वजनम् पुराणम्...! -शैलजा खाडे-पाटील.
तिनं घायाळ
मनाने त्या दुकानातुन काढता पाय घेतला. बाहेर आल्यावर त्या दुकानाच्या काचेनं
व्यापलेल्या तावदानांमध्ये तिला तिचचं टुम्म फुगलेलं अस्सल भोपळी रुप चिडवु आणि
डिवचुही लागल. त्याचवेळी तिच लक्ष दुकानाच्या दारातच उभ्या केलेल्या चवळीच्या
शेंगेसारख्या कमनीय बांध्याच्या, घारे डोळे, कुरळे सोनेरी केस व बदामी रंगाचे डोळे
असणाऱ्या सुंदर तरुणीच्या पुतळ्याकडे गेल आणि नेमकं त्या पुतळ्याला तिने मघा आत
पसंत केलेला सुंदर नक्षीदार आकाशी निळ्या रंगाचाच टॉप चढवला होता. मग ती त्या
पुतळ्याकडे जरा ओशाळुनच पाहु लागली. जोडीला तिनं एक दीर्घ उसासाही टाकला. तो
मनमोहुक सुंदर टॉप तो निर्जीव पुतळा घालु शकतो पण माझ्यासारखी हाडांमासांची,
चालती-बोलती तरुणी घालु शकत नाही. जिथे जाईल तिथे कपड्यांसाठी, जागेसाठी आपल्याला
तडजोड करावीच लागते अस तिला वाटुन गेलं.
हल्ली हल्ली तर
हक्काचा जीवाभावाचा नवराही आपल्या ‘जाड्या रुपावरुन’ चेष्टा करु लागलाय. आपल
एकुलत एक लाडकं पिल्लु पण आपल्याला “ए ढब्बे मम्मे” म्हणुनच पण अजाणतेपणाने
का होईना बोलवत असत. श्शी काय हे कुठे नेऊन ठेवलय आपण स्वःताला? तरी
नशीब जगात खाय-प्यायच्या बाबतीत अशी मापं नाहीत..म्हणजे शरीराचं माप बघायच आणि मग
तेवढच खायचं असं काहीतरी..पण आता मात्र राहून राहून वाटतय मोजुन-मापुन-तोलुन खायला
हवयं. या वाढत चाललेल्या धुडाला आवर घातला पाहिजे. या विचारांत ती रममान असतानाच “अरे अरे काकु जरा बघुन चाला ना!” अस हुसकावत एक सुंदर तरुणी तिला नकळत थडकुन आत
दुकानात शिरली. “श्शी काकु?!!!” तिनं हटकलेला ‘काकु’ शब्द तिला खुपच झोंबला.
निदान ताई तरी म्हणायच ना आता कुठ
तिसावं लागलय मला. अस मनाशीच पुटपुटत ती मघा दुकानात चाललेल्या तरुणीच्या तंग जीन्स व स्लीव्हलेस ब्लॅक टॉपच्या पाठमोऱ्या आकृतीकडे
पाहतच राहिली आणि पुन्हा तेच..मनसोक्त कपडे घालण्यासाठी मनसोक्त खाऊन चालणार नाही
ही जाणीव तिला तिच्या रोजच्या जगण्यातल्या कटु अनुभवांतुंन होत होती.
या विचारांतच
ट्रॅफिकच्या बुजबुजटातुन ती घरी आली, अंग टेकलं. तिच गोंडस पिलु शाळेला गेलं
असल्यानचं तिनं आज शॉपिंगचा घाट घातला होता पण तिच्या त्या अवजड धुडामुळे तिच्या
या घाटावर पाणी पडलं होतं. मग थंडगार कोकम सरबतचे घुटके घेत घेत तिनं टी.व्ही. ऑन
केला. तर कुठल्यातरी रेसिपी शोमध्ये घरच्या घरी तुपातली जिलेबी कशी बनवायची दाखविली
जात होती. अमुक कप साखर..तमुक कप मैदा..शेर-पावशेर तुप अस सगळं चालल होत..तिला
तिच्या वाढलेल्या वजनाची आधीच चिंता लागुन राहिली होती त्यात ही जिलेबी पाहुन
तिच्या तोंडाला पाणी सुटु लागलं. मग वैतागुन तिनं चॅनल बदललं तोवर ‘टशन’ पिक्चर मधल्या “छलियॉं..छलियॉं ओ छलियॉं..” च्या तालावर झिरो फिगर मधली करिना कपुर ठुमकत होती परत गाडी आली ना फिगरवरच! परत तिनं चॅनल बदललं तर सई ताम्हणकर नि प्रिया
बापटचा ‘वजनदार’ चालला होता.
झ्झाल्ल..! सगळीकडे तोच तोच नि तोच ‘वजनदार’ माहोल! तिला स्वतःच्याच शरीराची चीड येऊ लागली. मग वैतागुन सरबत
पिलेला असतानाही, टाकला चहा मस्तपैकी.. तजेल्या चहाचा कप ओठांवर टेकवत तिचं अंतर्मन
तिच्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावू लागलं..तर ती ५ वर्षांची असतानाच तिला ‘सुदृढ बालक स्पर्धे’ मध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याचे तिच्या आईच्या कौतुकाचे बोल आजही
तिच्या कानात घुमत असत. शाळेमध्येही कबड्डी, खो-खो इ. खेळांमध्येही ती तिच्या बोजड
शरीरामुळे मोकळेपणाने कधी खेळलीच नव्हती. कॉलेजच्या दिवसांतही तिला वेगवेगळ्या
फॅशनचे कपडे कधी ट्राय करताच आले नाहीत. शाळा-कॉलेजच्या गॅदरिंग व नाटकांमध्येही
नाचणं तर लांबच पण एखाद्या ‘काकुबाई’ सारख्या आई, आज्जीचाच रोल तिला मिळायचा.
अशावेळी ‘अवजड वाहनास प्रवेश बंद’, ‘चल चल मेरे हाथी’ असे पोरांपोरींचे टोमणेही तिला बेजार करायचेत. कॉलेजात असतानाही तिच्या या
पुरीगत टम्म फुगलेल्या रुपड्यामुळं एखादा राजकुमार तिच्या आयुष्यात येऊन प्रेमा
बिमाची भानगड करणं पण शक्यच न्हवतं (अपवाद सौंदर्यावर भाळुन नव्हे तर विचारांवर
प्रेम करणाऱ्या पुरुषांचा) पण तिची बुध्दीचं एवढी अफाट असल्यानं नोट्ससाठी मात्र
तिच्याभोवती भल्या भल्या पोरांचा गराडा असायचा. एरवी वडापचा रिक्षावालाही
हीच्यामुळे ४ ऐवजी ३ च सीट्स बसायच्या म्हणुन ४ थ्या सीटचे पैसे हीच्याकडुनच वसुल
करायचा. सणावाराला किंवा एखाद्या घरगुती कार्यक्रमांमध्ये जाडेपणामुळं हीला साडी
नेसायची हौसच उरायची नाही पण त्यातही कधीतरी तिने ती नेसलीच तर मात्र सगळेजणं
तिच्याकडे अशा काही नजरेनं बघायचेत की जणु काही समोर रंगरंगोटी केलेल असं ‘भाताचं टोपलं’ च उभं आहे.
पण एक गोष्ट
तिच्याकडे अस्सल होती ती म्हणजे तिचे ‘चांगले विचार’, तिची ‘सद्सद् विवेकबुध्दी’. मग आयुष्याच्या अशा जळमटी वळणांवर तिला सतत वाटत रहायचं शरीर तर नाशवंत आहे
पण विचार चिरंतन राहतात..जसजशी वर्षे सरत जातील तसतशा शरीरावर सुरकुत्या चढत
जातील, ते आकसेल, थकेल पण आपल्या चांगल्या विचारांवर तर कधीच सुरकुत्या पडणार
नाहीत ते सदोदित राहतील..नाहीतर दिसायला ‘डावी’ असणारी माणसं विचारांनी
मात्र ‘उजवी’ असतात. शेवटी सौंदर्यालाही कोमेजण्याचा शाप असतोच की! या तिच्या विश्वासामुळं ती आजवर तिच्या वजनदार धुडाकडे दुर्लक्ष करीत आली
होती. लग्न जमतेवेळी तिची खरी कसोटी होती. वजनी कारणामुळे तिला बरेच नकार येऊ
लागले. मग तिनं थोड मनावर घेतल नी तात्पुरत का होईना मॉर्निंग वॉक व एखादा योगाचा
क्लास करुन करुन २-३ महिन्यांत फार जाड नाही पण आटोपशीर दिसेल अशी शरीराची ठेवण
केली. दुधात साखर अशी की तिच्या नवऱ्याने तिला पहिल्या भेटीतच सांगुन टाकलं की
त्याला साधी सरळ सालस व चांगली शिकलेली पोरगी हवीय..तिचं शिक्षण व चांगले
आचार-विचार याला त्यानं पहिल प्राधान्य देऊन लग्नाला होकार दिलाय. त्यावेळी तर
तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती मनातुन धन्य पावली. लग्नानंतरच हॉटेलिंग,
फिरणं, मग कसबस बाळंतपण मग बाळाच पालन पोषण यामुळं तिच तिच्या शरीराकडं अक्षम्य
असं दुर्लक्ष होऊ लागलं. आधीच वात्या भरलेलं शरीर त्यात बाळंतपणानंतर मात्र ते
खुपच अवजड बनलं. तिचं तिलाच तिच्या शरीराचं ओझ उचलता येईनास झाल. बी.पी. चा त्रास
सुरु झाला. रोज आरोग्याची एक ना एक तक्रार सुरु झाली. अस्वस्थच नि कससच होऊ लागल.
आपण आपल्या विचारांवर, मनावर प्रेम करायला शिकलो पण स्वतःच्या शरीरावरही प्रेम केल
पाहिजे तरच आपल आयुष्यमान वाढेल याची तिला वारंवार जाणीव होऊ लागली.
“नाकी डोळी छान आहे हो तुमची पण थोडं बारीक झाला ना मग आणखी
खुलुन दिसाल बघा”. “अगं लग्नात कशी होतीस बघ आणि आत्ता मात्र वाढता वाढता वाढे
झालयं की तुझं”. “काय, खाऊन पिऊन टुमटुमीत आहेस की तुझ्याकडं बघुनच कळत हो ते”. “ये बाई ते लेगिग्न्झ
वगैरे घालत नको जाऊस अग बघ तरी त्यातनं कशा त्या जाड्याजुड्या मांड्या बाहेर
डोकावतात बर नाही दिसत ते”. “आमच्या सुनबाई पहायला गेलो तेव्हा बऱ्या दिसत होत्या पण आता
हाड-पेरं शोधावी लागतात त्यांच्यात”. असे सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी इ. चे टोमणेवजा संवाद
तिला आणखीनच अस्वस्थ करीत असत. असचं एके दिवशी लेकराचे बाबा नि लेकरु पाठीवर बसुन
घोड्याचा खेळ खेळत होते. बाबा दमले लेकराला पाठीवर फिरवुन तेवढ्यात लेकरु पटकन्
बोललं “बाबा तुम्ही नका खेळत जाऊ
तुम्ही लगेच दमता आपली मम्मी ढब्बी आहे ना मग मम्मी हत्ती बनेल”! यावर दोघंही बापलेक खुप वेळ हसत राहीलीत. हे
ऐकुन मात्र तिचा आता तिळपापडच झाला कारण अरे आपल्या हाडा-मासांचच लेकरु आपल्याला
आपल्या बेढब व बोजड शरीरावरुन काहीतरी पाचकट बोलत म्हणजे काय! अर्थात त्याच वय तिच्या या जीव्हारी लागलेल्या
शब्दांचं गांभीर्य न कळण्याइतपत लहानच होत ही गोष्ट वेगळी पण..ही बाब तिच्या
अंर्तमनावर घाव करुन गेली. अरे याच लेकरासाठनं तर आपण गरोदरपणी व बाळंतपणानंतर
बकऱ्याच्या मुंड्या, काळीज, रक्ती, आत जाऊन लपाव अशा गुबगुबीत अंड्याच्या पोळ्या,
तर्रीदार सुरमई, गरम-गरम मोगरा बासमती नि त्याच्यावर तुपाची धार, खारीक, खोबरे,
बदाम, काजु, अशानं भारलेले असे डींकाचे लाडू, असा खुराक खाल्ला त्यानंतरची जागरणं व शून्य व्यायाम
यामुळचं तर आपला परत भोपळा झाला ना. दिवसेंदिवस तिच्या वजनाचा काटा पुढे-पुढे सरकत
होता. लेकराची पहिली वहिली शाळा..त्याचे नखरे, खाणं-पिण, अभ्यासाच्या वेळा,
नवऱ्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, त्याचे मित्र, ऑफिस स्टाफ यांची रेलचेल,
नातेवाईक, शेजारी-पाजारी, जोडलेले, रक्तातले, इ.इ.इ. च येणंजाणं..मध्येच सण-वार,
व्रतवैकल्ये, आजारपणं, वेळी-अवेळी खाणं, वेळच मिळत नाही म्हणुन स्वप्नातच चालु
असलेला व्यायाम आणि सोबतीला सणावाऱ्यातल्या पुरणपोळ्या, करंज्या, खाजे, कानोले,
गुलाबजामुन, श्रीखंडपुरी इ खुराकाचा डोस! या सगळ्या पसाऱ्यात ती इतकी हरवुन गेली की तिला स्वतःलाच स्वतः शोधणं कठीण
होऊन बसलं.
अचानक दारावरची बेल वाजली. तिचं लाडकं-दोडकं पिल्लु शाळेतुन
आलेल होत. ती अशा विचारांतुन बाहेर आली व त्याला तिनं खाणं-पिणं भरवलं तसं ते
धावलं खेळायला. मग ती स्वयंपाकाला लागली. पण; वाढलेल्या वजनाची चिंता तिला काही केल्या गप्प बसुच देईना. कित्येक वर्षांची
तिची अशा बोजड वजनाची झिंग उतरवायला काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं बनल होत. “अहो ऐका ना उद्यापासुन मीही तुमच्यासोबत जीमला येते.” तिनं झोपण्यासाठी अंथरुण टाकत टाकत नवऱ्याला
सांगुन टाकल. “अगं तुझा घरकामातुन,
मार्केटला येता-जाता होतो ना व्यायाम? मग कशाला जीम वगैरे भानगड..!” तो कामाचा लॅपटॉप बंद
करीत करीत तिला बोलला. “ हे बघा मी हे बोजड शरीर
घेऊन फार दिवस जगेन अस काही मला वाटत नाही आत्ताच माझ्या मागे कमी का दुखणी लागली
आहेत? मग बसा तुम्ही नि तुमचं
लेकरु दोघचजणं.” तिनं जरा चढ्या आवाजतच
नवऱ्याला सुनावलं. “अगं अस का बोलतेस बरं,
मलाही तुझी काळजी आहेच ना पण मला काय वाटत आपण प्रॉपर अशा डाएटीशीअनचा (आहारतज्ञ) सल्ला
घेऊयात म्हणजे तुला व्यायामाची व आहाराची एक योग्य दिशा मिळेल नाही का” हे ऐकुन ती खुदकन हसली,
मग झोपेत तिला ती बारीक झाली आहे व तो आकाशी निळ्या रंगाचा सुंदर टॉप चढवुन ती
बागेत दोरीउड्या मारत असल्याच्या अशा काहीतरी स्वप्नांची गाडी सुसाट पळु लागली....
अखेर तो दिवस
उजाडला...! सकाळपासुनच तिचा नवरा व
लेकरु तिला खाण्यापिण्यावरुन चिडवु लागल होत. आज डाएटीशीअन कडे जायच आहे. आजच काय
खायच ते खाऊन घ्या उद्यापासुन तुझा डाएट, व्यायाम सुरु होणार..दुधाची तहान ताकावर
भागवावी लागणार..चमचमीत..झणझणीत..तर्रीद्दार..हे शब्द आता फक्त दुसऱ्यांकडुनच
ऐकायचेस तु. खाय-प्यायचे मोठ्ठे-मोठ्ठे त्याग करावे लागणार. आम्ही कधी मस्त वेलची
पाकातले खव्याचे गुलाबजामुन खाताना आमच्या खाण्यावर तु अजिबात मन घालायचे
नाहीस..पाणीपुरी, मिसळ, पावभाजी, रगडा, मंच्युरिअन हे सगळं आता स्वप्नातच पहायच बर
तु! अस बरच काहीतरी तिला
सुनवायच चालु होत. जाताना मात्र तिने पाणीपुरीवर जाम रट्टा मारला व चांगल्या ३
सुक्या पुऱ्या संपवुन टाकल्या. चायनीज गाडीकडं तिच लक्ष गेलं पण नवऱ्यानं तीला आता
त्यागाची सवय करुन घ्यायला हवी याची जाणीव करुन देताच त्यांचा मोर्चा डाएटीशीअन
कडे जायला वळला.
“हे पहा, तुमच्या वयाच्या व उंचीच्या मानानं तुमचं २० किलो
वजन जास्त आहे. आपल्याला तुमच्या बॉडी मास इंडेक्स नुसार वजन कमी करायच आहे.
तुम्ही आजवर कसा आहार घेत आलात त्याचा रोजचा क्रम मला सांगा” डाएटीशीअन मॅडम तिला बोलल्या. “खरं सांगु का मॅडम मी सकाळी नुसतीच चहा घेते २ कप, दुपारी २
वाजता जेवण..परत संध्याकाळचा चहा व परत रात्रीच जेवणं. व्यायाम घरकाम व मार्केट ला
जाता येतानाचा होतो.” ती एवढुसं तोंड करीत
मॅडमंना बोलली. “हे पहा, घरकाम किंवा
दैनंदिन कामं हा अगदीच मर्यादित व्यायाम झाला तुमच्या शरीरात गेलेल्या कॅलरी
रोजच्या रोज प्रमाणात बर्न झाल्या पाहीजेत तरच तुम्ही फिट राहु शकता. सकाळचा
नाश्ता राजासारखा, आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारख हवं नेहमी. लक्षात ठेवा,
आपला ९०% आहार व १०% व्यायाम असं आपल्या चांगल्या आरोग्याचं गणित
आहे.याबाबतीत, जगात तीन प्रकारच्या व्यक्ति असतात,
१. काही व्यक्ति या पहाटे ५ वाजता ऊठुन फिरायला
जातात..फिरुन दमुन आलो म्हणुन दिवसभर खा-खा खातात. दुपारी जेवणानंतर मस्तपैकी २-३
तास आडवे होतात. यामुळे शरीरात चरबी साठत जाते व वजन वाढते.
२. काही व्यक्ति पटकन वजन कमी करायच्या नादात अतिव्यायाम
करतात व सोबतीला अतिडाएट करतात, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणतत्वे न मिळता शरीर
पुर्णपणे क्षीण बनतं जातं. प्रसंगी त्यांना व्हीटॅमीनचे डोस व कोर्सेस चालु करावे
लागतात.
३. आणि काही व्यक्ति सकस व चौरस आहाराची आणि योग्य
व्यायामाची सांग़ड घालुन वजन आटोक्यात ठेवतात. स्वतःचे आयुष्यमान वाढवुन समृध्द
बनतात.
आपल्याला
तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींपैकीच एक बनायचय. वजन कमी करण अवघड नाही तर कमी झालेल
वजन आहे तितकच आयुष्यभर मेंटेन ठेवणं हे खर आव्हान आहे. पण हे ज्याला जमलं तो
जिंकला!” डाएटीशीअन मॅडम हसतमुखाने
हे सगळं सांगत होत्या व दोघे ती आणि तो कानात जीव ओतुन हे सर्व ऐकत होते. तिच्या
मनानं तर आताच पक्क केलं होतं की आजपर्यंत आपण आपल्या आवडी-निवडीने सगळं कसं हवं
तसं खात आलो पण आता योग्य डाएट फॉलो करायचाच. “मॅडम जमेल ना मला सगळं हे?” ती थोडं कचरतच बोलली.
“खरतरं आजवर तुम्ही हवं ते खाल्ल, हव तस जगला. हे शरीर आहे. अगदी यंत्रासारखंच. याची जर हालचालच झाली नाही
तर त्याला गंज चढतो. तुमच्या शरीराची योग्य तेवढी हालचाल करा. व जोडीला योग्य आहार
घ्या. खाण्यासाठी जगु नका तर जगण्यासाठी खा. पाणी भरपूर प्या. मैदा, साखर, मीठ, व
तेल यांचा अतिरेक वाईटच. अधिकाधिक फळे, पालेभाज्या, व कडधान्ये खा. पॉलिश तांदळाऐवजी
हातसडीचा तांदूळ वापरा. दर एक – दोन महिन्याला सुर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन, राईस
ब्रान, ऑलिव्ह ऑईल ही तेले आलटुन-पालटुन वापरा. मांसाहारामध्ये मटन क्वचित खा
मात्र रोस्टेड फिश व चिकन तुम्ही प्रमाणात खाऊ शकता. कुठेही बाहेर गेलात तर
स्वतःचे खाण्या-पिण्याचे पर्याय तयार ठेवा. आग्रहाला बळी पडु नका. योग्य आहारात
समावेश नसलेल्या पदार्थांना नाही म्हणायला शिका. शेवटी डाएट म्हणजे काय? तर आपल्या शरीराच्या हालचालीनुसार त्या प्रमाणातच
कॅलरीज शरीराच्या गरजेनुसारच पोटात जातील असा आहार घेणे. या कॅलरीज अती झाल्या तर
त्याच फॅट बनायला लागत. शरीरामध्ये अधिकाधिक प्रोटीन्स व फायबर्स जायला हवेत.
त्यामुळे तुमची चयापचय शक्ती वाढायला मदत होते. प्रोटीन्स व फायबर्स असलेले अन्न
सेवन केल्यास तुमचं शरीर फिट – फाईन राहून थकवा येत नाही. कोण म्हणतं तुम्ही
व्यायामासाठी जीमच लावा?, योगाच करा. तर
सायकलिंग, स्वीमिंग, टेनिस, दोरीउड्या, किंवा न चुकता मॉर्निंग वॉक. यांपैकी
तुम्ही काहीही फॉलो करु शकता पण रोज न चुकता सातत्याने कमीत कमी अर्धा तास कोणताही
व्यायाम प्रकार तुम्ही करु शकता. हे सगळं फॉलो करा व मला दोन महिन्यांनी भेटा.” डाएटीशीअन मॅडम हे सर्व अत्यंत कळकळीनं त्या
दोघांना सांगत होत्या.
असं सगळं
आहाराच व व्यायामाच गणित मनातल्या मनात सोडवत ते त्रिकुट घरी आलं. दुसऱ्याच
दिवसापासुन तिने मॉर्निंग वॉक चालु केला. मग तो ही तिला स्वतःला वेळ मिळावा म्हणुन
बारीक-सारीक कामांत मदत करु लागला. शिवाय, तिला पहाटे लवकर उठवणे, तिच्या डाएटची
तयारी करुन ठेवणे, दुपारी झोपु न देणे व वारंवार या सगळ्यांसाठी चीअर अप करु
लागला.
ती ज्या सोसायटीत रहायची तिथल्या बायका फारतर भाजी, शॉपिंग व गप्पांचा
कट्टा अटेंड करायलाच बाहेर पडत असत. हे तिला ती जेव्हा सकाळ सायंकाळचा वॉक करु
लागली तेव्हा कळल. कारण सोसायटीच्या स्पोर्ट स्पेस मध्ये २-३ पुरुष माणसं सोडलीत
तर ‘बाई’ म्हणुन तिच व्यायामाला येत असे. मग अशावेळी
कुणी किचनच्या खिडकीतुन वाकुन बघत तर कुणी बाल्कनीतल्या तुळशीला पाणी घालता घालता
तिच्या या ‘दंगल’ अवताराकडे टकामका टकामका पाहत असे. एव्हाना
तिलाही अशा चोरट्या व विचित्र नजरांची सवय झाली. आपण स्वतःच्या चांगल्या
आरोग्यासाठी व्यायाम करतो, इतरांसाठी नाही या पक्क्या विचाराने नंतर तिनं
दोरीउड्या, स्टेप्स, आर्म्स-लेग्ज स्ट्रेचेस तसेच घरच्या घरी वॉल पुशअप्स, फ्लोअर
पुशअप्स, स्क्वॅट्स, सुर्यनमस्कार असा व्यायाम चालु ठेवला तोही सातत्याने. सोबतीला
योग्य आहारही नीट पाळला. चवी-ढवीच्या मोहजाळातुन तर ती कधीच बाहेर पडली.
आता हा दिनक्रम
तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनुन गेला. हळुहळु हवे ते परिणाम दिसु लागले. बेढब
शरीराला सुडौल आकार मिळु लागला. पाहणा-यांच्या नजरेत तिचं खुललेलं व्यक्तीमत्व
आत्मविश्वासा सकट भरु लागल.तिला जगण्याचा व एकंदरित फिट रहाण्याचा मंत्रच
मिळाला...तिच्या ‘असण्याबरोबरच’ तिच्या ‘दिसण्याचही’ ध्येय जसजसं तिच्या
टप्प्यात यायला लागलं तसतसं तिच्या आत्मविश्वासाचा वाराही आता अधिकच अनुकूल बनला व
आनंदाचे पंख लावून ती सुखा-समाधानाच्या गगनात झेपावु लागली....!
-शैलजा खाडे-पाटील.
------------------------------------------------------------------------------------------------
Very Nice... :)
ReplyDeleteThanks
DeleteNice
ReplyDelete