Thursday, 20 April 2017

इ'मॅजिका'तल अफलातुन 'मॅजिक'!

  इमॅजिकातल अफलातुन मॅजिक’! 

शैलजा खाडे-पाटील.
     
आनंदनि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. कोणती बाजू केव्हा समोर येईल, सांगता नाही येत. संसाराच्या रहाटगाडग्यात तळाशी हात नेऊन धडपडत जमेल तस आनंद चाचपण हा माणसाचा जन्मजात गुण आहे. कुणाचा आनंद कशात आहे हे ज्याच त्याला ठाऊक. समाजाच्या चौकटीत राहुन आनंद उपभोगणारे वेगळे, अन् ती चौकट मोडून यथासांग, बिनधास्त आनंदाच्या वाटेवरुन चालणारे नव्हे तर चक्क पळणारे वेगळे.यातला कोणता आनंद मोठा नि कोणता छोटा हे मोजणं म्हणजे शुध्द वेडेपणाच ठरावा. आनंदाला कोणतही मोजमाप नाही हेच खर. एखाद्याला बी पेरण्यात आनंद मिळतो..तर एखाद्याला पेरलेल्या बी ला फुटलेला कोवळा अंकुर पाहण्यात व त्या अंकुराला कुरवाळण्यात आनंद मिळतो. एखादा त्या रोपट्याच्या पानां-फुलांमध्ये त्याचा आनंद शोधतो. तर एखादा त्या झाडाची मधुर, रसाळ चाखण्यात आनंद मानतो आणि इतरांनाही त्याची चव देऊ करण्यात राजीखुशी होतो. कवी गुलजार बोलतात, कल खुशी मिली थी, जल्दी में थी, रुकी नही...काहींच्या बाबतीत अस घडत. आयुष्यात आनंद येतो पण तो आनंद आला कधी नि गेला कधी याचा थांगपत्ताही लागत नाही इतका तो क्षणिक असतो. पण या क्षणिक आनंदाच्या जाण्याने कोलमडून न पडता परत नव्याने जो आनंदाचा शोध घेतो तोच आनंदी आयुष्याची कथा सुफळ संपुर्णम करण्यात यशस्वी होतो.
      अविरत आनंद शोधण्यात माणुस वेगवेगळ्या वाटा धुंडाळत असतो. गावाकडच्या आनंदाच्या वाटा या शोधाव्या लागत नाहीत. त्या आपोआप निसर्गतः तिथल्या माणसाला आपल्या कवेत घेत असतात. मग ते सुर-पारंब्या खेळणं असो की, दोस्तांसोबत विहिरीत सुर मारुन डुंबण असो. मस्त शेतातल्या खळ्यावर हुरडा-भाकरी खाणं असो नाहीतर, गुरा-ढोरांच्या पाठीवर बसुन जोरजोरात गाणी म्हणणं असो. अशा आनंदाला जगात तोड नसते. पण तोच सर्वसामान्य माणुस जर शहरात राहणारा असेल तर त्याला त्याच्या नि त्याच्या कुटुंबाच्या आनंदासाठी खिसा थोडा सैल करावाच लागतो. शहरात ना शेत ना विहीर, ना खळे, ना गुरे-ढोरे! मग असा माणुस पाण्यात डुंबायची, लाटांवर तरंगायची, मजा मस्ती करायची विविध ठिकाणे शोधुन काढतो.
      अशा माणसाला अशी ठिकाणे शोधत शोधत मौजमजा करायला व एकंदरित आनंदाच्या जोशात Vibrant व्हायला एक ठिकाण सापडत-Adlabs Imagica! बसल्या बसल्या इंटरनेट वर तो माणुस या ठिकाणची माहिती काढतो. सवयीप्रमाणे तो पहिल्यांदा तिथल्या तिकिटांचा दर पाहतो. महिन्याभरातल्या हिशेबांची गोळाबेरीज करुन चार पैसे तो गाठीला बांधतो,  नि त्याच नि बायकोच तिकिटं बुक करुन टाकतो. तर असा सगळा कार्यक्रम झाल्यावर बायकोचा मुड बघुन येत्या सुट्टीला आपण इमॅजिकाला जायचय अस घोषित करुन तिला सरप्राईज देतो. हे ऐकल्यावर तिच्या हातातल काम भरकन गळुन पडत नि दोघजण प्रेमान मिठीत विसावतात. एकमेकांना जायच्याच कल्पनेने आनंद गवसतो. एक सत्य असं की आनंद कधीही लपुन राहत नसतो. एव्हाना शेजाऱ्यांनाही याची चांगलीच कुणकुण लागलेली असते. मग कुठलीतरी बाई पचकन बोलते, कशाला ती थेर? आम्ही नाही बाई कुठ जात येत..नुसती उधळपट्टी ती..खाव-प्याव नि घरात गप गार बसावतर दुसरा कुठलातरी म्हातारा बडबडतो,  आमच्यावेळी नव्हता असला थाट, वणवण करीत जा नि विकतच दुखणं घरी घेऊन या कुणी सांगितलय?  जाईतोवर नवरा बायको दोघांचीही अशा बोलण्यांना प्रत्युत्तर द्यायची केविलवाणी धडपड सुरु असते. तो बोलतो, अहो तेवढाच बदल! आता नाही तर मग कधी आनंद मिळणार? अर्ध्या शेणी मसणात गेल्यावर?..फिरल्याशिवाय जग तरी कस कळणार, उरलेल आयुष्य जगायला ऊर्मी कशी मिळणार? तेवढाच आपल्या पोतडीत अनुभव, उगीच का कोणी म्हटलय-केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार! तर हीचाही  शेजारणीला आपण उधळपट्टी नाही तर आनंद उपभोगायला जातोय हे सांगण्याचा कसोशीचा प्रयत्न चालु असतो. अहो फुकटचा आनंद नि विकतचा आनंद!  काहीही असल तरी आनंद हा शेवटी आनंदच असतो..घरातल्या चार भिंतीच्या आत उष्टी-खरकटी आवरण्यात, पोरांची हागणी-मुतणी काढण्यात नि दागिने-साड्यांवर भंपक चकाट्या पिटण्यात कसला आलाय आनंद? हे तर रोजच जगणं झाल ना. त्यापेक्षा जो आनंद कधी उपभोगलाच नाही किंवा तो रोज रोज मिळणार नाही असा आनंद-खुशी-समाधान-हास्य मिळवायला आम्ही चाललोय इमॅजिकाला! हे ऐकून शेजारीण चरफडत राहते. वॉटर पार्कच ठिकाण असल्यान तिथ साडी चोळी घालुन आनंद उपभोगता येणार नाही असं नवरा त्याच्या बायकोला आठवण करुन देतो. तीही मस्त १/४ आणि टी-शर्टच पॅकिंग करते. मनातल्या मनात अशा आनंदाला समानार्थी असलेले कॉलेजचे दिवस ती आठवत राहते.
     मग दोन्ही पाखरं आनंदाच्या प्रवासाला निघतात. आनंदाची वाट खुपच मजेदार नि मनाला मोहुन टाकणारी असते. रोज-रोजचा धोपटमार्ग सोडुन अंतःकरणातील सुप्त इच्छांना उजाळा देणारी असते. या वाटेवरुन चालताना स्वतःला विसरायला होत. आनंदाच्या या प्रवासात तो डोळ्यांवर झकपक गॉगल चढवतो. ऑफिसातले रटाळवाणे पीसी मेल्स डोळ्यांसमोर येऊ नयेत म्हणुन काळजी घेत राहतो. बॉसचे प्रोजेक्टबद्दलचे शब्द कानात घुमु नयेत म्हणुन कानातल्या नाजुक पडद्याआड ते शब्द तात्पुरते गुंडाळून टाकतो. तीही मुंबई-पुणे-मुंबई मधल्या का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे..मध्ये हरवून गेलेली असते. त्या गाण्यातल्या सुरामध्ये ती किचनमधल्या कुकरच्या शिट्टीचे सुर चुकुनही मिसळु देत नाही. किंवा उप्पीटात लिंबाची बी नव्हती ना? फॅन नीट बंद केलेत का? की आज चहात आलं घालायचच राहुन गेल? अशा पाचकळ प्रश्नांना तिच्या मनात मुळीच स्थान नसत.

      आज ती फक्त तीच असते आणि तो फक्त तोचअसतो. तशी एरवी  दोन्ही पाखरं प्रेम-बिम सांभाळुन  आपापल्या कामाच्या अवकाशात उडणारी...एकमेकांना हवा तितका नि हवा तेवढा स्पेस देणारीच असतात. पण तरीही संसाररुपी काळजीची जाण ठेऊन इमॅजिकामध्ये गेल्यावर आपापली स्पेस सांभाळुनच आनंद लुटायचा, कुणाची कुणावर सक्ती नको की अतिभक्तीही नको. असा ठराव परस्परांत समंत करुनच दोघेही निघालेली असतात.
     आनंदाचे डोही...आनंद तरंग या लयीतच दोघेजण त्या माहोलात पाऊल टाकतात. पाहतात तर सगळीकडे रंगीबेरंगी पाखरांप्रमाणे सगळी बाया-माणसं उडत्या पावलांनी वॉटरपार्क कडं झेप घेत असतात. त्यातल्या दोन पाखरांनी सॉरी पोरींनी बाह्या नसलेली आखुड पोलकी नि अर्ध्यामुर्ध्या चड्ड्या घातलेल्या पाहून तिच्या गावरान मनाला थोड थिजायलाच होत पण, आता मात्र आचार-विचार-पेहराव-मॅनर्स या सगळ्यांना तिलांजली देऊनच हीथला आनंद लुटायचा असा दोघंही निर्धार करतात. माणसांनी भरलेल्या ऊरात धडकी भरवणाऱ्या झुलत्या तबकड्या, मोठ्या मोठ्या लोखंडाच्या रुळांवरुन पाहीजे त्या वेगात, वाकड्या-तिकड्या दिशेत माणसांना घेऊन फिरकतेले डबे आणि त्यांतुन बाहेर पडणाऱ्या माणसांच्याच कर्णकर्कश तेही आनंदाच्या किंकाळ्या! हे सगळं तिला बेहोश करायच तेवढं बाकी ठेवतात. हा अनलिमिटेड आनंदाचा पसारा पाहुन आपल्या देशाच्या जगातील सर्वांत मोठ्या राज्यघटनेची आठवण अचानक तिला होते. त्यातल्या १९ कलमांतर्गत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर उपभोग कसा घ्यायचा याचा धडा तिला याक्षणी मिळाल्यासारख वाटत राहत. या स्वातंत्र्यामुळच तर आपण जीवनातील खराखुरा आनंद हवा तसा नि हवा तितका उपभोगु शकतो हे निर्विवाद सत्य तिच्या मनात ठसत राहत...
     तुझ Social Mind जरा बाजुला ठेऊनच आनंद घे असा नवऱ्यानं दिलेला सल्ला ती या खेळांच्या धबडग्यात जाम विसरलेली असते. हा मोठा डोंगर कसा बर पोखरला असेल? खेळांची एवढी मोठ्ठी मोठ्ठी नि लांबडी प्लास्टीक, फायबरची नळकांडी कशी तयार केली असतील? ती या पोखरलेल्या डोंगरात कुशलपणे कशी बर बसवली असतील? मुख्य म्हणजे वॉटरपार्क म्हणजे पाण्याशिवाय काहीच नाही. मग जवळ-जवळ लाखो लिटर पाणी कुठुन बर आणत असतील? बर ते आणलं ते आणलं तेचतेच पुर्नप्रक्रिया करुन वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज, जनरेटर, बॅटरीसंच, हे कस जमवल असेल? माणसाच्या आनंदाचा हा खेळ मांडताना या डोंगरामध्ये वसलेल्या पर्यावरणाची किती टक्के हानी झाली असेल? अगोदरच्या पर्यावरणाच्या आनंदावरच का बुलडोझर फिरला नसेल? याआधी हीथली हिरवीगार झाड, पक्षी, प्राणी, फळं-फुलं, ही सगळी वनसंपत्ती भुईसपाट करताना कायद्याचा कितपत आधार घेतला असेल? शेजारच्या गावातल्या कितीतरी पोरां-पोरींना चांगला रोजगार मिळाला असेल? आपण हीथ आनंदासाठी आलो..म्हणजे आपल्या आनंदावर त्या रोजगारी पोरां-पोरींची कुटुंबच्या कुटुंब दोन वेळची भाकर आनंदानच खात असतील नाही का? छे! तिचं social mind अगदी सोसल तसं प्रश्नांचा भडिमार तिच्या मेंदुवर करीत असत. तिचा असा प्रश्नोत्तर चेहरा पाहून तिच्या नवऱ्याला याची शंका न आली तर नवलच! तो पुन्हा तिला भानावर आणतो. चला आनंद लुटायचाय किनी...Let’s feel अफलातुन Magic..!

      असे भरभरुन जगा की उद्याच तुमच्या जीवनाचा अखेरचा दिवस आहे आणि एवढे शिका की तुम्हाला जसे काही अमरच रहायच आहे.या महात्मा गांधीजींच्या विचारांची मांड मनात पक्की करुन ती त्याच्या सोबतीनं चालु लागते. काही नाही आज भरभरुन आनंद घ्यायचा व तो कसा घ्यायचा हेही शिकायचच. सुरुवातीलाच, वॉटर पार्क चा स्टाफ कॉटन कपडे खेळात चालणार नाहीत. तर आमचे कसल्या ब्रॅंडचे सिल्क चे कपडे विकत घ्या अशी विनवणी करीत असतो. ती मात्र ही बाब धुडकावून लावत असते. स्वदेशीचा नारा देत, आम्हाला फसवायच कारण नाही अस सुनावते. परंतु, पाण्यातल्या घसरगुंड्या खेळताना सुती कपडे त्यावरुन सरकायला कठीण जातात, सिल्क चे सर्रकन सरकतात त्यामुळं खेळाचा विनाअडथळा आनंद लुटता येतो. हे शास्रोक्त कारण तिला खेळ खेळताना कळुन चुकत! पाण्यात गेल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवुन लहान निरागस मुलांप्रमाणे खेळु लागतात..कधी एकेकाळी गावातल्या उसातल्या पाटाच्या पाण्यात असेच ते तास न् तास खेळत रहात..त्या शुभ्र पाण्याला तहानलेल्या बैलांचं तोंड लागलेल असायच, त्याच पाण्यात उसातल वाडं काढुन आलेल्या वडिलांच्या घामाचा थेंबही मिसळलेला असायचा तर त्याच पाण्यात भांगलुन दमलेल्या हातपाय धुणाऱ्या माय च्या पायाचा चिखल पण तरंगायचा. कुठं गेलेत हे सगळे? या सर्वांच प्रतिबिंब तिला या फेसाळलेल्या पाण्यातही दिसत असत. असं काही तरी...
     एरवी तिला केस मोकळे सोडायला अजिबातच आवडत नसतात..पण आज ती गळ्यात मोकळे केस सोडुन मोबाईल मधल्या सेल्फीला पोझ देत असते. तो ही मस्त कॅप घालुन चांगलाच खुललेला दिसुन येत असतो. एकंदरीत दोघांचीही तरल नि नाचरी अवस्था झालेली असते. रोजच्या जिंदगीत ती खुपच धाडसी, बिनधास्त, निडर असते ती सगळे उंच उंच मोठ्ठे मोठ्ठे गेम खेळणार. तो खुपच एकलकोंडा, थोडाफार बुजरा, शांत त्यामुळ तो मागे मागे राहूनच आनंद लुटेल अशी अंदाजांची घुसळण दोघांच्याही मनात होत आलेली असते. पण, खरी गंमत अशी की  या घुसळणीतुन बाहेर आलेल वास्तवाच लोणी मात्र, दोघांनाही चक्रावुन सोडणाऱ्या अशा निराळ्या नि भलत्याच चवीच निघालेल असत. कारण हवेनं टम्म फुगलेल्या गोलाकार नावेत ती नुसत बसायलाच घाबरत असते मग त्यातुन घसरगुंडी खेळणं तर लांबच. पण तो तिला धाडस देउन देउन असे २-४ गेम खेळायला लावतोच व  नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे यावेत असे एकापेक्षा एक बिनधास्त अशा खेळांचा आनंद तो स्वतःही लुटत असतो.
हे पाहुन दोघांनाही पुन्हा नव्यानेच एकमेकांची अशी आगळीवेगळी ओळख होते. मिळालेल्या आनंदी क्षणांचे सोने करायचे या निर्धाराने दोघेही झपाटलेले असतात. पाण्यातले खेळ खेळताना, उंचावरुन घसरगुंडीतुन येताना अस्सा काही पोटात गोळा येत असतो की शप्पथ्थच! अशावेळी हाताची नव्हे तर पायाचीही बोटे तोंडात जावीत असा अहो आश्चर्यम! आनंदी आनंद मनाला वेड लावत असतो. एखाद्याला जाता जाता ठेच लागली तर पटकन् आई गंअस तोंडातुन आपसुकच निघत पण त्याच्यासमोर जर अचानक वाघ येऊन उभा राहिला तर, बाप रे बापम्हणुन घाबरगुंडी उडते. मतितार्थ- मोठ्या न झेपणाऱ्या संकटात बाप म्हणजे वडिलच आठवतात, अर्थात यामुळ आईच्या मातृत्वावर खचितही शंका नाही बर का. संकटात सोडा पण आनंद लुटतानाच्या अफलातुन भीतीने की काय कोण जाणे, यावेळी मात्र तिचही सेम असच होत असत..पाण्यातले खेळ खेळताना भीतीनं ती गळुन जात असायची तेव्हा ती तो खेळ संपेपर्यंत पप्पा, पप्पा, पप्पा....अस ओरडल्याच ऐकुन बाकीचे खुपच हसत राहतात. त्याचवेळी मागे एकदा दाढेच्या ट्रिटमेंटसाठी भुलीच इंजेक्शन द्यायच्या वेळीही तिने...नुसता पप्पा, पप्पा, पप्पा.... असा जयघोष करुन सगळा दवाखानाच डोक्यावर घेतल्याची आठवण तिला या आनंदावेळीही मनातल्या मनातल्या हसायला लावते.
      अशा अफलातून इमॅजिकामध्ये Rain Dance ची ही सोय लावुन दिलेली असते. तिला नाचायला खुपच आवडत असत. ती गाण्याच्या तालांवर ठेका धरायला चालु करते आणि सोबतीला तोही थिरकायला लागतो. ते म्हणतात ना, “Life is not waiting for storm..It’s about to Dancing in Rain..! अस काहीतरी तिला फील होतं. दोघेही अक्षरशः देहभान विसरुन नाचतात. त्याच पावसात एक वयाची साठी पार केलेल जोडपंही मनमुराद नाचत असतं. न जाणे कुठल्या कुठल्या गोष्टींचे टेन्शन्स, राग, लोभ, आसक्ती, ईर्ष्या, मोह, मत्सर या मानवी अवगुणांना हा कृत्रिम पाऊस आपल्यात सामावून घेत घेत स्वतः मात्र नाचणाऱ्यांना आनंद देत असतो.

      तिला कृत्रिम पावसाची इतकी ओढ. तर अस्सल पावसाने तर बेधुंदच व्हायला होत तिला. अलीकडे..मस्त तुफानी पावसात भिजुन नाचणे ही तर तिच्या मनात नव्हे तर DNA मध्ये रसरसुन भरलेली गोष्ट. पण त्या अल निनोन सगळा लोचा करुन ठेवलाय ना तिच्या या पॅशन चा.
      तर, प्रशांत महासागरात असलेले ताहिती बेट आणि पेरु देशाच्या किनारपट्टीजवळुन वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह म्हणजेच अल निनो. याच्या प्रभावामुळे आजुबाजुच्या हजारो चौ. किलोमीटर भुभागावरील पाण्याचे तापमान वाढायला सुरुवात होते. यामुळं अल निनोच्या प्रभावाखाली येणाऱ्या विविध देश-प्रदेशांच्या पावसाच्या प्रमाणांवर याचा विशेष परिणाम होत असतो असच घडतय २-३ वर्षांपासुन नि पाऊस रुसुन बसतो माणसांवर. तर पावसात नाचताना  तिला हा अल निनो आठवायच कारण म्हणजे तुफानी, मनात धडकी भरवणारा पाऊस तिने गेली काही वर्षे अनुभवलेलाच नसतो. कारण हेच – अल निनो चा प्रभाव. छे! नाही पडला असा पाऊस आपण यायच मग अशा कृत्रिम पावसात भिजायला, नाचायला. माणसाच डोक पण ना कसलच्या काय सुधारलय..पावसावर पण त्यान मात केलीय म्हणायची. अशा पावसाचा प्रयोगही दुष्काळावर मात करण्यासाठी माणसानं करुन पाहीला. यासाठी त्याच्या छोट्याशा मेंदुनं ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याचा वेग नि दिशा यांचा अभ्यास केला. आणि थेट काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारुन पाऊस पाडला गेला. (मला वाटतय मी भूगोलावर न लिहिता आनंद या विषयावर लिहितेय आणि तुम्हीही तेच वाचताय पण थोडा ट्विस्ट हो!
      Rain Dance करीत करीत भुक लागते ना राव! एकदमच गाभाळलेल्या चिंचेसारख वाटायला लागत भूकेमुळे. मग मस्त वडापाव आणि कटिंग चहाची लहर येते. तिथल्या कॅंटीनकडं दोघांची स्वारी वळते. पण त्यांचा दैवदुर्विलास! पिझ्झा, बर्गर, कोक, शिवाय मेन्युच नसतो तिथे. मग ते पिझ्झा, कोक वर पोटभरुन ताव मारतात. इंटरनॅशनल वॉटरपार्क असल्यानं परदेशी पर्यटकांना ध्यानात घेऊन हे मेन्यु ठेवल्याच कळत. समुद्रासारखा फिल यावा म्हणुन तिथे निळ्याशार फेसाळत्या पाण्याचा मोठ्ठाला तलावही आनंदी प्राण्यांच्या सॉरी माणसांच्या दिमतीला असल्याचा दिसतो.
      तो आणि ती मग शिरतात त्या पाण्यात. तिथेही दोघांचा नागीणडान्स वगैरे होत असतो. त्या तलावातही पोर-टोरं, बाया-माणसं रंगीबेरंगी माशांसारखे इक़डुन तिकडे, तिकडुन हिकडे पोहत, डुंबत, नाचत, हसत, गात असल्याचे एकंदरित तिला दिसत. तिच लक्ष तलावाकडेला असणाऱ्या डीजे बॉय आणि सिक्युरिटी गार्ड कडं जात राहत, की जे दोघेही रणरणत्या ऊन्हात या माशांकडं सॉरी माणसांकडं तास न् तास पाहत उभे असतात. त्यांचे डोळे पण काय नशीब घेऊन आलेले असतात नाही की त्यांना अगदी रोज मनभरुन असा इतरांचा आनंद पहायला भेटत असतो. पण या कलियुगातही इतरांचा असा आनंद पहायलाही जिगरलागत भलेही तो आनंद पाहण्यासाठी चार पैसेच का मिळुदेत. त्यामुळं तिला या दोन माणसांचं भारी अप्रुपच वाटलं.
      तर अशा या आनंदाच्या प्रवासात शेवटचा टप्पा खेळतात ते नौकाविहाराचा. त्यात तो आणि ती नावेत बसुन तलावामध्ये नौकाविहार करतात. अशावेळी दोघेही अनाकलनीय आवेशात पाण्याची नव्हे तर आनंदाचीच कारंजी अंगावर झेलत आपला आनंद व्यक्त करीत असतात. दोघांच्याही मनात नुसता आनंदी-आनंदच रुंजी घालीत असतो हे विशेष. सोबतीला पाण्यातली नौका व्हलवताना आयुष्याची नौकाही दोघांनी निर्भर विचारांनी एकजुटीनं व्हलवायची अस काहीतरी डोळ्यांनीच एकमेकांना सांगुन जातात. पण आता घराच्या परतीचा Countdown सुरु झालेला असल्याने हळुहळु निघण्याची तयारी सुरु होते. कारण, Tomorrow has no end ह्याची तनमनाला जाणीव असते.

      परतीला मात्र शरीरावरचे आणि मनावरचे साचलेले मळभ दूर झाल्याने तिथल्या उत्तुंग आनंदाचा ठेवा, अनुभवलेल अफलातुन मॅजिक अंतरंगात साठवत दोघेही चालायला लागतात...! अशावेळी तिच्या डोळ्यांसमोर नकळत कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी येतात-
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणतं?
 पेला अर्धा सरला आहे असंसुध्दा म्हणता येतं,
 पेला अर्धा भरला आहे असंसुध्दा म्हणता येतं
 सरला आहे म्हणायच की भरला आहे म्हणायचं
  तुम्हीच ठरवा?......शैलजा खाडे-पाटील.


9 comments: