मुका पाऊस...!
..........By शैलजा खाडे, कोल्हापुर.
तिच्या
तोंडातुन गळणाऱ्या फेसाकडे नुसतच एकटक पाहत बसलेल्या बाब्यानं मधुनच आभाळकडं
पाहिलं...आणि नरड्याच्या शिरा ताणुन तो किंचाळला, “ आता बास कर की आता बरसायचा, सगळं धुऊन तर नेलस निदान मुक्या जनावराला तरी वाचु दे.” अन् तो गुडघ्यात तोंड घालुन रडु लागला. त्याच्या
रडण्याच्या आवाजाने सुकत चाललेल्या हिराने बाब्याकडं किलकिल्या डोळयानं पाहिलं.
नाक फेंदारुन एक दीर्घ ऊच्छवास् सोडला. माणसालाही लाजवेल अशी अपार करुणा भरलेल्या
तिच्या डोळ्यांतुन टपकन् अश्रु गळला. पाणी मुरलेल्या ओल्या जमिनीवर सर्वांगावर
सुया टोचाव्यात अशा गारठ्यात हिरा निपचित पडली होती. गेले आठ दिवस चाऱ्याविना तिचे
शरीर सुकत चालले होते. तिचे शेवटाल्या टप्प्यातले दिवस भरत आले होते. पोटाच्या
बाजुला असणारी कातडी सुकुन आतल्या हाडांचा सापळा पार खपाटाला गेला होता. बाहेरही
पाऊस अन बाब्याच्या डोळ्यांतल्या अश्रुंचा पाऊस याला काही अंतच न्हवता. हिरा
अधुनमधुन डोळे उघडायची बाब्याकडे पहात सुस्कारे टाकायची....त्यालाही तिच्यासोबतच
तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाची काळजी लागली होती. गावातल्या वेशीपर्यंत आलेले
पुराचे पाणी बाब्याच्या काळजाचा ठाव घेणारे होते. सर्व काही ठप्प झाले होते. ते
पाणी हा हा म्हणता बाब्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचले.
यंदाचा
पाऊस काही वेगळाच होता..ऊरात धडकी बसवणारा..डोळ्यांतले अश्रुही आटवणारा...पुरामुळे
गावातली निम्म्याहुन अधिकची वस्ती कधीच गाव सोडुन कोरड्या आसऱ्याला निघुन गेली
होती. पण बाब्याला त्याची लाडक्या गाभ असलेल्या हिराची काळजी गाव सोडवु देत
न्हवती. गावातल्या घरांचाच एकमेकांशी संपर्क तुटला होता. माणुस न्हवे चिटपाखरुही
फडफडु नये असा बेफाम पाऊस कोसळत होता.
तर सप्ताह सरला तरी ऊन्हाची कोवळी तिरीपही पडली
न्हवती. बाब्या घोटभर पाण्यावर आणि घरातल्या शिल्लक असल्या नसलेल्या धान्यावर
कसातरी जीव राखीत आला होता. मुठभर तांदूळ तो कोरडेच खायचा. चुलीतली राखही
पावसाच्या पाण्याने शिल्लक ठेवली न्हवती. तिथे खायचं शिजवायला काडी कुठली पेटवणार? घरातला असा एकही कोपरा शिल्लक राहिला नाही जिथे ओल नाही. दिवसभरात
हाहा म्हणता महापुराने रौद्र रुप धारण केले आणि पाण्याने बाब्याचा ऊंबरठाही पार
केला.
बाब्याने
घरच्या माळ्यावर आसरा घेतला. घर ते कुठले? ते घर बायको-मुलांच्या हसण्या-खिदळण्याला तसे पोरकेच होते. चार भिंती असलेली पत्रा
मारलेली जांभ्या दगडाची खोलीच ती. माळ्याच्या खालच्या अंगाला हिरा निपचित पडली. आता
मात्र बाब्याला चांगलेच रडु कोसळले..तो माळ्यावरुन खाली ऊतरला अन् हिराच्या गळ्यात
गळा टाकुन हमसुन हमसुन रडु लागला. तिच त्याची जगण्याचा अन् विरंगुळ्याचाही एकमेव
आधार होती. गावातही बाब्या त्याच्या नावाने कमी अन् हिराच्या नावाने जास्त ओळखला
जायचा. लग्नानंतर अवघ्या सहा-सात वर्षांत
कसल्याशा जीवघेण्या आजाराने त्याची बायको त्याला सोडुन गेली. पुन्हाच्यान नवीन
संसार थाटायचे त्याच्या मनातही आले नाही. पोटच्या पोराप्रमाणे तो हिराला सांभाळत
आला होता.
घराच्या
उंबऱ्याला लागलेले पाणी पाहुन आता मात्र बाब्याचे आवसान पार गळाले. पुराच्या
पाण्यापासुन वाचविण्यासाठी माळ्यावर तर तो हिराला चढवणे अशक्यच होते. त्यातल्या
त्यात त्याने पाण्यात डुबलेल्या जळणातले चार-पाच लाकडी ढोपरे घेतले नि चारी
बाजूंनी हिराच्या अंगाखाली सारले..जेणेकरुन थोडे तरी पाणी तिच्या अंगावर येणार
नाही. पुन्हा तो माळ्यावर जाऊन बसला. दोन्ही पाय जवळ घेऊन दोन्ही हातांची घडी
पायांवर ठेवली आणि हताश नजरेने तो हिराकडे पाहु लागला. तरीही दोन-चार तास झाले नि पाणी ऊंबरठा सोडुन
घरात शिरले...
हिराच्या पायाला पाणी लागले..हळुहळु पाणी पोटापर्यंत
चढले तशी हिरा हडबडली..थोड्याफार ताकदीनिशी तिने पाय झाडले..आणि जोरात ऊच्छ्वास
सोडला. हे पाहुन माळ्यावर बसलेला बाब्या खाली आला. आता तो कमरे पर्यंत पाण्यात
डुबलेला होता. त्याने त्याची ऊरली सुरली ताकद पणाला लावली व हिराच्या अंगाखाली
दोन्ही हात घालुन तिला हलवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या पोटातल्या जीवामुळे तिचा
अधिकचा भार तिच्या शरीराला हलुच देत न्हवता...काळ कसोटीचा होता..बाहेर पावसाने
जहरी थैमान घातले...निसर्गाच्या कहरापुढे
माणुस मात्र हतबल झाला. पाणी काही ओसरायचे नाव घेत न्हवते. बाब्या हिराला कवटाळुन
बसला.
त्याने
डोळे मिटले व देवाचे स्मरण करु लागला. काहीतरी चमत्कार घडावा अन् त्याचे नि हिराचे
प्राण वाचावेत असा धावा तो करु लागला. जसजसे पाणी वाढु लागले तशी हिरा धडपडु
लागली..बाब्या तिला घट्ट पकडुन बसला होता. हिरा बारीक आवाजात हंबरु लागली..तिचा
स्वतःचा जीव वाचावा म्हणुन ती निकराचा लढा देत होती की? बाब्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी तिथुन निघुन जावे असे तिला वाटत होते?......शब्दांविना मुकीच ती शेवटी..न बोलता येणाऱ्या
पावसासारखी.
“ये बाब्या चल ये लवकर बस ये.” गावातलाच बाब्याचा एक भला दोस्त् बाब्याला बोलवत होता. हा आवाज ऐकुन बाब्याला
हुरुप आला. पाहतो तो काय..दारात एक नाव ऊभी होती त्याच्यासारखेच गावातले लोकं त्या
नावेत होते. बाब्याने हिराभोवतीचा हात सोडला व ऊभारुन एक पाऊल नावेच्या दिशेने
टाकले..तोवर हिराचे हंबरणे ऐकुन तो जागीच थबकला! “आरं थांबलास का ये बीगी
बीगी नावंत एकचजण मावतुया आता परत माघारी मरायला कोण येतय हीथ डुबलेल्या घराला
बघाया, पाऊस
पार पिसाळलाय.” तो भला दोस्त बाब्याला बोलला. बाब्याने नावेवर एक नजर टाकली व पुन्हांदा
लाडक्या हिराकडे पाहिले..तिच्या पोटाकडे पाहुन तर त्याचे मन कालवले….
-----------------------------
चार-सहा
दिवस पाऊस वेड्यासारखा बरसुन गेला. होते न्हवते सगळे ओरबाडुन गेला. त्यात सरकारी
पंचनाम्यात नदीतुन वाहत आलेली एक जोडी टीव्हीवाल्यांसाठी ब्रेकींग न्युज
ठरली...हिरा-बाब्याची. मुका पाऊस मुक हिराला, तिच्या पोटातल्या मुक्या जीवाला नि बाब्याला
घेऊन गेला... अन् एका शेतकऱ्याच्या त्याच्या गायीवरल्या अपार प्रेमाची कहाणी भूतदयेच्या
लाटांवर तरंगुन गेली!
--------------------------------------------------- By शैलजा खाडे, कोल्हापुर.
खूपच हृदयस्पर्शी.....
ReplyDeleteकाळजाला भिडलं हे लेखन, खूपच छान शैलजा👍
ReplyDeleteHeart touching
ReplyDelete