Saturday, 26 May 2018

'बाबा'...एक आंतरिक ओढ!

बाबा...
                                                             शैलजा खाडे-पाटील.

     
     तशी ती संध्याकाळही रोजचीच संध्याकाळहोती. फार काही विशेष घडलं न्हवत. फक्त पावसाची एक सर नुकतीच येऊन गेली होती कारण तो मे महिन्यातल्या आम्रसरींचा मोसम होता. पावसानंतर आभाळ एकदम लख्ख झालं होत. तापल्या भूमीची तृष्णा भागवुन पाऊस तर निघुन गेलेला होता पण, धरणीला पुन्हा पुन्हा त्याचीच ओढ लागलेली होती. जसं हे पावसाच व धरेच नातं, तसच मानवी नात्यांमधल्या मनालाही कुणाची ना कुणाची ओढ लागलेली असते. मग ते नात प्रियकर-प्रेयसीच असो, आई-मुलाच असो, नवरा-बायकोच असो, मित्रत्वाच असो नाहीतर...नाहीतर...? फक्त उदरात वाढवुन त्याला जन्म न दिल्यामुळे नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या त्या बापआणि लेकाच असो! ओढ ही दोन्ही बाजूंनी राहिली आणि ती सुध्दा शुध्द अंतःकरणातुन असेल तरच त्या नात्यामधल्या प्रेमाला, मायेला, आपुलकीला, काळजीला अर्थ असतो.
      पाऊस पडुन गेल्यावर निसर्गाची मरगळ तर निघुन जाते तो पल्लवीत होतो. पण माणसाच्या बाबतीत अस घडतच अस नाही. असाच पाऊस पडुन गेल्यानंतर... पिकलेल्या पापण्यांखालच्या सुरुकुतलेल्या डोळ्यांवरचा धुरकट असा जडशीर चश्मा थरथरत्या हाताने बाबाने काढला. तो रुमालाने पुसला, व पुन्हा डोळ्यांवर चढवुन पावसानंतरच्या कुठे कुठे लख्ख पांढऱ्याशुभ्र व मध्येच सांजवातीकडे कललेल्या अशा पिवळसर तांबुस आभाळाकडे तो पाहु लागला. तशी त्याने त्याच्या आय़ुष्यात अशी खुप आभाळं पाहिली होती. सुरुवातीला अर्धांगिनीच्या साथीने, व नंतर मुलाच्या साथीने. आता त्याला असच आभाळ त्याच्या एकुलत्या एक नातवाच्या साथीने पहायची इच्छा उरली होती पण, ती काही केल्या पुर्ण होत न्हवती. स्वतःच्या रक्तामासाच्या जीवाला..मुलालाच पाहुन त्याला कित्येक वर्षे लोटली होती. आता फक्त ओळख उरली होती ती लेकाच्या आवाजाचीच..तोही आवाज एखाद-दुसऱ्या फोनवरुन ४-५ महिन्यांतुन एकदाच त्याच्या कानावर पडायचा. नातवाला पहाव, भेटावं अशी मनोमन इच्छा असुनही बाबा काहीच करु शकत न्हवता. ६ वर्षांपुर्वीच अमेरिकेत जन्मलेल्या त्याच्या  नातवाला पहायला जायच म्हणुन बाबाने पासपोर्ट, व्हीसाची सगळी तयारी केली पण...सुनबाईं व लेकाने थोड्या दिवसांत आम्हीच तिकडे येतो असे सांगुन बाबा अमेरिकेला न जाता आपल्या घरातच  राहिला. जिथं दुधाचं भांडचं रितं असेल तिथं त्या दुधावरच्या साय़ीची अपेक्षा तरी काय करणार?  आम्हीच येतो..तुम्ही नका येऊ हे गेली कित्येक वर्षे ऐकुन, ऐकुन  त्याला आता एकटेपणाखायला ऊठु लागला. हळुहळु बाबाला आता एकटेपणाची सवयच झाली होती..घरातील शांतता आणि तो रोज बागेत ज्या बाकड्यावर बसत असे ते बाकडे हेच काय ते त्याचे सखे सोबती असायचे.

     आजोबा..एक मोगऱ्याचा गजरा घ्या की फक्त १० रुपयेला एक आहे..घ्या ..या आवाजाने बाबाची आभाळाकडे एकटक पहायची तंद्री भंगली. पाहतो तो समोर एक ९-१० वर्षांचा सावळासा मुलगा उभा होता. त्याच्या हातामध्ये पांढऱ्याशुभ्र व सुवासिक अशा मोगऱ्याच्या फुलांचे गजरे आणि लाल-गुलाबी-पिवळी-पांढरी अशी विविध रंगांची सुंदर व मोहक अशी फुले होती. तेल-कंगवा नसलेले विस्कटलेले डोक्याचे केस..खोलवर गेलेले बारीक डोळे..कोरडे पडलेले ओठ..हाता-पायाची झालेली काडी.. अर्धी मुर्धी मळकटलेली, खिसा फाटलेली चड्डी व तांबुस किंवा आधी तो पांढरा असावा व नंतर त्यावर मळाच किटान चढुन मग तो तांबुस झाला असावा असा फाटक्या कॉलरचा आणि तुटक्या बटणाचा शर्ट घातलेला तो मुलगा बाबाला मोगऱ्याचा गजरा विकत घेण्यासाठी मनवत होता. अरे, बाळ मी हा गजरा घेऊन काय करु? नकोय बाबा मला जा तुबाबा त्या मुलाला समजुतीच्या सुरात बोलला.अहो, आजोबा, ह्यो मोगऱ्याचा गजरा घ्या नि आज्जीला द्या तिला आज तुम्ही बागेत नाही ना आणलसा फिरायला मग घरी गेल्यावर ह्यो गजरा तिला केसांत घालायला द्या ती लय खुष होईल बगा.तो मुलगा मोठ्या आशेने बाबाला बोलला. अरे वेड्या ते आभाळ पाहिलस? आज्जी तर त्या आभाळात केव्हांची लपुन बसलीय..मला रोज पाहते ती..कुणाला देऊ रे गजरा मी?  जा बाळ तु.” बाबा आभाळाकडे पाणावलेल्या नजरेने पाहतच त्या मुलाला  बोलला. बाबाचे हे बोल ऐकुन गजरे विकणाऱ्या त्या पोराला काय कळायच ते कळल आणि मान खाली घालुन नाराज मनाने तो पुढे चालु लागला.

      आधीच बोट-बोटभर खोल गेलेले डोळे त्यात भर म्हणजे त्याचा तो पडलेला, निराश चेहरा   पाहुन बाबाच्या मनात एक वेगळीच कालवाकालव झाली. त्याने त्याला आवाज दिला व मोठ्या आनंदाने त्याच्याकडुन गजरा विकत घेतला. त्या मुलाने दहाची नोट खिशात घातली नि जाम खुषीत येऊन उंच उड्या मारतच तो पुढच्या विक्रीला निघुन गेला. बाबा त्या पाठमोऱ्या पोराकडे पाहत राहिला व त्याच मन समाधानाने भरुन गेलं. त्यानंतर बाबा बराच वेळ त्या मोहक गजऱ्याकडे पाहत राहिला. त्या गजऱ्यातील फुलांच्या प्रत्येक पाकळी-पाकळीत त्याला तिचा चेहरा दिसु लागला. कित्येक वेळेला आपल्या अर्धांगिनीच्या सुखद आठवणींमध्ये बाबा रमुन जायचा. पण वेळेच्या व नशिबाच्या पुढे कुणाच काहीच चालत नाही. नियतीनं आयुष्याच्या जोडीदाराला अकालीच हिरावुन नेल. त्याला तो तरी काय करणार?  ‘तीहोती तेव्हा घराला घरपणं होतं. घरातल्या प्रत्येक वस्तुं-वस्तुंमध्ये जीवहोता. खरतरं, आयुष्याच्या सांजवेळीच बायकोची म्हणजेच जीवनाच्या जोडीदाराची खरी गरज असते हे बऱ्याच पुरुषांना फार वेळानं कळतं. तस बाबा ने हे वास्तव स्वीकारलं होत म्हणा!  कारण त्याने तिला नेहमीच भरभरुन प्रेम दिलं होत. पण जसा हीकडे मुलगा अमेरिकेत मोठ्ठाल्या कंपनीत रुजु झाला तसा तिने जीव झुरणीला टाकला. वारंवार आजारपणातुन ती ऊठुच शकली नाही व शेवटी पोटच्या गोळ्याची भेट न होताच तिच्या आयुष्याचा दिवा मालवला. त्या धक्क्यातुन बाबानं कसबसं स्वःताला सावरलं होतं. तसा बाबा मनाने कणखर होता.

     पावसानंतरचा मंद वाहणारा गार वारा बाबाच्या मनालाही थंडावा देत होता. अशा  हेलावणाऱ्या वाऱ्याने बाबाच्या अंगावर २-४ झाडाची पाने पडलीत आणि इतका वेळ नेहमीच्या बाकड्यावर बागेत बसलेला बाबा आठवणींच्या वळणावरुन पुन्हा आपल्या रोजच्याच मार्गाला आला. कधी काळी घेतलेली चप्पल बाबाने पायात सरकवली..तशी रोजची बायका-मुलांची-नातवांची धावपळ असती तर त्यांच्या गोतावळ्यात धावता धावता चप्पल तर कधीच झिजुन गेली असती. पण हीथे तर सगळा पोकळ पसाराच होता. त्यामुळे चपलापासुन ते चश्मा, पैशांच पाकिट, मनगटी घड्याळ अशा कित्येक छोट्या-मोठ्या गोष्टी बाबा कित्येक वर्षे वापरत आला होता. हळुहळु सुर्य कलला तसा बाबा सावकाश पावले टाकत घराच्या दिशेने निघाला. आता तर रस्त्याच्या खाचखळग्यांचा अंदाजही घ्यायची त्याला गरज न्हवती कारण डोळे मिटुनही तो त्या रस्त्याने घरी जाऊ शकत होता एवढा तो रस्ताही त्याचा सखा बनला होता.
     तशी त्याला घाई करायची गरजच न्हवती कारण घरी कुणीतरी वाट पाहणारं असतं तेव्हा माणुस वेड्या आशेन..ओढीनं..आपल्या पिलांना बिलगण्यासाठी..वगैरे घरी जायची
घाई करीत असतो. पण बाबाच्या बाबतीत यांपैकी कुठलीच गोष्ट घडणार नसल्याने तो अगदी निवांत मनाने चालला होता. एव्हाना बाबा आणि त्याचा एकटेपणा आजुबाजूच्या लोकांना चांगलाच परिचित झाला होता. त्यामुळेच, बागेतुन घरी जाताना कोपऱ्यावरची भाजीवाली, इस्त्रीवाला, दुकानदार, सलुनवाला असे बरेच नि बरेच रोजच्याच गरजेचे लोक बाबाला आवर्जुन बोलवत असत.
      बाबा आपला सगळ्यांशी काय?  कस काय? वगैरेचा संवाद साधत हळुहळु नेहमीच्या दादु चहावाल्याच्या टपरीवर येऊन थांबला. अरे दादु आज थोडीशी साखर टाकच चहात. तोंडाला थोडा गोडवा येऊदे रेदादुच्या टपरीवरच्या खुर्चीवरची धुळ झटकत, त्यावर बसतच बाबा दादुला बोलला. अरे बाबा आसल काय सांगु नगो मला. उद्या तुझी साखर वाढली नि दवाखाना लागला की माझ्या नावानं सगळी बोंबा मारत्याल...असे बोलत बाबाकडे पाहत दादुने रोजच्याप्रमाणे विनासाखरेचा मस्त वेलची, आले टाकलेला स्पेशल दुधाचा कटिंग चहा बाबाला देऊ केला पण त्याला काय वाटले कुणास ठाऊक पुन्हा हसत हसतच त्याने त्या चहात वरुनच दोन चिमटी साखर टाकली. हे बाबाने पाहिले. अरे दादु रक्ताच्या माणसांनी दूर केल्याने या शरीरात साखर वाढुन नको तेवढा गोडवा आलाय आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या आयुष्यात गोडवा नसतानाही तुझ्यासारख्या पावलोपावली जोडलेल्या माणसांच्या प्रेमाने माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने गोडवा टिकुन आहे.. म्हणुनच तु उगाच नाही दोन चिमटी का होईना वरुन चहात साखर टाकली, कळलं?” असे दादुला बोलतच बाबाने चहाचा घुटका घेतला. एरवी चहा प्यायला असा कितीसा वेळ लागतो माणसाला?  २-४ मिनीटं पण बाबा मात्र कटिंग चहा घ्यायला १०-१५ मिनीटं सहज लावायचा. सहज म्हणण्यापेक्षा मुद्दामच कारण बाबाकडे तर वेळेचंन संपणार गाठोडच होत तो टपरीवर येणाऱ्या प्रत्येकासोबत पाऊस पाण्याच्या गप्पा मारतच चहा घेत असे. सुर्य पुर्ण डुबला...दिवेलागणीची वेळ झाली..तसा बाबा दादुचा निरोप घेऊन चालता झाला.

     घरी आल्यावर बाबाने त्या पोराकडुन विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा देवघरातल्या देवीला वाहिला. दिवा लावुन त्याने डाळ-भाताचा कुकर चढवला. कामाच्या बाबतीत बाबा थोडातरी स्वावलंबी होताच. तीगेली तशा कुकर लावण्यापासुन छोट्या रोट्या बनविणे ते चहापाणी, कपडे, भांडी अशा छोट्या-मोठ्या गोष्टी बाबाच करीत असे. तस बाबाच घर मोठ व प्रशस्त होतं देवघर, बैठकीची खोली, किचन, दोन बेडरुम्स, छोटसं अंगण, त्या अंगणात बाबाने फुलवलेली फुलझाडांची व फळझाडांची बाग वगैरे..सरकारी वरिष्ठ लिपिक म्हणुन बाबा निवृत्त झाला होता. आजवर त्याने त्याची कामावरची सेवा चोख व प्रामाणिकपणे बजावली होती. मुलगा, सुन, नातू यांना काही कमी पडु नये म्हणुनच बाबाने स्वतःच्या प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कष्टातुन आर्थिक बाबतीत मोठी तजवीज करुन ठेवली होती. पण निळाशार, शांत, कधी उसळता व रुपेरी वाळुंच्या किनाऱ्याचा समुद्र कसा लोभस व मनमोहक वाटतो पण त्याच पाणी मात्र माणसाची तहान भागवु शकत नाही तसच काहीतरी बाबाने साठवुन ठेवलेल्या पैसा, सुबत्ता व संपत्तीच झाल होत. बाबाकडे तर सगळं सगळं होत पण त्याचा उपभोग करुन घेणारी जीवाभावाची माणसेच त्याच्यापाशी न्हवती.

     कुकरची तिसरी शिट्टी होते तोवर दारावरची बेल वाजली. बाबाने दार उघडले तोच अरे दोस्ता कधी आलास तु? अरे ओवीने आज सुंदर तलावाकडे फिरायला जायचा हट्ट धरला मग त्या पिटुकलीला तिकडेच घेऊन गेलो रे आज. त्यामुळे नाही येता आल मला बागेत..आणि आता ती परत मुंबईला जाईतोवर जमणारच नाहीय..बाबाचे शेजारी थत्ते आजोबा बोलले ते आज खुपच खुशीत होते. खुप नशीबवान आहेस तु रे..नातीसोबत चांगला रमतोसअसे बोलत बाबाच्या व त्यांच्या नेहमीच्या पुर्वीच्या ऑफिसातल्या, कॉलेजातल्या वगैरे गप्पा सुरु झाल्या. गप्पा मारतानाच मासे पकडायचा विषय निघाला आणि बाबाला मात्र आज सुरमई खायचा मोह झाला. डाळ भाताचा बेत उद्यावर ढकलुन लगेच बाबाने नाक्यावरच्या हॉटेलातुन खमंग सुरमई पार्सल मागवली. थत्ते आजोबांच्या मैत्रीमुळे बाबाला स्वतःच्या एकटेपणाचा विसर पडत असे.
      दोघेही चांगलेच रंगात आले...सुरमईच्या पहिल्याच घासाला बाबाला तीची आठवण झाली. कारण बायकोच्या हातची खमंग सुरमई ही बाबाची सगळ्यात आवडती डीश होती. तुला सांगतो मित्रा आमची हीअश्शी चवदार सुरमई बनवायची ना की खाताना स्वर्गसुख मिळायच रे..असे बोलत बाबाने एक मोठ्ठा आवंढा गिळला. तोवर त्याला जोराचा ठसका लागला. थत्त्यांनी त्याला पाणी दिले. बाबाने घेतलेला हातचा घास कधीच गळुन पडला. बसल्या जागीच बाबाच्या थकलेल्या डोळ्यांतुन घळघळ पाणी वाहु लागले..नंतर तो अक्षरशः लहान पोरासारखा रडु लागला. ते पाहुन थत्ते आजोबाही थिजले व त्यांचेही डोळे भरुन आले.           
     अरे मित्रा जाऊदे ना अशी किती वर्षे तु आठवणींच्या जंजाळात गुंतवुन स्वतःला त्रास करुन घेणार आहेस? हे जग किती सुंदर आहे बघ तरी.. तु प्रयत्न करतोसच ना रे या एकटेपणातुन मोकळेपणाने जगायचा...प्रत्येकालाच हवं ते हवं तस मिळालं असतं तर सुखाची किंमत कुणालाच कळली नसती. जे नशीबाचे भोग आहेत ते भोगावेच लागतात. या जगात कुणीच अमृत पिऊन आलेला नाहीय..म्हातारपणाचा शाप प्रत्येकालाच आहे पण नियतीचा हा शाप आपण वरदान कसा बनवायचा ते आपल्याच हातात आहे. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. प्लीज आटप जेव लवकरथत्ते आजोबांचे हे शब्द आता कित्येक वर्षे बाबाला चांगलेच तोंडपाठ झाले होते. तरीही बाबाला हे ऐकुन थोड बरं वाटल व जेवणं आटपुन दोघेही शतपावली करायला बाहेर पडले.
     त्या संध्याकाळी पावसाची सर येऊन गेल्यामुळे, हवेत बोचरा असा गारवा पसरलेला होता. त्या गारव्यात बाबा आणि थत्ते आजोबा दोघेही हळुहळु शतपावली करीत नाक्यावर आले.
     नाक्याचा रस्ता हा एका जुनाट पुलाखालुन जात असे. दोघेही घरी जाण्यासाठी पुलाखालुन वळले तोच मोगऱ्याच्या मंद, सुवासिक व मोहक वासाने बाबाची पावले आपोआप थिजली. चश्मा नीट पुसुन पाहतो तो पुलाखालच्या डाव्या कोपऱ्यात एक ९-१० वर्षांचा मुलगा फुलांचे गजरे विणत बसला होता. एवढ्या अंधुकशा प्रकाशात बारीक सुईने मोगरा-अबोलीचे गजरे तो मुलगा मोठ्या कसबीने व भरभर विणत होता. बाबाला राहावलेच नाही. तो सावकाश त्या मुलापाशी गेला व त्याला जवळुन न्याहाळुन पाहिले तर मघा सायंकाळी बागेत, ज्या मुलाकडुन बाबाने मोगऱ्याचा गजरा घेतला होता, तो तोच मुलगा होता. त्याचा अवतार खुपच गबाळा असला तरी त्या अंधाऱ्या रात्रीच्या अंधुकशा प्रकाशातही त्याच्या चेहऱ्यावरचे एक विशिष्ट तेज बाबाच्या नजरेआड लपले नाही.अरे, तु मघाशी बागेत मला गजरा विकत घ्यायला भाग पाडल तोच ना रे तु?” बाबाने खात्रीशीर सुरातच त्याला विचारले. तसे इतका वेळ तल्लीन होऊन गजरे विणणाऱ्या त्या मुलाने वर पाहिले. अरे, आजोबा व्हय मीच त्यो. मघा तुम्हाला गजरा इकलेला..आता उद्याच्या धंद्याची तयारी करतोय..जरा टायमाने रातच्याला ह्या फुलांचे गजरे, हार, माळा तयार केल्या की दुसऱ्या दिशी लय काळ टिकत्याल बघामुलगा हलकेच स्मितहास्य करीत बोलला.

       अरे बाळ, इतक्या रात्री अशा बोचऱ्या थंडीत बसण्यापेक्षा तुझ्या घरी जाऊन का हे काम करीत नाहीस? तुझे आई-वडिल कुठे बाहेर कामाला गेलेत का?” इतका वेळ बाबा आणि त्या मुलाचा संवाद ऐकलेल्या थत्ते आजोबांनी मात्र आता न राहवुन त्या मुलाला विचारले.  आई-वडिल? कशे असत्यात ते? कशे दिसत्यात? ते तर म्या कधीबी पायले न्हाय..जसा माणुस कसा आसतो त्याला पोटाला खायाला लागत..रहायला..निजायला निवारा लागतो..कापडं लागत्यात आणि त्यासाटनं हरी पत्ती लागती एवढं कळाया लागलं तसा म्या बहुढंगी कामं करीत आलोय..पयला म्हंमईला हुतो एका दाढीवाल्या बरोबर. त्यो दाढीवाला बेक्कार माणुस हुता. बेकरीत, भट्टीत, काचच्या कारखान्यात, समुद्रातल्या खाडीत, जमिनीखालच्या नाल्यात असलेली लय बेक्कार आणि जीव जाईल अशी कामं मला कराया लावायचा त्यो......चिमणीएवढं तोंड करुन तो मुलगा मोठ्या नाराजीच्या सुरात त्याची कहाणी सांगत होता. तेवढ्यात....“म्हणजे तुझं या जगात कुणीच नाहीय म्हण. बिच्चारा!” थत्ते आजोबा त्या मुलाच बोलणं मध्येच थांबवत बोलले. व्हय मला कुणी नाही. म्हंमईतल्या त्या दाढीवाल्याचा डोळा चुकवुन लांबड्या आगीनगाडीत चढलो ते ह्या मोठ्या ठिकाणला उतरलो. हीथ म्या भली, बुरी माणसं पाह्यली. त्यातल्या भल्या माणसांनीच मला ह्यो पोट भरायचा रस्ता दावला.डबडबलेल्या चिमुकल्या डोळ्यांतुन आसवे गालावरुन टपकायच्या आतच त्या मुलाने पटकन ती आसवे आवरलीत.
     तु येतोस का रे माझ्या घरी?  माझीही अवस्था तुझ्यासारखीच आहे बघ. फक्त थोडा फरक आहे माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही व तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाहीय. बाबाच घर कुठाय विचार कुणीही सांगेल तुला.”  बाबा एकदमच भावनाविवश होऊन बोलुन गेला. तुमच्या घरी नि मी? न्हाय न्हाय ते कस हुईल? आजपातुर मला आसं कुणी इचारल न्हाई. तरी बी बगतो.मुलगा डोकं खाजवतच बाबाला बोलला व तो पुन्हा त्याच्या गजरे विणायच्या कामात मग्न होऊन गेला.. आणि बाबा व थत्ते आजोबा घरच्या दिशेने चालु लागले...
    तशी बागेत उमललेली टवटवीत अशी रंगीबेरंगी सुवासिक फुलं तोडायला बाबाला मुळीच आवडायच नाही पण देवाला वहायला एखादच फूल बाबा त्या फुलझाडाची माफी मागुन तोडत असे. सकाळी नेहमीप्रमाणे बाबा देवपुजा करायला बसला नि काल संध्याकाळी देवीला वाहिलेला तो मोगऱ्याचा गजरा त्याने काढला. काल तर कित्ती सुंदर नि आज पार रया गेलेला कोमेजलेलां, सुकलेलां, काळवंडलेलां तो गजरा बाबाने पाहिला व त्याला त्या बागेत भेटलेल्या, गजरे विणणाऱ्या पोराची आठवण झाली. या कोमजलेल्या गजऱ्यातल्या फुलासारखचं त्या बापड्या पोराच आयुष्य बनलय.. ह्यातली ही फूलं शेवटी कचऱ्यातच जाणार...नाही...नाही...असं होता कामा नये. ह्या कोमेजलेल्या फुलांचा काहीतरी चांगला उपयोग व्हायला हवाय...असा विचार करुन बाबा उठला आणि बागेत जाऊन तो गजरा खताच्या पेटीत टाकला. हां आत्ता ती कोमेजलेली फूलं खतात व मातीत मिसळुन पुन्हा बागेतल्या इतर फुलझाडांना, फळझाडांना नव्याने फुलायला, नवीन बहर आणायला, जगायला मदत करतील. ह्या विचारातच बाबा घरात आला देवपुजा आटोपली..पण बाबाला कससच वाटत होतं एकदम रितं..रितं...
     वाचण्यासाठी  पेपर न घेताच खुर्चीवर तसाच रेलुन बसला.  तेवढ्यात त्याच लक्ष समोरच्या बाल्कनीत गेलं..कित्येक दिवस तिथे कुणी रहायला आलेलं न्हवतं पण आता मात्र बाबाला त्या बाल्कनीत एक चिमुकला मुलगा त्याच्या आईसोबत तुळशीला पाणी घालताना दिसला. शेजारीच एक माणुस पेपर वाचत बसला होता कदाचित त्यांचाच तो छोटा मुलगा असावा व काल रात्रीच ती फॅमिली त्या फ्ल़ॅटमध्ये शिफ्ट झाली असावी. दोघेही आई-बाबा त्या छोट्या मुलासोबत हातवारे करुन, टाळ्या वाजवुन, बोबड्या सुरात काहीतरी बोलुन त्याला खेळवत होते.

     त्या दोघांच्याही आनंदाला पारावार उरला न्हवता व तो छोटा जीवही त्यांच्यासोबत अगदी मजेत हसत-खेळत होता. हे दृश्य बाबा बराच वेळ न्याहाळत होता..ते पाहताना मात्र त्याच्या काळजाला घरे पडत होतीत..आणि तोच थकलेल्या, सुरकुतलेल्या, म्हाताऱ्या डोळ्यांतुन अश्रुंचा महापुर वाहु लागला...त्याला अस्वस्थ वाटु लागल..आजचा दिवस रोजच्या दिवसा सारखा नक्कीच न्हवता हे बाबाला जाणवायला लागलं. बाबा ताडकन उठला व गेली कित्येक वर्षे बंद असलेली आतली खोली बाबाने उघडली व तिथल जुनं लाकडी कपाट धाडकन उघडलं. तसे पटकन त्याने जपुन ठेवलेले तिचेलेकाचेकित्येक जुने फोटो, जुनी कपडे, जुनी खेळणी, जुनी पुस्तके-वह्या, सगळं सगळं त्याने भराभरा उपसुन त्या खोलीभर पसरुन ठेवल. हां..आजचा दिवस ह्या म्हणावं तर सुखद पण या घडीला बाबासाठी दुःखद आठवणींचा होता तर. एरवी बाबाने त्या खोलीला कायमचच टाळं ठोकल होत पण, आज बाबाच्या मनाने वेगळच काहीतरी ठाणलं होत...बाबा त्या प्रत्येक गोष्टीवरुन मायेनं..थरथरत्या हातानं स्पर्श करु लागला... तरीही त्याचं मन भरेना की काय म्हणुन त्यानं त्या वस्तु छातीशी घट्ट कवटाळल्या व तो लहान पोरासारखं बेसुर आवाजात आक्रोश करु लागला...त्याच्या आक्रोशात संबंध घरही जणु रडु लागलं. क्षणभर बागेतली फूलं-फळंही कावरीबावरी झालीत..देवघरातला देवही जागा व्हावा अशी तीव्र हाक बाबा आपल्या गेलेल्या पत्नीला व जिवंत असुनही मयतासमान असलेल्या आपल्या लेकाला व नातवंडाला घालु लागला...बाबाला आता हे सगळं असह्य झालं होत..खरंतरं ज्या नियतीने बाबाची ही अवस्था केली होती त्या नियतीलाही या गोष्टीची लाज वाटावी इतक्या खोलवर रुतलेल्या आंतरिक वेदनेने, ओढीने बाबा हमसुन हमसुन रडत होता. तेवढ्यात बाबाला जोराचा घाम फुटला व बसल्या जागीच बाबा धाडकन् कोसळला. बाबाचा जुनाट चश्मा फुटुन त्याच्या काचांमध्ये बाबांच्या या वस्तुंतल्या कित्त्येक आठवणींचे तुकडे-तुकडे दिसु लागले...
     तुम्हाला किती वेळा सांगितलय..अतिभावनिक होणं तुमच्या तब्येतीसाठी घातक आहे..तरी वेळ बरी थत्ते आजोबा कॉफी पिण्यासाठी म्हणुन तुमच्याकडे आले व तुमचा जीव वाचला..त्यांनी त्यांची खरी दोस्ती निभावली बाबा..काळजी घ्या.बाबाच बीपी तपासत तपासतच डॉक्टर बोलले. बाबाने डॉक्टर व थत्ते आजोंबांकडे पाहत स्मितहास्य केले.

     बाबा हळुच बेडवरुन उठला आणि बागेत गेला. तोवर त्या खतपेटीतल्या सुकलेल्या मोगऱ्याच्या पाकळ्या खतात, मातीत मिसळु पाहत होत्या..बाबा काही क्षण इतर झाडांकडे व त्या खता-मातीत मिसळलेल्या पाकळ्यांकडे पाहत राहिला. थत्ते आजोबा किचनमध्ये कॉफी बनवताना खिडकीतुन बाबाकडेच पहात होते. बाबा पुन्हा आत आला. त्याची चाल आत्मविश्वासाने ओतपोत भरलेली होती... मित्रा, माझ्यानंतर या बागेची काळजी घ्यायला कुणीतरी हवय..मग मीही वरुन आभाळातुन पावसासारखा बरसेन व या बागेतल्या आणि बागेची काळजी घेणाऱ्यालाही तृप्त करेन..बाबा थत्ते आजोबांना हसत-हसतच बोलला. थत्ते आजोबांना मात्र काही अर्थ लागेना त्यांना हा बाबा थोडा वेगळाच बाबा भासला. तोवर बाबाने वकिल साहेबांना फोन लावला. “हो आजच या..एक काम आहे..दत्तकपत्र आणि वारसापत्र दोन्हीं करायच आहे मला..”  हे फोनवरच बोलणं ऐकुन थत्ते आजोबांना तो गजरे विणणारा मुलगा, खतपेटीतला मोगऱ्याचा गजरा नि बहरलेली बाग...याचा अर्थ उमगला. त्यांनी बाबाकडे एक समाधानी व सहमतीची नजर टाकुन बाबाला कॉफी देऊ केली..आणि जणु आजवर त्याच्या आयुष्यात काही घडलच नाही या अविर्भावातच, मजेत बाबा कॉफीचे मस्त घुटके घेऊ लागला...

                                                                                                   लेखिका

                                                                                   शैलजा खाडे-पाटील.

3 comments:

  1. mast .....................ch

    ReplyDelete
  2. अप्रतिम... बाबा is always real hero...
    "बाप की दौलत नही, सिर्फ साया काफी होता है"

    ReplyDelete