Wednesday, 5 April 2017

    साठवणीतल्या साड्यांच्या सुंदर आठवणी 
                                          शैलजा खाडे पाटील        
      नुकतच भावाच लग्न आटपून घरी आले...पाहते तर घराच्या भिंतींसकट प्रत्येक वस्तु आसुसलेल्या भावनेने माझी वाट पाहत होती. तुम्हाला माहितेय? या जगात सर्वांत वाईट गोष्ट कोणती? ती म्हणजे कोणाचीतरी वाट पाहणे...मला माझ्या घराची दया आली. मस्तपैकी फ्रेश होउन मी माझ्या घराला घट्ट कवेत घेतलं...जसं एखादी आई ब-याच दिवसांनी आपल्या मुलाला भेटल्यावर मायेने कवेत घेते ना तस... I mean घराची साफसफाई करुन प्रसन्न वाटलं. मग घरही खुदकन हसलं. जेवणखाणं झाल आणि रात्री समाधानाने कधी डोळा लागला कळलचं नाही. तेव्हा झोपताना एक खोल भावना मनात दाटून आली, ती म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा पण जोपर्यंत आपण आपल्या घरात येउन आपल्या घराला कुरवाळत नाही तोपर्यंत मनाला चैनच पडत नाही.
दुसऱ्या दिवशी दुपारी निवांत कपड्यांच कपाट लावायला घेतलं...कपाटातल्या साड्यांची आणि माझी तर महिनोंन महिने भेटच नव्हती त्या बिचाऱ्या रागाने आपले रंगीबेरंगी अंग आकसून बसल्या होत्या. मग मी अगदी प्रेमाने लडीवाळपणे एकेक साडी बाहेर काढली. बरेच दिवस न वापरल्यामुळं खूप घड्या-घड्या पडल्या होत्या. काठ दुमडले होते. म्हणून त्याच घड्यांवर साडी चिरु नये म्हणून मी एकेक साडी उलगडत गेले...पाहता पाहता सगळी बेडरुम त्या सुंदर नक्षीदार साड्यांनी व्यापून गेली. साडी आणि बाईच विलक्षण नात असत! प्रत्येक साडीशी तिची कोणती ना कोणती गोड आठवण जोडलेली असतेच. तस माझा आणि साडीचा ३६ चा आकडा कारण शालेय वयापासून मला साडी हा प्रक्रार कळायला लागला, तस मला तिच्यात फार Interest नव्हताच. कारण एकतर मला साडीच नेसता येत नसे आणि कशीबशी नेसलीच तर ती सावरता सावरता माझ्या नाकीनऊ येई.
     तर, माझ्या आयुष्यात साडी नेसण्याचा पहिला प्रसंग आला तो इ. ४ थी मध्ये तेही १५ ऑगस्ट दिवशी...माझा आवाज सुरेल असल्यामुळं मला त्या दिवशी  साडी नेसून माईकवर देशभक्तीपर गाणं  म्हणायची संधी मिळाली. मग काय...साडी होती काळ्या रंगाची आणि त्यावर गुलाबी रंगाची सुंदर सुंदर फुलं... क्या बात! खुप उठून दिसायची ती साडी. अगदी कुणीही नेसलं तरी... पण मला काय ठाउक, की माझ्या आईने साडीपन्ना मोजून छोट्यातली छोटी साडी मला दिली होती. पण साडी बाकी छान होती, आणि ती नेसवली माझ्या ताईने...मग माझी स्वारी निघाली शाळेकडे लुटूक लुटूक...डोक्यातला गजरा आणि ती साडी यांनी चांगलीच गट्टी केली. साडीच्या नीऱ्या पायात येऊन मी अडखळत चालत होते आणि खाली नीऱ्या सावरायला गेले की डोक्यातला गजरा समोर नाकाच्या शेंड्यावर येऊन लटकायचा. अस सगळं Manage करत-करत मी शाळेत गेले, देशभक्तीपर गाणं म्हटलं इ. इ.

     मग शाळा-कॉलेजमध्ये, Get-Together, Send off, Traditional Day, गॅदरिंग अशा कार्यक्रमांत साडी नेसत गेले. पण पक्की अंगासोबत साडी नेसायची कला फक्त माझ्या ताईलाच अवगत होती...एक सिक्रेट शेअर करते बर...लग्नासाठी माझा नवरा जेव्हा मला पहायला आला, तेव्हासुध्दा ताईनेच मला साडी नेसवली होती. अशा एक एक आठवणी डोळे चोळत उठू लागल्या जेव्हा मी बेडरुम मधल्या साड्यांकडे पाहत राहिले...लग्न ज्या साडीवर ठरलं ती नाजुक गुलाबी साडी... साखरपुड्याचा पेढा अधिकच गोड झाला ती हिरवी साडी..अक्षता जीच्या साक्षीने पडल्या ती अक्षताची मोती रंगाची साडी...वरात निघून मी माझ्या सासरच्या घरात ज्याच्या साथीनं पहिल माप ओलांडल तो जांभळ्या रंगाचा शालू...नंतर केळवणासाठी नातेवाईकांनी घेतलेल्या लाल, पिवळ्या, हिरव्या ,निळ्या अशा बऱ्याच साड्या...
     साडीचे बरेच प्रकार पाहिले मी...पण पैठणी, संडे-मंडे, सिल्क, कश्मीरी, Embroidery, कुंदन वर्क  असे मोजकेच आहेत माझ्या कपाटात. विशेष म्हणजे गेल्या ३-४ वर्षांपासूनच्या कित्त्येक साड्या अगदी जशाच्या तशा टिकल्या आहेत. जणु काही नुकत्याच दुकानातून नव्या कोऱ्या आणल्यासारख्या...आमच्या परिवारामध्ये अविवाहीत मुलींनाही साडी घ्यायची पध्दत आहे. म्हणजे, मुलगी वयात आली की तिला पहिली साडी भेटतेच. मला अशी पहिली साडी घेतली ती माझ्या आजीने. गडद गुलाबी रंग आणि त्यावर सुंदर सोनेरी नक्षी खूपच मोहक आणि देखणी साडी होती ती!
   साडी नेसणे ही खूप मोठी कला आहे असं मला वाटतं. बंगाली, गुजराती, आसामी, नऊवारी असे साड्या नेसण्याचे नाना प्रकार. हल्लीच्या काळात प्रत्येक मुलीला साडी नेसताच येते असं नाही. त्यांपैकी मीही एक होते. मग लग्नाची तारीख ठरली की अशा मुलींची साडी नेसण्यासाठीची बोबडीधडपड सुरु होते.
          माझ्यासकट, माझ्या मैत्रिणींपैकी बहुतांश या प्रकारातून गेल्या आहेत. आमच्या मराठा समाजात काही कुटुंबांत मुलगी कितीही आधुनिक असली तरीही लग्नाचे पहिले ५ दिवस तरी तिने २४ तास साडीत राहणे अपेक्षित असते. माझा या ५ दिवसांचा साडीतला अनुभव म्हणजे नुसता अनुभवनाही राहिला तर, त्या अनुभवाच माझ्या नवऱ्यासमोर रडगाणं झाल! कारण मला साडी carry करण तेवढ जमतच नव्हत. मग पाठपरतवणी झाल्यावर मोजके चुडीदार व गाऊन्स घालणे अशी ‘Deal’ आमच्यात झाली.
         मी एक स्त्री म्हणून साडीच अस्तित्त्व व तिच महत्त्व अजिबात नाकारत नाही पण ती Carry करण सर्वच स्त्रियांना जमतचं अस नाही आणि अशाजणींवर ती नेसावीच म्हणून लादली गेली तर मात्र माझा आक्षेप राहणार. काहीजणींना नुसताच पदर जुळवणं सहज जमतं... तर काहीजणी नीऱ्या डावीकडे की उजवीकडे या विचारात मध्येच खोचून टाकतात. म्हणजे, साडी नेसता न येणाऱ्यांची अशी केविलवाणी अवस्था असते. माझी आई व ताई दोघीही २ मिनिटात साडी नेसतात तेही सहज, व लीलया. मला याचं गमक अजूनही नाही कळलेल कदाचित, साडी नेसणं, सडारांगोळी काढणं, आटोपशीर स्वयंपाक बनवणं यासाठी बाईचा हात वळावा लागतो, अस म्हणतात...पण माझ्यासकट अशा बऱ्याच जणी असतील की ज्यांचा हात फक्त लिहीण्यासाठी आणि पुस्तकांची पाने पलटून ती वाचण्यासाठीच वळत असतो. प्रत्येक स्त्रीचा प्राधान्यक्रम वेगळा राहतो हे एकदम मान्य. पण कुठलीही स्त्री कितीही आधुनिक झाली तरी निदान स्वतःसाठी तरी जगायला जे जे आवश्यक आहे ते तरी तीनं स्वतःहून करणं अपेक्षित आहे अस मला वाटत. मग नोकरीच्या ठिकाणी तिचा हात १00% वळूदे पण घरी आल्यावर तरी तो हात १0% तरी वळावा ही अपेक्षा. आणि त्या हातामध्ये मात्र आपलेपणा हवाच.
     तर विषय काय...साडी! मी समाजात अशा कित्येक स्त्रिया पाहिल्या आहेत की ज्यांचा साडी हा विषय म्हणजे जीव की प्राण! मोदींजीनी केलेल्या नोटाबंदीवर जगात जेवढी चर्चा, जेवढे वाद होत नसतील तेवढ्या चर्चा केवळ २ बायकांत फक्त साडी या एकमेव विषयावर होत असतात. मी जवळून पाहिल आहे हे. मग काही स्त्रियांमध्ये ईर्ष्या आलीच. माझ्या नवऱ्याने मुळ किंमतीला, तमुक डिझाईनची, अशा रंगातल्या तशा पट्ट्यांची, सुतीतली ...नि रेशमी...की नेटची साडी आणली...अस काय नि काय!  अशी चर्चा कानावर पडू लागताच घोळक्यातल्या माणसाच पाकिट मारल्यावर एखादा चोर कसा हळूहळू निसटू पाहतो अगदी तशीच मी ही अशा बायकांमधून हळूहळू काढता पाय घेत असत... आणि मनात या चर्चेचा उपयोग काय आणि का ऐकतोय आपण ही चर्चा हा चोरटा भाव असतोच!
     माणसांमाणसांत भेदभाव असतो तसाच साडीतही असतो बरं का! अमुक साडी सासरच्यांनी घेतलेली तमुक साडी माहेरच्यांनी घेतलेली...यातही उपभेदभाव असतातच. ही साडी आईने, तर ती साडी सासूने घेतलेली. ही साडी भावाने, तर ती दिराने...आणि अमूक साडी नणंदेने, तर तमूक बहिणीने घेतलेली ही साडी लग्नातली, तर ही बारशातली.. अस बरचं म्हणजे बरचं काही... पण काही स्त्रीयांना सासरपेक्षा माहेरच्या साडीचं म्हणजे माहेरकडून घेतलेली साडीचं कौतुक अधिक प्रिय असतं.  मग ती साडी कितीही कमी दर्जा अथवा कमी किंमतीची असुदे.

          मराठवाड्यातील काही भागांत साडीची झोळी करुन त्यात लहान बाळांना झोपवण्याची प्रथा आहे.  म्हणजेच बाळाच कुटुंब कितीही श्रीमंत असलं तरी त्याच्यासाठी नक्षीदार पाळणा न वापरता साड्यांची झोळीच वापरतात. किती विशेष ना ही गोष्ट! कदाचित त्या साडीची ऊबच त्या तान्हुल्याला सावरत असेल. कारण आई, काकी, मावशी, आजी अशा कित्येक नात्यांमधले मायेचे धागे जोडलेली त्या साडीची झोळी म्हणजे त्या बाळाला सुंदर पाळण्यापेक्षाही मोलाची आहे.
         गोधडी हा प्रकार साडी शिवाय अपूर्णच. मला जस कळू लागलं, तस मला गोधडीशिवाय झोप लागत नाही. मी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला असताना, आमची अभ्यास सहल दिल्ली येथे गेली होती. थंडीचे दिवस होते. आणि मी शाल, ब्लँकेट ऐवजी गोधडीच नेणार असा हट्ट घरी धरला...त्यावेळी माझं इतकं हस झाल होत की विचारु नका. कारण पोरगी दिल्लीला जाणार अन् सोबत गोधडी नेणार ही कल्पना म्हणजे अंतराळात अवकाशयानातून जाताना सोबत चणे-फुटाणे नेणे अशीच वाटते. शेवटी एक मोठ २ साड्यांच पातळ धुपट न्याव असा निवाडा झाला. कारण गोधडी म्हटलं की ओझ आलचं. गोधडीच्या बाहेर ज्या रंगीबेरंगी साड्या लावल्या जातात ते पाहून झोपताना वाटत की आपण अंगावर सप्तरंगी इंद्रधनुष्य लपेटलय...आणि भर म्हणजे, आईच्या किंवा आजीच्या कुशीत गाढ झोपलोय असा लडीवाळ feel ही येतो.
       आजही माझ्याकडे १ लाल रंगाची व त्यावर मोठ्ठी पिवळी फुले व निळे काठ असलेल्या साड्यांची सुंदर, मऊ, ऊबदार गोधडी आहे. माझ्या लग्नानंतरही माहेरहून सासरी ती रुकवतासोबत आलीच. किंबहुना माझाच तो हट्ट. मध्यंतरी साड्यांचे फ्रॉक्स किंवा बाह्यांना बॉटल किंवा फुगे लावलेल्या सुंदर अशा चुडीदारची फॅशन होती आणि समोर स्मोकींग व त्यात मणी बसवायचे आणि पाठी बांधायला लांबच्या लांब बंद (नाड्या) असत. सोबत परीसारखा मोठ्ठा ऐसपैस घेर. यांसाठी शक्यतो प्लेन साड्या वापरल्या जात असत. असा ड्रेस शाळेत सिव्हील डे दिवशी घालून जाणं म्हणजे एकदम हटके status मानलं जाई.
       आमच्या कुंटुंबात आम्ही तिघी बहिणी...लहानपणी आई एखादी सुंदर साडी बाजूला काढून ठेवे आणि त्या एका साडीमध्ये आम्हां तिघींना पण अगदी एकसारख्या डिझाईनचे फ्रॉक्स शिवत असे. आणि ते जेव्हा आम्ही घालत असू तेव्हा पाहणाऱ्यांकडून आम्हांला बँडवाले पाटील अशी चिडवाचिडवी केली जात असे. आमच्या लहानपणी वागळे की दुनिया नावाची खूप गाजलेली विनोदी मालिका दुरदर्शन वरुन प्रसारित होत असे. त्या मालिकेतही एकाच कुटुंबातील सर्वजण एकाच रंगाचे व डिझाईनचे कपडे घालत असत...मग आमच्या घरी कुणी आलचं तर आम्हां तिघींना वागळे की दुनिया काय म्हणते?’  असा सवाल भेटायचा.
        साडीतलाच लुगडं नावाचा प्रकार तर खुपच सुंदर व अद्भूत म्हणावा लागेल! आजही आमच्या घरी बाळंतपण आलं तर, लगेच फोनवरुन आजीला निरोप जातोच...अमूक तारीख दिलीय बाई...एक चांगल्या धडीच लुगडं बाजूला काढून ठेव. कारण नंतर त्याचे छोटे मोठे तुकडे करुन जगात आलेल्या इवलुशा पिटुकल्या जीवाला त्यात लपेटल जातं. यथासांग ते रांगेपर्यंत अशा लुगड्यांचा बाळासाठी उपयोग केला जातो. अशा लुगड्यांची ऊब म्हणजे आईच्या मायेची पाखर जणु!
        .......हे आणि असं बरचं काही...या विचारांतच बेडरुम मध्ये सहज घड्याळाकडे लक्ष गेल तर...५ वाजले होते. माझ्या आवडत्या चहाची वेळ झाली. साड्यांचा ढीग आवरला. मस्त नीट रचल्या त्या कपाटात एकावर एक अशा. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी जिवलग मैत्रिणी रांगेत उभा राहून सुंदर फोटो काढतात...दिलखुलास हसतात अगदी तशाच या रचलेल्या साड्या मला भासल्या! मग वाटलं यांना एक छान घर देऊ रहायला...Amazon वरुन लगेच एक साडी बॉक्स बुक करुन टाकला, साड्या ठेवायला. साड्यांकडे पाहता पाहता आदरणीय कवयित्री शांता शेळके यांच्या पैठणीवरील काही ओळी गुणगुणगायचा मोह काही केल्या मला आवरेना...


खस हीन्यात माखली बोटे पैठनीला केंव्हा पुसली,
शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली....
वर्षांमागून वर्षे गेली, संसाराचा स्त्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला...... 
                                                                                   
                                                                  - शैलजा खाडे पाटील

...................................................................................................................

                                                                                                                                                   



                                          

   

No comments:

Post a Comment