जाणीव..!
By-शैलजा.
गटाराच्या
पाण्यामध्ये डुबलेली कपड्यांची पिशवी तिने ऊचलुन ऊराशी कवटाळली. तिच्या थकल्या-सुरकुतल्या
डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. पुढे चालायला तिने पाऊल ऊचलले पण ते दगडाहुनही जड
झाले होते. पोरीने केलेला अपमान तिच्यासारख्या स्वाभिमानी बाईला न पचणारा होता. तरीही ती पाऊल पुढे टाकणार तोवर तिच्या
डोक्यातुन झिणझिण्या आल्या..डोक्यावरचा पदर सरर्कन खाली गळला नि धाडकन् ती खाली
कोसळली. हे पाहुन मीरा क्षणार्धात धावली व आपल्या माय ला ऊचलुन तिने पाणी पाजले.
हळुहळु रेणु भानावर आली...
लेकीला उशाशी बसलेली पाहुन तिला समाधान वाटले. “वापस तु रुसुन ऱ्हाईली तर,
खरहुन तु नाही तर मीच तुले सोडून जाईन बा”, मीरा आपल्या आईला लटक्या रागातच बोलली. हे ऐकुन रेणुचे
डोळे मायेने पाणावले. तिने मायेने मीराच्या तोंडावरुन हात फिरवला व पुन्हा एकदा मायलेकीच्यात
मांडवली झाली. रेणुची लेक मीरा, गुणाने, स्वभावाने सर्वांना आपलसं करणारी,
रेणुच्या शिस्तीत, चांगल्या संस्कारात वाढलेली पण नशीबाने तिला जीवनाचा साथीदार
सच्च्या मनाचा भेटला नाही. त्याच्या वागण्यावरुनच दोघींच्यात वारंवार खटके ऊडत. आजतर
मीराने आईचा अपमान करुन गावची वाट दाखविली. मीराचे तिच्या नवऱ्यावर आंधळे प्रेम होते इतके
की त्याच्यासाठी ती रेणुला अलीकडे काहीबाही बोलत असे.
असे कित्येक ऊन्हं-पावसाळे रेणु तडजोडींच्या आधारावर ढकलीत आली होती. तडजोड
ते कुणाशी? जावई नावाच्या आडबाळ
प्राण्याशी!! तसं पाहिलं तर तिच
स्वतःच आयुष्यच एक तडजोड होत! दुसऱ्यांच्या घराचे इमले
चढवताना उंचावरुन पडुन तिचा नवरा गेला. पुन्हा अशाच बांधकामावर तिने
दगड-माती-विटा-सिमेंटची ओझी वाहुन चार मुलींचे पालन-पोषण केले. ऐपतीप्रमाणे
त्यांना शिकविले, लग्ने केलीत. बाकींच्या तिघींचे संसार छान फुलले, काही कमी पडले
नाही. पण मीराच्या बाबतीत संसाराची गाडी थोडी वेडीवाकडी वळणे घेत होती. तिचे
लव्हमेरेज होते. मुलगा ऐतखाऊ व व्यसनी असल्याचे रेणुच्या अनुभवी नजरेने जाणले
त्यामुळेच तिने ह्या लग्नाला विरोध केला. पण शेवटी आंधळ्या प्रेमात मीराच जिंकली.
त्या तिघी लेकींपेक्षा मीरावर रेणुचा अपार जीव होता. तशी आईला आपली सगळी मुलं
सारखीच. पण, पायातले पैंजण-जोडवी असोत, सुंदर साडी-चोळी असो, किंवा काहीतरी
चटक-मटक खायचे असो स्वतःच्या पोटाला टाच देऊन रेणुने मीराच्या सगळ्या हौस-मौज आजवर
पु-या केल्या होत्या.
पण लग्नानंतर मात्र मीराही
रेणुसोबत बांधकामावर जाऊ लागली. घरातले राशन-पाणी-भाजीपाला सर्वच मीराच्या कमाईवर
चालु लागले. नवरा म्हणुन तो कोणतेही कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडायला तयार
न्हवता. मीराशी गोडीगुलाबीने बोलुन तो ऐशोआरामी जीवन जगत होता. लेकीचे हे हाल
रेणुला पाहवत न्हवते. त्यात मीराच्या संसाराच्या वेलीवर एक सुंदर फुलही ऊमलले.
नातवाकडे पाहुन रेणुने जावयावरच्या रागाला आळा घातला. पण एका मुलीचा बाप म्हणुनही
तो ऐदी,व्यसनी माणुस निष्क्रिय ठरला. त्याच्या ऐदीपणाची थोडीही जाणीव मीराला होत
न्हवती हे आश्चर्य! कारण मीराचे
त्याच्यावरचे आंधळे प्रेम! तिच्या या प्रेमाचा फायदा
घेऊ तो मीराच्या कमाईवर जगत होता.
रुपाने उंचपुरी , लांब-सरळ नाक, नाकात
कानडी चमकी, नेहमी चापुन घातलेला केसांचा अंबाडा, गळ्यात मोहनमाळ, कानात लटके
झुबे, डोक्यावरती पदर, हातात डाळींबी रंगाच्या काचेच्या बांगड्या, बोलण्यात एक
आत्मविश्वासु करारीपणा, नि जोडीला पुरुषालाही लाजवेल अशी काम करण्याची ताकद...एका
नजरेत भराव अस रेणुच व्यक्तीमत्व! मीराच्या बाबतीत नेहमीच
धडपडीत राहिलेल्या रेणुला बाकीच्या तीन पोरींच्या रोषाला सामोरे जावे लागायचे. “माय तु पुन्हाच्यान मीरेकडच
कायहुन राहिले चाललीस, जराशान आमच्याकडं येईन जात बा, दोन घास आमच्यासोबतीन बी
खाईत जात बान”. अशी कुरकुर त्या नेहमी
रेणुपाशी करीत असत. पण रेणुच्यातील भाबडी आई मात्र मीराला सर्वतोपरी मदत करायला
तत्पर असे. बाकीची भावकी, शेजारी-पाजारीही रेणुला ती जावयाकडे राहणे कसे अयोग्य
आहे हे वारंवार पटवुन द्यायचा प्रयत्न करीत असत, पण रेणु सर्वांकडे दुर्लक्ष करुन
मीरा व तिच्या मुलावर अपरंपार प्रेम, मायेची पाखरण करीत असे.
म्हातारी जे काही किडुक-मिडुक
साठवुन ठेवत असे, ते सर्व काही मीरा व नातवासाठी खर्च करुन टाकायची. “मीरे म्हाय लेकरा वाईच
माज बी ऐकुन ऱ्हाय बा..सोड या बाबाचा नाद, त्यो तुले काय सुखं देऊन ऱ्ह्यायला बा? कुठतरी सडुन मरल
बे..हेच्या मागाहुन कस करताव तु सांग मले? चल आपण आपया गावाहुन
जातेल...शेती पिकवतेन..मस्त खातेल..मी जिते असेतुवर नि माह्या मागारी बी तुला
कायबी कमी पडुन न्हाय देणार बा..!” असं रेणु नेहमी मायेपोटी
मीराला बोलत रहायची. पण मीराचे मन त्या बेजबाबदार माणसांत एवढे गुंतले होते की
तिला आईचे हे शब्द जणु काही ऐकुच येत नसत.
आजचा सुर्य एक वेगळा दिवस घेऊन ऊगवलेला होता. “हे पाह्य लेकरा तुज्यासाटनं ही रंगीन गोंडापदराची साडी
आणलीन नि पोट्ट्यासाठी बी कापडं हायत ते चढवा नि पटापटा आटपुन देवळात जाऊन यीव बा” रेणु मीराला बोलली. हे
ऐकुन मीराला पण काही कळेना आजचा दिवस तर सणवार नाही, काही विशेष नसताना मायला काय
झाले? रेणु मात्र मनोमन आज खुषीत होती..कधी न्हवे ते
तिने आजचा दिवस एकदम खास व आनंदात मीरासोबत व
नातवासोबत घालवायचा असे ठरविले. ते तिघेही देवळात जाऊन आले. नातवासाठी
खेळण्यांची खरेदी झाली. घरी आल्यावर रेणुने गोड खायला म्हणुन खीर केली. बराच वेळ
ती खीर ढवळत होती.
उकळत्या
खीरीकडे पाहत तिच्या सुग्रास वासामध्ये रेणुचे मन कधी आठवणींच्या चवींमध्ये रंगुन
गेले कळलेच नाही. मीरा लहानपणी कशी हट्ट धरल्यावर रुसुन बसायची मग तिला साडीचा
झोका बांधुन त्यात झुलवल्यावरच तिचा रुसवा जायचा...एकत्र जेवताना पहिले ताट
मीरालाच..काहीही खाऊ असो, वस्तु असो पहिला मीरालाच...चौघी बहिणींच्यात बाहुला
बाहुलीच्या खेळात नवरी म्हणुन मीरा कशी नट्टापट्टा करायची..कशी मिरवायची..तर कधी
रेणुचीच ती आई होऊन तिला ऊगे ऊगे रागे भरायची...अशा विचारांत मग्न असतानाच..
रडण्याच्या आवाजाने रेणु भानावर आली. पाहते तो..ऊकळत्या खीरीत नातवाने हात घातला
होता त्याचा हात भाजल्याने तो रडत होता. हे एका क्षणात घडले. “हे पाह्य म्हातारे चल निग
हीथुन, तु जिती हय तोवर काय आमाला सुखं न्हाय मीराचे कान भरीत ऱ्हाती..आन आजि ह्यो
ऊद्येग करुन ठेवला बा तुनं पायताण पाह्य हे. चल ऊचल तुजे गटुळं नि चालती व्हय.” जावयाचे जिव्हारी शब्द
ऐकुन रेणु हमसुन रडु लागली. चुकलं म्हणुन माफी मागु लागली. “ गे म्हातारे ऊठ, नि बस
जाले आता. माय लेकराचा जीव खाऊन बसती का गे तु..परवाच्यान तुला आडविली तेहुन चुकी
जाली. आता तर माह्या संसाराची पाठ सोडन बा तुय चल निग’’. धावत पळत आलेल्या मीराने
पोराला उचलत रेणुला चांगलेच फैलावर घेतले. मीराचे हे शब्द रेणुच्या काळजापार गेले.
रेणुने रडत-रडतच गठुळे बांधले नि ती घराबाहेर पडली. जावई चांगलाच आनंदला त्याचा
चैनीसाठीचा अडसर आता दूर झाला होता. रेणु गावच्या गाडीसाठी स्टॅंडच्या दिशेने चालली.
पोराच्या हातावर दुधाची साय लावुन, काही वेळ मीरा शांत बसुन राहीली. तोवर
म्हातारीचे किडुक-मिडुक असलेली एक कातडी पिशवी मीराच्या नवऱ्याने तिच्यासमोर आणुन
टाकली. ती पण ऊकीरड्यात नेऊन टाक असे त्याने सुचवले. त्याला म्हातारीची एकही आठवण
घरात नको होती. जेणेकरुन ती पाहुन मीराला म्हातारीला पुन्हा रहायला बोलवावेसे
वाटेल. मीराने ती पिशवी घेतली. पण आईची वस्तुच ना शेवटी! ती पिशवी टाकायचे तिचे
काही धाडस होईना. म्हणुन तिने ती ऊघडली त्यातुन एक आरसा, एक तिच्या वडिलांचा व
बहिणींचा जुना डागाळलेला फोटो बाहेर पडला, शिवाय एक जीर्ण झालेले फाटके तुटके
पत्रही त्यात तिला दिसले. बऱ्यापैकी वाचता येत असलेल्या मीराने ते पत्र वाचायला
सुरूवात केली..
“माह्य ताय रेणुका, ह्यो
माजा शेवटाल घटका चालु हैन. अशेच मला वाटुन राहिलेय, तुज्याकडं पाहुनशान वाटतेय
आणखीन ऊम्मीदीने जगुन पाह्ये. पर ह्यो रोग म्हाय गिळणारेय. तिनी पोरींसारकीन तु
चौती पोरं म्हणुन मीरेले प्रेम, ममता दीऊन राहीली, तीचेकडे पाहुन कुणेलेबी वाटणार
न्हाय की त्यो एक दिसाचा जीव तुले एका रातच्यान चिखल-मातीच्या गड्ड्यात सापडुन
ऱ्हायला व्हता. तु त्याले ऊराशी कवटाळुन सक्कया मायहुन जास्ती जीव ववाळुन टाकला.
तुज्यावरच्या जिम्मेदारीत भर पडली. म्हणुनशान माज्या वावरातले दोन वाफे मी
तुज्याकडन सोपवित हाई. मोट्टा भाव म्हणुन तेवडाच माजा तुज्या संसारानं हातभार.
काळजी घीत रहा..आपयी भेट कवा घडन कळीत न्हाय. तुला भेटावसं नि बगावसं वाटुन
ऱ्हाईले बा..तुजी खुशाली कळीतोवर मी ह्या जगात असनं बी नसनं बी..तुजा दाद्या आंदा.”
ते
पत्र वाचुन पुरे होतोवर मीरेच्या डोळ्यांतुन घळघळ अश्रु वाहु लागले. तिला आंतरिक
जाणीव झाली की आजच्या दिवशीच ती रेणुला सापडली होती. म्हणुन...नवीन साडी, लेकराला
खेळणी, नि गोड खीर...! ह्या सर्वांचा अर्थ तिला
आत्ता कळला. सख्ख्या रक्ताच्या पोरींसाठी जेवढे कष्ट घेतले नाही तेवढे तिने या
परक्या मीरासाठी घेतले. इतक्या अठराविश्व दारिद्रयाचे भोग भोगणाऱ्या रेणुने
अक्षरशः पापण्यांचा झुला करुन मीरेला
लाडाकोडात वाढविले. या अगतिक जाणीवेने मीरेने पोराला ऊचलले नि स्टॅंडच्या दिशेने
धावत सुटली....
स्टॅंडवर
पोहोचल्यावर, मिरेची चातकी नजर रेणुला शोधु लागली...वेड्यासारखी सैरभैर झालेली
मीरा गावाकडच्या गाडीचा शोध घेऊ लागली..तेवढ्यात खिडकीच्या तावदानातुन शुन्यात नजर
लावुन बसलेल्या रेणुकडे तिची नजर गेली..मीरा पटकन् गाडीत शिरली. दोघींची नजरानजर
झाली. पोरासकट मीरेने आपल्या आईला कडकडुन मिठी मारली. रेणुला मीरेच्या मीठीत
लहानपणीच्या मीरेचा भास झाला. दोघींचीही मनं आनंदाने रडुन हलकी झालीत..तेवढ्यात
कंडक्टरने बेल मारुन मीरेला गाडीतुन खाली ऊतरुन जाण्यासाठी खुणावले. “हे अजून इक तिकीट द्या बे
मले ह्याच गावचं.” मीरा हसत कंडक्टरला
बोलली. हे ऐकुन रेणुने मीराकडे मोठ्या मायेने पाहिले तिच्या नजरेत रेणुला
सख्ख्याहुनही अधिकच्या प्रेमाची जाणीव लख्ख दिसली..!
--- शैलजा खाडे.
शैलजा खूप छान आणि मार्मिक कथा अतिशय सुरेख आणि मुद्देसूद ,भाषेची उत्तम बांधणी करून कथा लिहिलीयस ,अशीच अनेक सुंदर आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करणारी उत्तम आणि दर्जेदार लिखाण लवकरच वाचायला मिळो.👍👍
ReplyDeleteIts really nice blog..��
ReplyDeleteखरच खूपच भावनिक आणि हृदयस्पर्शी व्यथा सर्वांसमोर मांडली आहेस.आणि आईची माया ही आपल्या जीवनातील अनमोल रत्न असते. शब्दरचना खुप छान आहे.
ReplyDeleteझकास
ReplyDeletevery nicely written ... keep going 😊
ReplyDeleteवाह... अप्रतिम..
ReplyDelete