Monday 13 March 2017

कुणालाही मानवेल असं पनवेल..

कुणालाही मानवेल असं हे पनवेल!
                                                                                                               - शैलजा खाडे-पाटील.

    जसा दसरा संपला तसे दिवाळीचे वेध लागले. धनत्रयोदशी उजाडली..लग्नानंतरची ही माझी पहिलीच दिवाळी, अन् ती साजरी करण्यासाठी किंबहुना, माझ्या नव्या नवेल्या संसाराची सुरुवात म्हणून मी कोल्हापूरहून पनवेलला पोहोचले...तसं माझ ऑफीस कोल्हापूरमध्ये आणि माझ्या नवऱ्याच पनवेलला. त्यामुळंच लग्न होऊनही, ७-८ महिनोंकी लंबी दर्दे जुदाई आम्ही सहन केली. पण या दिवाळीला, खऱ्या अर्थानं, I कडून We कडे असा माझा प्रवास सुरु झाला...पनवेल शहरापासून ६ कि.मी वर असणार नेरे हे डोंगरांच्या कुशीत वसलेलं छोटसं गाव. त्या गावानजीकच महालक्ष्मीनगर आपल्या स्वागतास सज्ज. तिथूनच माथेरानही सहज जाण्याजोग. महालक्ष्मीनगर डोळ्यांसमोर आलं की तिथल्या आठवणींची एक एक अशी पानं हळूहळू उलगडत जातात...
     तिथच फ्लॅट हा निवासी प्रकार मी पहिल्यांदा अनुभवला. मी मूळची कोल्हापूरची. सासर, माहेर, ऑफीस सगळं तिथच आणि मुख्य म्हणजे तिथली माझी घरं अगदी ऐसपैस, बागबगीचा असणारी व टुमदार. त्यामुळ फ्लॅट विषयी कुतुहल होतच. त्यातल राहणीमान, कुणाकडूनतरी ऐकलेलं किंवा पेपर-पुस्तकांत वाचलेलं...पण फ्लॅट मधील जगण्याच खरंखुर अवगतीकरण झालं ते पनवेलमधल्या महालक्ष्मीनगर मध्येच. एकत्र कुटुंबपध्दती ऱ्हास पावून फ्लॅट संस्कृती उदयाला आली ती मुळात एकाकी, स्वार्थ, अहंकार असे अवगुण घेउनच असा काहीजण टाहो फोडतात. पण मी अनुभवलेली इथली फ्लॅट संस्कृती या टाहोला छेद देणारी ठरली. याच पनवेलमध्ये माझ्या आयुष्याची 2nd Inning (लग्नानंतरच आयुष्य) सुरु झाली.
     तर, महालक्ष्मीनगरमध्ये एकसारख्या इमारती, अगदी एकसारखीच दारे, खिडक्या, रस्ते इ. पहिल्यांदा पाहिल्यावर जणु जुळी भांवंडच एकमेकांच्या हातात हात घालून ऊभी आहेत असा भास मला झाला. अन् माझ्या कोल्हापूरी गावरान मनाला थोडं बावरायलाच झालं. नवीन घर, नवीन संसार, सगळं कस अगदी स्वच्छ कोऱ्या पाटीसारखं..त्यामुळं जसं, नव्या करकरीत पाटीवर श्री गणेशा लिहावा आणि ते सुंदर अक्षर नजरेत, मनात साठवून ठेवाव अगदी तसचं इथल्या माझ्या दिवाळीच झालं...दिवाळी खूपच मजेत साजरी केली मनात साठवून ठेवण्याजोगी. जसा सण झाला, घरातल सामान लावून झाल तस माझ मन तळ्यात मळ्यात करायला  लागलं. मला माझ्या कोल्हापूरची हूरहूर लागली.अजिबातच करमेनास झालं.
      एक दिवस अचानक, दुपारी बेल वाजली, आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू! कारण, माझा नवरा, आणि कचरेवाला, दुधवाला, पेपरवाला, ही दुपार सोडून येणारी ४ च माणसं. तर आमच्या शेजारीण मिसेस सिंग आल्या व अस्सल बिहारी बोलीत माझी चौकशी केली. माझ नवीन बारसही त्यांनी करुन टाकलं. कारण, माझ नाव शैलजा मध्ये श ऐवजी स आणि चा उच्चार ज्या असा न करता जा असा केला  (म्हणजे, उच्चारताना जोकर मधला ज वेगळा आणि जाई जुई मधला ज वेगळा असं). म्हणजेच सेलजा अस. त्यांच्याशी बोलताना माझंही तोडकं मोडकं हिंदी यावेळी चांगलच भाव खाऊन गेल. मग आमची यथासांग ओळख-पाळख झाली. हळूहळू शेजारधर्माच नुसत पालनच नव्हे तर पोषणही सुरु झाल. एकमेकींच्या पदार्थाची रेलचेल सुरू झाली. एकदा मी लोखंडी काळ्या तव्यात भाकरी बनवताना मिरच्या मागायला सिंग आंटी आल्या, आणि तेव्हाच तव्यातली भाकरी नेमकी फुगुन टुम्म झाली. अहो आश्चर्यम!!! या नजरेने त्या माझ्याकडे पाहतच राहील्या. मग मला कळलं ते अस की, त्यांच्याकडे फक्त गव्हाचे फुलकेच बनतात भाकरी हा प्रकार त्यांनी प्रथमच बघितला. तेव्हा मी त्यांना ताटातून भाकरी दिली,तर त्यांनी लगेच काजु, बदाम, मनुके इ. सुका मेवाच माझ्या हातात ठेवून दिला. किती हा दिलदारपणा!
      कधी आजारपण आलं, कसली मदत लागली तर त्या माझी आवर्जुन चौकशी करत. अगदी विश्वासान घरची चावीही माझ्याकडे ठेवून जात. बिहार राज्य म्हटलं की आपल्यासमोर सर्वसाधारण चित्र येत ते निरक्षरता, मागासलेपण, गरिबी, भ्रष्टाचारानं गांजलेल राज्य. पण, सिंग आंटीनी त्यांच्या प्रांजळ वागणुकीतून या प्रतिमेला तडा दिला. त्यांच्यासारखे अनेकजण जीव लावणारे लोक तिथं मला भेटले, आणि माझ्या मनात कायमचे घर करुन गेले.
      मी व माझा नवरा आम्हा दोघांनाही व्यायामाशिवाय चैन पडायचा नाही. (six pack zero figure चा हट्ट नाही बर का!)  विशेष म्हणजे महालक्ष्मीनगरमध्ये फिरण्यासाठी, व्यायामासाठी खुप सुंदर मोठ्ठाली बाग होती. आम्ही दोघंही या बागेत न चुकता रोज जाऊ लागलो. त्या बागेच वैशिष्टय म्हणजे बागेभोवती मोठी-मोठी हिरवीगार बहरलेली शेती होती आणि एक विहिरही. या विहिरीला १२ महिने झऱ्याच पाणी असे. बागेच्या मध्यभागी २ मोठी तळी होती.
      त्यामध्ये छोटी कासवं, इटुकले मासे खेळत असत. आमच्या कोल्हापूर मध्ये शिळी भाकरी वा चपाती उरली तर, घाला गुरा- ढोरांना. पण इथ आम्ही शिळी भाकरी वा चपाती किंवा ब्रेडचे तुकडे या तळ्यातल्या कासवांना, माशांना घालत असू. सभोवार शेती असल्यान अगदी नुकतीच खुडलेली हिरवीगार, ताजी भाजी स्वस्त दरात तिथले शेतकरी देत. खरचं, शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस या जगात सापडणार नाही. अशी ताजी काळी वांगी, पालक, मेथी, खरबूज, भेंडी, बोरं, घोसाळी नेहमी माझ्या किचनमध्ये येऊ जाऊ लागले. घोसाळ्यांची भजीही मी इथेच बनवायला शिकले.
 तर अशा सुंदर बागेत गेल्यावर आदरणीय कवी बा.सी. मर्ढेकरांची कविता माझ्या ओठांवर यायची...
किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो,
किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो...
खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच...
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखाची तीच!
        पनवेल खर तर मुंबईपासून जवळ. पण येतं रायगड जिल्ह्यात म्हणजे कोकणात. त्यामुळं इथल्या बोलीभाषेलाही खास कोकणी लयीचा ताल. येथील मंदिरांच्या अधिक संख्येमुळं मंदिरांचं शहर अशी पनवेलची ओळख आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील गणेश जयंती इथं खूप उत्साहान साजरी केली जाते. त्यालाच माघी गणेशोत्सव बोलतात हा उत्सव इथला खास! या उत्सवाच्या मिरवणुकीत मुली, बायका हौसेनं नाचतात हेही पहिल्यांदा पाहिल मी. अन् अशा मिरवणुकीतच मलाही नाचायची निरंकुश संधी मिळाली.  नवरात्रामध्ये तर आमचा दांडीया आणि गरबाचा धुमधडाका चालू असायचा.
     माझी मॉल या प्रकाराशी प्रथमच ओळख झाली ती पनवेलमध्येच. नाहीतर, कोल्हापूरमध्ये महाद्वार रोड, गंगावेस, लक्ष्मीपुरी, तर कधी कपिलतीर्थ मार्केट मध्ये गेलं की होलसेल बाजार भरुन आणायचा. (अलीकडेच रंकाळ्यावर डी मार्ट झालय म्हणा! ) पण इथ नवऱ्याला कंपनीतर्फे फूड कार्ड मिळत असल्यानं, आम्ही मॉलमध्येच खरेदी करत असू. पहिल्यांदा गेले तेव्हा काय घेऊ नी काय नको असं झालं. माझ्या हॉलमध्ये शो च्या वस्तूंची एकच गर्दी झाली. तर, किचनमध्ये कपाटात भांड्यांची ढकलाढकली होऊ लागली. एवढी भांडी जास्त झाली. नको त्या विनागरजेच्या वस्तूंनी मन विटायला लागलं. परिणामी मला, मॉल मधल्या खरेदीमध्ये काहीही स्वारस्य राहील नाही. अशा खरेदीबाबतीत मी मनापासून निगरगट्ट बनले. तसही असं कितीसं लागत माणसाला जगायला...आपल्या हव्यासापायी गरजेच्या गोष्टींवर काजळी चढते आणि नको त्या गोष्टी लखलखायला लागतात ज्यांचा प्रकाश इतका प्रखर असतो की, त्या प्रकाशात आपले डोळे दिपून एव्हाना, आपण आपल्याकडेच पहायच विसरुन जातो. मग मी निर्धार केला की मॉल मध्ये पाऊल टाकायचं ते निर्मोही मनानचं!
      एरवी संध्याकाळी, पनवेलच्या रस्त्यांवर उगाचच न्याहाळत फेरफटका मारायला मला आवडायचं. एका पावलावर रसरशीत फणसांचे गरे तर दुसऱ्या पावलावर ऊसाचा ताजा रस...हिरव्यागार कलिंगडांचे ढीगच्या ढीग, पिवळ्याधमक आंब्यांची रास... कोवळ्या लुसलुशीत काकड्या, काळ्या, हिरव्या द्राक्षांचे घड, बोंबील, सुरमई, खेकड्यांचे वाटे, ताजी मक्याची कणसं तीही कधी उकडलेली तर कधी मस्तपैकी तिखट मीठ, लिंबू लावलेली, संत्री मोसंबी ज्यूसचे स्टॉल्स...मध्येच एखादा पाणीपुरी वाला अथवा भेळवाला तर कोपऱ्या-कोपऱ्यावर खेडूत लोकं हिरवीगार ताज्या भाज्यांचे वाटे लावून विकायला बसलेले असायचे. तर फिरताना असा एक वेगळाच माहोल मला अनुभवायला मिळायचा. माणसांचा व निसर्गाचा हा अभूतपूर्व पसारा पाहून वाटायचं, निसर्ग किती भरभरुन देत असतो माणसाला...आणि माणूसही ते घेत असतो. तो मिळालेलं स्वतःच्या पोटात ढकलून इतरांच्या पोटालाही द्यायच काम करीत असतो. मात्र, या आवर्तनाच्या बाहेर माणसाने न जाणेच रास्त. कारण, निसर्गाला अमर्याद ओरबाडलं तर तोही रुसतोच की.
     या बाजारांमध्ये खरवीज (खरवस) हा पळसाच्या पानाच्या द्रोणातून, तोही विकत मिळणारा मी इथे पहिल्यांदाच पाहिला. आमच्या कोल्हापूर मध्ये म्हैस किंवा गाय व्याली म्हणजे, तिच्या ताज्या चिकाच वाटप गल्लोगल्ली वाटायला एकच धावपळ सुरु व्हायची. ज्याच्यापासुन गूळ, वेलदोडे, व नकळत मीठाचा खडा टाकून खरवीजाच्या वड्या, नासकवणी, खरवीजाचा खिस असे एकदम चवदार पदार्थ बनवले जात. असो. पनवेलमध्ये असं बाजाराच चित्र हे ग्राहक व विक्रेता यांच्यातलं प्रवाही व सहजसंवादी नात अधोरेखित करणारा असायच. ज्यामध्ये परस्परांना जोखण्याच्या स्पर्धेचा अर्विभावही कधी मी पाहिला नाही.
     माणूस नावाचा प्राणी हॉटेलमध्ये गेला की घरच्या सात्विक चवीच अन्न चाचपत राहतो, व घरी मात्र हॉटेलच्या चमचमीत अन्नाच्या चवीचं अनुकरण करीत बसतो. मी आणि माझ्या नवऱ्यान ही अस्वीकारार्ह बाब कधीच केली नाही. पनवेलमधलं उत्सव हे हॉटेल आमच खास. त्यानंतर नंबर लागायचा तो शबरीनीलकमलचा. एखादा खास उत्सव असला की आम्हाला उत्सव शिवाय करमायच नाही. म्हणजे आम्ही अशा Occasion ला उत्सव हॉटेल मध्ये जात असू. उत्सवमध्ये नवरत्न कुर्मा, शबरीमध्ये डोसा व नीलकमल मधलं व्हेज कोल्हापुरी यांची चव अजुनही माझ्या जीभेवर रेंगाळतीय.  एकदा उत्सव मध्ये आम्ही जेवण करीत असताना, आमच्या बाजूच्याच टेबलला एक जोडप व त्यांचा छोटा मुलगा असं त्रिकोणी कुंटुब बसलेल होतं. एरवी, Hard drink पिण्यासाठी वेगळी सोय असताना तो माणूस त्याच्या मुला व बायको समोरच ड्रींक करीत बसला होता. मग त्याच पाहून मुलगाही अजाणतेपणाने त्या ड्रींकचा हट्ट करु लागला. शेवटी तो मुलगा रडू लागला. तो माणूस बोलला बेटा ये गंदा है, नई पीने का’. यावर तो मुलगाही लगेच React झाला. ये गंदा है ये,  आप पी रहे हो तो, आप भी गंदे हो गये ना’? यावर तो माणूस निरुत्तर झाला व चपापून त्यानं आमच्याकडं पाहिल, आपल्या कुटुंबाच असं ओंगळवाण प्रदर्शन त्याला पचलं नसल्याचं, अन् साधा जेवणाचा आस्वाद घेतानाही स्वतःची सद्सद् विवेकबुध्दी गहाण टाकल्याचे भाव मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसले. आधी  मी कसं सगळ Goody Goody  लिहील...पण वरील प्रसंगामुळं थोडा Twist मिळाला ना तुम्हालाही वाचायला!
     मुंबई, ठाण्याची जीवनवाहिनी ट्रेनपनवेल मधुनही सुटतात. पनवेलच रेल्वेस्थानक अतिशय स्वच्छ व सुटसुटीत. आम्ही वाशी, कोपरखैरणे, CST, ठाण्याला ट्रेनमधून प्रवास करायचो. ट्रेनमधला अनुभव हा तसा लिखाणाचा मोठा आणि वेगळा विषय असल्यानं, त्याबद्दल इथ आटोपशीरच मांडलेल बरं. तर, ट्रेनन मला वाशीला जायला खूपच आवडायच कारण, जाताना मला चिखलमाती, पाणी व छोट्या झुडूपांनी व्यापलेल्या खाड्या बघायला मिळायच्या. ट्रेनच्या बुजबुजटातून बाहेर पडलं की, प्रत्येकजण  शरीरानं आपआपल्या परिघात मग्न असलेला, मात्र मनानं विचारांच्या समुद्रात डुंबत, पोहत, गटांगळ्या खाणारा.  अशी कित्येक जणांची लाटच्या लाट मला दिसे. वाशीचा रघुलीला मॉल माझ फेव्हरेट ठिकाण! आधी नमुद केल्याप्रमाण आम्ही खुपदा Window Shopping करायचो बाकी एखाद दुसरी खरेदी. ट्रेननं वाशी स्टेशनवर उतरल्यावर उसासे टाकण्याऐवजी, दीर्घ श्वास घेणे मी पसंत करायचे. कारण तिथली मोकळी स्वच्छ जागा, आटोपशीरपणा, खाण्या-पिण्याची व, निवांत बसण्याची सोय हे सर्व मला स्तिमित करुन सोडायच. शिवाय, तिथल्या दगडी फरशांवर अनवाणी पायाने चालण्याचा मोह मला उगाचच डिवचायचा.
     एकदा वाशीहून फिरुन परत पनवेलला येताना, घाई-गडबडीनं साध्या डब्याच तिकिट असताना  मी चुकुन फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले. आणि नेमक्या त्याच डब्यात तिकिट चेकर मॅडम चढल्या. मला त्यांनी पुढच्या स्टॉपला उतरवलं व माझ्याकडे दंडाचे पैसे मागू लागल्या. रात्री ९ वाजून गेलेले. पण माझा मोबाईल, पर्स माझ्या नवऱ्याकडचं राहिल की जो जेन्टस डब्यात चढलेला. मी विनंती करुन चेकरच्या असिस्टंटच्या फोनवरुन पतिराजांना फोन केला व ते मला परत मागे न्यायला आले. दुर्देवाने नेमकं आम्ही वाशीमध्ये काहीतरी खरेदी केल्याने आमच्याकडे दंडाचे पैसे देण्याइतपत ही रक्कम शिल्लक नव्हती. 
     चेकर मॅडमना मी माझ गाऱ्हाण पटवून द्यायचा खूप प्रयत्न केला. मीही नियमांचे पालन करणारी मुलगी आहे, मी मुद्दाम नाही तर चुकून घाईत फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले, वॉलेट, पर्स सगळं दाखवल व दंडाची रक्कम जवळ नसल्याच सांगितल, इ. इ.  पण बया काही ऐकायलाच तयार नाही. तिच्यातली सरकारी रग जास्तच आग ओकू लागली. ज्यामध्ये आम्ही सामान्य लोक होरपळून जात असतो. मग माझ्यातली  सुप्त अवस्थेतली प्रतिशक्ती  जागी झाली...आणि पटाकदिशी मी तीचा हातच पकडला. चला माझ्यासोबत घरी चला तिथे पैसे मिळतील असे मी ठामपणे बोलले.  तशी ती चपापली. मग मीही लोकशाहीशी तडजोड करायचीच नाही असा निर्धार केला. मग मॅडम नरमल्या. आमच्याकडे ऑटोपुरते पैसे ठेऊन बाकीचे सगळे तिने काढून घेतले. इथे मी लाच दिली किंवा त्यांनी ती घेतली असा अर्थ होतोच असं नाही. कारण वारं येईल तशी पाठ फिरवणं कधी कधी त्या त्या काळाची गरज असते, तरच आपण नीट चालू शकतो. इथे परिस्थितीने नियमांवर कडी केली की जी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
     कालांतराने, माझ्या नवऱ्याच कामाच ठिकाण बदललं. त्यामुळं जेव्हा मी पनवेल सोडलं तेव्हा मन नाराज झालं. तिथल्या या अधिकतम गोड आठवणींचं स्फुल्लिंग सदा चेतत राहणारं ठरल. तिथल्या माणसांच्या सोबतींच, भावनांच, विचारांच गारुड आजही माझ्यावर कायम आहे. माहेरवाशीण सासरी परत जाताना तिचा एक पाय आत नि एक बाहेर राहतो तशीच माझी अवस्था हे पनवेल...महालक्ष्मीनगर सोडताना झाली. इथे येताना बावरलेपणाचंपांघरुण घेऊन आलेले मी जाताना मात्र खळाळत्या प्रवाहा सारखी इथल्या आठवणीं सोबत घेऊन आले. आयुष्यात संक्रमण ठरलेलचं असतं, म्हणजे काहीतरी ओलांडून जावच लागतं. मग हा संकेत मी तरी कसा मोडणार बर?  पण माझ्याकडून एक शाश्वती तुम्हाला नक्की मिळणार ती हीच की, कुणालाही मानवेल असं शहर पनवेल! एवढ भरभरुन लिहुनही पनवेलमधल्या विचारांचा कल्लोळ काही थांबेना म्हणूनच अशा वेळी, आदरणीय बालकवींच्या ओळी ओठांवर येतायत....
येथे नाही तेथे नाही .......
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

                                                                                         शैलजा खाडे-पाटील.
...................................................................................................................






2 comments: