नाद! अगं यु नो आय एम गोईंग टु गिव्ह ए तर्री पार्टी टु आवर ऑल फ्रेंड्स!” असं काहीतरी ती नाईट वॉकला सोसायटीच्या खाली यायची तेव्हा नामदेवाच्या कानावर यायचा.  नेहमी असलीच पार्टी-बिर्टीची, रश्शाची, ते वीक एंड सेलिब्रेशनचं बोलणं नि मधनचं व़ॉव ग्रेट! कुल यार! ओ नो, रिअली...हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..! हा सगळा प्रकार मुद्दाम नाही पण त्याच्या कानावर पडायचा.
      नामदेवला पण सोसायटीतल्या अशा त्याच्या दृष्टीनं हायफाय असणाऱ्या लोकांना न्याहाळायला भारी आवडायचं आता तो तर छंदच बनुन गेला होता. आणि तसही त्याला काम ते काय लाईट-पाण्याची सोय लावुन गेटवर येणा-जाणाऱ्यांची नोंद ठेवल्यानंतर सगळा वेळ तर त्याचाच असायचा..दारिद्र्याने पोखरलेल्या संसाराला स्वतःच्या कष्टाने भरुन काढण्यासाठी तो कधी कधी सकाळी ते रात्री व रात्री ते पुन्हा सकाळी अशा दोन-दोन डुट्या करीत असे. या डुट्यांमध्ये त्याला एक नाद लागला होता..होय..नाद! ‘माणसं वाचण्याचा नाद’! त्या माणसांना आतुन-बाहेरुन न्याहाळुन त्याला त्यांच्या मनात काय-काय चालु आहे हे सहज ओळखता येत असे. सोसायटीतली लहान मुले, म्हातारी-कोतारी माणसे, तरणीताठी पोरं ही सगळी नाम्याच्या ह्या नादामुळे मनाने त्याच्या जवळ आली होती. त्यांच्यात व नाम्यामध्ये एक विश्वासाचनातं तयार झालेल होत. पण का कोण जाणे सोसायटीतले काही काही लोकं मात्र त्याला त्याच्या हुद्द्याप्रमाणेच वागणुक देत असत. रुचिरा रेस्टॉरंटकडे जाणाऱ्या कारचा मालकही अशा माणसांपैकी एक होता. त्याची न नाम्याची रोजच नजरानजर व्हायची पण तो साहेब माणुस त्याला अगदी तुच्छतेच्या नजरेनं पहात असे व कधी कधी गेट नीट उघडलं नाही म्हणुन चार शिव्याही हासडत असे. सोसायटीत असे बरेच लोकं होते की त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक इ.इ. मोठ्या हुद्द्याच्या पदव्या होत्या व महिन्याला लाखोंच्या घरात त्यांची कमाईही असावी. पण ह्यातील काही माणसे म्हणजे नाम्याला निर्जीव पुतळ्यांप्रमाणेच वाटायचीत कारण आलिशान फ्लॅट, चकचकीत गाड्या, स्टायलीश कपडे व पंचपक्वान्नाच रोजचं खाणंपिणं या सगळ्या सुखांचा उपभोग घेऊनही ही माणसे मनाने मात्र समाधानी नसतात. असं नाम्याच पक्क मत झाल होत. अशांपैकीच एका जोडप्याची तर रोज रात्री काहीना काही भांडणं चालु असायची. ही नाम्यासाठी तर नित्यनेमाची बाब झाली होती. त्या साहेब माणसाला पाहिल्यावर नाम्याला त्याची किव यायची व या सायबापेक्षा तर मीच सुखी आहे अस त्याला मनोमन वाटायच.
कारण, तो गाव सोडुन वॉचमनची नोकरी करायला शहरात आल्यावर त्याची बायको व मुलानेही त्याला मोलाची साथ दिली होती. त्याचा मुलगा बाहेरुन कॉलेज शिकत शिकत कुठल्यातरी दुकानात कामाला होता तर, त्याची बायको त्याच सोसायटीमध्ये धुण्या-भांड्यांची कामे करीत असे. एका छोट्या भाड्याच्या खोलीत त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. पण पोटाची खळगी भरतील एवढे पुरेसे भांडवल त्यांच्याकडे होते ते भांडवल म्हणजे त्यांचे धडधाकट हात-पाय! नाम्या अगदीच सामान्य असे जीवन जगत होता मात्र त्याला रोज रात्री सुखा-समाधानाची झोप लागायची. तो सोसायटीमध्ये घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या बायकोसोबत शेअर करीत असे. त्याची बायकोही त्याच सोसायटीत कामाला असल्यामुळे तिलाही काही घटनांची कारणे व त्यांचे होणारे परिणाम माहीत असायचेत. कुणी काही नवीन खरेदी केली, कुणीतरी आजारी आहे, शेजाऱ्यांमधल्या रुखरुखी, कोण आल-गेल याची माहितीही तिला असायची. पण या जोडप्याची एक चांगली सवय म्हणजे ते या गोष्टी सोसायटीतल्या अन्य कुणालाही न सांगता आपआपसांत शेअर करीत असत.
     त्यारात्रीची त्याची नि तिचीभांडणेही नाम्याने बायकोच्या कानावर घातली. तेव्हा त्याला अस कळलं की ती दोघंही मोठ्ठाल्या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या लग्नाला ४-५ वर्षे होऊनही अद्याप मुलाबाळाचा विचार ते करीत नाहीयत. साहेबाला मुल हवयं पण ते करिअर की काय म्हणतात त्याच्यासाठनं मॅडमला मुलाबाळाची बेडी नकोय...असं काहीतरी बायजाने म्हणजे नाम्याच्या बायकोने साहेब नि मॅडमच्या घरी कामाला असणाऱ्या दुसऱ्या कुठल्यातरी बायकांकडुन ऐकलेल नाम्याला सांगितल. अशा किती बायका कामावर हायत म्हणे त्यांच्यात? तर गंमत अशी एक महिन्याच्या वर त्यांच्याकडे कामवाल्या बायका टिकतच नाहीत. कारण म्हणे त्या मॅडमचा तिरसाट स्वभाव. सोसायटीतल्या शिकल्या सवरलेल्या बायका म्हणतात की त्या मॅडमला लय दांडगा इगोहाय! असं बरचं नि बरचं काय काय बायजाने नाम्याला गुप्त बातम्या दिल्या. तेव्हा कुठ त्याला जाऊन कळलं की आजकालच्या बाया-माणसांना आईव्हायसाठीपण चक्क मनवाव लागतय! या काळ्या गर्द विचारानं त्याला त्या साहेबाची तर दयाच आली. सोन्याच्या ताटात नि चांदीच्या वाटीत जेवणारा गडी बापव्हायसाठी झुरतोय, बायकोला मनवतोय! तरच गेट उघडण्यावरुन मालक एवढा नाम्याला का झापतोय याच कारणही नाम्याला कळलं व तो मनातल्या मनात पक्का हसलाही. कारण घरच्या खाजगी भांडणाचा राग साहेब कुणावर आणि कुठ काढल याचा काही नेम नाही हे त्याला कळुन चुकल.
     या गोष्टीवर खुप विचार केल्यावर नाम्यामधला माणुसकीने भारलेला माणुसजागा झाला. भलेही ती लय मोठ्ठी लोकं हायत आपल्या सावलीची पण त्यांच्यासमोर उभा रहायची लायकी न्हाय पण एकांद्याचा संसार सुखाचा होत असलं तर तेवढ पुण्य पदरात पडलं. काय बी करुन या जोडप्यातला तंटा कायमचा निकाली लावायचा असं त्याच्या मनान ठाणलं. अशा विचारात असतानातच नाम्याला एक पदर खोचलेली बाई त्याच्याच दिशेने येताना दिसली. त्याने ओळखले ही त्या सारख्या सारख्या भांडणाऱ्या जोडप्याच्या घरात काम करणारीच बाई होती. तिचा चेहऱा रागाने लालबुंद झाला होता..ती दातओठ खात मुठ्या आवळत चांगली तणतणत नाम्यासमोर येऊन ऊभा राहिली. कामाला एक मिनीट जरी टाईम झाला तर मॅडम लय बडबडतीया..भांड्याचा ह्यो मोठ्ठा रगाडा नि कपड्यांचा ह्यो मोठ्ठा ढीग असतुया..आणि सणावाराला बोनस काहीतरी मागितल तर त्याच्याऐवजी पाणऊतारा करीत असतीया ती बया..आता मी काय तिच्याकडं कामाला जाणार नायती कामवाली बाई जशी बोलली, तसा नाम्या बोलला..अहो मावशी आपण काबाडकष्ट करुन खाणारी माणसं अशा तिरसाट लोकांच बोलणं नसतं मनावर घ्यायच. एक काम करतो मी माझ्या बायकोलाच तिथ कामावर लावून देतो. माझी बायको म्हणजे दुधात इरघळणारी साखर हाय साखर..कसल्याबी बाईमाणसांना रितीभातीनं ताळ्यावर आणती किनी बघाच तुम्ही!” हे ऐकुन ती कामवाली बाई तिचे इंचभर बाहेर आलेले दात काढत, फिदी फिदी हसतच निघुन गेली. बहुदा तिला नाम्याच्या बायकोची पण तिच्यासारखीच गत होणार असा पक्का विश्वास वाटुन ती त्या टर उडवणाऱ्या लयीतच गेटकडे रवाना झाली. रात्री जेवताना नाम्याने त्याच्या बायकोला त्या भांडखोर जोडप्याच्याघरी  कामासाठी जाण्यासाठी विचारले असता त्याच्या बायकोनेही आढेवेढे न घेता ही गोष्ट कबुल केली. कारण कितीही झाल तरी त्या आईपणटाळणाऱ्या बाईला तिलाही जवळुन पहायच होत.
     सकाळी पहिल्या कामाला म्हणुन ती त्या मॅडमच्याघरी पोहोचली. दोन-तीन वेळा बेल वाजवल्यावर, एस एस आय विल डेफिनेटली सेंड यु दॅट कन्फर्मेशन लेटर..यु विल बी अल्सो गिव्ह दि ओनली वन रिमांयडर टु मी अबाऊट धिस ओके..यु नो ना आय एम टुssssबीझी टुSS डु धिस लिटल थिंग्स...वन मिनट हां आय विल कॉल यु बॅक..असे बोलत तिने नाम्याच्या बायकोकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतच फोन बंद केला. हु आर यु..? कोण तु?” मॅडमनी तिला विचारले. मी बायजा..आगुदरच्या बाईच्या बदल्यात आजपासनं मी तुमच्याकडं कामाला येणार हाय. तिला वाईच बरं नाही म्हणुन...ती पुढचं काही बोलायच्या आतच, मॅडमनी त्यांच्या हातातला मोबाईल सोप्यावर फेकत टीपॉय वरचा पेपर तोंडासमोर धरला. इट्स ओके. मला फालतु बडबड ऐकायची सवय नाहीय यु नो? काम सगळी करुन घे आज आणि हो पेमेंट पुर्वीचीला जेवढ मिळायच तेवढच तुलाही मिळेल अंडस्टॅंड? चल माझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग कॉफी बनव मग कामाच बघ तासाभरात सगळं उरकाव लागेल मलाही निघायचय ऑफिसलापेपरआडुन मॅडमच तोंड काही दिसत न्हवत पण हा धारदार आवाज मात्र बायजाच्या चांगलाच कानात घुमत होता. बायजाने कॉफीचा मग मॅडमच्या हातात दिला मॅडमनी पेपर न्याहाळतच तो तोंडाला लावला. अन..एकदम डोळे मिटले. वॉव यार, खुप दिवसांनी न्हवे महिन्यांनी मी असली स्ट्रॉंग नि टेस्टी कॉफी पिलीयअशी बेस्ट कॉंप्लीमेंट बायजाला पहिल्याच दिवशी मिळाली. कॉफी निम्मी अर्धी झाली असता मॅडमनी एकदम पेपर टाकला नि भारभार मशीन सारख्या घरभर पळु लागल्या म्हणजे अंघोळ पाणी, कपडे आवरुन त्या बायजासमोर आल्या तिला वॉशिंगमशीनच सगळ टेकनिक समजावुन सांगु लागल्या. ते सांगत असतानाच बायजा मॅडमना अगदी जवळुन न्याहाळु लागली. खांद्यापर्यंत कुरळे केस..घारे – निळे डोळे..कानात हिऱ्याचे दोन नाजुकसे खडे..चाफेकळीसारख नाक...अंगावर पॅंट-नि बिन बाह्याचा शर्ट..त्यालाच मॅचिंग लावलेली लिपस्टीक..आणि अंगाला येत असलेला कुठल्यातरी अत्तराचा वास..अस सगळं..जणु काही कॉलेजमधली सोळा सतरा वर्षांची कोवळी पोरचं ती जणु..! मॅडम आज तुम्ही एकदम झक्कास दिसतायासा बघाबायजा बोलली. हे बघ तुला मी आल्या आल्याच सांगितलय फालतु बडबड नको हे घे घराची किल्ली मी निघते.असे बोलुन मॅडम पाठमोऱ्य़ा झाल्या नि निघुनही गेल्या. एवढं मोठ्ठ घर नि किमती सामानाची त्यानला काय काळजी नसल का? तवा त्या माज्याकडं घराची किल्ली देऊन गेल्यात. दिसायला तर इंद्रदरबारातल्या रंभा,अप्सरांना बी लाजीवतील अशा हायत. वरती एवढ्या मोठ्या कंपनीत काम करत्यात. साहेब त्यांच्यावर किती प्रेम करीत असतील न्हाई. असच वाटतय पण त्यानला आईका व्हायच नसलं बर? खरच ह्या जगामधी अशी एखादी बाई असल का की तिला आई व्हायलाच नको वाटत आसल..असे बरेच नि बरेच विचार बायजाच्या मनात घोळत होते. त्या नादातच तिने घरातली सगळी कामं आवरुन ती दुसऱ्या कामांना निघुन गेली.
      दुपारच्या वेळेला नाम्याने बायजाला पहिल्या दिवशीचा वृतांत विचारला असता बायजाने सगळी बातमी नाम्याला दिली. व हळुहळु मॅडमच्या मनात घर करुन त्यांनला आई न होण्याच्या विचारातन बाहेर काढायचं अस दोघांनी निश्चित केल. दुसऱ्या दिवशी बायजा मॅडमकडे कामासाठी पोहोचली. बायजाने बनवलेल्या पहिल्या दिवशीच्या स्ट्रॉंग कॉफीची मॅडमना आता रोज चटकच लागली..त्या कॉफीसाठी तर त्या रोज आतुरतेने बायजाची वाट पाहु लागल्या. बाकी तिचं काम-बिमही त्यांना पसंत पडलं असावं. त्यांचा तो हेकेखोर नुर हळुहळु सौम्य आवाजात बदलु लागला..बायजाही त्यांच्या मुड्सच्या कलानेच सगळी कामं झट की पट करु लागली. महिन्याभरातच बायजाच व मॅडमच एक वेगळच असं नातं तयार झाल. कदाचित आपुलकीचं नातच असावं ते! बायजाला कळुन चुकलं की मॅडम तब्येतीला चांगल्या असणाऱ्या कारल्यासारख्याच हायत..कडु पण पोटात गेल्यावर सगळी दुखणी छु मंतर करणारे कारले..त्यांना वळकणं एवढं सोप्प न्हवतं. खुप म्हणजे खुप चढ-ऊतार पाहिलेल्या बाईंपैकीच त्या एक होत्या. पण हे पोरा-बाळाच त्यांच्या डोक्यात कसं घालायच त्यांच्या हेच काही केल्या बायजाला ऊमजत न्हवतं.
      एक दिवस बाल्कनीत बायजाच्या हातची कॉफी घेता घेता त्यांनी बायजालाही कॉफी देऊ केली. बायजानेही त्यांचा मुड बघुन, ही संधी आता सोडायची नाही अस मनात पक्क ठाणलं. मॅडमच्या बाल्कनीत मोगरा, जाई, मनीप्लॅंट, तुळस, सदाफुली, अशी बरीच नि शोची झाडं होती. पण एकच कुंडी माती असुनही रिकामीच बायजाला दिसली. तसं तिने मॅडमला याबाबत विचारले तेव्हा गेली ४-५ महिने त्या कुंडीमध्ये कुठलही रोपटं लावलं तर ते टिकतच नसल्याच आणि वाळुन जात असल्याच बायजाला कळलं. बायजा त्या दिवशी काहीच नाही बोलली. पण दुसऱ्या दिवशी- मॅडम मी काय म्हणते एखाद्याच्या हाताला बहर नसतोच मग ते रोज झाडाला खतपाणी घाला, काळजापल्याड जपा, पण एखाद्याच्या हाताला एवढा बहर असतो की वाळवंटात बी चार दाणं फेकल तर तिथ बी झाड ऊगवल. आहो खर हाय बर का हे! अशा भरल्या घरात असली रिकामी कुंडी ठेवणं चांगल न्हाय हो
बायजा आपली भित भित मॅडमना बोलली. कायतरीच गं तुझं! अडाण्या बायकांच्या अंधश्रध्दा आहेत गं या सगळ्या. त्या कुंडीतील मातीच खराब असणार म्हणजे त्यातुन नीट पाण्याचा निचरा वगैरे होत नसेल अस काहीतरी. मला तर त्या रिकाम्या कुंडीकडे पहायलाही वेळ नसतो गं! आता तुच बघ मस्त गेले ४-५ महिने त्या कुंडीत माझ्या नवऱ्याने ७-८  रोपं तरी लावुन पाहिलीत. पण त्यातल एकही जगलेलं नाहीय. कुणाला वेळ आहे गं  अशा फालतु गोष्टींकडे लक्ष द्यायला? ही तर माझ्या नवऱ्याची आवड आहे. बोलत असतो..निर्जीव वस्तुंपेक्षा सजीव वस्तुंमधला आनंद म्हणे त्याला घ्यायला आवडतो. एखाद्या जीवातुन दुसरा जीव तयार होणं आणि त्या दोघांतल नातं फुलत व फुलवत जाणं हा अनुभव बघायला किंवा घ्यायला शिकलं पाहिजे मग ते नात झाडाचं त्याच्या फुला-पानांशी असो नाहीतर माणसाच त्याच्या लेकराशी असो. असं काहीतरी ज्ञानाचे डोस तो वरचेवर मला पाजत असतो गं..मी ही त्याच्यासारखा विचार करीत बसले असले तर आज जे काही आलिशान घर, फर्निचर, मस्त मॉडर्न किचन, कोरी चारचाकी हे सगळं पहायलाच मिळाल नसतं बघ. माझ्या करिअरला वेळ दिला म्हणुन तर आज हे सुख माझ्या पायाशी आहे मॅडम गरमागरम कॉफिचे घुटके घेत घेत बोलल्या.
     हे ऐकताना बायजा मात्र मनातल्या मनात खुपच खुष झाली कारण तिला जो विषय इतके दिवस मॅडमसोबत बोलायचा होता त्याच विषयावर मॅडमच्या बोलण्याची गाडी आलेली होती. आता बायजाने डाव हातचा जावु द्यायचा नाही असं मनोमन ठाणलं, आणि धाडस करुन ती मॅडमना बोलली- हे बघा मॅडम तुमासनी राग आला तर इऊदे..पर साहेबांच म्हणणं तर मला पटतया. आता तुमाला एक टाईम नसतो या रिकाम्या कुंडीकडं बघाया पण साहेबांची इच्छा बघा, कितीदा त्यांनी त्या कुंडीत झाड जगुन,त्याला पालवी फुटुन, त्याच्यावर कळी उमलावी म्हणुन प्रयत्न केले किनी..एवढ्या मोठ्या पदावरचा गडीमाणुस त्यो तेची इच्छा ती केवढी..फकस्त झाड जगावं नि ते चांगल फळा-फुलांनी बहरावं एव्हढच. मॅडम कुणीतरी कुणाच्यातरी रक्तामासातनं जन्माला आलं..उमललं म्हणुनच हे समदं जग चाललय न्हवं? आता तुमी मिनीटभर इचार करुन बघा की जगातल्या कुठल्याच झाडाला नवी पालवीच फुटली नसती, त्याला कळ्या-फुलं-फळं अस काय बी उगवल नसतं तर हे समदं जग वाळवंट बनल नसत का? मग तर तुमी, मी आपणं कोणचं नसतो. बराबर किनी? आओ जसं झाडांच तसच माणसांच नाही का? माणसाची जिंदगी बी वाळवंटच बनल जवा तेच्या जिंदगीत नवीन नात्याची पालवी फुटणार न्हाय! म्हणजे संसाराच्या वेलीला एक तरी कळी येऊन ती फुलली पाहिजेच. बरं ती कळी येऊ द्यायची इच्छा तरी मनात आणावी किनी माणसानं तरच तेची जिंदगी सफल हुतीया बघा. आई होणंम्हणजे बाईच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखच हाय. हे तुमी समजुन घेतल पायजे...यातला आनंद एकीकडं आणि जगातली समदी सुखं एकीकडं अस गणित हुतया मग. मग या अशा रिकाम्या कुंडीत नि आपल्यात काय फरक राहिला सांगा बरं? मस्त सुखं लोळण घेत्यात एकेकाच्या संसारात पण ज्यांच्या संसाराच्या रोपट्याला कधी पालवीच फुटत नाही त्यांना इचारा की त्यांच हे दुखणं म्हणजे या रिकाम्या कुंडीगतच असतया. मग अशी दुखऱ्या मनाची बाया माणसं..दुसऱ्यांच्या फुललेल्या कळ्या-फुलांवर भरभरुन प्रेम कराया लागत्यात...आणि..
 यु स्टॉप धीस नॉनसेन्स प्लीज स्टॉप. गेट आऊट..लिव्ह मी अलोन. बावळट बाई चल निघ हीथुन. तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलायची? तुझ्यासारख्या बायकांना मी चांगलच ओळखते कुणाच्यातरी भावनांना हात घालायचा नि ते सगळं जगभर चघळत रहायच. यु गेट आऊट्ट!” मॅडम रागाने लालबुंद झाल्या होत्या..बायजाचं बोलणं मध्येच तोडन तिला त्यांनी निघुन जायला सांगितल. आणि रागाच्या भरात त्यांनी ती रिकामी मातीची कुंडी जोरात जमिनीवर फेकली तशी कुंडीचे तुकडे होऊन कुंडीतली माती सगळ्या बाल्कनीभर झाली. हे पाहुन बायजाचा चेहरा काळाठीक्कर पडला. व तिने डोळे पुसत घरातुन काढता पाय घेतला.
      मॅडम बराच वेळ बाल्कनीत बाकीच्या झाडांकडे एकटक पाहत उभ्या राहिल्या. आज ऑफिसलाही येणार नसल्याच कळवुन टाकलं. सगळीकडे एक वेगळीच पण घुसमटलेली शांतता पसरली होती. खरंतरं बायजा जे काही बोलली होती त्यातला शब्द नि शब्द त्यांच्या कानात घुमत होता. नुसता शब्दच नाही तर त्यातला खोलवर दडलेला अर्थही मॅडमना मनातुन अस्वस्थ करीत होता. दिवस कसा मावळला ते कळलच नाही. डोकं चांगलच ठणठणत होतं. तेवढ्यात बेल वाजली. साहेब ड्युटीवरुन आले होते. मॅडमचा चेहरा पाहुन नेहमीप्रमाणे ते काहीच न बोलता फ्रेश होऊन त्यांनी दोघांसाठी कॉफी बनवली. एकंदरीतच मुड ऑफ असल्याच त्यांना कळलं होत. त्यांच लक्ष बाल्कनीतल्या त्या रिकाम्या फुटलेल्या कुंडीकडे गेलं. ते पाहुन त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत सगळे तुकडे व माती साफ केली. ते करीत असतानाच आपलाही संसार या फुटक्या कुंडीसारखाच झाल्याच त्यांना वाटल. थोडा वेळ असाच गेला निःशब्द...! फक्त एका वाक्यातच आज रात्री डीनरला बाहेर जाऊयात अस त्यांनी मॅडमना सुचित केल. काहीही न बोलता मॅडमनेही होकाराची मान हालवली. इकडे नाम्याला बायजाने मॅडमसोबत घडलेला सगळा वृत्तांत सांगितला व परत कामावर जाणार नसल्याच सांगितलं. आता मात्र नाम्या चांगलाच ढवळुन निघाला याच विचारात असताना मॅडम नि साहेब कारमधुन जाताना त्यानं गेट उघडलं व त्याला आता आशा वाटु लागली की बायजाच्या बोलण्यानं मोहरीभर तर फरक पडला आसलच की मॅडमच्या इचारात. नाहीतर आज बऱ्याच दिवसांनी तो त्यादोघांना एकत्र जाताना पाहत होता.
     इकडे डीनर करतानाही साहेब व मॅडमच्या मध्ये ऑर्डरच जुजबी बोलण झालं. ते घरी येईतोवर साहेब अंदाजच बांधत होते की नेमकं काय घडलं असावं? बर डायरेक्ट विचारावं तर परत त्याच त्याच भांडणाची भिती की जी ४-४ दिवस मिटण्याच नाव घ्यायची नाहीत. त्यापेक्षा स्वतः बोलेल तेव्हा बोलेलम्हणुन साहेब मॅडमशी जास्त काही बोलणंही टाळत होते. रात्री झोपतेवेळी ते ऑफिसचे महत्वाचे मेल्स चेक करीत असताना...अचानक मोठ्ठा रडण्याचा हुंदका त्यांच्या कानावर पडला. त्यांनी पाहिल तर मॅडम ओक्साबोक्शी रडत होत्या. तोच मॅडम एखाद्या निरागस बाळासारख्या त्यांच्या कुशीत विसावल्या व आता मात्र त्यांच्या भावना अनावर झाल्या व अश्रुंचा अभिषेकच जणु त्या साहेबांना घालत होत्या. सॉरी....आजपर्यंतच्या माझ्या निर्णयाचे परिणाम तुला भोगायला लागले..त्या रिकाम्या कुंडीत इवलुस रोपट जगवण्याची तुझी धडपड मला कळायला हवी होती रे...आपण उद्याच गायनॅक कडे जाऊ..मॅडम हुंदके आवरतच बोलल्या. हे ऐकुन साहेबांच्याही डोळ्यांत आसवांचा पाझर फुटला. आज कित्येक वर्षांनी त्यांच्या मनात पिटुकल्या पावलांच्या आशेची पालवी फुटली होती...
नाहीतर माणुस आशेवरच जगत आलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाम्याने दोघांनाही गाडीतुन जाताना पाहिले. दोघांचेही चेहरे आनंद व एका वेगळ्याच ओढीने भारलेले त्याला दिसले. दुपारी बायजा व नाम्या जेवण आटपुन दोघेही निवांत टेकले होते. तेवढ्यात साहेबांची गाडी आली. नाम्याने नेहमीप्रमाणे गेट उघडले..गाडी पार्क करताना नाम्या व बायजा दोघेही गाडीकडे रोखुन पाहत होते. तेवढ्यात मॅडम गाडीतुन खाली उतरल्या आणि....त्यांच्या हातात एक नवी कोरी अशी बहुतेक गुलाबाच रोपट असलेली कुंडी होती विशेष म्हणजे त्या रोपट्याला लालसर-तांबुस अशी नाजुक इवलुशी पालवी फुटलेली होती. ते पालवीफुटलेल गुलाबाच रोपट दिसताच बायजा व  नाम्या एकमेकांकडे समाधानी व आनंदी नजरेने पाहतच राहिले...आणि दोघांचेही डोळे आनंदाश्रुंनी डबडबले..

                    पालवी-एक लघुकथा.
              लेखिका- शैलजा खाडे-पाटील.



1 comment: