‘चहा’ पे चर्चा
शैलजा खाडे – पाटील
बऱ्याच दिवसांनी ‘आकु’ चा फोन आला. तिचा
फोन म्हटलं की हातात असेल ते काम मी बाजूला ठेवते कारण आकु ही व्यक्तीच अशी आहे की
तिच्याशी बोलल्यावर मला एकदम फ्रेश वाटत. माझी मैत्रिण आकांक्षा तिला लाडीगोडीन मी
‘आकु’ बोलते. ती व्यवसायानं डॉक्टर
आहे. असचं बोलता बोलता मला तिन विचारलं, ‘काय गं तुझं
सर्वांत आवडतं काम कोणत?’ तिच्या या प्रश्नावर मला फारसा विचार
करावा असं वाटलचं नाही अन् अगदी सहज मी बोलून गेले...सकाळी ८ वाजता चहा बनवून तो पिता
पिता पेपर वाचन करणे. तिला पण मजा वाटली ऐकून. पण, ती डॉक्टर असल्यानं खूप चहा घेत
जाऊ नको, असा आरोग्यवर्धक सल्ला दिला. मग वर्तुळात वर्तुळे असतात तसे आमचे विषय
झाले.
मग माझ्या मनात विचार आला खरचं आपल आवडतं
काम चहा बनवून तो पिताना पेपर वाचणे हेच आहे का? (इथे मी चहा घेताना नव्हे तर पिताना असा शब्द वापरते कारण मी
कोल्हापूरी आहे! ) तेव्हा माझा मेंदु आणि मन या दोहोंच्यात
जबरी लढाई झाली. शेवटी दोघांच्यात मांडवली होऊन अंतिम विजय माझ्या वरील आवडीचाच
झाला. मी या माझ्या आवडीच कारणंही शोधलं ते असं की, चहाचे
घुटके घेत-घेत बराच वेळ पेपर वाचत मला, स्वतःला समाजात घडणाऱ्या
घटनेतील मानवी अनुभवांशी निगडीत, आनंद, दुःख, समाधान अशा कित्येक भावनां जाणून
घेण्याची संधी या चहाच्या निमित्तान मिळते. कारण असा निवांत वेळ चहाच्या वेळीच भेटतो.
घोटभर चहा पिला की पोटभर ढेकर यावा असा उत्साह मिळतो. साधा चहा, स्पेशल दुधाचा चहा, कोरा चहा,
ग्रीन टी, लेमन टी, गुळाचा चहा असे चहाचे सर्वसाधारण प्रकार. हल्ली, ग्रीन टी
प्यायची एक वेगळी फेज आहे. कॅलरी बर्न होण्यासाठी, डाएटींगसाठी, वजन कमी
करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर असल्याच बोलतात. मध्यंतरी एका मराठी चॅनलवर दुपारच्या
रेसिपी शोमध्ये चक्क चहा कसा बनवायचा? याची रेसिपी दाखविण्यात आली. म्हणजे, चहा सुध्दा बनविण्याचे
नाना प्रकार असतात. साधा चहा म्हणजे कोरा चहा उकळवून त्यात दूध ओतायच तर स्पेशल
चहा म्हणजे दुधामध्येच बाकीचे जिन्नस टाकायचे असं काही तरी.
मधुमेहींना विनासाखरेचा चहा लागतो. माझ्या घरी माझी
आई आणि वडील दोघेही मधुमेहाचे पेशंट्स, पण चहाचे पक्के चाहते. मध्यंतरी त्यांनी Sugerfree गोळ्या घालून चहा पिण्याचा प्रयोग करुन पाहिला. आई चहा ठेवायची व
पप्पांना विचारायची, अहो किती गोळ्या घालु? (बंदुकीतल्या नव्हे तर Sugerfree बरं का! ) मग आम्हा भावंडांच्यांत एकच हास्याचा
फवारा उडायचा. पण नंतर त्यांना गोळ्या आवडेनाशा झाल्या...बोलले कृत्रिम ते
कृत्रिमच व सरळ फक्त चहापूड टाकूनच विनासाखर त्यांचा ‘डेली
टी’ सुरु झाला. कोऱ्या चहानं बिघडलेलं पोट व दुखणारं डोक
शांत व्हायला मदत होते असं बोलतात. लेमन टीने सुध्दा हा फरक जाणवतो.
मला आवडणारा चहा म्हणजे गुळमाट असा ‘गुळाचा चहा’. ऊसाच्या
मळ्यांभोवती असणारी धगधगती गुऱ्हाळघरे म्हणजे अणुऊर्जा आयोगाचा एखादा मोठा अणु
प्रकल्प आणि तो फिका पडावा असा त्यां गुऱ्हाळघरांचा थाट! या गुऱ्हाळघरातील ताज्या गुळाचा चहा पिणं म्हणजे
असा अणुप्रकल्प यशस्वी होण्यासारखा आनंद ...एकदम मस्त!.
पूर्वी आमच्या आजोळी फक्त गुळाचाच चहा बनवला
जात असे. तेव्हा ‘साखऱ्या’ फक्त नावालाच. तर, माझी आजी पसरट अशा
छोट्या हंडीत चुलीवर चहा चढवायची...पाणी, चहापूड ( मगदुम चहापत्तीच बर का! ) आणि गूळ असं उकळवून कोमट करून ठेवायची, आणि प्रत्येकाची अंघोळ झाली की,
चुलीपुढं शेकायला बसायचं...मग आजी वाटीमध्ये गुळाचा काळा कोमट चहा ओतायची व वरुन
कोमट दूध घालायची, कारण कोऱ्या गुळाच्या गरम चहामध्ये गरम दूध घातलं की चहा नासतो.
(म्हणजे फाटतो) मग मस्तपैकी १ मोठी वरकी (आत्ताचे जिराविरहित मोठे बटर) चहासोबत
खाल्ले की काम फत्ते!
प्रत्येक घरामध्ये असणारा चहा चवीने व
सुगंधाने वेगळाच असतो. गावाकडे गेलात तर तिथे ‘काळा चहाच’ भेटणार म्हणजे, रेग्युलर चहा पण, दूध अगदी नावालाच. आणि गोड इतका की एकदा चिकटलेले ओठ
परत उघडतील की नाही याची खात्री चहा संपेपर्यंत करुन घ्यावी लागते! . पण अशा चहामध्ये गावाकडची माया
विरघळलेली असते, हे वेगळं सांगायला नको. शहरातला चहा म्हणजे पांढरा चहा. पांढरा
चहा म्हणजे कोऱ्या चहात दूध भरपुर सायीसकट घातलेलं किंवा स्पेशल दुधाचा चहा व
चवीलाही कमी गोड. खरतरं इथं काळा, पांढरा असा भेदभाव नाही करायचा मला... फक्त
प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक घरातली चहा बनविण्याची, त्याच्या चवीची रित वेगवेगळी असते
हे सांगण्यासाठी या काळ्या, पांढऱ्या शब्दांची ही रंगपंचमी!
दुधाच्या सायीवरुन एक आठवलं...माझ्या आजोळी,
माझी मामेभांवडं यांना चहामध्ये Compulsory दुधाची साय
लागतेच. आणि त्यामध्ये पार्लेची बिस्किटं कुस्करुन चमचानं खाणारं हे लोकं.
लहानपणापासूनच सवय. मग याच कारण मला कळलं ते असं- शहरात कसं Bornvita किंवा Complan दुधात टाकून ते चॉकलेटी मिश्रण पितात अगदी तसचं हे असं मिश्रण पिण्यात
त्यांनाही आनंद भेटतो.
चहा पित पित एकट्यात जाणं हा एक खास अनुभव.
म्हणजे हातात गरमा गरम चहा व तो पित-पित एकट्यानंच विचार करत एकांतात बसायच. अशा वेळी, चहाची Quantity
खूप लागते बरं का. म्हणजे, मोठ्ठाले मग, मोठे कप असं काही तरी. कारण
इवलुशा कपातून चहा पिताना दोन घुटक्यात तो चहा संपला की एकांतात मनात येत असणाऱ्या
विचारांनाही पूर्णविराम भेटतो.
चहा हे असं पेय आहे की, त्यासाठी आपणांस
नुसत निमित्त असल की झालं. शिवाय, खिशालाही परवडतं हे वेगळं. जुने मित्र, मैत्रिण
भेटले की चला चहाला...रट्टा मारुन अभ्यास करायचा फटाक कन कपभर चहा घेउनच बसायच.
कुठलाही पाहुणा ऐनवेळी दारात थबकला टाका चहा. अगदी नवी नवी ओळख झाली चहा घेउ?. सहज कोणाची विचारपूस करावीशी झाली चहापाणी
झालं का?. दिवसाची सुरुवात गरमागरम वाफाळत्या चहानेच.
दवाखान्यात पेशंटला लिक्वीड डाएट मध्ये चहा हा मेन्यू असतोच. प्रसंगी अशा पेशंटला
बघायला आले की मागवा चहा. डोकं दुखतय, टेन्शन आलंय, अस्वस्थ होतयं जरा च्या घ्या
बरं वाटल, तरतरी येईल. कुणाशी अबोला झाला, बोलण्याची सुरुवात कशी व कोणत्या
कारणाने करायची ही विवंचना सहसा झाला का चहा? या प्रश्नाने दूर
होणार. कुण्या परगावात जा, पाहुण्याकडे जा पहिला प्रश्न चहा घेणार? किंवा थांबा की च्या घेऊनच जा. असं बरचं नि बरच काही!
आपल्या आयुष्यातील स्वागत आणि
निरोप हे बहुतकरुन चहानेच होतात हे विशेष. (काही अपवाद वगळता). किंबहुना, आपल्या
आजूबाजूला काही सरकारी कार्यालयांमध्ये ‘भ्रष्टाचार’ या शब्दाला समानार्थी व पर्यायी असा शब्द म्हणजे ‘चहापानी’
असं समीकरण झालयं. ही वेदना वेगळीच म्हणावी
लागेल. येथे मात्र गोड चहाची चव बेचवच होणार, यात वाद नाही. ही बोचरी खंत मला
वाटते.
मी असंही पाहिल आहे की काही
भागांत, एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ति मृत पावली की १२ दिवस चहा घेत नाहीत.
म्हणजे गोड खात-पित नाहीत. व दिवसकार्याच्या १३ व्या दिवशी
प्रथम तोंड गोड करण्यासाठी पहिल्यांदा चहा पिला जातो व दुःख सांडून या दुःखातून
बाहेर पडायची ऊर्मी मिळते त्या चहातून.
इतकचं नव्हे तर, कुणी एखाद्याच्या घरी गेलं व तासभर बसलं व तिथल्या घरच्यांनी चहा न देता
नुसत्या पाण्यावरच आपला निरोप साजरा केला तर मनाला खुप नाराजी वाटते. तर काहींना
हा प्रकार अपमानास्पद वाटतो. एवढा वेळ बसलो... एवढ आपुलकीनं बोललो... पण साधा
चहासुध्दा विचारला नाही असा भाव मनात घर करुन जातोच. चहा आणि व्यक्तीं
व्यक्तींमधील संवाद या दोन गोष्टी म्हणजे, पाण्यामध्ये विरघळणाऱ्या साखरे सारख्या.
आणि या सुसंवादाच्या श्रेयाच निमित्त मात्र चहा बनतो.
चहाची ‘तलफ’ असणं, चहाची ‘आवड’ असणं व चहाच ‘व्यसन’ असणं या तिन्ही अगदी भिन्न गोष्टी आहेत असं मला वाटत. चहाची ‘तलफ’ येण्यासाठी काळ नि वेळ काहीही लागत नाही. या प्रकारात
मध्यरात्री २ वाजताही चहा घेतला जातो. पण याच एक वैशिष्ट्य म्हणजे, यांमध्ये अगदी एक घोटभर चहाही तलफ भागवून जातो. चहाची ‘आवड’ असणं हेही एक वेगळया सुरातलं गाणं...जसं की मला
चहाची आवड आहे. म्हणजे, सकाळी फ्रेश होण्यासाठी व सायंकाळी
मूड बदलण्यासाठी १-१ कप प्रमाणबध्द घेतला जाणारा चहा
आवडीच्या प्रकारात मोडतो. मी व माझ्यासारख्या अशा आवडीचे लोक जगाच्या पाठीवर
कुठेही गेले तरी चहाचा पाहुणचार मुळीसुध्दा टाळत नाहीत. चहाच ‘व्यसन’ म्हणजे अनारोग्याच्या खाईत लोटणारच. अतिचहा
शेवटी वाईटच याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. नवीन-नवीन
विद्यार्थी दशेत मला नकळत चहाच व्यसनच लागल होतं. इतकं की, मी
कॅन्टीनमध्ये दिवसभरात १२ कप चहा घेतला होता...व त्याचा दुष्परिणाम माझ्या
चेहऱ्यावर, हातापायावर उष्णतेचे पुरळ उठले. म्हणूनच, चहाची ‘तलफ’ असावी, चहाची ‘आवड’ असावी पण
चहाच ‘व्यसन’ नकोच अस माझ शुध्द अनुभवी
मत आहे.
कॅन्टीनवरुन
आठवलं...कॅन्टीनचा चहा एक वेगळाच अनुभव देणारा. भलेही त्यात चहापत्ती, दूध, साखर
यांच प्रमाण कसंही असेना पण मित्र मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये असा चहा घेण म्हणजे,
एकमेकांची सुख, दुःखे वाटून घेऊन दुःखांना बायबाय करुन सुखांना वेलकम करणं!
टपरीवरचा चहाही निराळाच.
टपरीवरचा चहा घेण्यासाठी ‘कंपनी’
देणारी व्यक्तिही राजी खुशी आपल्यासोबत असावी, कारण पांढरपेशा व्यक्ति सोबत का-कू करत टपरीवरचा चहा प्यायला मजाच येत नाही. थोडक्यात, टपरीवरचा चहा प्यायचा झाल्यास एकदम टपोरी बनायला पाहिजे. मुख्य म्हणजे,
दुसरा फायदा, खिशाला कात्रीही कमी बसते. पुण्या-मुंबईसारख्या
शहरांत ‘कॅफे कॉफी डे’ अशी कल्पना
जोमात आहे कारण, कॉफी मागवायची, नि हवा तितका वेळ त्या कॅफेमध्ये गप्पा मारत
बसायच. पण कॉफी डेच अस का नाव बरं...’कॅफे टी डे’ का नाही असा मला पडलेला प्रश्न. तसं कॉफीपेक्षा चहा हे आपल्या भारतीय
पेयांच्या रांगेत प्रथम स्थानी जाऊन बसणारं पेय आहे असा माझा कयास आहे.
माझ्या किचनमध्ये, चहाच भांड, कपबशी आणि चहा
गाळायच गाळण यांवर माझ अगदी इतर भांड्यांकुंड्यांपेक्षा जरा जास्तच प्रेम आहे.
कारण, मला चहा विशेष आवडतो. माझ्या नवऱ्याला चहाची विशेष आवड नाही. मग तो ऑफीसला
गेला की मी १ वेळचा चहा २ वेळा बनवून पिते. म्हणजे, एका वेळी अर्धा कप असा.
त्यामुळ, आरोग्याच्या दृष्टीनं आपसूकच माझ कमी प्रमाणात चहा पिण होत, आणि चहाची
आवड मात्र मनोमन जोपासली जाते.
हल्ली चहा सर्व्ह करताना, बशी देण्याची
पध्दतच लुप्त होत आहे. नुसता कपच आणि तोही अर्धामुर्धा. पण मी माझ्या कपाटात बशा
आवर्जून ठेवल्या आहेत...कारण गावाकडील पाहुण्यांना बशी लागतेच. चहा बशीतून पिताना
सुर्र सुर्र असा आवाज करुन चहाची चव घेण्यातही एक वेगळीच मजा असते. कोणत्याही
प्रकारचा सकाळ संध्याकाळचा नाश्ता आणि चहा हे दोघं पक्के दोस्त. शिरा, उप्पीट,
पोहे, इडली, आंबोळी असा बेत झाला की जरा चहा टाका असं फर्मान आपसूकच निघत. पण जेवणानंतरही चहा
घेणारेही विरळेच.
मी चहा घेत नाही. असं काही जण अभिमानाने
सांगतात. हे का? ते कळत
नाही कदाचित चहा म्हणजे आरोग्यास अहितकारकच असा त्यांचा समज असावा आणि अशा लोकांचा
पाहुणचार करण म्हणजे बुचकळ्यात पडल्यासारखं होत. मग, करा लिंबूसरबत, कोकम, नाहीतर द्या
कपभर दूध. ज्याची सर फक्कड अशा चहाला येतच नाही.
चहाच्या नुसत्या सुगंधानेच किती प्रसन्न वाटत ते पहा. सकाळी वा संध्याकाळी
काहींच्या घरातून चहाचा असा सुगंध एकत्र येतो, आणि सगळ वातावरण प्रफुल्लित करुन
सोडतो. आलं घालुन केलेला, वेलदोडे टाकलेला, लिंबाची पान
टाकलेला, तर कधी गवती चहा टाकून केलेला चहा. वा! एकदम पुनर्जन्म मिळालाय असा फिल येतो. असा चहा पिल्यानं नव्हे, तर नुसत्या सुगंधानंही. चहाच्या चवींनाही नाना
चवी आहेत. अतिगोड, मध्यम, कमी गोड असे. आणि त्यात भर म्हणजे वेलदोडे, लवंग, सुंठ,
दालचिनी, काळी मिरी, जायफळ, असा चहाचा मसाला टाकून बनवलेला चहा तर एकदम फक्कड
मेजवानी जणु! अशा चहाच्या सुगंधांची व चवीची खरी मजा अनुभवता
येते ती, पावसाळ्यात व थंडीच्या दिवसांत...मग अशा प्रफुल्लित
चहाला प्लेटभर गरमागरम भज्यांशिवाय मुळीच करमत नाही.
सर्वसामान्य कुटुंबांत, विशेषतः नोकरदार
वर्गात सकाळी नाश्त्याऐवजी चहा व त्यात बुडवून चपाती खाल्ली जाते. माझ्या घरी १२
महिने हेच Combination असतं. त्यात भर म्हणजे, आईच्या हातच्या भरपूर तेल
लावून एकाखाली एक असे पदर सुटलेल्या, तवाभर पसरलेल्या गरमागरम चपात्या चहासोबत
खायला मिळणं म्हणजे माझ भाग्यच!. माझ्या घरी चहासोबत चपाती
हा मेनहिरो असतो व खारी,बटर, टोस्ट, बिस्कीटे हे साईड हिरो असतात. कारण, कधी कधी
चहासुध्दा माणसांसारखा त्याच त्याच सहवासाला कंटाळतो म्हणून त्याला पण अशा बेकरी
सहवासाचा Change ही मिळतो.
मला आवडलेला चहा म्हणजे
चेन्नईमधला. तिथे स्टीलच्या उभट ग्लासातून थोडीच साखर घालून, पण अगदी बासुंदीसारखा
चहा मी पिला होता. चहा बनविणारा तर २ फूट उंचीवरुन ग्लासांमध्ये चहा ओतून चांगला
मिक्स करुन देई. अमरावती शहरामध्येही खूप चवीचा चहा भेटतो. सोलापूरमध्ये मी दूध पावडर
टाकलेला चांगला चहा बऱ्याचदा Taste केला आहे. आमच्या
कोल्हापूरच्या चहाची तर बातच न्यारी...तसे आम्ही खरे रस्सा खवय्येलोक. पण शिरा-पोहे मिक्स किंवा वडापाव व सोबतीला
टपरीवरचा काचेच्या ग्लासमधला कटिंग चहा यातही आम्ही तेवढेच ‘कटिंग
चहा पिवय्ये’ म्हणून समृध्द झालेलो आहोत!
तर....अशा चहावरून आठवल, हा लेख लिहिता लिहिता माझ्याही चहाची वेळ झाली आहे आणि तुम्हाला एव्हाना
कळलंच असेल की ही वेळ टाळून चालणार नाही...चहाच आधण ठेवलंय..त्याला ऊकळी
येतेय...सोबत माझ्या मनातही, आता चहा घेत घेत हा लिहिलेला
लेख वाचायचा म्हणून आनंदाची ऊकळी फुटतेय...
-
शैलजा खाडे-पाटील.
.................................................................................................................................
Nice about tea..!! Keep it up :)
ReplyDeleteअति सुंंदर.....कोल्हापूरी शब्द ....नाद खुळा...
ReplyDeleteThanks
DeleteKolhapuri literature...quite interesting...Great start!!
ReplyDeleteThank u!
ReplyDeleteसुदंर ..
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete